रुग्ण आणि डॉक्टर यांचं नातं संशयाच्या गर्तेत गटांगळ्या का खाऊ लागलं आहे?

डॉ. उज्ज्वला दळवी

curd in any food be dangerous
कोणत्याही पदार्थांमध्ये दह्याचा सतत वापर करणं ठरू शकतं घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
After cochlear implant surgery included in Mahatma Phule Jan Arogya Yojana Nagpur saw first surgery
महात्मा फुले योजनेतून राज्यातील पहिली कर्णरोपण शस्त्रक्रिया नागपुरात… दोन वर्षीय चिमुकला…
Puneri patya viral puneri pati outside hospital funny puneri poster goes viral
PHOTO:“मी डॉक्टर आहे इंजेक्शनसाठी…” दवाखान्याबाहेर पेशंटसाठी लिहलेल्या सूचना वाचून पोट धरुन हसाल
‘Abhi bhi feel kar raha hu’: Shah Rukh Khan opens up about struggle with breathlessness after quitting smoking
शाहरुख खानने स्मोकिंग सोडली; पण आता होतोय ‘हा’ भयंकर त्रास; जाणून घ्या याबाबतची डॉक्टरांची मते
NMC, safety doctors, medical colleges, doctors,
धक्कादायक! नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या पोटातून डॉक्टरांनी काढल्या तब्बल ६५ वस्तू; शस्त्रक्रियेदरम्यान झाला मृत्यू, पोटात आढळलं…
Solutions to achieve educational goals by inculcating interest in learning
सांदीत सापडलेले…!: उपाय
Health Special Diwali for mental health
Health Special : मानसिक स्वास्थ्यासाठी दिवाळी

‘अलीकडचे डॉक्टर पेशंटशी धड बोलत नाहीत, तपासत नाहीत! नुसत्या महागडय़ा तपासण्या करून घेतात! पैसे काढायचे धंदे यांचे! चांगली अद्दल घडवली पाहिजे त्यांना!’ आजकाल सर्वसामान्य माणसांच्या तोंडून हे ऐकायला मिळतं. नेमकं काय बिनसलंय?

माणसांची दुखणी दूर करणं हे डॉक्टरचं काम. माणसाचं शरीर आणि मन ही यंत्रं नव्हेत. त्यांचं कार्य अत्यंत गुंतागुंतीचं, क्लिष्ट असतं. त्यांचे आजार ही कधी सोप्पी तर कधी महाकठीण, फसवी कोडी असतात. तीही ठरावीक सूत्रांवर आधारलेली, गणिती कोडी नसतात. साध्या डोकेदुखीचं कारण शोधताना ५०-६० पर्यायांचा विचार करावा लागतो. पडशापासून मेंदूतल्या रक्तस्रावापर्यंत काहीही शक्य असतं. आधुनिक विज्ञानामुळे शरीरातल्या अतिसूक्ष्म पातळीवरच्या घडामोडी समजू लागल्या आहेत. त्यामुळे वैद्यकशास्त्राचा आवाका आणि व्यापही फार वाढला आहे. पडशाला कारण ठरणारे अनेक जंतू, रक्तस्रावाची विविध कारणं वगैरेंनी निदानापर्यंत पोहोचणाऱ्या वाटांचा भूलभुलैया वाढला आहे. समोरच्या माणसाचं वय-व्यवसाय-पत्ता, राहणीमान, घराणं, इतर आजार, चालू औषधं, इतर लक्षणं वगैरे अनेक गोष्टींचा परामर्श घेऊनच योग्य तो निष्कर्ष काढावा लागतो. बेस थिअरमसारख्या मार्गदर्शक तत्त्वांची मदत घ्यावी लागते. सगळा विचार योग्य मार्गाने केला तरीही खरं उत्तर हुलकावण्या देतं किंवा डॉक्टरांची विचारसरणी बिनचूक असली तरी कधी कधी आजाराचंच पाऊल वाकडं पडतं. तशा चुकांना हलगर्जीपणा, निष्काळजीपणा म्हणता येणार नाही.

पण रुग्णाला तपासून, सर्वागीण विचार करून डॉक्टरने घेतलेला निर्णय योग्य असला तरी त्याच्या योग्यपणाला ठोस पुरावा नसतो. रुग्णाच्या नातेवाईकांना ती मागची सगळी प्रक्रिया समजत नाही. ‘डॉक्टर उपचार करत होते तरीही पेशंटची प्रकृती खालावली,’ इतकंच त्यांना कळतं. नेमकं काय झालं ते डॉक्टरांनी समजावून सांगितलं तरी नातेवाईकांना ते समजतंच असं नाही. कित्येकदा रुग्णाच्या चिंतेने नातेवाईक इतके हवालदिल झालेले असतात की काही समजून घ्यायची त्यांची क्षमताच हरपलेली असते. पूर्वी अशा वेळी फॅमिली डॉक्टर नावाचा देवमाणूस, जिव्हाळय़ाचा, हितचिंतक, विश्वासाचा सल्लागार मध्ये असे. त्याला इतर डॉक्टरांची बाजू समजत असे. ‘आता डॉक्टरांच्या हातात काही नाही. ऑपरेशन करून पाहू. पण यश देवावर सोडायचं,’ असं त्याचं मत सर्वमान्य होई. गेली तीन-चार दशकं तो दुवा निखळला आहे.

डॉक्टर-पेशंट नातं आणि त्याच्याशी कायद्याचा येणारा संबंध यांचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. डॉक्टरांचा निष्काळजीपणा, गंभीर निष्काळजीपणा, वैद्यक व्यवसायातले गैरव्यवहार वगैरेंबाबत जनसामान्यांतली जागरूकता वाढली आहे. सगळेच डॉक्टर धुतले तांदूळ नसतात. डॉक्टरकडे खरी पदवी नसेल, त्याला ज्ञानच नसेल तर डॉक्टरकी करणं हा मोठा गुन्हा आहे. त्याच्याकडे अपेक्षित ज्ञान असलं तरी जर त्याने जाणूनबुजून चुकीचं काम केलं असेल तर तोही अपराधच आहे. त्याने पैसे उकळायला रुग्णाच्या तब्येतीशी खेळ केला तर तोही वैद्यक व्यवसायातला गुन्हाच झाला. तशा डॉक्टरला शिक्षा व्हायलाच हवी. त्यासाठी रुग्णाच्या संरक्षणाला दिवाणी, फौजदारी कायदे, ग्राहक संरक्षण कायदा सगळे सुसज्ज आहेत. पण डॉक्टरला दोषी ठरवण्यापूर्वी त्याने प्रामाणिकपणे काम केलं की नाही, हे ठरवणं गरजेचं असतं. त्याने एखादं औषध कशासाठी दिलं, नेमकं तेच ऑपरेशन का केलं किंवा ऑपरेशन का केलं नाही, त्यामागचे त्याचे विचार, त्याचं स्पष्टीकरण काय होतं ते समजून घेणं आवश्यक असतं.

पण उपचारांना यश आलं नाही, की पीडितांच्या मनात अन्यायाची भावना उफाळते. पूर्वी देवाला-दैवाला दोष लावला जाई. आता तो डॉक्टरचा दोष मानला जातो. चिडलेले नातेवाईक न्यायालयात धावतात. त्याचा गवगवा होतो. खटल्यात डॉक्टर निर्दोष असल्याचं सिद्ध झालं तरी जनमानसातली त्याची डागाळलेली प्रतिमा स्वच्छ व्हायला युगं लोटतात. आर्थिक, मानसिक, सामाजिक नुकसान प्रचंड होतं. शिवाय न्यायालयात डॉक्टरांच्या विचारपद्धतीबद्दल तज्ज्ञांचं मत फक्त अति गुंतागुंतीच्या खटल्यांतच घेतलं जातं. इतर खटल्यांत झुकतं माप फिर्यादीच्याच पदरात पडण्याची शक्यता मोठी असते. काही नातेवाईक न्यायालयाच्याही फंदात पडत नाहीत. कुठल्याही दुर्घटनेचं खापर डॉक्टरांच्या माथ्यावर फोडून त्यांना धोपटायचा मार्ग मोकळा असतोच. कायदा हातात घेणाऱ्यांना शिक्षा व्हावी अशा विधेयकाचा प्रस्ताव २०१९ मध्ये संसदेत फेटाळला गेला! डॉक्टर-रुग्ण-नात्यातल्या विश्वासाची जागा अविश्वास, भय, वैर यांनी घेतली. भूमिका प्रतिकूल झाल्या. डॉक्टरांच्या आणि रुग्णांच्याही विम्याच्या रकमा आभाळाला भिडल्या. धास्तावलेल्या डॉक्टरांना संपूर्ण माणसाचा विचार करून, सुशिक्षित, सुसंस्कृत बुद्धीचा, ज्ञानाचा, अनुभवाचा कौल घेऊन निर्णय घेणं धोक्याचं वाटू लागलं. उपचारांच्या प्रत्येक टप्प्यावर तपासण्यांच्या सबळ पुराव्यांची जोड देणं आवश्यक झालं.

‘खर्चाकडे बघू नका, डॉक्टर! बिनचूक निदान व्हायला हवं. सग्गळय़ा तपासण्या करा, सर्वोत्तम औषधं द्या. बाबा बरे झालेच पाहिजेत!’ असा कौटुंबिक हट्ट असतो. उत्तरहट्ट पुरवायला डॉक्टर ना देव असतो ना जादूगार. तो पूर्वहट्ट पुरवू शकतो आणि इमानेइतबारे पुरवतो. भरपूर तपासण्या केल्यामुळे ‘मेंदूच्या आत खोलवर झालेला रक्तस्राव नेमका कुठल्या रक्तवाहिनीतून झाला आहे’, ‘हृदयाची कार्यक्षमता १५ टक्के आहे की १२’ ते समजतं. त्याचा बरं होण्याशी किंवा उपचार बदलण्याशी फारसा संबंध नसतो. पण त्यामुळे निदान बिनचूक होतं. डॉक्टरने काहीही चूक केली नाही आणि जमतील तेवढे प्रयत्न केले याचा भरभक्कम पुरावाही जमा होतो. जीवशास्त्रात कधी कधी अनपेक्षित गोष्टी घडतात. बाबांना तात्पुरतं का होईना, बरं वाटू शकतंही. डॉक्टरलाही त्याची आशा असते. पण बहुतेक वेळा तसं होणार नाही, हे स्पष्ट दिसत असतं. तरीही नातेवाईकांना ते मान्य नसतं. शिवाय हल्ली डॉक्टरांची मांदियाळी झाली आहे. जवळच्या नात्यात एखादा तरी डॉक्टर असतो. तो स्वत:च उपचार करत असला तर तोही बचावाचा पवित्राच घेतो. पण जेव्हा त्याच्यावर रुग्णाची जबाबदारी नसते तेव्हा तो हवं ते सुचवायला मोकळा असतो. त्याने आगीत तेल पडतं. त्या भरीला पडून नातेवाईकांनी, ‘अजून कसं बरं वाटत नाही?’ असा जाब विचारला की त्यांच्या समाधानासाठी नवी तपासणी, नवी औषधं.. खर्च वाढत जातो. आणि मग, ‘त्या डॉक्टरांनी तपासण्यांत, औषधांत इतके पैसे काढले तरी गुण आला नाही,’ मूळच्या गंभीर दुखण्याला द्यायचा सगळा दोष डॉक्टरांना दिला जातो. वडय़ाचं तेल वांग्यावर निघतं.

दमा, अ‍ॅलर्जी, काही प्रकारचं नैराश्य वगैरे आजार पूर्णपणे बरे होत नाहीत. कधी भर तर कधी उतार असा त्यांचा जोर आयुष्यभर कमी-जास्त होत राहातो. त्यांना स्वीकारलं, योग्य औषधं नियमितपणे घेऊन कह्यात ठेवलं तर जगणं सुखाचं होतं. पण ‘मला पूर्ण बरं वाटलंच पाहिजे,’ अशा हट्टाने लोक नको नको ते इलाज करून घेतात आणि मग, ‘त्या सगळय़ा डॉक्टरांनी भलभलती औषधं देऊन माझ्या तब्येतीची वाट लावली!’ असा आरोपही करतात.

त्यामुळे एका रुग्णाची संपूर्ण जबाबदारी घ्यायलाही डॉक्टर घाबरतात. तज्ज्ञांमध्येही संपूर्ण माणूस बघणारे कमी झाले आहेत. फक्त कण्याचे, केवळ यकृताचे, फक्त फुप्फुसाचे असे एकेका अवयवाचे तज्ज्ञ असतात. ते आपापल्या क्षेत्रात पारंगत असतात. पण क्षयाची औषधं घेणाऱ्या रुग्णाने, ‘जळजळ होते’ म्हटलं की त्याला तडक पोटाच्या तज्ज्ञाकडे पाठवलं जातं. त्यात पैसे उकळायचा हेतू नसतो. ते भयापोटी होतं. तसं भीतीचं, वैराचं नातं आधी अमेरिकेत सुरू झालं. अनेकांनी त्यांच्या अंतस्थ, स्वार्थी हेतूंमुळे त्याला खतपाणी घातलं. तिथे ते फोफावलं आणि तिथून जगभर पसरलं. त्याने कुणाचंही भलं झालं नाही. जुनं परस्परविश्वासाचं नातं परत आणायला डॉक्टर, जनता आणि सरकार यांनी एकजुटीने, शिकस्तीने, सातत्याने प्रयत्न करणं आवश्यक आहे. नाही तर सध्या तरी तो विनापरतीचा प्रवास वाटतो आहे.