‘गुरुकुंजातील हा आश्रम माझा एकटय़ाचा नसून तुम्हा सर्वाचा आहे. ही आश्रमाची गंगा भारताच्या कानाकोपऱ्यांत पोहोचविणे हे तुमच्यावर अवलंबून आहे. हे स्फूर्तिकेंद्र आहे. याचे काशी-केदार बनायला नको.’ अशी इच्छा व्यक्त करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रचारकांना सांगतात, ‘तुम्हाला माझ्यासोबत संबंध कायम ठेवायचा असेल तर, माझ्या विचारांशी संलग्न होता आले पाहिजे; माझ्या विचारांना तुमची साथ मिळाली पाहिजे ‘‘आपल्या बापाचा तुकडोजी बुवाशी संबंध होता म्हणून आपणही ठेवू’’ हे ठीक आहे. पण हा संबंध विचारांशी हवा, शरीराशी नव्हे! कारण, शरीर हे एक दिवस जाणारच आहे; तत्त्व मात्र अमर आहे! ‘‘गुरुकुंजात शेती किती वाढली, इमारती किती बांधल्या, पैसा किती जमविला,’’ हेच जर आपण पाहू तर ते सारे विकृत स्वरूप ठरेल. ते मला नको आहे. सेवामंडळाच्या शाखा भारतात वाढल्या पाहिजेत. गुरुकुंजात हायस्कूल चालते, दवाखाना चालतो. ते इतर ठिकाणासारखे चालू नये. इथे काहीतरी आदर्श दिसायला हवा. प्रचारकांनी गावागावांत प्रार्थनेचे वारे पसरविले पाहिजे. हेच सर्व विकासाचे मूळ ठरेल! भारतात श्रीगुरुदेव सेवामंडळ ही एक संस्था आहे आणि तिच्यात ५० कार्यकर्ते असले तरी ते भारताच्या कानाकोपऱ्यांत वातावरण निर्माण करू शकतात; असे श्रीगुरुदेव सेवा मंडळाद्वारे घडले पाहिजे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा