डॉ. उज्ज्वला दळवी

लुइझियाना या अमेरिकी राज्यात २००९च्या ऑगस्टमध्येहेन्री व्हाइट या २१वर्षांच्या, शिकाऊ बास्केटबॉलपटूने वर्गात वजनं उचलायचा भरपूर व्यायाम केला. शिवाय उशिरा पोहोचल्याबद्दल त्याला वर्गानंतर साडेचार मैल उन्हातून धावायची शिक्षाही झाली. रणरणत्या दुपारी धावताधावता तो कोसळला. १२ दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. तो सकाळपासून पुरेसं पाणी प्यायला नव्हता. व्यायामासाठी, उन्हातून धावताना घामावाटेही शरीरातलं बरंच पाणी खर्ची पडलं. पाणीतुटवडय़ामुळे मेंदू-हृदय-किडनीसारख्या महत्त्वाच्या अवयवांकडचा रक्तपुरवठा घटला. त्यांना गंभीर इजा झाली. २०१६मध्ये फ्लोरिडात टेनिसचा एक सामना उन्हात चार तास चालला. केप्यूलून या खेळाडूला प्रचंड थकवा आला. ताबडतोब क्षारयुक्त पाणी प्यायल्यानं त्याला नवी ऊर्जा मिळाली, तो महत्त्वाचा सामना जिंकला. दोघेही खेळाडू उन्हातच धावले-खेळले. पाणी पिणारा जिंकला, न पिणाऱ्याचा मृत्यू झाला.

nashik municipal corporation taken steps towards making water from borewells available in certain locations
नाशिक शहरात विंधन विहिरींतील पाण्याचा पर्याय; टंचाई निवारणार्थ महापालिकेची व्यवस्था
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
pune water planning delayed due to absence of Guardian Minister
Pune Water planning : पालकमंत्री नसल्याने पाणी नियोजन लांबणीवर
water supply Bandra area, Bandra,
मुख्य जलवाहिनीतून गळती, वांद्रे परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम
Pune Water Supply, Water Resources Department,
पुण्याच्या पाण्याचे नियंत्रण जाणार जलसंपदा विभागाच्या ताब्यात? नक्की काय आहे कारण !
brain rot disease loksatta news
विश्लेषण : ‘ब्रेन रॉट’ यंदाचा ऑक्सफर्ड शब्द मानकरी! पण ही अवस्था नक्की काय असते? हा चिंताजनक विकार का?
What is the National Health Claim Exchange health insurance
आरोग्य विम्याची प्रक्रिया आता जलद? काय आहे ‘नॅशनल हेल्थ क्लेम एक्स्चेंज’?

 आपल्या शरीराचा ६०-७० टक्के भाग असलेलं, साधंच पाणी हा आपल्या आहारातला सर्वात आवश्यक, पोषक पण उपेक्षित घटक आहे. शरीरातली कित्येक महत्त्वाची कामं पाणीच करतं. जठरा-आतडय़ांतले पाचकरस तयार करण्यासाठी, ते नीट मिसळण्यासाठी अन्नाचा थलथलीत लगदा करण्यासाठी, पचलेले अन्नघटक रक्तापर्यंत पोहोचवण्यासाठी पाणीच मदतीला धावतं. शरीरातल्या प्रत्येक पेशीच्या कामकाजात पाण्याचा हातभार लागतोच. त्यांच्यासाठी पोषण, प्राणवायू, महत्त्वाचे रासायनिक संदेश पोहोचवणारी कुरियर सेवा पाण्याचीच. मूत्रिपडांवाटे टाकाऊ पदार्थाची, विषांची धुलाई करणारा सफाई कामगारही पाणीच. तापमान वाढलं तर घामाच्या वाफेतून उष्णता बाहेर टाकणारा एअर-कंडिशनर; घसा, श्वसनमार्ग यांच्यासाठी ह्युमिडिफायर पाणीच. रक्तदाबापासून सांध्यांतल्या वंगणापर्यंत सगळीकडे पाण्याची लगबग चालते. शरीरातल्या पाण्याचा १० टक्क्यांहून अधिक भाग घटला तर जिवाला धोका संभवतो! 

 म्हणूनच शरीरही पाण्यावर काटेकोरपणे लक्ष ठेवतं. रक्तदाब थोडासा घटला, रक्ताचा खारटपणा जरासा वाढला तरी रक्तवाहिन्यांतले सावध प्रोटीन-हेर मेंदूकेंद्रांना बातमी पोहोचवतात. तिथून, ‘पाणी वाचवा!’ असे विजेरी संदेश मज्जातंतूंमार्फत मेंदूच्या बुडाच्या तहान-केंद्राला आणि रासायनिक संदेश रक्तावाटे मूत्रिपडांना आणि लाळग्रंथींना पोहोचतात. लघवीतल्या कचरासफाईसाठी कमीतकमी पाणी वापरलं जातं. तोंड सुकतं आणि तहान लागते. त्याउलट रक्तदाब वाढू लागला; क्षारांचं प्रमाण कमी होत चाललं की तशीही खबर मेंदूला पोहोचते. रक्तवाहिन्यांतलं जास्तीचं पाणी लघवीवाटे बाहेर टाकायचे रासायनिक आदेश मूत्रिपडांना तातडीने पोहोचतात. शरीरातलं पाण्याचं प्रमाण ठरलेल्या मर्यादेतच ठेवायला प्रयत्नांची शिकस्त होते.

 मित्रांबरोबर फुटबॉल खेळल्यावर तहानेल्या मुदितने पाण्याचं भांडं तोंडाला लावलं आणि त्याला एकदम बरं वाटलं. पाणी तोंडात-जठरात पोचल्याबरोब्बर तिथल्या प्रोटीन-खबऱ्यांनी मारलेली, ‘पाणी आलंऽऽ’ची विजेरी आरोळी मेंदूपर्यंत पोहोचते. रक्तापर्यंत पाणी पोहोचायच्या आधीच तहान-हाकाटी बंद होते. पण शरीराची परीक्षा घेऊ नये. तहान लागली; तोंड सुकलं; दिवशी चारपेक्षा कमी वेळा, थोडीथोडीशीच लघवी झाली तर आवर्जून अधिक पाणी प्यावं. दिवशी पाऊण ते एक लिटरपेक्षा कमी पाणी पिणं मूत्रिपडांना झेपत नाही. पाण्याविना माणूस सर्वसाधारणपणे तीन दिवसांपेक्षा अधिक काळ जगू शकत नाही. वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी कमी वजनाच्या गटात भाग घ्यायला सदूने स्वत:चं वजन घटवलं. त्यासाठी तो चार दिवस फार कमी पाणी प्यायला. स्पर्धेच्या वेळी त्याचं वजन कमी भरलं पण ताकद आणि एकाग्रताही चांगलीच उणी ठरली. पाण्याच्या कमतरतेमुळे डोकंही दुखलं. 

 रंगरावाला मधुमेह आहे. तो त्यासाठी औषध घेत नाहीच. शिवाय अंगात ताप असताना, दारू पिऊन, ओकत उन्हात दगड फोडायला गेला. हॉस्पिटलात इन्सुलिन, सलाइन सगळय़ाची गरज लागली. शिदू खेडेगावच्या जत्रेला गेला. तिथे पाण्यासारखे ढाळ सुरू झाले. तालुक्याच्या हॉस्पिटलला पोहोचेतो कासावीस झाला. ढाळांमुळे पाण्यासोबत क्षारही शरीरातून निघून गेले होते. डॉक्टरांनी अँटिबायोटिक्सबरोबर तोंडाने प्रमाणबद्ध मीठ- साखर- पाणी (ओरल रीहायड्रेशन सोल्यूशन= ओआरएस) दिलं. चार-पाच दिवसांत शिदू बरा झाला. सत्तरीच्या मथूमावशी निर्जळी मंगळवार करतात. यंदाच्या उन्हाळय़ात बिनपाण्याने त्यांची त्वचा सुकली, डोळे आत ओढले गेले. मग शुद्धच गेली. डॉक्टर म्हणाले, ‘कमालीचं डीहायड्रेशन झालंय. स्ट्रोक, हार्ट अ‍ॅटॅक वगैरे काही झालं नाही ते नशीब.’ पण शरीरातलं पाण्याचं संतुलन सांभाळायची धडपड करणाऱ्या मूत्रिपडांना मात्र त्या डीहायड्रेशनमुळे गंभीर इजा झाली. त्यांचा काही भाग कायमचा निकामी झाला.

तरुण वयातही डीहायड्रेशनने मूतखडय़ाचा, व्यायामाने वाढणाऱ्या दम्याचा त्रास वाढू शकतो. पण साठीनंतर तहान-केंद्र सुस्तावतं. डीहायड्रेशन झाल्यावरही तहान लागत नाही. त्यातच इतर आजार, औषधं, बुद्धिमांद्य वगैरेंनी तहान अधिक घटते. डीहायड्रेशन सहज होतं. त्यामुळे मूतखडा, लघवीचे संसर्ग, बद्धकोष्ठ, पडझड वगैरेंचं प्रमाण अधिकच वाढतं. ते टाळायला, तहानेवर अवलंबून न राहता, पाणी प्यायचं आखीव वेळापत्रक पाळावं.

लहान मुलं पाण्यासाठी मोठय़ांवर अवलंबून असतात. त्यांना वेळोवेळी पाणी प्यायचं वळण लावावं आणि सोबत नेहमी पाण्याची बाटली द्यावी. ‘‘मावशी, रोज चार हंडे पाणी पीत जा. अंगातली विषं धुऊन जातील आणि तब्येत सुधारेल,’’ भाच्याचा सल्ला आज्ञाधारक छबूताईंनी मनावर घेतला. आठवडय़ाभरात त्या गुटगुटीत झाल्या. चेहऱ्यावर तकाकी आली. पण पायही सुजले! धाप लागली. वागणं सैरभैर झालं. प्यायलेल्या पाण्याचा महापूर ताईंच्या थकल्या हृदयाला, म्हाताऱ्या मूत्रिपडांना झेपला नाही. फुप्फुसांत पाणी भरलं. रक्तातलं क्षारांचं प्रमाण कमालीचं घटलं. तातडीच्या उपचारांमुळे ताई जेमतेम वाचल्या. आपली मूत्रिपडं दिवशी २०-२८ लिटर पाण्याचा निचरा करू शकतात पण एका तासात एका लिटरहून अधिक उत्सर्जन त्यांना जमत नाही. ताशी दोन लिटरहून अधिक पाणी प्यायलं तर पाण्याची विषबाधा होऊ शकते. 

‘रात्री झोपताना, मध्यरात्री ग्लास-ग्लास पाणी प्यायलं नाही तर रक्त घट्ट होऊन हार्ट अ‍ॅटॅक-स्ट्रोक होतो,’ व्हॉट्सअ‍ॅपवरच्या धोक्याच्या घणघणाटामुळे घाबरलेले श्रीपादमामा रात्री जास्तच पाणी रिचवू लागले. रोज चारपाच वेळा झोपेत, धडपडत लघवीला जाताना आपटधोपट, झोपमोड झाली. त्यामुळे त्यांची आकलनशक्ती घटली; स्मृतिभ्रंशाचा, भ्रमिष्टपणाचा त्रास झाला. खरं तर रात्री मूत्रिपडं शिथिल होऊन अधिक लघवी साठवतात, पाण्याचा निचरा घटवतात. निसर्ग झोपमोड टाळायला बघतो. त्याला मदत म्हणून झोपण्यापूर्वीच्या तीन तासांत तरी, फार तर घोट-दोन घोट पाणी प्यावं.  गेल्या शतकात साध्या पाण्यापेक्षा सरबतं, फळांचे रस, फसफसणारी शीतपेयं, मद्यार्कमिश्रित पेयं पिण्याकडे कल वाढला. मेंदूला नैसर्गिकपणे गोडाची चटकच असते. गरजेपेक्षा अधिक पाणी, कॅलरीज पोटात जाऊ लागल्या. लठ्ठपणाच्या जागतिक साथीला त्यांचा पेयभार लाभला. वजनदार माणसांनी ‘फक्त पाणीच’ प्यायचा (अन्य पेयं टाळून) नियम पाळला तरी वजन घटायला मदत होईल.

रोज किती आणि कुठलं पाणी प्यावं?

 व्यक्ती तितक्या परिस्थिती! प्रत्येकाचं वजन, खाणंपिणं, काम, भोवतालचं हवामान लक्षात घ्यावं लागतं. त्यामुळे एक साचेबंद उत्तर शक्य नाही. पण काही शास्त्रज्ञांनी ‘कॅलरीमागे सव्वा ते दीड मिलिलीटर पाणी, म्हणजे २००० कॅलरीजना २.५- ३ लिटर पाणी’ असा त्याचा रोजच्या कॅलरीजशी मेळ घातला आहे. त्या पाण्यातला सुमारे २२ टक्के भाग रसाळ फळं, दुधी-काकडीसारख्या पाणचट भाज्या, डाळ-भात-आइस्क्रीमसारखे पाणीदार पदार्थ यांच्यातून येतो. चहा-कॉफी-ताक-दूध यांचाही मोठा वाटा असतो. उरलेला हिस्सा साध्या पाण्याचा असावा.

बाटलीबंद, अल्कलीयुक्त, महागडय़ा पाण्याला स्वच्छतेखेरीज काही फायदे नसतात. मुंबई- पुण्याच्या नगरपालिकांचं पाणी पिण्याजोगं असतं. पण सोसायटय़ांच्या टाक्यांत साठवलेल्या पाण्याचा अभ्यास झालेला नाही. ते फिल्टर करून आपलीच पाण्याची बाटली नेहमी जवळ बाळगावी. कठीण पाणी वाईट नाही. त्याच्यातून मॅग्नेशियम-कॅल्शियमचे गरजेचे क्षार मिळतात. मूतखडा होण्याकडे कल असला तरच मृदू पाण्याचा हट्ट धरावा. तांब्याच्या भांडय़ात पाणी एकदोन दिवस राहून गेलं तर त्यात तांब्याचे विषारी क्षार उतरायची शक्यता असते. आपल्या शरीराला तांब्याची अतिसूक्ष्म कणभर गरज असते. तेवढं तांबं रोजच्या अन्नातून सहज मिळतं. त्यासाठी तांब्याच्या भांडय़ातलं पाणी प्यायची काहीच गरज नाही.  सगळय़ात सोप्पं उत्तर निसर्गानेच दिलं आहे! तहान लागली की तिच्याकडे दुर्लक्ष न करता, तृप्ती होईतो स्वच्छ, साधं पाणी प्यावं हे उत्तम.

Story img Loader