अस्तुत्तरस्यां दिशी देवतात्मा
हिमालयो नाम नगाधिराज:।
कालिदासच्या ‘कुमारसंभवम्’च्या पहिल्या सर्गातील हा पहिला श्लोक. त्यावरून कळते की हिमालय हा ‘नगाधिराज -पर्वतांचा राजा’ – असल्याचे पहिल्या शतकातील कालिदासालाही माहीत होते. पण केवळ १५८ वर्षांपूर्वीही तो नगाधिराज नेमका केवढा लांबरुंद व किती उंच आहे हे मात्र कुणाला माहीत नव्हते. कारण त्यापूर्वी हिमालयाचे मोजमाप कधी करण्यातच आले नव्हते.
१८०३ मध्ये विलियम लॅम्ब्टन यांनी भारताच्या ‘ट्रिग्नोमेट्रिक सर्व्हे’ची सुरुवात केली, त्याच सुमारास चार्ल्स क्रॉफर्ड हा ब्रिटिश पथकप्रमुख पूर्व नेपाळमध्ये गेला होता. या भागातील पर्वत व शिखरे अतिप्रचंड असल्याचे त्याच्याकडून इतरांना समजले. ते ऐकून कर्नल वेब या ब्रिटिश सेनाधिकाऱ्याने १८०९-१० मध्ये त्या भागातील शिखरांची उंची मोजली. तेथील ‘धवलगिरी’ हे शिखर २६ हजार फुटाहून उंच असल्याचे त्याने जाहीर केले. मात्र त्यावर कुणाचा विश्वासच बसला नाही. कारण दक्षिण अमेरिकेत बोलेव्हियातील अँडीज पर्वताचे ‘अंकोह्युमा’ ( उंची २३ हजार १२ फूट) हे त्याकाळी जगातले सर्वोच्च शिखर मानले जाई. पण हिमालय हा जगातला सर्वात उंच पर्वत असण्याची शक्यता क्रॉफर्ड व वेब यांच्यामुळे भूसंशोधकांच्या लक्षात आली.
दरम्यान मराठा राज्य लयास गेले. ब्रह्मदेशही जिंकल्यावर बहुतेक भारत व हिमालयाचाही बराच भाग इंग्रजांच्या अधिपत्याखाली आला. त्यामुळे हिमालयाची मोजमापे घेणे व नकाशे तयार करणे शक्य होऊ लागले. पण नेपाळ व तिबेटमध्ये मात्र परकीयांना मज्जाव होता.
१८४३ मध्ये जॉर्ज एव्हरेस्ट निवृत्त झाल्यावर ट्रिग्नोमेट्रिक सर्व्हेचे नेतृत्व कर्नल अँर्ड्यू वॉ यांचेकडे आले. त्यांच्या काळात हिमालयातील शिखरांची उंची निश्चित करण्याचे काम सुरू झाले.
हिमालयाच्या रांगा पूर्व पश्चिम पसरलेल्या आहेत. त्यापैकी भारताच्या बाजूने लागणाऱ्या पहिल्या कमी उंचीच्या रांगांना ‘शिवालिक टेकड्या’ म्हणतात. त्यानंतर अधिक उंचीच्या ‘मध्य हिमालय’ व त्याच्या पलीकडे सर्वात उंच ‘बृहद् हिमालय’ या रांगा आहेत. या तिन्ही रांगांच्या पलीकडे ज्या रांगा आहेत, त्यांना ‘पार हिमालय’ (ट्रान्स हिमालय) म्हणतात.
हेही वाचा >>> लोकमानस : एकाच अर्थसंकल्पात ५० वर्षांच्या गप्पा!
हिमालयातील सर्वोच्च शिखरे मध्य व बृहद् हिमालय रांगांत आहेत. पण अलीकडे असणाऱ्या शिवालिक टेकड्यांमुळे, त्यांच्या पलीकडची उंच शिखरे दिसत नाहीत. मात्र उत्तर बंगालमध्ये, दार्जिलिंग परिसरात शिवालिक रांगा नाहीत. त्यामुळे अगदी दूरवरून, दार्जिलिंग येथूनही, या भागातील कांचनजंगा व इतर शिखरांचे दर्शन घडते. या सर्व पार्श्वभूमीवर कर्नल वॉ यांनी या परिसरातील शिखरांची मोजणी करण्याचे ठरवले.
या भागातील ७९ शिखरांची उंची व नकाशातील स्थान निश्चित करण्याचे कार्य, वॉ यांच्या नेतृत्वाखाली १८४९ ते १८५५ मध्ये हाती घेण्यात आले. या शिखरांचे वेधही दूरवरूनच घ्यावे लागणार होते. कारण यापैकी बहुतेक शिखरे तिबेट आणि नेपाळमध्ये होती. आणि तिथे परकीयांच्या प्रवेशावर कठोर निर्बंध होते. कुणी परकीय त्या भागात सापडलाच तर त्याला अटक करून कैदेत टाकत. कैदेत खूप छळ होई किंवा जन्मठेपही भोगावी लागे. त्यामुळे या शिखरांच्या जवळ जाऊन स्थानिक नावासह त्यांची नेमकी स्थाननिश्चिती करणे अशक्यच होते. त्यामुळे हा सर्व्हे करताना हिमालयातील शिखरांना सांकेतिक अक्षरे किंवा क्रमांक देण्यात आले होते. उदा. Peak – A, B किंवा Peak -14, 15 इत्यादी.
भारतीय हद्दीतून शेकडो कि. मी. अंतरावरून थिओडोलाइट रोखून शिखरांचे वेध घेतले जाऊ लागले. कर्नल वॉ यांच्या सांगण्यावरून ‘जेम्स निकल्सन’ यांनी १८४९ मध्ये ‘Peak- B’ या शिखराचा वेध घेतला. मोठा थिओडोलाइट वापरून सहा ठिकाणांहून हे वेध घेतले गेले. ही ठिकाणे त्या शिखरापासून १७४ ते १९० कि. मी. अंतरावर होती.
या सहा ठिकाणांवरून एकूण ३० नोंदी घेण्यात आल्या होत्या. यात प्रकाशाच्या वक्रीभवनाचा परिणाम वगळून अचूक अंतिम उंची ठरवणे गरजेचे होते. पण त्या नोंदींवरून गणिताने तशी अचूक उंची काढण्याआधीच निकल्सनला मलेरियाने गाठले. आता हे काम गणन विभागाकडे सोपवण्यात आले. दरम्यान वॉ यांचे एक साहाय्यक मायकेल हेन्नेसी यांनी ‘Peak- B’ ला ‘Peak -15’ (शिखर -१५ )असे नाव दिले होते.
त्याकाळी राधानाथ शिकधर हे कोलकाता येथे गणन विभागाचे प्रमुख होते. विभाग प्रमुख या नात्याने त्यांना सर्व आकडेवारी उपलब्ध होत. १९५२ मध्ये त्यांच्या लक्षात आले की त्यांनी केलेल्या गणितावरून शिखर – १५ ची उंची २९ हजार फूट येत होती. म्हणजे ते जगात सर्वात उंच शिखर होते. त्यांनी लगेच हा निष्कर्ष आपले प्रमुख कर्नल वॉ यांना कळवला.
हे खरे असेल तर हा कदाचित १९ व्या शतकातील सर्वात मोठा भौगोलिक शोध होता. एकदा तो जाहीर झाला की भूगोलाच्या पुस्तकापासून ते गिर्यारोहण, नकाशे, जागतिक मानदंड, पर्यटन, अशा अनेक क्षेत्रात खळबळ उडणार होती. आणि त्या शिखराचे नाव कदाचित दररोज जगात कुठे ना कुठे झळकणार होते.
त्यामुळे वॉ यांनी स्वत: जातीने सर्व पडताळण्या केल्या. १८५५ पर्यंत इतर शिखरांचीही मोजणी झाली. आलेल्या नोंदीवर प्रकाशाचे वक्रीभवन, गुरुत्वीय परिणाम इ. विचारात घेतल्यावर या शिखराची उंची ८८४० मीटर (२९ हजार दोन फूट) असल्याचे निश्चित झाले. मग १८५६ मध्ये वॉ यांनी सर्व्हे ऑफ इंडियाचे प्रमुख या नात्याने हा निष्कर्ष जाहीर केला. तोपर्यंत त्या शिखराचे वेध घेऊन सहा वर्षे आणि तो सर्वोच्च असल्याचे लक्षात येऊन चार वर्षे उलटली होती.
अशा प्रकारे जगातील सर्वात उंच शिखर हिमालयात असल्याचे प्रकाशात आले. त्याचे नामकरण ‘माऊंट एव्हरेस्ट’ असे करण्यात आले. त्या नामकरणाचा इतिहासही त्याच्या शोधाएवढाच रंजक व उद्बोधक आहे.
पुढे सर्व्हे ऑफ इंडियाने १९५२ ते ५४ मध्ये वेध घेऊन त्याची उंची ८८४८.७३ मीटर ठरवली. २९ मे १९५४ रोजी एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनसिंग नोर्के यांनी हे शिखर सर करून जागतिक विक्रम नोंदवला. १९७५ मध्ये चीनने आठ ठिकाणांवरून अत्याधुनिक उपकरणे व तंत्राच्या साहाय्याने वेध घेऊन या शिखराची उंची ८८४८.१३ असल्याचे घोषित केले.
दूरस्थ: पर्वता रम्य: (दुरून डोंगर साजिरे) असे म्हणतात. युगानुयुगे त्याच्या जवळ राहणाऱ्यांना या शिखराचे जे साजिरेपण व थोरवी आकळली नाही, ती दुरून वेध घेणारांना उमगली. एकूणच या शिखराचा शोध ही जगात फार मोठी खळबळ उडवणारी आणि अनेक क्षेत्रांना नवी दिशा देणारी घटना ठरली.
या लेखाच्या सुरुवातीस दिलेल्या कुमारसंभवाच्या पहिल्या श्लोकाचा उत्तरार्ध पुढीलप्रमाणे आहे.
पूर्वापरौ वारिनिधी विगाह्य
स्थित: पृथ्विव्या इव मानदंड: ।।
अर्थ : तो (हिमालय) पूर्व पश्चिम समुद्रांना बाहुत घेणारा असा पृथ्वीवरील (विशालतेचा) मानदंडच आहे.
कालिदासानंतर दोन हजार वर्षांनी त्याच्या या कवीकल्पनेला पुराव्यांचा आधार मिळून ती एक भौगोलिक वास्तव आहे, हे सिद्ध झाले. तसेच त्याच्या ‘पृथ्वीचा मानदंड’ या कल्पनेला विशालतेशिवाय अजून एक वेगळेच व ‘सर्वोच्च’ परिमाण प्राप्त झाले. महान प्रतिभावंतांचे काव्य इतिहासाच्याच नव्हे तर कधी कधी भूगोलाच्याही संदर्भातही ‘अक्षर’ ठरते ते असे.
lkkulkarni.nanded@gmail.com