हरयाणाच्या नूह जिल्ह्याचे पोलीस उपअधीक्षक सुरिंदर सिंह यांच्यावर खाण माफियांनी डम्पर चालवल्यामुळे त्यांची हत्या झाल्याचे प्रकरण गंभीर आहे. हरयाणासारख्या छोटय़ा राज्यातल्या एखाद्या जिल्ह्यात पोलीस उपअधीक्षक दर्जाचा अधिकारी बऱ्यापैकी वरिष्ठ मानला जातो. त्याच्यासारख्या वरिष्ठ पोलिसावर ही वेळ येत असेल, तर बाकीच्यांची किती पत्रास बाळगली जात असेल याची कल्पना करता येते. सुरिंदर सिंह आणि त्यांचे पथक ताउरू भागातील दगडखाणीतून दगड आणि खडीची अनधिकृत ने-आण करणाऱ्यांच्या मागावर होते. एका डम्परचा पाठलाग करत असताना, संबंधित डम्परचालकाने खडी रिती करण्यासाठी डम्पर उभा केला. चालकाला हटकण्यासाठी सुरिंदर सिंह डम्परच्या पुढय़ात आल्याक्षणी डम्पर सुरू करून आणि सुरिंदर सिंह यांना चिरडून डम्परचालक पसार झाला. या प्रकरणात डम्परच्या क्लिनरला आतापर्यंत अटक झाली आहे. हरयाणा सरकारने सुरिंदर सिंह यांना हुतात्म्याचा दर्जा देऊन, त्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत आणि कुटुंबातील एकास सरकारी नोकरी देत असल्याचे जाहीर केले आहे. असे केल्याने सुरिंदर यांचा जीव परत मिळणार नाही, हा एक भाग. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे, कडक कारवाईचे आश्वासन दिल्यानंतरही खाण आणि खदानीतून दगड व खडीची चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर वचक बसण्याची शक्यता नाही.
हरयाणा सरकारनेच या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या वर्षांतच नूह जिल्ह्यात बेकायदा दगड वाहतूक करणारी ६८ वाहने जप्त करण्यात आली आहेत, २९ तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत आणि सव्वाचार लाखांहून अधिक दंड गोळा करण्यात आला आहे. संपूर्ण हरयाणात या कालावधीत आणखी ऐवज, वाहने जप्त करण्यात आली आहेत. ही झाली अधिकृत आकडेवारी. या आकडेवारीपलीकडे दगड माफिया आणि पोलिसांमध्ये झालेल्या ‘देवाणघेवाणी’ची नोंद अर्थातच कुठेही नाही. दगडखाणींबाबत सर्वोच्च न्यायालयाने बंधने घालून दिली असली, तरी अशा खाणींमधून दगड आणणे आणि ते दगड भरडून तयार झालेली खडी इतरत्र नेण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. या व्यवसायात कोटय़वधींची बेहिशेबी उलाढाल होते. हरयाणाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, अरवली पर्वतरांगा आणि शेजारील राजस्थानातून फरिदाबाद, नूह आणि गुरुग्राम येथील खदानींमध्ये भरडण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर दगड आणले जातात. राज्यसीमांवर नाके, चौक्या उभारूनही अवैध वाहतुकीला म्हणावा तसा पायबंद बसलेला नाही. नूह जिल्ह्यातच डिसेंबर २०२१ मध्ये अवैध वाहतुकीची चौकशी करण्यास गेलेले जिल्हा पोलीस अधीक्षक वरुण सिंह यांच्या वाहनाला डम्परच्या साह्याने ठोकरण्याचा प्रकार घडला होता. यावरून दगड आणि खाण माफिया किती निर्ढावलेले आहेत, याची कल्पना येते. बेसुमार दगडखाणी, त्यांतून होणारी दगड-खडीची चोरटी वाहतूक या ष्टद्धr(२२४)ृंखलेमध्ये गुंडपुंड, व्यावसायिक, राजकारणी, पोलीस अशी सर्वच मंडळी गुंतलेली असतात. त्यामुळे दरवेळी अशी एखादी घटना घडल्यानंतर काही काळ चौकशी होते आणि नंतर प्रकरण संपुष्टात येते. आणखी महत्त्वाचा मुद्दा पोलिसांविषयीच्या आदर आणि जरबेचाही आहे. गुजरातमध्ये आणखी एका पोलिसाला चिरडण्याचा प्रकार किंवा मध्यंतरी मुंबईत मोटारीच्या बॉनेटवरून पोलिसालाच काही अंतर घेऊन जाण्याचा प्रकार हे अपवादात्मक राहिलेले नाहीत. वेळ पडल्यास पोलिसावरही चालून जाण्याच्या या प्रवृत्तीस केवळ समाज जबाबदार नाही. यात पोलिसांचाही काही दोष आहेच.