जग जिंकण्याची अलेक्झांडरची महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊ शकली नाही ती भूगोलाविषयीच्या त्याच्या अज्ञानामुळे.
‘प्राचीन काळच्या साम्राटांपासून ते सध्याच्या राज्यकर्त्यांपर्यंत सर्वजण भूगोलाचे गुलाम किंवा कैदी आहेत.’ टिम मार्शल यांच्या ‘प्रिझनर्स ऑफ जिओग्राफी’ या ग्रंथाचे हे मुख्य सूत्र आहे. त्याला अनुमोदन देणारी अनेक नाटय़मय उदाहरणे इतिहासात आहेत. त्यापैकी अलेक्झांडर ऊर्फ सिकंदर याचे उदाहरण उद्बोधक आहे.
इ. स. पूर्व ३२६ च्या जुलैमध्ये भारतात झेलमकाठी पोरसविरुद्धचे युद्ध झाल्यावर अलेक्झांडरला आपली विजयमोहीम आवरती घ्यावी लागली. त्यामागील अनेक कारणांपैकी गंगा नदीबद्दल ग्रीकांच्या अवास्तव कल्पना व भीती, म्हणजे भूगोलाचे अज्ञान, हेही एक कारण होते. कारण काही असो, पण उर्वरित भारत जिंकून जगज्जेता होण्याचे स्वप्न सोडून देऊन, बियास नदी न ओलांडताच अलेक्झांडर परत निघाला. मात्र ज्या मार्गाने तो आला होता त्या खैबर खिंड मार्गाने परत न जाता सिंधू नदीतून जलमार्गे जाण्याचा निर्णय त्याने घेतला. असे करून त्याने नकळत एक युद्ध छेडले होते आणि ते युद्ध होते निसर्गाशी.
तोपर्यंत ही चूक त्याने टाळली होती. भारतात येताना खैबर खिंड ओलांडण्यापूर्वी त्याने त्या खिंडीच्या अलीकडे असणाऱ्या तक्षशिलेचा राजा अंभी याला अंकित करून घेतले होते. नंतरही सिंधू नदी ओलांडताना, पोरसविरुद्ध युद्धाच्या वेळी पुरामुळे रोरावणारी झेलम नदी पार करताना, अशा अनेक ठिकाणी तो भौगोलिक बाबतीत जागरूक होता.
पण परत जाताना जलमार्गे सिंधूतून जाण्याचा निर्णय मात्र त्याने काही गृहीतकांच्या आधारे घेतला. त्याची कल्पना अशी होती, की सिंधू नदी पुढे कुठेतरी नाईल नदीच्या वरच्या भागात तिला मिळते. सिंधूतून नाईलमध्ये आणि मग नाईलमार्गे भूमध्य समुद्रात उतरू अशी त्याची योजना होती. खरे तर तो काही नवा भूप्रदेश शोधायला निघालेला प्रवासी संशोधक नव्हता. त्यामुळे हजारो सैनिक आणि प्रचंड संपत्ती घेऊन अज्ञात मार्गाने जाणे, हा त्याने खेळलेला भौगोलिक जुगारच ठरला. आपण केवढी मोठी चूक केली हे त्याला फार उशिरा कळाले.
१८०० नावा आणि जहाजे, ८७ हजार पायदळ, १८ हजार घोडदळ, ५२ हजार इतर माणसे आणि प्रचंड संपत्ती घेऊन अलेक्झांडर सिंधूमार्गे परत निघाला. पण या प्रवासात सिंधू नदीकाठच्या लहान लहान राज्यातील लढाऊ टोळय़ांनी त्याच्यावर हल्ले केले. त्या भागातील भूरचना त्या टोळय़ांना ज्ञात व सोयीची होती. त्यामुळे मोठमोठय़ा युद्धात अजेय ठरलेले अलेक्झांडरचे सैन्य या टोळय़ांच्या गनिमी हल्ल्यांनी जेरीस आले. आजच्या मुलतान प्रांत परिसरात एका लढाईत तर खुद्द अलेक्झांडरच अतिशय गंभीररीत्या जखमी झाला.
मैदानी प्रदेशात सिंधू नदीचे पात्र दोन्ही बाजूस कित्येक कि.मी. पसरते. पण गाळ साचल्याने त्याची खोली सतत बदलते. पुढे मुखाजवळ तर सिंधूच्या हजारो चौरस किलोमीटर पसरलेल्या शाखोपशाखांत असंख्य लहान-मोठे प्रवाह व बेटे आहेत. शिवाय या त्रिभुज प्रदेशाच्या दोन्ही बाजूस शेकडो मैल दलदलीचा प्रदेश पसरलेला आहे. आणि त्याच्या पलीकडे पूर्वेला भारताच्या दिशेने थरचे वाळवंट तर पश्चिमेला मकरानचे वाळवंट आहे. याचमुळे त्यापूर्वी व त्यानंतरही कुणीही कधीही सिंधमार्गे भारतात आले किंवा गेले नाही.
असंख्य अडचणींचा सामना करीत सिंधू नदीतून अलेक्झांडर आजच्या सिंध प्रांतापर्यंत पोहोचला. तोपर्यंत त्याला कळून चुकले होते की सिंधू ही नाईलची उपनदी नाही. सिंधूमार्गे समुद्रात पोहोचू शकलाच तरी तो नाईल नदी आणि भूमध्य समुद्र यांच्यापासून हजारो कि. मी. पूर्वेस अरबी समुद्रात उतरणार होता.
मग त्याने नौदल अधिकारी निआर्कसच्या नेतृत्वाखाली एक तुकडी समुद्रमार्गे पर्शियाच्या आखाताकडे पाठवली. सेनापती क्रिटेरसच्या नेतृत्वाखाली सैन्याचा एक भाग जमिनीवरून कार्मेनियाकडे (आजचा दक्षिण इराण) पाठवला. तर एक भाग घेऊन तो स्वत: ज्रेडोसिया (आजचे मकरान ) वाळवंटातून पर्शियन आखाताच्या काठाने निघाला. समुद्रातून समांतर जाणाऱ्या निआर्कसने वाटेत त्यांना टप्प्याटप्प्यावर अन्न, पाणी व रसद पुरवावी अशी योजना होती.
पण भौगोलिक स्थिती माहीत नसलेल्या दुर्गम वाळवंटातून स्वत: मोठय़ा सैन्यासह जाणे ही तर त्याची फारच मोठी चूक ठरली. त्यात भर म्हणजे त्या काळात मोसमी वारे नेमके उलट (जमिनीवरून समुद्राकडे ) वाहू लागल्याने निआर्कसची जहाजे भरकटली. परिणामी पूर्वयोजनेनुसार अलेक्झांडरला वाळवंटात अन्न, पाणी मिळूच शकले नाही.
आता समोर शत्रू असा कुणीच नव्हता. पण पाणी व अन्नाचा अभाव हेच शत्रू बनले. निर्जन, निर्जल असे मकरानचे वाळवंट ( सध्याच्या पाकिस्तानमधील बलुचिस्तान) आणि पर्शियन आखाताच्या किनाऱ्याचा खडकाळ, ओसाड भूप्रदेश ओलांडणे हे एक दु:स्वप्न ठरले. अन्न, पाण्याअभावी असंख्य जनावरे व सैनिक तहान, भूक आणि प्रचंड उष्णतेमुळे तडफडून मेले. सोबत आणलेल्या लुटीतील अनेक मौल्यवान वस्तू वाटेत ठिकठिकाणी टाकून द्याव्या लागल्या. कारण ते वाहून नेण्यासाठी जनावरे आणि माणसेच नव्हती. हे वाळवंट ओलांडण्यास त्याला दोन महिने लागले आणि सुमारे १५ हजार सैनिक मृत्युमुखी पडले. त्याच्या भारत मोहिमेत एकाही युद्धात एवढे सैनिक मेले नव्हते.
असंख्य हालअपेष्टा भोगून, उर्वरित सैन्यासह अलेक्झांडर कसाबसा इ. स. पूर्व ३२४ मध्ये पर्शियात सुसा (सध्याच्या इराणमध्ये) येथे पोहोचला. परतीच्या एकूण पूर्ण प्रवासाला त्याला दोन वर्षे लागली. त्यानंतर विजय समारंभ वगैरे झाला, पण ते सर्वच तात्कालिक ठरले. पुढे बॅबिलोनला पोहोचल्यावर लवकरच तो गंभीर आजारी पडला. त्याच्यावर विषप्रयोग करण्यात आला होता, असेही मानले जाते. ते अशक्य नव्हते.
परतीच्या प्रवासात वाटेत प्रचंड हानी तसेच भूक व तहानेने सैनिकांचे मृत्यू झाले होते. त्याप्रसंगीही अलेक्झांडरचे व्यक्तिगत वर्तन एखाद्या धीरोदात्त नायकाचे होते. इतर सैनिक तहानलेले असताना स्वत: एकटय़ाने पाणी पिण्यास त्याने नकार दिला होता. पण आपला ‘सदैव सुदैवी’ वाटणारा जगज्जेता हिरो – नायक असंख्य ठिकाणी दैवापुढे, निसर्गापुढे हतबल होताना या प्रवासात सर्वाना दिसला होता. यानंतर अनेक कारणांनी अलेक्झांडरची लोकप्रियता ओसरू लागली. कटकारस्थाने सुरू झाली. इ. स. पूर्व ३२३ मध्ये वयाच्या केवळ ३३ व्या वर्षी महान -द ग्रेट – मानल्या जाणाऱ्या जगज्जेत्या अलेक्झांडरचा मृत्यू झाला.
वयाच्या २० व्या वर्षी सत्तेवर येऊन केवळ तिसाव्या वर्षी त्याने तोपर्यंतचे सर्वात मोठे साम्राज्य निर्मिले. त्याने केलेल्या एकूण २० मुख्य व अनेक लहान-मोठय़ा लढायांपैकी एकही लढाई तो हरला नाही. यामुळेच ‘जो जिंकेल तो सिकंदर’ सारख्या म्हणी रूढ झाल्या. प्रत्येक लढाईत तो स्वत: आघाडीवर रहात असल्याने त्याला केव्हाही मृत्यू येऊ शकला असता. पण तसे झाले नाही. भारतातून परत जाताना मुलतानजवळ एका लढाईत छातीवर बाण लागून तो प्राणांतिक जखमी झाला. पण त्यातूनही तो आश्चर्यकारकरीत्या वाचला. याचमुळे ‘नशीब सिकंदर’ सारखे शब्दप्रयोग रूढ झाले. परंतु एवढे असूनही शेवटची निसर्गाविरुद्धची लढाई मात्र अपवाद ठरली. भूगोलाकडे दुर्लक्ष करून जगज्जेता साम्राटही जिंकू शकत नाही, हाच अलेक्झांडरच्या कहाणीच्या अंतिम अध्यायाचा अर्थ आहे.
एल. के. कुलकर्णी,‘भूगोलकोशा’चे लेखक आणि भूगोलाचे निवृत्त शिक्षक
lkkulkarni.nanded @gmail.com