जन्मापासूनच आव्हानांशी खेळावे लागलेल्या दीपा कर्माकरची क्रीडा कारकीर्ददेखील अशीच काहीशी आव्हानात्मक होती. दुखापती, वाद खेळाडूच्या कारकीर्दीचा एक भागच असतात. जणू या दोन गोष्टी हातात हात घेऊनच चालत असतात. दीपाच्या बाबतीत यामध्ये एका गोष्टीची भर पडते. ती म्हणजे संघर्षाची. लहानपणापासूनच दीपाला दुखापती, वादापेक्षा संघर्षाचाच अधिक सामना करावा लागला. सपाट पाय असल्याने ही कधी जिम्नॅस्टिक खेळाडू होऊच शकणार नाही असा ठाम निष्कर्ष तज्ज्ञांनी काढला. दीपाला करावा लागलेला हा पहिला संघर्ष. या आव्हानाचाही तिने सामना केला आणि वडील दुलाल यांच्याकडे वेटलिफ्टिंगचे प्रशिक्षण घेता घेता ती जिम्नॅस्टिकपटू कधी झाली हे तिच्या वडिलांनाही कळले नाही. पण, दीपाला ठाऊक होते. तिने मनाशी जिम्नॅस्टिकपटू होण्याचीच खूणगाठ बांधली होती.
सपाट पायांचे आव्हान पेलतानाही दीपाने जिम्नॅस्टिकमधील ‘प्रोदुनोव्हा व्हॉल्ट’ हा सगळ्यात कठीण प्रकार निवडला. समोरच्या बाजूने उडी मारून दोन वेळा हवेत कोलांटी उडी घेऊन जमिनीवर परतताना दोन्ही गुडघे छातीजवळ घेऊन उतरायचे, असा हा आव्हानात्मक प्रकार. रशियन जिम्नॅस्ट येलेना प्रोदुनोव्हाच्या नावाने हा प्रकार ओळखला जातो. ज्या खेळाडूंमध्ये धाडस आणि जिद्द असते तेच या प्रकाराची निवड करतात. कारण, जिम्नॅस्टिकमधील हा प्रकार ‘मृत्यूची तिजोरी’ म्हणूनच ओळखला जातो. अगदी अलीकडच्या काळातील आघाडीची जिम्नॅस्ट अमेरिकेची सिमोनी बिलेसला तू कधी या प्रकाराचा विचार केलास का असे विचारण्यात आले, तेव्हा तिने मी मरण्याचा प्रयत्न करत नाही, असे उत्तर दिले. विश्वातील सर्वोत्तम जिम्नॅस्ट असलेल्या बिलेसच्या उत्तरातच या प्रकारातील आव्हान दडले आहे. हे आव्हानही दीपाने सहज पेलले. बिश्वनाथ आणि सोमा नंदी हे पती-पत्नी सावलीसारखे तिच्यासोबत राहिले.
हेही वाचा :व्यक्तिवेध: सुहास जोशी
प्रचंड मेहनत, चिकाटी आणि कर्तबगारीने दीपाने भारतात जिम्नॅस्टिकमधील यशाची मुहूर्तमेढ रोवली. दीपाला यश मिळेपर्यंत भारत जिम्नॅस्टिकपासून कित्येक मैल दूर होता. पण दीपाने हे अंतर इतके सहज पार केले की, ती आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणारी आणि पदक विजेती पहिली भारतीय जिम्नॅस्टिकपटू ठरली. आशियाई आणि जागतिक पदकांच्या रांगेत ऑलिम्पिक पदकाची उणीव होती. त्या स्वप्नाच्या अगदी जवळ ती पोहचली होती. पण, नशिबाने साथ दिली नाही. तिचे प्रयत्न ०.१५ गुणांनी कमी पडले. दीपाला चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले.
हेही वाचा : ‘अभिजात’तेची राजकीय पाळेमुळे
ऑलिम्पिकनंतरचा कालखंड मात्र दीपासाठी सर्वात खडतर होता. सलग स्पर्धा सहभागाने दुखापतींनी डोके वर काढण्यास सुरुवात केली. गुडघ्याच्या दुखापतीने तिला हैराण केले. शस्त्रक्रिया करून त्यातून ती बरी होत नाही, तोच उत्तेजक सेवनाच्या आरोपाने तिच्या कारकीर्दीला जणू पूर्णविराम मिळाल्यासारखा होता. पण, त्यातूनही ती उभी राहिली. ‘मी दीपा कर्माकर आहे… मनाशी ठरवते ते पूर्ण करते…’ असा दीपाचा जीवनाविषयीचा दृष्टिकोन होता. पण, वाढते वय आणि सरावाचा अभाव यामुळे दीपाच्या स्वप्नांना मर्यादा येऊ लागल्या आणि तिने अखेर खेळ थांबविण्याचा निर्णय घेतला.