‘‘हल्ली गल्लीबोळात सतराशे साठ पुरस्कार दिले जातात. पण मला संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला तेव्हा पहिल्यांदाच वाटले की, आजपर्यंत आपण जे काही रंगभूमीवर केले, जे गुणात्मक योगदान दिले, त्याचे खरोखरीच चीज झाले…’’ अभिनेत्री सुहास जोशी यांचे २०१८ सालचे हे उद्गार त्यांच्यातील विचारशील व्यक्ती आणि अभिनेत्रीचे लख्ख दर्शन घडवतात. असे चीज करणाऱ्या पुरस्कारांत आता भर पडली आहे ती आधुनिक मराठी रंगभूमीचा पाया रचणारे विष्णुदास भावे यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची. संपन्न घरात जन्म झालेल्या सुहास जोशी यांची नाटकाशी पहिली गाठ पडली ती कॉलेजात. तिथून पुढे ‘पीडीए’त ओळख घट्ट झाली. मग त्या नाट्यप्रशिक्षण घ्यायला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामात गेल्या. तिथे इब्राहीम अल्काझींचे मार्गदर्शन मिळाले. दरम्यान, त्यांनी संगीत विशारद ही पदवीही मिळवली होतीच. पण त्यात त्यांनी करिअर केले नाही. मुंबईत आल्यावर विजया मेहतांचे शिष्यत्व त्यांनी पत्करले. ‘बॅरिस्टर’, ‘गोष्ट जन्मांतरीची’, ‘आत्मकथा’, ‘आनंदी गोपाळ’, ‘कन्यादान’, ‘सख्खे शेजारी’, ‘कमला’, ‘किरवंत’, ‘चूकभूल द्यावी-घ्यावी’, ‘डॉक्टर, तुम्हीसुद्धा?’ अशा एकाहून एक आव्हानात्मक भूमिकांनी त्यांच्यातल्या कलावंताला सार्थक समाधान मिळाले. कुठल्याही भूमिकेचा शिक्का आपल्यावर बसू द्यायचा नाही हा त्यांचा निर्धार. म्हणूनच लक्ष्मीबाई टिळकांवरील एकपात्री प्रयोगाचे शिवधनुष्यही त्यांनी लीलया पेलून दाखवले. पुढे त्यावर आधारित दूरचित्रवाणीपटही त्यांनी केला. चित्रपटांतील कलाकारांना पाहायला नाटकाला प्रेक्षक गर्दी करतात हे लक्षात आल्यावर त्यातही आपला कस अनुभवायचे त्यांनी ठरवले.
हेही वाचा : उलटा चष्मा: माजी मंडळ
‘तू तिथं मी’, ‘सातच्या आत घरात’, ‘आनंदाचं झाड’, ‘अगं बाई अरेच्चा’, ‘आघात’, ‘झिम्मा’, ‘मुंबई-पुणे-मुंबई’ असे गिनेचुने चित्रपटही त्यांनी केले. त्यापुढचे माध्यमांतर होते मालिकांचे. ‘अग्निहोत्र’, ‘ऋणानुबंध’, ‘प्रपंच’, ‘किमयागार’ अशा मोजक्याच मालिकांतून त्यांनी हुन्नर दाखवला. पण दोन-तीनशे एपिसोड्सचे दळण दळणाऱ्या मालिकांपेक्षा आरंभ, मध्य, शेवट यांचा चपखल आलेख असलेल्या मालिकांचाच ओढा त्यांना होता. प्रेक्षकांनी ‘जाता-येता पाहण्याच्या’ मालिका करणाऱ्यांना त्यांचे सांगणे आहे, की तुम्हाला इथे दीर्घकाळ टिकायचे असेल तर सशक्त कथाबीज आणि सखोल विचारच हवा. म्हणून त्यांनी अलीकडे मालिका करणे थांबवले. अभिनय ही शिकायची गोष्ट आहे, खडतर मेहनतीशिवाय पर्याय नाही, हे नव्या कलाकारांना त्या कळकळीने सांगतात. अल्काझींनी केलेला वाचन-संस्कार त्यांनी टिकवला आहे, तसेच सजग नागरिक म्हणून ठाणे शहरातल्या सामाजिक, कला क्षेत्राशी त्यांनी स्वत:ला जोडून घेतले आहे. विष्णुदास भावे पुरस्काराने त्यांच्या या कारकीर्दीवर आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.