डॉ. उज्ज्वला दळवी

होय, कोलेस्टेरॉलपैकी ‘एचडीएल’ गुणी आणि मित्रच; पण तेही वाढू नये म्हणून स्निग्धाम्लांवर नजर हवी.. असं कशामुळे?
‘‘अगं आई, खाऊ दे ना मला पिझ्झा! कोलेस्टेरॉलची आपल्या शरीराला नितांत गरज असते. आपल्या औषधांचा खप वाढावा म्हणून औषधकंपन्यांनी उगाचच कोलेस्टेरॉलचं नाव बद्दू केलंय!’’ चिंकूने सोयीस्कर अर्धसत्य ऐकवलं.

curd in any food be dangerous
कोणत्याही पदार्थांमध्ये दह्याचा सतत वापर करणं ठरू शकतं घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
4 Essential Tests Every Woman Over 20 Should Do
हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी विसाव्या वर्षापासून प्रत्येक महिलेने कराव्यात ‘या’ चार चाचण्या; जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात… –
‘Abhi bhi feel kar raha hu’: Shah Rukh Khan opens up about struggle with breathlessness after quitting smoking
शाहरुख खानने स्मोकिंग सोडली; पण आता होतोय ‘हा’ भयंकर त्रास; जाणून घ्या याबाबतची डॉक्टरांची मते
Testy bhindi fry khatti mitthi bhindi lady fingars recipe for lunch or diner
भेंडीची खट्टी -मीठी भाजी; ती पण चिकट न होता! पाहा सोपी मराठी रेसिपी
Is thirst a good predictor of dehydration
तहान लागते म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते का? तज्ज्ञांनी केला खुलासा…
Pune air, bad air, Pune air at hazardous levels
पुण्याची हवा धोकादायक पातळीवर, बिघडलेल्या हवेचे परिणाम काय?
Health Special Diwali for mental health
Health Special : मानसिक स्वास्थ्यासाठी दिवाळी

‘हृदयविकाराचा आणि कोलेस्टेरॉलचा काहीही संबंध नाही,’ असं प्रतिपादन करणारं एक सनसनाटी समालोचन २०१४ साली इंग्लंडच्या यॉर्क विद्यापीठाच्या जर्नलमध्ये छापून आलं. समाजमाध्यमांच्या हाती आयतं कोलीत मिळालं. कानगोष्टींसारखा अधिकाधिक बदलत तो दावा चिंकूसारख्या लाखो मुलांपर्यंत पोहोचला. त्यानंतर हार्वर्ड विद्यापीठाच्या सामाजिक आरोग्य विभागाच्या प्रमुखांनी त्या समालोचनातल्या अनेक त्रुटी दाखवणारा लेख प्रकाशित केला; पण तो सनसनाटी नसल्यामुळे दुर्लक्षित राहिला.

शरीरातल्या प्रत्येक पेशीच्या आवरणाचा कोलेस्टेरॉल हा महत्त्वाचा घटक असतो. पेशीच्या वेशीतून अनेक पोषक पदार्थ, उत्पादनं ये-जा करतात. विजेचे आणि रासायनिक संदेश वेशीपार जातात. ते सगळं दळणवळण सुरळीत पार पडायला कोलेस्टेरॉलची आवश्यकता असते. पित्तरसातलं आम्ल, त्वचेखाली बनणारं ड-जीवनसत्त्व, थायरॉइडपासून इस्ट्रोजेनपर्यंत अनेक हॉर्मोन्स कोलेस्टेरॉलपासूनच बनतात. इतपत कोलेस्टेरॉलची आपल्या शरीराला ‘नितांत गरज’ असते; पण म्हणून ताळतंत्र सोडून पिझ्झा-चीझ-लोणी चापायचं नसतं.

दूधदुभतं, मांस, अंडी या आहारातल्या प्राणिज पदार्थातून तयार कोलेस्टेरॉल आणि शिवाय स्निग्धाम्लं हा कोलेस्टेरॉल बनवायचा शिधाही मिळतो. काजू-शेंगदाणे-बदाम-पिस्ते, गोडं तेल, तिळेल वगैरे खाद्यतेलं यांच्याकडूनही लिव्हरला स्निग्धाम्लांचा शिधा मिळतो. २०० मिलिग्रॅम तयार कोलेस्टेरॉल शरीरात गेलं की त्याला पूरक म्हणून लिव्हर ८०० मिलिग्रॅम कोलेस्टेरॉल बनवतं. आहारातून अधिक कोलेस्टेरॉल आलं तर लिव्हरचं उत्पादन आपसूकच कमी होतं. लिव्हरनं बनवलेली ती तेलकट रसद प्रथिनांच्या बासनात गुंडाळून पेशींकडे पोचते. त्या गाठोडय़ांची नावं लांबलचक आहेत. त्यांना थोडक्यात ‘व्हीएलडीएल’ आणि ‘एलडीएल’ म्हणतात. ती पेशींकडचं कोलेस्टेरॉल आणि त्याचे दुष्परिणाम वाढवतात म्हणून त्यांना दुष्ट कोलेस्टेरॉल म्हणतात. पेशी त्या गाठोडय़ांतून आपल्याला हवं तेवढं कोलेस्टेरॉल काढून घेतात आणि उरलेलं कोलेस्टेरॉल (एचडीएल) उलटटपाली लिव्हरकडे पाठवतात. तिथून ते पित्ताम्लांच्या रूपाने आतडय़ांतून बाहेर जातं. अधिकचं कोलेस्टेरॉल शरीराबाहेर पाठवतं म्हणून एचडीएल गुणी! ते जेवढं अधिक तेवढं बरं.
कारभार इतका सुसूत्र असला तर रक्तातलं कोलेस्टेरॉल वाढतंच कसं?

हातावर पोट असलं तर सुगृहिणी प्रत्येक वेळी आणलेल्या शेरभर धान्यातून मूठभर डाळतांदूळ गाडग्यालोटक्यांत राखून ठेवतात. बिनकमाईच्या दिवसांत पोटाला त्याचाच आधार होतो. शरीरही तसंच करतं. दीड लाख वर्ष मानवजात शोधीपारधी म्हणून वणवणत होती. हरणा-रानडुकराची शिकार क्वचित कधी तरी मिळे. मॅमथ दोन-तीन वर्षांतून एखादा! एरवी ससे- खारी- पक्षी- अंडी मिळाले तर मिळाले. ती इवलीशी शिकारसुद्धा कळपातल्या वीस-पंचवीस माणसांत विभागली जाई. त्यात प्रत्येकाच्या वाटय़ाला किती येणार? मग तेलबियांतून, नारळातून मिळणाऱ्या तुटपुंज्या स्निग्धाम्लांपासून (फॅटी अॅसिड्स) कोलेस्टेरॉल बनवून लिव्हर काम चालवी. मॅमथच्या मेजवानीवेळी पोटात जाणाऱ्या कोलेस्टेरॉल, स्निग्धाम्लांमधून लिव्हर अधिकच्या कोलेस्टेरॉलची बेगमी करून ठेवी. थोडं आपल्या कोठारात साठवून ठेवी आणि थोडं पेशींकडे पाठवे. पुढच्या मोठय़ा शिकारीपर्यंत ती शिदोरी पुरवून वापरली जाई.

दहा हजार वर्षांपूर्वी शेळय़ामेंढय़ा, गुरं माणसाच्या वळचणीला आली आणि माणसाच्या आहारात कोलेस्टेरॉलचा रतीब सुरू झाला. तीन शतकांपूर्वी औद्योगिक क्रांती झाली, अन्नाच्या उत्पादनाचंही औद्योगिकीकरण झालं आणि मांसातलं कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढलं. दूधदहीलोण्याची रेलचेल झाली. त्याचसोबत आहारात शेंगदाणे, तळलेले पदार्थ, तेलंही वाढली. स्निग्धाम्लांचा पूर आला. पण बेगमीसाठी जास्तीचं कोलेस्टेरॉल बनवायची लिव्हरची दीड लाख वर्षांपासूनची खोड कायम होती. आहारात गोडाधोडाचं प्रमाण वाढलं. त्याच्यातल्या साखरेने लिव्हरला कोलेस्टेरॉल बनवायला अधिकच प्रोत्साहन दिलं. स्निग्धाम्लांची रसद चालू होतीच. कोलेस्टेरॉल बनत राहिलं. पेशींमध्ये त्याची म्हणजेच चरबीची फिक्स्ड डिपॉझिट्स वाढली. लठ्ठपणा वाढला. बेगमीची कोठारं ओसंडून रक्तातलं कोलेस्टेरॉल वाढलं. पित्तातून बाहेर ओतलेल्या कोलेस्टेरॉलचे पित्ताशयात खडे झाले. चिंकूच्या पिढीपर्यंत ते सगळं वाढतच गेलं आहे.

शरीरात कुठल्याही गोष्टीची अडगळ व्हायला लागली की लढाऊ पेशींना सफाई कामगार म्हणून पाठवलं जातं. रक्तवाहिन्यांत, लिव्हरमध्येही लढाऊ पेशी साचलेल्या कोलेस्टेरॉलची युद्धपातळीवर सफाई करतात. त्या हाणामारीत रक्तवाहिन्या आणि लिव्हर दोघांनाही इजा होते. रक्तवाहिन्यांच्या व्रणांत कोलेस्टेरॉलचा साका (प्लाक्स) बसतो. तशी इजा चालूच राहिली तर हृदय/मेंदूकडे रक्त पोहोचवणाऱ्या वाहिन्या साक्याने चिंबतात. रक्तदाब वाढतो, हार्ट ॲटॅक, अर्धाग, बुद्धिभ्रंश संभवतात. लिव्हरला इजेमुळे सूज येते (नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपॅटायटिस), कॅन्सर होऊ शकतो. इतर अवयवांतही रक्तवाहिन्यांना सूज येते, इजा होते.

‘‘सूनबाई, आमच्या घराण्यात फराळ तुपातच तळतात! करंज्या तेलात तळायची माहेरची रीत विसरा! चार दिवसांत खवट होतील त्या!’’ बायाकाकींचं ब्रह्मास्त्र सुनेच्या वर्मी लागलं.तूप, लोणी, प्राण्यांची चरबी हे पदार्थ थंडीत गोठतात, अधिक टिकतात. लवकर खवट होत नाहीत. त्यांनी केक-आइस्क्रीम वगैरेंना घनता येते. त्यांच्यातल्या स्निग्धाम्लांच्या घडणावळीतली कार्बनच्या कणांची साखळी हायड्रोजनने खच्चून भरलेली, संपृक्त असते. खोबरेल, पाम ऑइल वगैरेंतही तशी संपृक्त स्निग्धाम्लं (सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स) असतात. संपृक्त स्निग्धाम्लं लिव्हरला अधिक कोलेस्टेरॉल बनवायला प्रोत्साहन देतात. दुष्ट कोलेस्टेरॉल (एलडीएल) वाढवतात. तूप बनवताना लोणी फार तापवावं लागतं. त्याने कोलेस्टेरॉलचा प्राणवायूशी संयोग होतो. हे ऑक्सिडाइज्ड कोलेस्टेरॉल जास्त अपायकारक.

तिळेल, करडई-ऑलिव्ह-गोडं तेल, बदाम, ॲव्होकॅडो यांच्यातल्या स्निग्धाम्लांतली एकच कार्बनजोडी हायड्रोजनशिवाय राहिलेली असते (मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स). अनेक जोडय़ा हायड्रोजनविना राहिल्या की बहु-असंपृक्त स्निग्धाम्ल (पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड) घडतं. सोया, अक्रोड, कॅनोला वगैरेंतली ओमेगा-६ स्निग्धाम्लं, काळय़ा पाठीच्या सरंगा, बांगडा वगैरे माशांमधली ओमेगा-३ स्निग्धाम्लं ही बहु-असंपृक्तच असतात. असंपृक्त स्निग्धाम्ल पदार्थ थंडीत गोठत नाहीत, पण लवकर खवट होतात. तशी तेलं तूपलोण्याहून स्वस्त असतात. ती कोलेस्टेरॉलधार्जिणी नसतात.

१९०२ साली तशा स्वस्त तेलांना कृत्रिमरीत्या हायड्रोजनने संपृक्त करायचं तंत्र जर्मन संशोधकांना सापडलं. १९०९ पासून क्रिस्को हे वनस्पती-तूप अमेरिकन बाजारात आलं. १९३७ मध्ये डालडा भारतात आलं. लवकर खवट न होणारा फराळ सर्वाना परवडू लागला. आता बाजारी केक- बिस्किटं- डोनट- पिझ्झा, तळलेले बटाटे- बर्गर- चिकन करायला ते कोलेस्टेरॉल वाढवणारे डालडाचे भाऊबंद सर्रास वापरतात.

मानवनिर्मित संपृक्त स्निग्धाम्लांच्या वेण्या बनताना कधीकधी त्यांच्या कार्बनसाखळीत ओवलेल्या हायड्रोजन-कळय़ा कधी साखळीच्या डावीकडे तर कधी उजवीकडे, दोन्ही बाजूला गुंफल्या जातात. डालडाच्या काही भाऊबंदांतली तशी विपरीत रचनेची स्निग्धाम्लं (ट्रान्स फॅटी ॲसिड्स) रक्तवाहिन्यांना आणि लिव्हरला अधिक इजा करतात. ती दुष्ट ‘एलडीएल’ तर वाढवतातच, पण गुणी ‘एचडीएल’ घटवतातही आणि प्रकृतीला दुहेरी अपाय करतात. भारतातल्या बाजारी खाद्यपदार्थातलं विपरीत स्निग्धाम्लांचं प्रमाण दोन टक्क्यांहून कमी असतं. २०२२ पासून ते कायद्यानंच सक्तीचं झालं आहे.
कोलेस्टेरॉल अत्यावश्यकही आहे आणि अपायकारकही आहे. प्रकृती सांभाळायला काय करायचं?

आहारातलं कोलेस्टेरॉल रोज २०० मिलिग्रॅमहून कमीच (रोजच्या कॅलरीजच्या १० टक्के हिश्शाहून कमी) ठेवावं. तेल-तूप-चरबी भरपूर असलेले पनीर-पिझ्झा-पेढय़ासारखे बाजारी पदार्थ टाळले तर संपृक्त आणि ट्रान्स स्निग्धाम्लं टळतील. रोजच्या कॅलरीजचा पाच ते ११ टक्के भाग गोडय़ा तेलासारखी न गोठणारी तेलं, काजू-शेंगदाणे, काळय़ा पाठीच्या माशांचा तेलकट भाग वगैरेंमधून मिळवावा. (प्रत्येकाची कॅलरीजची गरज वेगवेगळी असते. तिच्यासाठी सल्ला घ्यावा.) शुद्ध साखरगुळाचाही आहारातला हिस्सा कमीत कमी ठेवावा. सोबत अ-सडिक धान्यं, सालीसह कडधान्यं, पालेभाज्या आहारात घ्याव्या. त्यांनी साखर, कोलेस्टेरॉल रक्तात कमी पोहोचतात. रोज नियमित १०००० पावलं चाललं तर फायदा होतो.

इतकंच पाळलं तरी दुष्ट कोलेस्टेरॉल घटतं, गुणी कोलेस्टेरॉल वाढतं.काही जणांचा कोलेस्टेरॉल वाढण्याकडे आनुवंशिक कल असतो. त्यांच्यासाठी लिव्हरमधलं कोलेस्टेरॉलचं उत्पादन कमी करणारी आणि आतडय़ातून कोलेस्टेरॉलचं शोषण घटवणारी औषधं असतात. क्वचित थोडय़ा लोकांत त्यांचे दुष्परिणाम होतात. पण बहुतेकांना ती उपयोगाची ठरतात. कोलेस्टेरॉलला सन्मानाने वागवावं, पण हृदयात थारा देऊ नये.