पार्थ एम. एन.

‘हिंदूत्व वॉच’ या संस्थेने मुस्लिमांना लक्ष्य करणाऱ्या द्वेषपूर्ण भाषणांची नोंद घ्यायला सुरुवात केली. त्यांच्या कामातून पुढे आलेलं निरीक्षण बघून अस्वस्थ व्हायचं की कुणी तरी हे काम करतंय हे अधिक महत्त्वाचं समजायचं?

Sai Paranjpye Speech
Sai Paranjpye “अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने मराठवाड्यातील तरुणाईला सिनेसाक्षर केलं”, पद्मभूषण सई परांजपेंचे उद्गार
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
article about social and political polarization facing by american media
वृत्तवाळवंट सुफलाम करण्यासाठी…
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal : ऐन निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ; केंद्रीय गृह मंत्रालयाने ईडीला दिली महत्त्वाची परवानगी!
Crime News
Crime News : थिएटरमधून अर्ध्यात सोडून गेल्याचा राग… बंगाली चित्रपटावरून एकाने पत्नीवर झाडल्या गोळ्या
Action taken against bullet driver who makes loud noise
नागपूर : फटाके फोडणाऱ्या बुलेटमुळे त्रस्त! पोलिसांनी शेकडो सायलेन्सर…
Vaikunth Crematorium
वैकुंठात असुविधा, भटक्या श्वानांचाही त्रास, नक्की काय आहे प्रकार?
Girish Kuber Explanation About Gurdian Minister Post
Video : पालकमंत्री पदासाठी एवढी साठमारी का होते? लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचं सखोल विश्लेषण

सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात एक अस्वस्थ करणारा अहवाल प्रसिद्ध झाला. तो वाचून आश्चर्य मात्र वाटलं नाही.

२०२३ च्या पहिल्या सहामाहीत भारतामध्ये मुसलमानांना लक्ष्य करणाऱ्या द्वेषपूर्ण भाषणांच्या (हेट स्पीचेस) २५५ घटना नोंदवल्या गेल्या. म्हणजे दर महिन्याला ४२ आणि दर दिवसाला जवळपास १.५ द्वेषपूर्ण भाषणं! यापैकी ३३ टक्के भाषणांमध्ये मुसलमानांच्या विरोधात हिंसा करण्यासंबंधीचा थेट उल्लेख होता. जवळपास १२ टक्के भाषणांमध्ये त्यांच्या विरोधात शस्त्रं उचलण्याचं आवाहन होतं. यापैकी ८० टक्के भाषणं ही भाजपशासित राज्यांमध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये झाली होती, ज्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही.

यात आश्चर्य वाटण्यासारखी एक गोष्ट मात्र आहे. अशा द्वेषपूर्ण भाषणांच्या सर्वाधिक, म्हणजे २९ टक्के घटना महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत. शाहू- फुले- आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या, स्वत:ला पुरोगामी म्हणवणाऱ्या या राज्याने या वर्षांचा बहुतेक काळ हा मुसलमानांचं खच्चीकरण करण्यासाठी आवाज उठवण्यात घालवलाय.

हेही वाचा >>> पहिली बाजू : फडणवीसच मराठय़ांचे तारणहार!

ही महत्त्वाची आकडेवारी प्रसिद्ध केलीये संशोधनकार्य करणाऱ्या ‘हिंदूत्व वॉच’ नावाच्या संस्थेने. भारतातल्या धार्मिक अल्पसंख्याकांच्या विरोधात होणारी द्वेषपूर्ण भाषणं आणि गुन्हे यांची नोंद घेण्याच्या उद्देशाने त्यांनी ही पाहणी केली होती. या संस्थेचे संस्थापक आहेत २८ वर्षांचे रकीब नाईक. हा काश्मिरी पत्रकार वॉशिंग्टन डीसी येथे राहतो. त्याची १२ जणांची टीम आहे. ही सर्व स्वत:हून देश सोडून अमेरिका, कॅनडा आणि युरोपात स्थायिक झालेली तरुण मुलं आहेत.

गेल्या १९ महिन्यांमध्ये ‘हिंदूत्व वॉच’ने १२०० हून अधिक व्हिडीओ जमा केलेले आहेत. यात अल्पसंख्याकांच्या विरोधात घडलेले गुन्हे, द्वेषपूर्ण भाषणं यांचा समावेश आहे. आणि या व्हिडीओंना लाखांमध्ये व्ह्यूज मिळालेले आहेत. त्यांच्या या कामाचं महत्त्व हे की, काही काळापूर्वी या माहितीच्या आधारे सर्वोच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला आणि भारतामध्ये द्वेषपूर्ण भाषणांचा जो महापूर आलाय त्यामध्ये न्यायालयाने लक्ष घालावं अशी विनंती करण्यात आली.

या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात हरयाणाच्या नुह जिल्ह्यात धार्मिक हिंसाचाराचा उद्रेक झाला होता. यात सहा माणसं मारली गेली. बहुतेक प्रसारमाध्यमांनी या घटनेचं वार्ताकन करताना, ‘दोन जमातींमधला संघर्ष,’ असं त्याचं वर्णन केलेलं असलं, तरी ‘हिंदूत्व वॉच’ने यामागचं कटू सत्य समोर आणलं.

हा हिंसाचार सुरू होण्याच्या काही तास आधी विश्व हिंदू परिषदेचे नेते सुरेंद्र जैन यांनी नुहच्या मेवात शहरात मुसलमानांच्या विरोधात एक भाषण केलेलं होतं. त्याच्यासमोर बसलेल्या शेकडो लोकांना त्याने, ‘आपण मेवातचा चेहरामोहरा बदलायला हवा,’ असं जाहीर आवाहन केलं होतं. दंगलीमागे असलेली ही चिथावणी इतर कोणत्याही प्रसारमाध्यमाला प्रस्थापित करता आलेली नव्हती.

‘अल्पसंख्याकांच्या विरोधातल्या सगळय़ा गुन्ह्यांची एकत्रित नोंद घेतली जाईल असं एक व्यासपीठ मला स्थापन करायचं होतं,’ रकीबने मला सांगितलं. वॉशिंग्टन डीसीहून फोनवर तो माझ्याशी बोलत होता. ‘भारतामध्ये हिंदूराष्ट्रप्रेमाची जी भरती आलेली आहे त्याविषयी जाणून घेण्यात कोणाला रस असेल, तर ते सगळं एकाच ठिकाणी उपलब्ध असायला हवं असं मला वाटत होतं.’

टोकाची उजवी विचारसरणी असलेल्या भारतामधल्या नेत्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लक्ष ठेवणं ही रकीब आणि त्याच्या टीमच्या कामाची सुरुवात होती. हे नेते देशभर फिरतात, द्वेषपूर्ण भाषणं करतात आणि ही भाषणं आपल्या सोशल मीडियाच्या व्यासपीठांवर अपलोडही करतात. रकीब सांगतो, ‘हे नेते आपल्या सोशल मीडियामधून त्यांच्या विचारांच्या लोकांशी संवाद साधत असतात. त्यांना उचकावत असतात. भारताला हिंदूराष्ट्र बनवण्याचं हे काम अखंडपणे, अव्याहत चालू आहे.’

सोशल मीडियाचा अल्गोरिदम असा आहे की, अशा प्रकारच्या माहितीमध्ये रस नसलेल्या बहुसंख्य लोकांना ही द्वेषपूर्ण भाषणं होताहेत याची खबरही लागत नाही. म्हणूनच ‘हिंदूत्व वॉच’ला महत्त्व आहे. उजवी विचारसरणी नसलेल्या लोकांना भारतामध्ये काय घडतंय याची जाणीव ते करून देताहेत.

अशा प्रकारचा प्रयत्न भारतामध्ये याआधीही झालेला आहे. पण तो करणाऱ्यांना आपलं काम सरकारी दबावापोटी थांबवावं लागलं असं म्हटलं जातं. त्या प्रकाशनांच्या संपादकांनी त्यानंतर आपल्या पदांचा राजीनामा दिला.

रकीब म्हणतो, ‘भारतामध्ये राहून असं काही करणं म्हणजे संकट अंगावर ओढवून घेणं आहे. आम्ही काही भारत सरकारच्या न्यायालयांच्या अखत्यारीत येत नाही.’

ऑगस्ट २०२० मध्ये रकीब अमेरिकेला गेला तेव्हा तिथेच आसरा घ्यावा असं त्याच्या मनात नव्हतं. पण त्याच सुमारास, सुरक्षा रक्षकांनी काश्मीरच्या वादग्रस्त भागात राहणाऱ्या त्याच्या कुटुंबाला त्रास द्यायला सुरुवात केली.

काश्मीरमधल्या मानवी अधिकारांसंबंधीचं भारत सरकारचं आजवरचं रेकॉर्ड वाईट आहे. जगभरात सर्वाधिक लष्करी वास्तव्य असलेला हा प्रदेश आहे. सर्वसामान्य नागरिकांवर अत्याचार करणं, त्यांना मारणं, पत्रकारांवर दबाव आणणं, त्यांना तुरुंगात टाकणं हे प्रकार इथे चालतात.

रकीब अमेरिकेत आल्यानंतर काही दिवसांनी काश्मीरमध्ये पोलीस कस्टडीत एक मृत्यू झाला. उद्विग्न होऊन त्याने ट्वीट केलं, ‘मी नशीबवान म्हणायला हवा की, १९९७ मध्ये लष्कराने माझ्या वडिलांना पकडून नेलं होतं, पण कालांतराने ते घरी परतले होते.’ या ट्वीटनंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्याच्या कुटुंबाला त्रास द्यायला सुरुवात केली.

आपण घरी परतल्यानंतर आपल्यालाही त्रास व्हायला लागेल हे लक्षात आल्यावर रकीबने आपला व्हिसा बदलून वर्क व्हिसा करून घेतला आणि वॉशिंग्टन डीसीमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून तेच त्याचं घर झालं आहे. ‘मी काश्मिरी आहे, मुसलमान आहे आणि पत्रकार आहे. आज भारतामध्ये हे भयानक कॉम्बिनेशन आहे. या मार्गावरून चालण्याखेरीज माझ्यासमोर दुसरा पर्याय नव्हता. आपल्या देशात अल्पसंख्याकांच्या विरोधात होणाऱ्या गुन्ह्यांचा पाठपुरावा करण्यासाठी ही चांगली संधी आहे असा विचार मी केला,’ रकीब म्हणतो.

आज, रकीब आणि त्याची टीम टोकाच्या उजव्या विचारसरणीच्या ८००  नेत्यांचा पाठपुरावा करत आहे. देशभरातून अनेक स्रोतांमार्फत या नेत्यांचे व्हिडीओ जमा करत आहेत. आणि त्याद्वारे या देशात कोणतीही शिक्षा न होता किती सहजी, बेफामपणे आणि किती मोठय़ा प्रमाणात द्वेषपूर्ण भाषणं होत आहेत हे बाहेर आणताहेत. त्यांच्या ट्विटर हँडलला अगदी कमी काळातच ७५ हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स मिळालेले आहेत.

टोकाची उजवी विचारसरणी असलेल्या नेत्यांचा पाठपुरावा करण्याखेरीज, नियमितपणे व्हिडीओ पाठवू शकतील असे काही स्रोत ‘हिंदूत्व वॉच’ने देशभरात निर्माण केलेले आहेत. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे, यात अनेक स्थानिक पत्रकारांचा समावेश आहे. असे पत्रकार जे मुख्य प्रवाहातल्या माध्यमांमध्ये काम करताहेत, पण अशा बातम्या देण्याबाबत त्यांच्यावर बंधनं आहेत.

गेली सात-आठ वर्ष रिपोर्टिग करण्याच्या निमित्ताने मी भारतभर फिरलोय. या काळात वेगवेगळय़ा राज्यांमधले अनेक स्थानिक पत्रकार माझे मित्र/ मैत्रिणी बनले आहेत. त्यांची स्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक बिकट होत चाललीये. त्यांच्या राज्यात गेल्यावर त्यांना भेटणं होतं आणि मग गप्पांच्या ओघात ते आपल्यावरच्या या बंधनांविषयी बोलू लागतात. भाजपशासित राज्यांमधल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीविषयीच्या बातम्या देणं हे त्यांच्यासमोरचं मोठं आव्हान आहे. कारण इथे पोलीस उजव्या विचारसरणीच्या नेत्यांनी कितीही टोकाची द्वेषपूर्ण भाषणं केली तरी त्याकडे दुर्लक्ष करतात. या मर्यादांमुळे यातल्या अनेकांनी ‘हिंदूत्व वॉच’साठी छुपी पत्रकारिता करण्याचा पर्याय स्वीकारलाय.

या परिस्थितीचा अर्थ कसा लावायचा हे मला कळत नाही. एका बाजूला ही अतिशय वेदनादायी परिस्थिती आहे. आपल्याला जे हवं ते करायला मिळावं म्हणून परदेशात स्थायिक व्हावं लागलेला एक हुशार काश्मिरी पत्रकार एका बाजूला आहे. ज्या संस्थेमध्ये आपण काम करतो तिथे आपल्या बातम्या येणार नाहीत म्हणून द्वेषपूर्ण भाषणांचे व्हिडीओ पुरवणारी पत्रकारांची एक टीम त्याच्यापाशी आहे.

पण दुसऱ्या बाजूला, या सगळय़ातून स्फूर्ती घेण्यासारखंही खूप काही आहे. अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये रकीब काहीतरी बदल घडवण्याचा प्रयत्न करतोय. लोटांगण घालणाऱ्या न्यूजरूममध्ये काम करणारे असंख्य बिनचेहऱ्याचे पत्रकार काहीतरी बदल घडवण्याचा प्रयत्न करताहेत. त्यांच्या कामाचं श्रेय त्यांना मिळत नाही याची त्यांना फिकीर नाही. पत्रकारितेशी बांधिलकी असणं म्हणजे आणखी वेगळं काय असू शकतं?

लेखक ‘पारी’साठी काम करतात  

@parthpunter

Story img Loader