विनोद कुमार शुक्ल यांना नुकताच ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. त्यांची एक प्रसिद्ध कविता आहे. ‘हताशा से एक व्यक्ति बैठ गया था, व्यक्ति को मैं नहीं जानता था, हताशा को जानता था… दोनों एक दूसरे को नहीं जानते थे साथ चलने को जानते थे।’ आज क्षुल्लक कारणांवरून लोक एकमेकांच्या जिवावर उठत असताना शुक्ल यांना हा प्रतीष्ठेचा पुरस्कार जाहीर होणे महत्त्वाचे.

त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, ‘मी बारावीत हिंदीत नापास झालो नसतो, तर कदाचित आज मी डॉक्टर झालो असतो.’ ते साधारण २० वर्षांचे असताना कवी मुक्तिबोध त्यांच्या गावी राजनंदगावात आले. शुक्ल यांनी त्यांना आपल्या कविता दाखविल्या आणि हळूहळू विविध प्रतिष्ठित नियतकालिकांत त्या पाठविण्यास सुरुवात केली. त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला १९७१ साली- ‘लगभग जयहिंद’. तेव्हापासून आजवर त्यांच्या कविता, कथा, कादंबऱ्यांनी अनेक पिढ्यांचे अनुभवविश्व संपन्न केले. स्वातंत्र्यपूर्व काळात- १९३७ साली जन्मलेले शुक्ल आज ८८ वर्षांचे आहेत. मात्र आजही त्यांच्यातील लेखक आपल्याला वेळ तर कमी पडणार नाही ना, या चिंतेत आहे. पुरस्कारावरील प्रतिक्रियेत ते म्हणाले, ‘कितना कुछ लिखना बाकी है. इस बचे हुए को मैं लिख लेता हूँ, अपने बचे होने तक.’

शुक्ल यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणही राजनंदगावातच झाले. ग्रामीण जीवन जवळून अनुभवलेल्या शुक्ल यांच्या लेखनात भारतातील गावांचे, गावकऱ्यांचे सूक्ष्म बारकावे दिसतात. त्यांची पात्रे सामान्य आहेत- कोणी कारकून तर कोणी शिक्षक. त्यांचे प्रश्न, त्यांची स्वप्ने, त्यांची आव्हानेही सामान्यच. अशा सामान्यांची गोष्ट सांगता सांगता, शुक्ल समाजातील व्यंगांवर बोट ठेवतात. माणसाच्या अस्तित्वाचा संघर्ष अधोरेखित करतात. प्रतीकांचा, रूपकांचा बेमालूम वापर त्यांच्या साहित्यात दिसतो. आपल्या संवेदनशील, गुढरम्य, शैलीमुळे ते केवळ हिंदी साहित्यातीलच नव्हे, तर भारतीय साहित्यातील उल्लेखनीय लेखक ठरतात.

ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले, शुक्ल हे छत्तीसगडचे पहिलेच लेखक. ‘वह आदमी चला गया नया गरम कोट पहनकर विचार की तरह’, ‘सब कुछ होना बचा रहेगा’, ‘आकाश धरती को खटखटाता है’, ‘कविता से लंबी कविता’ हे कवितासंग्रह, ‘नौकर की कमीज़’, ‘खिलेगा तो देखेंगे’, ‘हरी घास की छप्पर वाली झोपड़ी और बौना पहाड़’, ‘दीवार में एक खिड़की रहती थी’ या कादंबऱ्या, ‘घोड़ा और अन्य कहानियाँ’, ‘पेड़ पर कमरा’, इत्यादी कथासंग्रह ही त्यांची लेखनसंपदा. त्यांना खरी ओळख मिळवून दिली ती कवितांनी. त्यांच्या अनेक कवितांचा आणि काही कादंबऱ्यांचा इंग्रजीत अनुवाद करण्यात आला. काही कादंबऱ्या आणि कथांवर आधारित चित्रपट आणि नाट्यनिर्मिती करण्यात आली. त्यांनी बालसाहित्यातही योगदान दिले.‘‘एक छुपी जगह’ ही कादंबरी त्याचेच उदाहरण. शुक्ल यांची एक प्रसिद्ध कविता आहे. ‘जो मेरे घर कभी नहीं आएँगे मैं उनसे मिलने, उनके पास चला जाऊँगा।’ नद्या, डोंगर, खडक, तलाव अशा निसर्गातील प्रेरणास्थळांचे रूपक योजून ते जे जे उत्तम त्याची भेट घेण्याची मनीषा व्यक्त करतात. हिंदी साहित्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी विनोद कुमार शुक्ल हे अशाच सर्वोत्तमांपैकी एक आहेत. ज्ञानपीठ हे त्यांच्या वाचकप्रियतेवरील शिक्कामोर्तब!