सिद्धार्थ खांडेकर

त्याची इथवरची झेप अलीकडच्या काळात गृहीत धरली जात होती. ज्या विश्वनाथन आनंदला डोम्माराजू गुकेशने गुरुवारी जागतिक गुणांकन (रेटिंग) यादीमध्ये मागे टाकले, त्यानेही याविषयी बोलून दाखवले होते. विश्वनाथन आनंद गुरुवार, ३ ऑगस्ट २०२३पर्यंत २७५४ एलो रेटिंगसह नवव्या स्थानावर होता. पण त्याने पारंपरिक प्रकारात बुद्धिबळ खेळणे जवळपास थांबवले आहे. त्यामुळे गेले अनेक महिने तो २७५४ एलो रेटिंगवर खिळून राहिला आहे. याउलट १७ वर्षांचा गुकेश भलताच सक्रिय असून, विविध स्पर्धामध्ये खेळत आहे. त्यामुळेच त्याच्या रेटिंगमध्ये वाढ होत आहे. नुकत्याच घेतलेल्या रेटिंग झेपेमुळे तो जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर पोहोचला आणि आनंद दहाव्या स्थानावर सरकला. गुकेशचे एलो रेटिंग सध्या २७५५.९ असे आहे. तो अझरबैजानमध्ये विश्वचषक स्पर्धेत खेळत असून, त्याच देशाच्या मिसरातदिन इस्कंदारॉवला सलग दोन डावांमध्ये हरवल्यामुळे त्याला पाच गुण मिळाले आणि तो आनंदच्या पुढे गेला. हे रेटिंग ‘लाइव्ह’ आहे. याचा अर्थ गुकेशच्या कामगिरीनुसार ते वरखाली होऊ शकते. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटना अर्थात फिडे दर महिन्याच्या सुरुवातीला क्रमवारी जाहीर करत असते. त्यासाठी आधीच्या महिन्यातली कामगिरी गृहीत धरली जाते. त्यामुळे ऑगस्ट महिन्यातील गुकेशच्या कामगिरीवरील रेटिंगवर शिक्कामोर्तब १ सप्टेंबर रोजी होईल. तोपर्यंत चांगली कामगिरी करत राहून आनंदच्या २७५४ एलो रेटिंगच्या वर राहण्याची क्षमता गुकेशमध्ये नक्कीच आहे. आनंदला ‘लाइव्ह’ रेटिंगमध्ये मागे सारणारा तो पहिला बुद्धिबळपटू नव्हे. तो मान जातो ग्रँडमास्टर पेंटाल्या हरिकृष्णकडे. १६ मार्च २०१६ रोजी ‘लाइव्ह’ रेटिंगमध्ये हरिकृष्णने आनंदच्या पुढे मुसंडी मारली होती. परंतु ही आघाडी अल्पकाळ टिकली आणि आनंदने पुढे काही चांगले डाव जिंकत गुणांची कमाई केली. त्यामुळे ‘लाइव्ह’ रेटिंगमध्ये हरिकृष्ण आणि आता गुकेशने आनंदला मागे टाकले, पण रीतसरपणे प्रसृत होणाऱ्या फिडे क्रमवारीमध्ये गेली ३७ वर्षे (जुलै १९८६पासून) आनंदला एकाही भारतीय बुद्धिबळपटूने मागे ओलांडलेले नाही. आनंदने विख्यात ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांना मागे सारत भारतीय बुद्धिबळपटूंमध्ये अव्वल स्थान गाठले आणि प्रदीर्घ काळ कायम राखले.

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Gukesh becomes youngest-ever world champion
D Gukesh: डी गुकेश विश्वविजेता! भारताच्या बुद्धिबळपटूने घडवला इतिहास
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
world chess championship loksatta
गुकेशच्या नवचैतन्याची कसोटी!
Arjun Erigaisi
व्यक्तिवेध : अर्जुन एरिगेसी
Numerology: अत्यंत विश्वासू असतात या ४ तारखेला जन्मलेले लोक, वाईट काळात देतात साथ
World Championship Chess Tournament Dommaraju Gukesh defeats Ding Liren sport news
जगज्जेतेपदाच्या दिशेने गुकेशचे पाऊल; ११व्या डावात डिंगवर मात

मात्र सुरुवातीस म्हटल्याप्रमाणे, ही परिस्थिती लवकरच बदलण्याची चिन्हे आहेत. २०१६ मध्ये आनंद सक्रिय होता, आता नाही. याउलट गुकेश जवळपास दर महिन्यात स्पर्धामध्ये खेळतो आहे. शिवाय त्याचा दर्जाही उच्च आणि सातत्यपूर्ण आहे. काही दिवसांपूर्वी २७५० एलो गुणांचे शिखर गाठणारा तो सर्वात युवा बुद्धिबळपटू ठरला होता. त्याच्या वाटचालीचा आलेख थक्क करणारा आहे. सप्टेंबर २०२१ ते ऑक्टोबर २०२१ या काळात तो २५९९वरून २६४० एलो रेटिंगवर झेपावला. म्हणजे एका महिन्यात ४१ गुणांची कमाई. ऑगस्ट २०२२ ते सप्टेंबर २०२२ या काळात तो २६९९ वरून २७२१ एलो रेटिंगवर झेपावला. म्हणजे महिन्याभरात २२ गुणांची कमाई. बुद्धिबळ खेळात वरचढ खेळाडूंशी सातत्याने खेळून आणि सातत्याने जिंकत राहूनच रेटिंग वाढू शकते. जितके रेटिंग वाढते, तितके अधिकाधिक सामथ्र्यवान बुद्धिबळपटू सामोरे येतात. यात पुन्हा दुसरे आव्हान म्हणजे, कमी रेटिंग असलेल्या खेळाडूंशी बरोबरी किंवा पराभव झाल्यास गुण गमवावे लागतात. या बहुपेडी आव्हानांचा सामना करत गुकेशची वाटचाल सुरू होती. मार्च २०१९ मध्ये गुकेश बुद्धिबळ इतिहासातील तिसरा सर्वात युवा ग्रँडमास्टर बनला. करोना महासाथीमुळे प्रत्यक्ष स्पर्धाच्या आयोजनावर मर्यादा आल्या आणि इतर अनेक खेळांप्रमाणेच बुद्धिबळपटूंसमोरही प्रगती आणि संधी खुंटण्याची समस्या उभी राहिली. आपण या काळात बुद्धिबळाच्या सखोल अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करू शकलो, असे गुकेशने एका मुलाखतीत म्हटलेय. त्याचा प्रशिक्षक ग्रँडमास्टर विष्णू प्रसन्नच्या मते, गुकेश त्याच्या पिढीतील इतर युवा बुद्धिबळपटूंप्रमाणे ऑनलाइन स्पर्धाच्या फार प्रेमात कधी पडला नाही. तसेच सुरुवातीस तो बुद्धिबळातील सध्याच्या अभ्यासासाठी अत्यावश्यक असलेली शक्तिशाली सॉफ्टवेअर्सही फारशी वापरायचा नाही. हा थोडासा आधीच्या पिढीतील बुद्धिबळपटूंच्या जवळ जाणारा प्रकार. स्पर्धामध्ये खेळत खेळत शिकण्याची त्याची सवय. करोनामुळे स्पर्धाच आटल्याने ती बदलण्याची गरज निर्माण झाली. तिथूनच मग अधिकाधिक ऑनलाइन स्पर्धा आणि तयारीसाठी इंजिनचा अधिक वापर सुरू झाला. २०१८ मध्ये निहाल सरीन, आर. प्रज्ञानंद आणि अर्जुन एरिगेसी हे युवा त्रिकुट ग्रँडमास्टर बनले. गुकेश त्यांच्यानंतर ग्रँडमास्टर बनला. पण आज तो २७५० एलो गुणांच्या पुढे गेला असून, पहिल्या दहातही आहे. याचा अर्थ उर्वरित तिघांची सध्याची कामगिरी कमी दर्जाची आहे असे अजिबातच नव्हे. प्रज्ञानंद आणि एरिगेसी आज २७०० एलो गुणांच्या वर आहेत, निहाल सरीन त्या टप्प्याच्या उंबरठय़ावर आहे. हे तिघे आणि गुकेश यांच्यातून भारताचा दुसरा बुद्धिबळ जगज्जेता निर्माण होईल असे अलीकडे बोलले जात होते. या शर्यतीत गुकेशने इतर तिघांवर आघाडी घेतली आहे हे मात्र नक्की.

गुकेशच्या नावावर काही महत्त्वाचे विक्रम नोंदवले गेलेत. माजी जगज्जेता आणि आजही जगातील क्रमांक एकचा बुद्धिबळपटू नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनला हरवणारा गुकेश सर्वात युवा ग्रँडमास्टर. तो जलद (रॅपिड) स्पर्धेतील डाव होता. गुकेशने अलीकडेच एका रॅपिड स्पर्धेत त्याला दैवतासमान असलेल्या आनंदलाही हरवले. त्यावेळी पटासमोर बसलेला गुकेश आपल्याला खूपच वेगळा, थंड आणि एकाग्रचित्त वाटला, असे आनंदने बोलून दाखवले. त्याचा हा थंडपणा अनेक बुद्धिबळपटूंना त्याच्या मनाचा आणि आकलनशक्तीचा थांग लागू देत नाही. गतवर्षी चेन्नईत झालेल्या ऑलिम्पियाडमध्ये त्याने एकाहून एक सरस विजय नोंदवले. यात अमेरिकेच्या बलाढय़ फॅबियानो करुआनाविरुद्धचा विजय विशेष गाजला. काळय़ा मोहऱ्यांनिशी खेळताना गुकेशने त्यावेळी जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या करुआनाला अस्मान दाखवले होते. पण अखेरच्या डावात मोक्याच्या क्षणी त्याला उझबेकिस्तानच्या नॉडिरबेक अब्दुससत्तारॉवविरुद्ध पराभव पत्करावा लागला आणि त्यामुळे भारताच्या ‘ब’ संघाचे सुवर्णपदक हुकले. सहसा विजयाच्या मालिकेनंतर अशा प्रकारचा पराभव खूप दु:खद अनुभव देणारा ठरतो. यातून खचलेले कित्येक बुद्धिबळपटू पुढे अभावानेच सावरल्याची उदाहरणे आहेत. गुकेशच्या कामगिरीवर त्या पराभवाचा फारसा परिणाम झालेला आढळला नाही. त्यामुळेच अलीकडच्या जगभरातील मोजक्या युवा बुद्धिबळपटूंमध्ये तो वेगळा ठरतो. त्याच्यातील या गुणाची दखल मॅग्नस कार्लसन, विश्वनाथन आनंद, माजी अव्वल महिला ग्रँडमास्टर ज्युडिथ पोल्गार यांनीही घेतलेली आहे.

गुकेश सध्या विश्वचषक स्पर्धेत खेळत आहे. ती जिंकून कँडिडेट्स स्पर्धा, तिथून जगज्जेतेपदाची स्पर्धा असा विलक्षण अवघड मार्ग आहे. कदाचित स्पर्धा खेळून रेटिंग आणखी वाढल्यास भविष्यात कँडिडेट्स स्पर्धामध्ये त्याला थेट प्रवेशही मिळू शकतोच. चांगला बुद्धिबळपटू, यशस्वी व सामथ्र्यवान बुद्धिबळपटू आणि जगज्जेता बुद्धिबळपटू हे तीन वेगवेगळे टप्पे आहेत. पहिल्या दोन टप्प्यांपर्यंत गुकेश आलेला आहे. पुढील मार्ग अधिक खडतर असेल. जगज्जेतेपद, ऑलिम्पियाड जेतेपद अशी अनेक आव्हाने आहेत. सध्या पुरुष आणि महिला बुद्धिबळ जगज्जेते हे चीनचे आहेत. पण सांघिकदृष्टय़ा विचार करता, भारत चीनला सरस ठरू शकतो आणि अमेरिकेला आव्हान देऊ शकतो. अमेरिका, चीन, भारत, तूर्त फिडेच्या ध्वजाखाली खेळणारा रशिया, अझरबैजान, उझबेकीस्तान या बुद्धिबळातील काही मोजक्या महासत्ता ठरतात. पटावरील या युद्धात भारतीय फौजेचा सेनानी सध्या तरी नि:संशय गुकेशच आहे.  

Story img Loader