डॉ. उज्ज्वला दळवी
‘‘आई, आज नताशा शाळेतून माझ्याबरोबर घरी येणार आहे. तिला शेंगदाण्याची भयानक अॅलर्जी येते. फक्त दडपे पोहे कर. बाजारातलं काहीही नको,’’ तन्वीच्या बोलण्यातून तिची मैत्रिणीबद्दलची कळकळ आईला समजली. तिच्या मनात नताशाच्या आईचाच विचार येत राहिला, ‘पाचवीतल्या मुलीला खाऊची अॅलर्जी! किती जपावं लागत असेल! दाणकूट कशातही घालतो आपण! मुलं एकमेकांच्या डब्यांतलं सहज खातात!’ आईला आठवलं, ‘यंदा मंगळागौरीला आलेल्या सवाष्णींपैकी एकीला चण्याची आणि दुसरीला आंब्याची अॅलर्जी होती. आंबाडाळ आणि पन्हं, दोन्ही बाद झाले!’
कशाचीही अॅलर्जी येते का? कुठल्याही अन्नपदार्थाची अॅलर्जी येऊ शकते. चीनमध्ये, उत्तर अमेरिकेत आणि पश्चिम युरोपात तर पाच ते आठ टक्के लोक कुठल्यातरी अॅलर्जीशी झुंजत असतात. पण शेंगदाण्याची, अंडय़ांची, दुधाची, कोलंबी-लॉब्स्टर-खेकडय़ांसारख्या कवचातल्या माशांची अॅलर्जी अधिक प्रमाणात जीवघेणी ठरू शकते. म्हणून तिची अधिक काळजी घ्यावी लागते.
कशामुळे येते अॅलर्जी? अॅलर्जीवाल्या लोकांच्या रोगप्रतिकारक यंत्रणेला लढायची खुमखुमीच असते. भांडकुदळ, अति उत्साही पेशी नको तिथे कुरापती काढतात. आतडय़ातल्या निरुपद्रवी अन्नघटकांवरही तुटून पडतात. त्या शस्त्रंही नेहमीपेक्षा वेगळीच( IgE अँटीबॉडीज) उगारतात. लढाई भलत्या दिशेला जाते. एरवी मारामारीत भाग न घेणाऱ्या पेशी (मास्ट पेशी, बेझोफिल्स, इओसिनोफील्स) गोवल्या जातात. हिस्टामीन नावाचा भडकमाथ्याचा निरोप्या कामाला हजर होतो; रक्तातून शरीरभर कलागती लावत फिरतो. अंगाला खाज येते. गांधी येतात. शिवाय रक्तवाहिन्या रुंदावतात, सूज येते, रक्तदाब खाली येतो. श्वासनलिका चिंबते, तिला सूजही येते. काही लोकांना काही अन्नपदार्थ सोसत नाहीत. ती अॅलर्जी नसते. पालेभाजी किंवा काकडी खाल्ली की दक्षाताईंना गॅसेस होतात ते त्या पदार्थातल्या फायबरमुळे. सुकांतीला दूध सोसत नाही. पोट डब्ब होतं, जुलाब होतात. दुधातली साखर(लॅक्टोज) पचवणारे रस तिच्या आतडय़ात बनत नाहीत. त्या त्रासांमागची कारणं अॅलर्जीहून वेगळी असतात. बांगडे-टय़ूना-पेडवे-तारली या माशांना विशिष्ट जंतुसंसर्ग झाला की ताज्या फडफडीत दिसणाऱ्या माशांतही हिस्टामीनचा साठा तयार होतो. तसे मासे खाल्ल्याने गंभीर अॅलर्जीसारखीच लक्षणं दिसतात. पण तीही अॅलर्जी नव्हे.
नताशाचं ठीक चाललं होतं. वर्गातल्या सगळय़ा मुलांना, सगळय़ा शिक्षकांना तिच्या पथ्याची माहिती दिलेलीच होती. बहुतेक मुलं, ‘खाऊत शेंगदाणे नाहीत’ असं स्पष्ट वाचून मगच तो खाऊ वर्गात आणत. नव्या आलेल्या असिताच्या वाढदिवसाला चॉकलेटं वाटली. चॉकलेटावर शेंगदाणे असल्याचं लिहिलं नव्हतं. म्हणून नताशाने ते खाल्लं. तिचा श्वास कोंडला, रक्तदाब फार खाली गेला. शाळेच्या सुपरवायझरांनी तिच्या बॅगेतलं अॅड्रिनॅलीनचं इंजेक्शन दिलं. तिच्या घरी कळवलं अॅम्ब्युलन्स मागवली. अँटिहिस्टॅमिनिक, फॅमोटिडीन, प्रेडनिसोलोन या गोळय़ा तिच्या बॅगेतही होत्या आणि सुपरवायझर बाईंकडेही होत्या. त्याही दिल्या गेल्या. सुपरवायझर तिला ठरलेल्या हॉस्पिटलात घेऊन गेल्या. तोवर तिचा श्वास बंदच झाला होता. लागलीच हिस्टामीनचं काम थांबवणारी आणि रक्तदाब वाढवायचीही औषधं दिली, कृत्रिम श्वासोच्छ्वास सुरू केला. नताशा वाचली. त्या चॉकलेटात, ‘शेंगदाणे आहेत,’ असं म्हटलं नसलं तरी ‘शेंगदाणे नाहीत,’ असंही स्पष्ट सांगितलं नव्हतं. ती एक छोटीशी चूक नताशाच्या जिवावर बेतली होती. शेंगदाण्याची अॅलर्जी तर भयंकर असतेच पण इतरही अॅलर्जी असलेल्या सुमारे ४० टक्के मुलांना तसा जीवघेणा त्रास एकदा तरी होतो.
बाबल्या वेंगुर्लेकर मत्स्यावताराचा भक्त. एके दिवशी कोलंबीचं कालवण चापल्यावर त्याला एकाएकी अंगभर सूज आली; श्वास कोंडला. तो मत्स्यामृतामुळे तडफडला. जन्मात पहिल्यांदाच आलेली अॅलर्जी तशी जिवावर उठू शकते. सर्जन असलेल्या रंजीनीला लॅटेक्स-रबराचे ग्लव्ह्ज घालून काम करावं लागे. त्यांच्या अॅलर्जीमुळे तिच्या हातांना खाज येऊ लागली; लाल पुरळ उठला; कातडी सतत खाजवल्यामुळे जाड झाली. रबरातल्या ज्या प्रथिनांची तिला अॅलर्जी आली ते प्रथिन जवळजवळ सगळय़ा भाज्या-फळांत असतं. ते त्यांचं संरक्षक प्रथिन असतं. हळूहळू काही ठराविक फळं खाल्ली की तिचा श्वास कोंडायला लागला. मग बऱ्याच भाज्या आणि फळं वर्ज्यच झाली. चीझ- आईस्क्रीम- लोणी वगैरेंना आकर्षक पिवळसरपणा देणारा रंग अॅनेटो नावाच्या फळांपासून बनवतात. रंजीनीला तोही वर्ज्य ठरला. तिने रबराचे नसलेले, व्हीनाइल ग्लव्हज न चुकता वापरायला सुरुवात केली. अॅलर्जीचं मूळच दूर केल्यामुळे पुढच्या पाच-सहा वर्षांत तिला आहारातल्या भाज्यांचं वैविध्य वाढवता आलं.
जगात सध्या सुमारे १० टक्के डॉक्टर-नर्सेसना, सात टक्के रुग्णांना आणि चार टक्के इतर लोकांना लॅटेक्स-रबर-अॅलर्जीचा त्रास होतो. त्यांच्यातल्या अनेकांना पॅकेज डील म्हणून भाज्याफळांचीही अॅलर्जी असते. शाल्मलीच्या अंगाला, डोळय़ांना खाज येई, गांधी उठत; अलीकडे दमही लागू लागला. कारण कळत नव्हतं. रक्ताच्या तपासण्यात अॅलर्जीशी निगडित असलेल्या इओसिनोफील्स नावाच्या पांढऱ्या रक्तपेशी आणि IgE अँटीबॉडीज वाढलेल्या होत्या. म्हणजे ती अॅलर्जी होती. कशाची ते शोधायचं होतं. डॉक्टरांनी सांगितलं, ‘‘काहीही तोंडात टाकलं की ते ‘व्हॅनिलावाली काजूचिक्की’, ‘कांचनगंगा-मसाला घातलेलं अननस-सफरचंद सॅलड’, ‘द्रौपदी-संडे-मसाला घातलेले सोया-नगेट्स’ असं खास खाण्यापिण्याच्या डायरीत नोंदून ठेवायचं.’’ तशा नोंदींवरून काजूच्या आणि सोयाच्या अॅलर्जीची शक्यता दिसली. तेवढेच पदार्थ वर्षभर वगळल्यावर त्रास नाहीसा झाला. त्यानंतर पुन्हा खाल्ल्यावर पुन्हा त्रास झाला. खात्री पटली. ‘अॅलर्जी कशाची आहे,’ हे शोधायची ती सर्वात चांगली पद्धत आहे. पण खात्री पटत नसली तर आणखी तपास करता येतात.
RAST नावाची रक्ताची परीक्षा असते. शाल्मलीने ती केली असती तर तिच्या रक्तात खास काजू-सोयांसाठी बेतलेल्या IgE अँटीबॉडीज सापडल्या असत्या. आरोपीच्या पिंजऱ्यात असलेल्या खाद्यपदार्थाचा सुईच्या अग्रावर राहील इतकाच भाग हलकेच त्वचेत टोचतात. त्याला प्रिक-टेस्ट म्हणतात. अॅलर्जी असली तर पुढच्या १५-२० मिनिटांत त्वचेवर गांधी उठते. खाद्यपदार्थाच्या अर्काच्या थेंबांचं त्वचेत इंजेक्शन देऊनही टेस्ट करता येते. पण तिची मोठी, जीवघेणी रिअॅक्शन येऊ शकते. त्या टेस्ट्स मोठय़ा हॉस्पिटलमध्ये, डॉक्टरांच्या उपस्थितीतच कराव्या लागतात. छोटय़ा अल्केशला गायीच्या दुधाची गंभीर अॅलर्जी होती. दूध प्यायल्यावर तर त्रास होईच पण दुधाचे एकदोन थेंबही हातावर पडले तरी तिथे फोड येत. त्याला सोया, तेलं वगैरे मिसळून बनवलेलं, आधुनिक अश्वत्थात्म्याचं महागडं दूध पाजणं भाग पडलं.
लहान मुलांमधल्या अॅलर्जीचं जगभरातलं प्रमाण वाढत चाललं आहे. प्रगत देशांतली मुलं वातानुकूलित घरांत वाढतात; स्तनपान नसल्यामुळे उकळलेल्या बाटल्यांतून फॉम्र्युले पितात; तान्हेपणी त्यांचा जगाशी संपर्क येत नाही. नंतर त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीला प्रत्येक गोष्ट परकी वाटते. म्हणून ‘चार ते सहा महिन्यांच्या वयात मुलांना शेंगदाणे-अंडी-मासे-गायीचं दूध यांचं अगदी थोडय़ा प्रमाणात उष्टावण करवून त्यांची सवय वाढवत न्यावी; त्यामुळे आस्तेआस्ते रागीट प्रतिकारशक्तीची त्यांच्याशी दोस्ती होत जाते,’ असं हल्ली तज्ज्ञांचं मत आहे. मोठेपणीही अन्नाची अॅलर्जी घटवायला तो पदार्थ हळूहळू वाढत्या प्रमाणात तोंडावाटेच देतात. त्या काळात प्रतिकारशक्ती भडकलीच तर IgE शस्त्रांना निकामी करणारं, ओमालीझूमॅब नावाचं औषध देता येतं.
अॅलर्जी सौम्य असली तर ती बेनाड्रीलसारख्या अँटिहिस्टामीन गोळय़ांनी आटोक्यात राहाते. पण ती कधीही एकाएकी वाढून जीवघेणी होऊ शकते. म्हणून भांडकुदळ पेशींना चिथावणारे अन्नपदार्थ जन्मभर वर्ज्य करणं उत्तम. प्रवासात सोबत घरचा डबा न्यावा. तरीही चुकून अपथ्य झालंच आणि श्वास कोंडू लागला, चक्कर आली तर तत्काळ घ्यायला बेनाड्रीलसारख्या अँटिहिस्टामीन गोळय़ा, प्रेडनिसोलोन हे स्टेरॉईड आणि आधीपासून भरून ठेवलेलं अॅड्रिनॅलीनचं इंजेक्शन एवढं सतत जवळ बाळगावं. अॅड्रिनॅलीनचा प्रकाशात नाश होतो. म्हणून ते ब्राऊनपेपर बॅगेत बंद ठेवावं. तशा आणीबाणीच्या वेळी बोलणं अशक्य होतं. म्हणून आपल्या अॅलर्जीची माहिती सांगणारं ब्रेसलेट नेहमी घालावं. तेवढे तातडीचे उपाय करूनही कृत्रिम श्वासोच्छ्वासाची गरज लागू शकते. म्हणून ताबडतोब हॉस्पिटलात पोहोचावं. उदरभरण हे यज्ञकर्म आहे. अॅलर्जी हा यज्ञवेदीच्या चटक्यांचा भाग. त्याच्यापासून संरक्षण मिळवायचे मंत्र शिकायलाच हवेत.