अजिंक्य घावटे

मारवाड प्रदेशात हिंदू म्हणजे नेमके कोण, हे ठरविण्याच्या प्रक्रियेत व्यापारी जातींचा मोठा सहभाग होता. त्यांनी अस्पृश्यांपासून सामाजिक अंतर राखण्याचा कसोशीने प्रयत्न केला. महाराज विजय सिंग यांच्या कारकीर्दीतील अभिलेखांचे विश्लेषण करणाऱ्या पुस्तकाविषयी..

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

The everyday social is the domain where the first experiences of social are formed.गोपाळ गुरू आणि सुंदर सरुक्काई यांच्या ‘एक्स्पिरियन्स, कास्ट अँड द एव्हरीडे सोशल’ या पुस्तकातील हे वाक्य आहे.. अलीकडे जातींच्या दैनंदिन अनुभवांचे विश्लेषण करण्याकडे अभ्यासकांचा कल दिसून येतो. विशिष्ट संहिता, साहित्य किंवा जातीविशिष्ट घटना यांचे विश्लेषण करण्याऐवजी रोजच्या जगण्यामध्ये जातींची भूमिका तपासणे उचित ठरते. अलीकडील जातीच्या अभ्यासपद्धतींमध्ये झालेला हा मुख्य बदल होय. दिव्या चेरियन यांचा ‘मर्चन्ट्स ऑफ व्हर्च्यू’ (नवयान प्रकाशन, २०२३) हा अभ्यास याच दैनंदिन जात इतिहासाचा (कोटिडियन कास्ट हिस्ट्री) भाग म्हणून पाहता येईल. जातींचा इतिहास तपासताना व्यापारी जातींची भूमिका चेरियन या पुस्तकाच्या माध्यमातून समोर मांडतात. यासाठी त्यांनी राजस्थानमधील मारवाड या राजपूत साम्राज्याचा अभ्यास सादर केला आहे.

महाराज विजय सिंग यांच्या कारकीर्दीतील (१७५२-९३) विविध अभिलेखांचे (अर्काइव्हज) विश्लेषण करत त्यावरील व्यापारी जातींच्या प्रभुत्वाची नोंद चेरियन करतात. ‘महाजन’ या एकाच संज्ञेखाली जैन, वैष्णव व काही प्रमाणात ब्राह्मण व्यापारी जातींचा विचार केला जाणे हा त्याचाच भाग होय. मारवाड प्रदेशातील हिंदू जाणिवा, अस्मिता याच महाजनांच्या प्रभावाखाली घडत गेल्या व त्या मुख्यत: ‘अछेप’- अस्पृश्यांना विरोध करत आकाराला आल्या, असा या पुस्तकाचा मुख्य दावा आहे. यापूर्वी वासाहतपूर्व काळातील हिंदू जाणिवांचा, अस्मितांचा  वेध घेताना मुस्लीम समुदायांची उपस्थिती महत्त्वाची मानली गेली. मुस्लिमेतरांना विरोध करत हिंदू स्व घट्ट होत गेला असा हा युक्तिवाद होय (रोमिला थापर- १९८९, दालमिया- १९९५). या उलट काही अभ्यासक (ख्रिस्तोफर बायली-१९८५, टालबोट-१९९५) हिंदू, मुस्लीम अशा काटेकोर विभागणीला नकार देताना पंथीय (सेक्ट्स) अस्मितांना प्रधान मानतात. मारवाड प्रदेशातील हिंदू ही धार्मिक अस्मिता मुस्लीम या घटकाऐवजी ‘अस्पृश्य’ या घटकाला विरोध करत तयार झाली, असा युक्तिवाद चेरियन करतात. मुस्लिमांचा विचारदेखील अस्पृश्यांअंतर्गत केला गेला, हे त्या सप्रमाण दाखवून देतात. राठोड राज्याने कायद्यांचा आधार घेत या प्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावली. थोडक्यात मारवाड प्रदेशात हिंदू म्हणजे नेमके कोण? हे ठरवण्यात व्यापारी जातींनी महत्त्वाची भूमिका बजावली व अस्पृश्यांपासून सामाजिक अंतर राखण्याचा कसोशीने प्रयत्न केला.

अनिकेत जावरे त्यांच्या ‘प्रॅक्टिसिंग कास्ट’ (२०१९) मध्ये नमूद करतात त्याप्रमाणे स्पृश्य-अस्पृश्यतेचा व त्याच्याशी संबंधित शारीर नीतिशास्त्राचा विचार इथे गरजेचा ठरतो.  कोणत्याही ऐतिहासिक अभ्यासासाठी साधनांचा विचार महत्त्वाचा असतो. गतकाळातील दैनंदिन घटनांचा वेध घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ऐतिहासिक साधनांची तशी वानवा आहे. प्रस्तुत पुस्तकातील दावा सिद्ध करण्यासाठी राठोड राज्यसंस्थेतील अभिलेखांचा आधार घेतला आहे. यात प्रामुख्याने- जोधपूर सनद परवाना वही (एसपीबी) व त्यातील आदेशांवर हे पुस्तक बेतलेले आहे. या वह्यांचे वैशिष्टय़ असे की, ३ बाय १ फूट आकाराच्या या वह्यांमध्ये राज्य व नागरिक यांच्यातील दैनंदिन व्यवहारांच्या नोंदी सापडतात. विविध तक्रारी, मागण्या, याचिका स्वरूपात या नोंदी आहेत. वह्यांमार्फत राज्यातील घडामोडींची नोंद ठेवणे हाच व्यापारी मनोवृत्तीचा भाग म्हणता येईल. वसाहतपूर्व काळातील दस्तावेजीकरणाचा एक प्रवाह या निमित्ताने खुला झाला आहे. या अर्थाने, हा अभ्यास मुख्यत: राज्यकेंद्री आहे, ही याची जमेची बाजू व मर्यादा म्हणूनदेखील पाहता येईल.

या नोंदीमधील आदेश हे व्यक्तींना उद्देशून नसून विशिष्ट पदांना उद्देशून केलेले आहेत उदाहरणार्थ- हकीम, कोतवाल इत्यादी. परिणामी एक व्यक्तिनिरपेक्ष व नोकरशाही सदृश प्रशासनाकडे होणारी वाटचाल म्हणूनसुद्धा या नोंदींकडे पाहता येते. या पूर्वीच्या अभ्यासांमध्ये राज्याचा (स्टेट) विचार करताना मुख्यत: राजा व दरबारी राजकारणाला प्रधान स्थान दिले गेले. इथे ‘राज्य’ या संकल्पनेचा सखोल विचार करताना स्थानिक अधिकारी व पदांचा समावेश केलेला आहे. यापूर्वी कायस्थ या पदाबाबतदेखील असा विस्तृत अभ्यास झालेला पाहता येतो. (R. O’ Hanlon, sqrq), २०१०) अठराव्या शतकांतील बहुतांशी राज्यव्यवस्थांमध्ये महाजनांनी आपले स्थान निर्माण केल्याचे दिसून येते. प्रशासक, लेखनिक, दरबारी अशा विविध स्वरूपांत व्यापाऱ्यांची प्रशासनामध्ये उपस्थिती होती. राज्याची लष्करी, राजकीय व आर्थिक-व्यापारी कार्ये यांतील ही गुंतागुंत होय. या प्रक्रियेची मुळे मुघल राज्यसंस्था व त्यातील आर्थिक व्यवहारांमध्ये स्पष्टपणे सापडतात. या संदर्भात संजय सुब्रमण्यम यांनी ‘पोर्टफोलिओ कॅपिटॅलिस्ट’बद्दल लेखन केले आहे. तर काही अभ्यासक मुघल ऱ्हासाचे कारणच मुळी गुजरातमधील ‘बँकिंग हाऊसेस’मध्ये शोधतात.

एस. गोपाळ यांचा ‘वीरजी वोरा’ (२०१७) हा लेखही इथे उद्बोधक आहे. निर्यातीच्या माध्यमातून येणार नफा व या नफ्यातून सावकारीमध्ये उतरलेल्या व्यापारी वर्गाने स्वत:चे आर्थिक व राजकीय स्थान अधिक घट्ट केले. औरंगजेबालाही कर्ज नाकारण्याची ताकद या व्यापाऱ्यांमध्ये होती, असे दिसून येते. एकूणच एक राजकीय वर्ग म्हणून व्यापाऱ्यांचा होणारा उदय बहुतांशी अभ्यासक मान्य करतात. मुघलोत्तर राजपूत व्यवस्थांमध्ये याच प्रक्रियांचे पडसाद उमटलेले दिसतात. यातूनच मारवाडी व्यापाऱ्यांचा एक मोठा वर्ग पुढे आल्याचे पाहता येईल.   ‘मर्चंट्स ऑफ व्हर्च्यू’ची रचना दोन भागांत केलेली आहे. पहिल्या भागामध्ये ‘अछेप’- अस्पृश्य जातींपासून सामाजिक अंतर राखण्यासाठी अभिजन हिंदू व्यापाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांचे वर्णन आहे. यात तीन प्रकरणे आहेत- प्युरिटी, हायरार्की, डिसिप्लिन. दुसऱ्या भागात ‘इतरांच्या’ बरोबर ‘स्व’ ची घडण स्पष्ट करतात. इथे उच्च जातीयांच्या शरीराचे नियमन, नियंत्रण करून ‘आदर्श शरीर’ निर्माण करण्याच्या प्रयत्नांचे वर्णन आहे. यात नॉनहार्म, ऑस्टेरिटी, चॅस्टिटी ही तीन प्रकरणे आहेत.

या दोन भागांची पार्श्वभूमी स्पष्ट करणारे ‘पॉवर’ नावाचे पहिले प्रकरण व दक्षिण आशियाई संदर्भात या बदलांचे उत्तर-आयुष्य तपासणारे व मारवाडी व्यापाऱ्यांचे सनातनी धर्माशी असणारे संबंध उलगडणारे एपिलॉग- उपसंहार. अशी पुस्तकाची एकंदर रचना आहे.  पहिल्या प्रकरणात पंधराव्या शतकानंतरच्या मारवाड प्रदेशातील सामाजिक, राजकीय व आर्थिक बदलांचे चित्रण आहे. यात प्रामुख्याने विजयसिंह यांचा वल्लभ संप्रदायातील प्रवेश (१७६५) व कृष्णभक्त म्हणून स्वत:ला पुढे आणण्याचा प्रयत्न महत्त्वाचा ठरतो. जोधपूर दरबाराने प्रकाशित केलेल्या ख्यात (ऐतिहासिक वंशावळी) मध्येसुद्धा विजय सिंह याचा  gusain असा उल्लेख आढळतो. (Gusain हा गोस्वामीचा स्थानिक अपभ्रंश). वल्लभाचार्य यांच्या वारसदारांना प्रतीकात्मक स्वरूपात दिलेली ही पदवी होय. या वैष्णव श्रद्धेच्या पाठपुराव्यातूनच राठोड राज्याची मायबाप अशी प्रतिमा तयार झाल्याचे मत नंदिता सहाय (२००७) नोंदवतात. कृष्णभक्ती हाच राजा आणि महाजन यांच्यातील समान दुवा होय. एका बाजूला व्यापारातील प्राबल्य तर दुसरीकडे प्रशासनातील सहभाग याआधारे व्यापाऱ्यांचे राजकीय स्थान अधिक घट्ट होत गेल्याचे चेरियन सप्रमाण दाखवून देतात. दिवाण, बक्षी, पांचोली, मुश्रफ, हकीम, दरोगा, कोतवाल, सयार, इत्यादी महत्त्वांच्या पदांवर जैन, वैष्णव व ब्राह्मणी जातींचे वर्चस्व दिसून येते. थोडक्यात डिव्होशन आणि डेट याआधारे त्यांनी ही पार्श्वभूमी स्पष्ट केली आहे.

Living next to a leatherworker violates my dharmall ( p.46)  kk If they drink water there,  my dharma will remain intact. ( p.47). महाजनांनी सत्तेचा वापर करत अछेप- अस्पृश्यांपासून सामाजिक अंतर राखले. उदाहरणस्वरूप म्हणून उपरोक्त याचिका पाहता येतील. स्वत:चा स्वतंत्र, स्वायत्त व शुद्ध असा अवकाश निर्माण करण्याचा प्रयत्न यातून दिसून येतो. अस्पृश्य म्हणजे नेमके कोण याची चर्चा दुसऱ्या प्रकरणामध्ये आहे. तुरक, चमार, धेड, थोरी, बावरी, भंगी, भांबी, मेघवाल, हलालखोर- यांचा अछेप असा उल्लेख अभिलेखांमध्ये सापडतो. याच्या कक्षा जरी रुंदावत्या असल्या तरी ‘भंगी शरीर’ हा अस्पृश्यतेचा गाभा असल्याचे निरीक्षण चेरियन नमूद करतात. भंगी कामाशी भंगी शरीर जोडले गेले असल्याकारणाने हे घडून आल्याचे दिसून येते. मेडम्ता (१७७५), पीपाडम् (१७७४) या गावांतील जटिया व मेघवाल या अस्पृश्य जातींपासून अंतर राखण्यासाठी त्यांच्या पूर्ण वसाहतीचे पुनर्वसन केले गेले. यासाठी आवश्यक खर्च उचलण्याची तयारीदेखील महाजनांनी दाखवल्याची नोंद आहे. आर्थिक व नैतिक अशा दोन्ही पातळय़ांवर हा प्रयत्न दिसून येतो. महाजन जातींची नीतिमूल्ये उदाहरणार्थ अिहसा, शाकाहार इत्यादीं विरोधी गोष्टी अछेप ठरवून बाजूला सारल्या गेल्या. एकूणच वासाहतकालीन आधुनिकतेच्या परिणाम म्हणून नव्हे तर वसाहतपूर्वकालीन कायद्यांमध्येसुद्धा अस्पृश्यता स्पष्टपणे दिसते.

तिसऱ्या प्रकरणात राज्याने धार्मिक परंपरा व व्यवहारांमध्ये केलेल्या हस्तक्षेपांची चर्चा आहे. राजपूत- मुस्लीम संबंधाचा आलेख रेखाटताना राजपूत दरबारांमधील मुस्लीम संकल्पना कशी आकाराला आली याचे चित्रण आहे. राज्य पुरस्कृत कथांमध्ये मुस्लिमांना ‘राजकीय शत्रू’ मानून त्यांना ‘इतर’ ठरवले गेले, अशी टिप्पणी चेरियन करतात. उदाहरणस्वरूप उदयपूर व सिसोदिया दरबारांतील कथा पाहता येतील. पद्मिनी कथेची पुनर्माडणी करताना अल्लाउद्दीन खिलजीचा संबंध ‘अशुद्धते’शी जोडला गेला. मुघलांपासूनचे लष्करी व सांस्कृतिक वेगळेपण व स्वत:चे राजकीय, सामाजिक वर्चस्व राखण्याचा प्रयत्न वारंवार दिसून येतो. त्यामुळे मुस्लिमांना अछेप म्हणूनच गणले गेले. राठोड राज्यासाठी ‘हिंदूं’ची संकल्पनाच मुळी मुस्लीम व अछेप यांचा वगळून साकार होते.

डिसिप्लिन या चौथ्या प्रकरणात मांसाहार विरोधी धोरणाची सखोल चर्चा आहे. महाजनांसाठी शाकाहार हे नैतिक मूल्य आहे. यामुळेच राज्याच्या विविध पदांवर असणाऱ्या महाजनांनी मृत जीवांशी अथवा मांसाहाराशी संबंध ठेवणाऱ्या समूहांना निम्नस्तरीय व इतर ठरवले. अशी कृत्ये बेकायदा मानली. याचा सर्वाधिक फटका अस्पृश्यांना बसला. थोरी, बावडमी आणि सांसी या खाटिक जातींसंदर्भात ही गोष्ट अधिक विस्ताराने स्पष्ट केली आहे. मेडम्तामधील काही आदेशांमध्ये प्राणिहत्या हा सांसीचा (samsis) स्वभावगुण म्हणूनच पाहिला गेला. यातूनच सामाजिक देखरेखीचे नवे धोरण समोर आले, ज्यात प्रत्येकजण बातमीदार होता. वासाहतकालीन ‘गुन्हेगारी जातीं’चा पूर्वेतिहास म्हणून याकडे पाहता येईल. चेरियन यांच्या मते मांसाहारविरोधी धोरण हा मारवाडमधील हिंदू अस्मिता घडण्यातील महत्त्वाचा भाग होय.

भाग दोनमधील तीन प्रकरणे उच्च मानल्या गेलेल्या जातींमधील शरीर-नियमन, नियंत्रणाची चर्चा करतात. उच्च जातीय शरीर व त्याची नीतिमत्ता जपण्यासाठी अधिकाधिक बंधने लादली गेल्याचे पाहता येते. खान-पान, लैंगिक व्यवहार, संपर्क इत्यादी संदर्भात शारीरिक शिस्तीचा आग्रह याच कारणास्तव धरला जातो. यातूनच हिंदू स्व किंवा हिंदू म्हणजे नेमके कोण याचे निकष घट्ट होत गेले. राठोड राज्याने स्वीकारलेल्या टोकाच्या अिहसेतून प्राणिहत्येवरील संपूर्ण बंदी लागू केली गेली. प्राणिहत्येबाबत कमालीची संवेदनशीलता (शेणातील कीटक, मुंगी इत्यादींपासून तेलाच्या दिव्यांना आवरण घालण्यापर्यंतचे आदेश) बाळगणाऱ्या राठोड अभिलेखांमध्ये स्त्रीभ्रूण हत्येसंदर्भात केवळ तीन नोंदी सापडतात!

महाजन जातींमध्ये व्यावसायिक यश हे जातीअंतर्गत प्रभावाशी अव्याहतपणे जोडलेले आहे. म्हणूनच व्यापार आणि प्रशासन दोन्ही पातळींवर यशस्वी ठरलेल्या जातींनी स्वत:च्या नैतिक मूल्यांचा- ‘सद्गुणांचा’ आग्रहाने पाठपुरावा केला. सट्टेबाजी, मद्यपान, गर्भपात इत्यादी संदर्भातील बंदी याचाच परिणाम म्हणून पाहता येईल. राज्याने यासंदर्भात कायदे करून त्यांची अंमलबजावणी करण्यावर विशेष लक्ष दिले. व्यावहारिक पातळीवर ही बंदी प्राणिहत्येप्रमाणे सार्वत्रिक न राहता केवळ महाजन जातींपुरती मर्यादित राहिलेली दिसून येते. महाजन जातींचे लैगिक आयुष्य नियंत्रित करण्याचा प्रयत्नही उघडपणे दिसून येतो. थोडक्यात शरीर नियंत्रणातून हिंदू स्व घडवण्याचा प्रयत्न इथे मोठय़ा प्रमाणावर दिसतो.

 ‘उपसंहार’मध्ये मारवाडी व्यापाऱ्यांनी सनातन धर्म चळवळीत बजाविलेल्या भूमिकेची चेरियन थोडक्यात चर्चा करतात. वासाहतकालीन आधुनिकतेला मारवाडी व्यापाऱ्यांनी सनातनी मार्गाचा स्वीकार करत प्रतिसाद दिला. सनातन धर्म व त्याच्या पुनरुज्जीवनासाठी काम करणाऱ्या कित्येक संस्था-संघटनांना आर्थिक निधी स्वरूपातील मदत, तसेच सनातनी साहित्य प्रकाशित करणाऱ्या छापखान्यांमधील मारवाडी गुंतवणूक या संदर्भात महत्त्वाची ठरते. (उदाहरणार्थ मुंबईतील व्यंकटेश्वर छापखाना, उत्तर प्रदेशातील कल्याण नियतकालिक व गीता प्रेस.) सार्वत्रिक – सगळय़ांना लागू होतील- अशी नीतिमूल्ये शक्य असतात का? काही विशिष्ट नीतिमूल्येच सार्वत्रिक होतात का? होतात तर ती कशी? या सर्वच प्रश्नांच्या उत्तर स्वरूपात

या पुस्तकाकडे पाहता येईल. आर्थिक भरभराट, समृद्धी लाभलेल्या व्यापारी जातींनी- महाजनांनी- स्वत:च्या नैतिक मूल्यांना सार्वत्रिक करण्यासाठी राज्याचा आधार घेतला. यातूनच हिंदू, मुस्लीम व अस्पृश्य असण्याचे ठरावीक साचे तयार झाले. या अर्थानेच हे महाजन मर्चंट्स ऑफ व्हर्च्यू होत!

मर्चंट्स ऑफ व्हर्च्यू (२०२३)

दिव्या चेरियन

नवयान प्रकाशन, नवी दिल्ली

पृष्ठ संख्या : २५५

मूल्य : ५९९ रुपये

Story img Loader