अण्णा भाऊ साठे यांनी, वारणेच्या खोऱ्यात ब्रिटिशांनी ज्यांना ‘दरोडेखोर’ ठरवले ते प्रत्यक्षात समाजासाठी संघर्ष करणारे कसे होते हे दाखवून दिले. हेच, असेच निष्कर्ष इंग्लंडच्या ससेक्स विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक रणजित गुहा यांनी काढले तेव्हा ते ‘सबाल्टर्न स्टडीज’ या नव्या अभ्यास-शाखेचे प्रवर्तक म्हणून जगन्मान्य झाले. या अभ्यासाची जगन्मान्यता, प्रा. गुहा नुकतेच दिवंगत झाले त्यानंतरच्या आदरांजलीतूनही दिसून आली. थोडक्यात, अण्णा भाऊ साठे यांचे वाङ्मय हे ‘लोकवाङ्मय’ ठरले, तर रणजित गुहा यांनी जागतिक स्तरावर अभ्यासकांना प्रेरणा दिली. हे दोन्ही प्रयत्न मार्क्सवादी पोथीनिष्ठ ‘परंपरे’च्या पुढे जाणारे होते. केवळ कामगारवर्गालाच नव्हे, तर सर्व श्रमिक/वंचितांना क्रांतीचे अग्रदूत मानणारे होते. अण्णा भाऊंची दृष्टी मातीशी इमान ठेवल्यानेच तयार झाली होती, पण बंगाली भद्रलोकांतल्या रणजित गुहा यांच्याकडे ही दृष्टी आली कुठून? 

ती आली अँटोनिओ ग्राम्ची याच्या अभ्यासातून. स्वत: ग्रामीण असलेल्या ग्राम्चीने मार्क्सवादाच्या शहरी तोंडवळ्यावर प्रश्न उपस्थित केलेच, पण लोककेंद्री- ग्रामकेंद्री अभ्यासदृष्टी हवी , हे भान जगभरच्या प्रामाणिक विद्वानांना ग्राम्चीने दिले. मार्क्सवादाशी रणजित गुहांचा परिचय १९४० च्या दशकारंभीच झाला होता. १९२३ साली तत्कालीन पूर्व बंगालात जन्मलेले रणजित गुहा शिक्षणासाठी तेव्हाच्या कलकत्त्यात आले, ऐन पंचविशीच्या उंबरठ्यावर असताना कम्युनिस्ट पक्षाने त्यांनी युरोपात अभ्यासवृत्तीवर पाठवले. १९४७ ते ५३ अशा सहा वर्षांत त्यांनी इग्लंड व अन्य युरोपीय देश, तत्कालीन पश्चिम आशियाई व अरब देश तसेच ‘सैबेरियन रेल्वे’ने प्रवास करून चीनलाही भेट दिली. माओच्या क्रांतीचे ताजे परिणाम पाहून ते मायदेशी आले आणि १९५९ पर्यंत येथील महाविद्यालयांत शिकवू लागले. १९५९ पासून मात्र ते इंग्लंडात स्थायिक झाले. पत्नी मेश्थील्ड याही तिथल्याच. भारत हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होताच, त्यामुळे वर्षातून एक दीर्घ भारतवारी होत असे. १९७० साली- नक्षलबारीची चळवळ मोडून काढली गेल्यानंतर- त्या भागातील शेतकऱ्यांपर्यंत रणजित गुहा पोहोचले, इथून त्यांच्या अभ्यासाला खरी कलाटणी मिळाली. ब्रिटश काळ, जमीनदारी, शेतकऱ्यांची स्थिती यांविषयीच्या त्यांच्या अभ्यासाचे ‘अ रूल ऑफ प्रॉपर्टी फॉर बेंगाल’ हे पुस्तक १९५९ मध्येच प्रकाशित झाले होते पण भूमिहीन, अल्पभूधारक शेतकऱ्यांची न्याय्य हक्कांसाठीची चळवळ इतिहासात ‘उठाव’, ‘बंड’ म्हणूनच पाहिली गेली आहे ती कशी, याचा अभ्यास गुहा करू लागले. ‘एलिमेंटरी आस्पेक्ट्स ऑफ पेझंट इन्सर्जन्सी’ (१९८३) हे पुस्तक त्यातून सिद्ध झाले. शेतकऱ्यांच्या या लढ्यांबद्दल शेतकऱ्यांची बाजू मांडणारी इतिहास-साधनेच नाहीत, उलट शेतकऱ्यांचा ‘उच्छाद’ सरकारला कसा दिसला याच्याच नोंदी आहेत- मग या नोंदींमधले संकेत नेमके ओळखून, संकेतभंग केल्याखेरीज इतिहासाची लोककेंद्री मांडणी शक्यच नाही, हे गुहा यांनी ओळखले! अभ्यासदृष्टीची ही कलाटणी केवळ या ग्रंथापुरती नव्हे, तर गुहा व त्यांच्या शिष्यांनी सुरू केलेल्या ‘सबाल्टर्न स्टडीज’ (१९८२ ते २००५, बारा खंड) या ग्रंथमालिकेतूनही दिसली. सबाल्टर्न स्टडीज या अभ्यास-शाखेचे संस्थापक म्हणूनच गुहा ओळखले जातात. इतिहास जेत्यांचा नाही, पराभूतांचाही लिहायचा असतो- ‘नेत्यां’प्रमाणेच अनुयायांकडेही बारकाईनेच पाहायचे असते, असे मानणारी ही शाखा आहे. 

maharashtra assembly polls 2024 state economy in decline during bjp rule says chidambaram
भाजपच्या सत्ताकाळात महाराष्ट्राची पीछेहाट; माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची टीका
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : हस्तक्षेपास एवढा विलंब का झाला?
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
Narendra Modi statement regarding the middle class in a meeting in Pune news
पंतप्रधानांची मध्यमवर्गाला साद; ‘मध्यमवर्गाची प्रगती होते, तेव्हा देश प्रगती करतो’; पुण्यातील सभेत विधान
pm modi rally in pune pm modi mega roadshow in pune ahead of maharashtra assembly elections
पंतप्रधानांची मध्यमवर्गाला साद ; ‘मध्यमवर्गाची प्रगती होते, तेव्हा देशाचा विकास’; पुण्यातील सभेत विधान
Ramdas Athawale, Panvel Candidate Prashant Thakur,
राहुल गांधी यांच्या अनेक पिढ्या आल्या तरी संविधान बदलू शकणार नाहीत, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादन

‘सबाल्टर्न’ हा शब्द ग्राम्चीचा. ‘लष्करातील तळाच्या दर्जाचा शिपाई’ अशा अर्थाचा हा शब्द ग्राम्चीने खिजगणतीत नसलेल्या गरीब/वंचितांसाठी वापरला. मुसोलिनीच्या काळात कैदेत असताना ग्राम्चीने वह्यांमध्ये इटालियन भाषेत केलेले लिखाण त्याच्या मृत्यूनंतर प्रकाशित होऊन इंग्रजीतही आले, त्यानंतर मार्क्सनिष्ठ सिद्धान्तालाच हादरा बसला. दुसरीकडे, जगभरच्या अनेक वसाहतींना दुसऱ्या महायुद्धानंतर स्वातंत्र्य मिळाले, ‘तिसरे जग’ अशी ओळख या वसाहती सांगू लागल्या, तर तिसरीकडे, एडवर्ड सैद यांचे ‘ओरिएंटॅलिझम’ हे पुस्तक १९७८ मध्ये प्रकाशित झाले… अशा अनेक घडामोडी, ‘सबाल्टर्न स्टडीज’ची सुरुवात होण्यास कारणीभूत ठरल्या. पण सर्वांत महत्त्वाची घडामोड म्हणजे १९७० नंतर रणजित गुहा यांनी जमिनीवरील वास्तवाचा घेतलेला पुनर्शोध, अनेक (बहुधा आशियाई, आफ्रिकन, एरिक हॉब्जबॉमसारखे काही ब्रिटिशही) सहकारी तसेच शिष्य यांच्याशी वेळोवेळी झालेल्या चर्चा, त्यातून वसाहतोत्तर इतिहासकारांना पडणाऱ्या प्रश्नांची जाण, या सर्वांतून ‘सबाल्टर्न स्टडीज’ घडले. संशोधन-पत्रिकेचे स्वरूप टाळून, पुस्तकाचे खंड काढणे गुहा आणि सहकाऱ्यांनी पसंत केले. पुढे ‘कॅन द सबाल्टर्न स्पीक?’ हा निबंध लिहिणाऱ्या गायत्री चक्रवर्ती-स्पिवाक यादेखील ‘सबाल्टर्न स्टडीज’ ग्रंथमालेच्या कामात लक्ष घालू लागल्या. सन २००५ मध्ये या ग्रंथमालेतील अखेरचा ग्रंथ निघाला, तो सांगण्यासारखे काही उरले नाही म्हणून नव्हे… आता या ग्रंथमालेवर विसंबून न राहाता इतरत्रही, इतर भाषांतही लिहिता येईल, या विश्वासातून हा विराम घेण्यात आला!  गतकाळ हा नेहमीच वैचारिक वादांचा प्रदेश असतो, याची पुरेपूर जाणीव रणजित गुहांना होती. त्यामुळेच, ‘कोणाचा इतिहास?’ हा प्रश्न त्यांनी महत्त्वाचा मानला आणि इतिहासाचे ‘कथन करणे’ हे आपले काम नसून, इतिहासातून त्या- त्या काळाच्या ताण्याबाण्यांचे बंध-अनुबंध (पॅटर्न) शोधणे हे इतिहासकारांचे कर्तव्य आहे, असे त्यांनी मानले.