डॉ. उज्ज्वला दळवी

‘‘ती बटणं मी कानात घालणार नाही!’’ अंतूनानांनी प्रतिज्ञाच केली. ‘श्रवणयंत्र नको’, दुखऱ्या गुडघ्यासाठी मुद्दाम बेतून बनवलेला ‘पट्टा नको’, गुडघ्याचं ‘ऑपरेशन नको’, ‘वॉकर नको’, ‘कवळी नको’, ‘ती नवी थेरं मला जमणार नाहीत,’ म्हणत नानांनी ऐकणं, हालचाल करणं, घास चावणं सगळंच थांबवलं. त्यांना शौचमुखमार्जन-आंघोळीला मदतीसाठी मुलाने, शरदने गडी लावला. ‘सूनबाईचा स्वयंपाक चाववत नाही,’ म्हणत गडय़ाने शिजवलेल्या मऊ खिचडी- लापशी- नाचणीसत्त्वावरच नाना भागवत. दिवसरात्र हॉलमध्ये सोफ्यावर बसून, श्रवणयंत्र कानात न घालता, नातीच्या बारावीच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करून टीव्हीचा आवाज मोठ्ठाच ठेवायचा त्यांचा हट्ट घरादाराची मन:शांती बिघडवत होता. टीव्हीऐवजी हातातल्या टॅबवर हेडफोन्ससकट सिनेमे, टीव्हीमालिका बघण्यालाही नानांचा नन्नाच. 

कोविडच्या कोंडवाडय़ात जग अडकलं आणि गडी येईनासा झाला, शरदचं, सूनबाईचं काम, नातीचं शिक्षण सगळं घरूनच सुरू झालं. अंतूनानांचे फाजील लाड संपले. टीव्ही सक्तीने बंद झाला. मग नानांनी झक मारत कानात ‘बटणं’ घातली आणि शरदकडून टॅबलेट शिकून घेतला. आता त्यानेही हट्टाने त्यांच्या गुडघ्याला पट्टा लावला, त्यांना वॉकरने चालायला शिकवलं. सुज्ञ नानांनी मुकाटय़ाने कवळीशी जवळीक साधली. सगळय़ांसोबत बसून डाळ-भात-भाजी जेवायला सुरुवात केली. चौरस आहार, शतपावली, शरदने यू-टय़ूबवरून शिकवलेले सोपे व्यायाम यांनी नानांची ताकद वाढली. कानातल्या ‘बटणां’मुळे व्याख्यानं, श्राव्य पुस्तकं, जुनी गाणी तर ऐकायला मिळालीच पण घरातल्या संभाषणांतही भाग घेता आला. सततच्या नव्या संदेशांमुळे मेंदूला नवं चैतन्य आलं. स्वभावातला किरकिरेपणा जाऊन जगायची नवी उमेद आली.

शरदने त्यांना मुद्दाम व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकही दाखवलं. तिथे त्यांना त्यांचे जुने शाळूसोबती राघूनाना भेटले. ते तंत्रज्ञानप्रेमी होते. त्यांनी अंतूनानांना  शिकवणीच दिली! चेहरेचोपडीवर जुन्या दोस्तांचे नवे चेहरे शोधून कंपू बनला. एकत्र कोडी सोडवणं, गाणी म्हणणं, चर्चा करणं रंगायला लागलं. निष्क्रियतेची, एकलकोंडेपणाची मरगळ, औदासीन्य (डिप्रेशन) गेलं. समाजाभिमुख राहण्याने मेंदूच्या कामकाजाला चालना मिळाली. बुद्धिमांद्य (डिमेन्शिया) टळलं. नानांची बुद्धिवर्धक, आनंदी कांचनसंध्या सुरू झाली.

वयस्क माणसांना नवीन शिकायची इच्छा असते. रक्तदाबमापक, रक्ताचा शर्करामापक, दम्याच्या औषधाचा पंप याखेरीज सत्तरी-ऐंशीच्या दरम्यानच्या सुशिक्षित, सुखवस्तू बुजुर्गापैकी सुमारे ६७ टक्के मंडळी स्मार्टफोन वापरतात. त्यावर तब्येतीविषयींच्या शंकांची उत्तरं शोधतात. शक्यतो जमेल तेवढी वर्ष स्वावलंबी राहायचा प्रयत्न करतात. पण तंत्रज्ञानाची घोडदौड त्यांची दमछाक करते. अंतूनानांच्या टॅबलेटवर, ‘प्राणघातक चूक! (फेटल एरर)’ असा ठळक संदेश एकदा झळकल्यावर ते पुन्हा टॅबलेटला हात लावायला धजेनात. कोविडपूर्वी शरद बराच वेळ घराबाहेरच असे. बारीकसारीक मार्गदर्शनासाठी त्याला वेळ नव्हता. परिणामी अंतूनानांचा संगणकी आत्मविश्वास लयाला गेला.

नव्या तंत्रज्ञानाबद्दल अनेक वडीलधाऱ्यांना तसा भयगंड निर्माण होतो. तंत्रज्ञान स्वीकारायला तरुणांची मदत मिळाली की इतर अनेक गोष्टींसोबतच जगणं, प्रकृतीची काळजी घेणंही सुकर होतं. पोटभर सकस जेवण, आजारांचं योग्य निदान आणि वेळच्या वेळी नेमके औषधोपचार यांमुळे जगभरच आयुर्मर्यादा वाढत चालली आहे. गात्रं थकायचं वेळापत्रक मात्र बदललेलं नाही. ऐंशी-पंचाऐशीनंतर अनेकांना  रोजच्या हालचालींसाठीही इतरांवर अवलंबून राहावं लागतं. साठी-पासष्टीच्या अनेक धडधाकट माणसांवर त्याचा भार पडतो आणि त्यांचं वार्धक्य लवकर येतं. ते दुष्टचक्र टाळायला तंत्रज्ञानाची मदत होऊ शकते. 

हल्ली नव्वदीतही लोकांना मुलांच्या घरी जाऊन रहायचं नसतं. नव्वदीच्या चंपूताई मुंबईला एकटय़ाच रहातात. त्यांचा मुलगा ऑस्ट्रेलियात. चंपूताईंच्या पासष्टीच्या मुलीचं, कुंदाचं सासर पुण्यात. तिचे सासूसासरे तिच्याकडे असतात. चंपूताई तर सत्तरीपासूनच थकल्या. मग कुंदाने आंतरजालावरूनच एक ब्यूरो शोधून काढला. तिथून चंपूताईंची देखभाल करायला काळजीवाहू आयाबाई मिळवल्या. चंपूताईंची बिलं भरणं, बँकेची कामं, वाणसामान, सुतार-प्लंबर-इलेक्ट्रिशियन सगळं स्मार्टफोनवरून रिमोट-कंट्रोलने सांभाळलं. एका दूरदर्शक कॅमेऱ्यावरून आईवर आणि आयाबाईंवरही जातायेता नजर ठेवली. रोज एक व्हिडीओकॉल करून आईला एकटं वाटू दिलं नाही. कुंदाची ओढाताण टळली. चंपूताईही खुशाल राहिल्या.

कायो कासागी नावाच्या नव्वदीच्या जपानी वृद्धेकडे एक पॅरो नावाचा यांत्रिक कुत्रा आहे. तो लडिवाळपणे कायोला बिलगतो. ती त्याच्याशी हितगुज करते तेव्हा तो नेमक्या जागी हुंकारी भुंकतो. तिला भावनिक सोबत करतो. त्याच वेळी तो तिला औषधं घ्यायची, तिच्या ऑस्ट्रेलियातल्या मुलाला, हिरोशीला फोन करायची आठवण करतो. तिची हालचाल, रक्तदाब, नाडीचे ठोके, झोप, मलमूत्रविसर्जन वगैरे सगळय़ाची बित्तंबातमी डॉक्टरांना आणि हिरोशीला  कळवतो. नेहमीपेक्षा काही वेगळं घडतं आहे असं वाटलं तर तातडीने मदत मागतो. आपल्याकडे ‘पॅरो’ नाही. पण तब्येतीचा तपशील नातेवाईकांना कळवणारी घडय़ाळं, गळय़ातली पदकं आहेत.

राघूनानांची यंदा पंचाहत्तरी झाली. ते मजेत एकटेच रहातात. नातवाच्या सुट्टीत त्यांनी त्याच्याकडून स्मार्टफोन, संगणक, त्यांची जोडणी हे सगळं नीट समजावून घेतलं. मग स्वत: त्या तंत्रज्ञानाशी झुंजून ते आत्मसात केलं, नवं येणारं ताबडतोब शिकून घेतलं. नव्या तंत्रज्ञानाचा बाऊच नाहीसा झाला. चंपूताईंची जी बँक-किराणामाल-ब्यूरो वगैरे कामं कुंदा दुरून करते ती सगळी राघूनाना आपल्याआपण स्मार्टफोनवरून करतात. सरकारी कामांसाठी पायपीट न केल्यामुळे पडझड-अपघात-उष्माघात वगैरे त्रास टळतात. तब्येतीचं काही बिनसलं तर फॅमिली-डॉक्टरांशी आधी व्हॉट्सअ‍ॅप संवाद साधून मग व्हिडीओकॉल करतात. डॉक्टरांचा उंबरठाही अगदी गरज असली तरच झिजवतात. त्यांचा हेअर-स्टायलिस्ट, शिंपी आणि त्यांच्या वार्षिक तपासणीसाठी रक्त घेणारा तंत्रज्ञही आंतरजाली पाचारणाचा मान राखून घरी येतो.

राघूनानांनी गुडघ्याचं ऑपरेशन योग्य वेळी करून घेतलं, नंतर वर्षभर दिमतीला ब्यूरोची माणसं ठेवली आणि उत्तम सुविधा असलेला वॉकरही वापरला. संडासाच्या खुर्चीची उंची वाढवणारी बैठक, खाली पडलेलं वर्तमानपत्र न वाकता उचलून देणारा लांबदांडय़ा चिमटा, जमिनीवरची टाचणी नेमकी खेचून उचलणारी चुंबकटोकवाली काठी, गोळीचे दोन तुकडे करणारं यंत्र अशासारखं तांत्रिक जंतरमंतर जागोजागी त्यांचे कष्ट वाचवायला तत्पर असतं. हल्ली त्यांचे हात कापतात, चहा सांडतो, पेन थरथरतं. पण दोन कानांचा कप, पेनाचं जड टोपण, यांत्रिक हजामत्या, नखं घासायला चिमुकली विजेरी कानस हे नवे दोस्त त्यांच्या मदतीला सरसावतात. तंत्रज्ञानाची अनेक छोटी रूपं राघूनानांच्या घरात मोठी कामं करतात. 

तंत्रज्ञान वापरायची गरज पंचविशीपेक्षा पंचाहत्तरीला अधिक असते.  पंचाहत्तरीनंतर दृष्टी, कान, गुडघे, दात वयाची जाणीव करून देत रहातात. हातपाय थकतात. बुद्धीचा तल्लखपणा घटतो.  तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सगळय़ा आघाडय़ांवर आधुनिक साधनांची उत्तम मदत मिळू शकते. गरजेचं असलेलं मोठं ऑपरेशन करून घ्यायलाही तंत्रज्ञानावर विश्वास ठेवावा लागतो. तंत्रज्ञानाचा स्वीकार केला, त्याच्याशी दोस्ती केली,  त्याची जमेल तेवढी मदत घेतली तर आपलेच हातपाय-ज्ञानेंद्रियं कर्तीसवरती रहातात. आपली सगळी कामं आपल्याआपण करता येतात. ज्ञानेंद्रियांचं, हातापायांचं काम चालू राहिलं तर बुध्दीला सतत चालना मिळते. शिवाय वेगवेगळय़ा प्रकारचं नवं तंत्रज्ञान आत्मसात करायचं सतत नवं आव्हानही मेंदूला सक्षम ठेवतं. हातपाय कामसू राहिले, मेंदू सजग राहिला तर स्वावलंबन टिकून रहातं. तंत्रज्ञानाची कास धरली की परवशतेचा पाश दूर ठेवायची शक्यता वाढते.