भारताचा विख्यात बुद्धिबळपटू, माजी जगज्जेता विश्वनाथन आनंद वयाच्या १७ व्या वर्षीपर्यंत ‘ग्रँडमास्टर’ बनला नव्हता. १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर आनंद ज्युनियर जगज्जेता बनला. गुकेश त्या वयाचा होईपर्यंत बहुधा बुद्धिबळातील सीनियर जगज्जेता बनलेला असेल. आनंदने बुद्धिबळात जे मिळवले, ते अतुलनीय खरेच. पण त्याची गादी चालवणारा भारतात कोणी तयार होईल का, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या फंदात आता भारतीय बुद्धिबळप्रेमी फारसे पडणार नाहीत. कारण गुकेशच्या रूपात त्या प्रश्नाचे खणखणीत उत्तर मिळाले आहे. १२व्या वर्षीच गुकेश ग्रँडमास्टर बनला. या खेळाच्या इतिहासातील सर्वात युवा ग्रँडमास्टर बनण्याचा त्याचा विक्रम अवघ्या १७ दिवसांनी हुकला! भारताच्या ताज्या दमाच्या युवा ग्रँडमास्टरांच्या गटामध्ये गुकेश सर्वात तरुण. सुरुवातीच्या वर्षांमध्ये त्याच्यापेक्षा आर. प्रज्ञानंद, निहाल सरीन, अर्जुन एरिगेसीसारख्या उदयोन्मुख बुद्धिबळपटूंनी अधिक चमक दाखवली होती. तरीदेखील प्रसिद्धीचा किंवा प्रतिकूल तुलनेचा जराही परिणाम खेळावर होऊ द्यायचा नाही, ही समज गुकेशमध्ये खूप आधीपासून दिसून येते. ही परिपक्वता, त्या जोडीला मानसिक कणखरपणा आणि एकाग्रता या गुकेशच्या जमेच्या बाजू. आनंद आणि प्रज्ञानंद यांच्याप्रमाणेच गुकेशही चेन्नईकर. त्या शहरात एकामागोमाग एक गुणवान बुद्धिबळपटू कसे निर्माण होतात हा स्वतंत्र अभ्यासाचाच विषय ठरेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा