एल के कुलकर्णी
बऱ्याच शास्त्रज्ञांना असे वाटे, की हरितगृह परिणाम हा स्थिर अवस्थेला पोहोचला असून त्यात आता बदल होणार नाही. काही जण असे मानत की हवेतील कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण एका मर्यादेपलीकडे वाढले की जास्तीचा वायू समुद्रात विरघळून जाईल.

असे काही खरेच होऊ शकेल याची चाहूल सर्वात आधी थोर भूगोल संशोधक अलेक्झांडर व्हॉन हंबोल्ट यांना लागली. १८३१ मध्ये त्यांनी असे सुचवले की जंगलतोड आणि वाफेच्या यंत्रांचा वाढता वापर याचा अनिष्ट परिणाम पृथ्वीच्या वातावरणावर होऊ शकेल. त्यापूर्वी जोसेफ फोरिअर, युनिस न्यूटन फूट यांनी हरितगृह परिणामाचे सूचन केले होते. तर जॉन टिंडॉल यांनी काही वायूंचे प्रमाण वाढल्यास वातावरणाचे तापमानही वाढेल हे सुचवले होते. हे ग्लोबल वॉर्मिंगचे अप्रत्यक्ष सूतोवाच होते. स्वीडनचे स्वँट अर्हेनियस यांनी हवेतील कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण सध्यापेक्षा अर्धे झाले तर वातावरणाचे तापमान खूप कमी होईल व त्याचे प्रमाण सध्याच्या दुप्पट झाल्यास तापमान पाच ते सहा अंशाने वाढेल असे १८९६ मध्ये सिद्ध केले. हे तर सरळ भू-तापवृद्धीचे – ग्लोबल वॉर्मिंगचेच – भाकीत होते. हा सर्व इतिहास यापूर्वीच्या लेखात आलेला आहे. एका अर्थाने हरितगृह परिणामाचा शोध हा भू-तापवृद्धीच्या शोधाचा पूर्वार्ध होता.

Loksatta anyartha Confusion in MPSC Result MPSC Affected Maharashtra State Public Service Commission Exam Recruitment
अन्यथा: तात्यांचा ठोकळा…!
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Loksatta anvyarth Shanghai Cooperation Council Pakistan Foreign Minister Bilawal Bhutto Zardari Foreign Minister S Jaishankar
अन्वयार्थ: जयशंकर ‘शिष्टाई’चे फळ
Prakash Ambedkar On OBC reservation
Prakash Ambedkar : ‘विधानसभेच्या निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षण थांबवलं जाणार’, प्रकाश आंबेडकर यांचा मोठा दावा
Devendra Fadnavis visited all interested leaders at their homes
विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी पुण्यातील भाजपच्या इच्छुक असलेल्या नेते मंडळींची देवेंद्र फडणवीस यांनी घेतली भेट
Arvind Sawant
Arvind Sawant Apologise : गुन्हा दाखल झाल्यानंतर अरविंद सावंतांनी व्यक्त केली दिलगिरी, पण ‘या’ नेत्यांची नावे घेत म्हणाले…
problem of traffic congestion in Mahabaleshwar created difficulties at many places
महाबळेश्वरला दिवाळी हंगामापूर्वीच वाहतूककोंडी
train hits student sitting on track with headphones
हेडफोन आणि मोबाइल ठरलं मृत्यूचं कारण; रेल्वे ट्रॅकवर बसलेला विद्यार्थी ट्रेनखाली चिरडला, कुटुंबानं एकुलता मुलगा गमावला

या प्रक्रियेला ग्लोबल वॉर्मिंग किंवा भू-तापवृद्धी हे नाव अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातील शास्त्रज्ञ वॅलेस ब्रोकर यांनी १९७५ मध्ये सुचवले. म्हणजे या प्रक्रियेची कल्पना येऊनही तिला नाव मिळण्यास ७९ वर्षे जावी लागली. कारण बऱ्याच शास्त्रज्ञांना असे वाटे, की हरितगृह परिणाम हा स्थिर अवस्थेला पोहोचला असून त्यात आता बदल होणार नाही. काही जण असे मानत की हवेतील कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण एका मर्यादेपलीकडे वाढले की जास्तीचा वायू समुद्रात विरघळून जाईल. कार्बन डाय ऑक्साइडचे हवेतील प्रमाण अत्यल्प – ०.०३ टक्के – आहे. पृथ्वीच्या निर्मितीनंतर सुरुवातीला हे प्रमाण जास्त होते. पुढे वनस्पती निर्माण झाल्या व त्या प्रकाश संश्लेषणासाठी हवेतील कार्बन डाय ऑक्साइडचे शोषण करू लागल्या. त्यामुळे त्याचे हवेतील प्रमाण कमी होऊन ०.०३ टक्के झाले. ते असे स्थिरच राहील असे अनेक तज्ज्ञांचे मत होते.

पण १९३८ मध्ये गाय स्टिव्हर्ट कॅलेंडर या एका अप्रसिद्ध इंग्रज इंजिनीअरने या स्थिर कल्पनेला मोठा हादरा दिला. त्यांनी एकोणिसाव्या शतकापासूनच्या तापमानाचे आकडे व हवेतील कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण याचा अभ्यास केला. त्या आधारे त्यांनी निष्कर्ष काढला की वातावरणाचे तापमान वाढत आहे आणि त्याचे कारण हवेतील कार्बन डाय ऑक्साइडचे वाढते प्रमाण हे आहे. कॅलेंडर यांनी अतिशय कष्टाने व जिद्दीने संकलित केलेली आकडेवारी व निष्कर्ष अचूक असल्याचेच पुढे आढळून आले. म्हणजे वातावरणाचे तापमान वाढत आहे, हे कॅलेंडर यांनी कारणासह सिद्ध केले. हा शोध एवढा निर्विवाद ठरला की, ही तापमानवाढीची क्रिया ‘कॅलेंडर परिणाम’ म्हणून ओळखली जाऊ लागली.

१९५० च्या दशकात गिल्बर्ट प्लास यांनीही निष्कर्ष काढला की कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण वाढल्यास वातावरणाचे तापमान वाढेल. त्याच सुमारास एडवर्ड सुएस यांना कार्बन डाय ऑक्साइडची पातळी वाढत असल्याचे पुरावे मिळाले तर रॉजर रेविल यांनी हे दाखवून दिले की आता महासागरात कार्बन डाय ऑक्साइडचे शोषण होणार नाही. तात्पर्य ५० वर्षांपूर्वी स्वँट अर्हेनियस यांनी सांगितलेले भाकीत खरे ठरून ग्लोबल वॉर्मिंग नावाचे अरिष्ट मानवाच्या डोक्यावर घोंघवू लागलेले होते. त्याची अधिकृत घोषणा बाकी होती एवढेच.

चार्ल्स किलिंग हे एक अमेरिकन शास्त्रज्ञ होते. कॅलिफोर्नियातील कॅलटेक या संस्थेत त्यांनी वातावरणातील कार्बन डाय ऑक्साइड वायू मोजणारे उपकरण तयार केले होते. पुढे त्यांच्या पुढाकाराने हवाई बेटावरील मौना लोआ वेधशाळेत कार्बन डाय ऑक्साइडच्या प्रमाणावर लक्ष ठेवण्याचे व नोंदी ठेवण्याचे काम सुरू झाले. १९५८ ते २००५ अशी तब्बल ४७ वर्षे त्यांनी हे काम केले. एवढा प्रदीर्घ काळ अशा नोंदी ठेवण्याचा हा विक्रमच होता. पण त्यातूनच वातावरणातील कार्बन डाय ऑक्साइडची पातळी वाढत असल्याचे निर्विवादपणे सिद्ध झाले. या नोंदींचा आधारे त्यांनी प्रसिद्ध केलेला आलेख ‘किलिंगची वक्ररेषा’ (किलिंग कर्व्ह) नावानेच प्रसिद्ध झाला. अमेरिकेच्या जेम्स हॅन्सन यांच्या १९८८ मधील एका अभ्यासाने आजवर वाटणारी भीती खरी ठरल्याचे दिसले. गेल्या शंभर वर्षात पृथ्वीच्या वातावरणाचे सरासरी तापमान ०.५ ते ०.७ अंशाने वाढल्याचे त्यांनी निर्विवादपणे दाखवून दिले. एकूण पृथ्वीला खरेच ज्वर चढत असून ग्लोबल वॉर्मिंग हे केवळ काल्पनिक संकट नव्हे तर वास्तव व मोठी आपत्ती असल्याचे सिद्ध झाले.

या भू-तापवृद्धीचे परिणाम महासागर, वातावरण व सजीव या सर्वांवर होत आहेत. वाढत्या तापमानामुळे उत्तर व दक्षिण ध्रुवावरील बर्फ मोठ्या प्रमाणावर वितळत आहे. त्यामुळे तेथील हिमटोप्यांची (आईस कॅप्स) जाडी कमी होऊन महासागराची पातळी प्रत्यक्षात वाढत असल्याचे आढळून आले. यामुळे येत्या काही दशकांत अनेक बेटे, बंदरे व सागरकिनारे हळूहळू पाण्याखाली जाण्याची भीती आहे. अधिक तापमानामुळे गेल्या काही दशकांत वणव्यांचे प्रमाण वाढले आहे. तापमान बदलामुळे अनेक सागरी व इतर सजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. दुसरीकडे हवामानात मोठे बदल होत आहेत. उष्णतेच्या व थंडीच्या लाटा अधिक तीव्र झाल्या आहेत. एल निनोची तीव्रता, पर्जन्याचे वेळापत्रक, वितरण व प्रमाण यात मोठे बदल होत आहेत. त्यामुळे एकीकडे अतिवृष्टी तर दुसरीकडे अवर्षण यांचे प्रमाण एकदम वाढले. याशिवाय अजून कोणते अप्रत्यक्ष दुष्परिणाम उद्भवतील हेही अनिश्चित आहे. उदा. हवेचे तापमान वाढले की तिची बाष्पधारणक्षमता वाढते. वाफ हीदेखील हरितगृह वायू आहे. त्यामुळे तिचे प्रमाण वाढले की तापमान अजून वाढते. त्यामुळे पुन्हा बाष्पधारणक्षमता वाढते. असे तापमानवाढीचे अजून एक दुष्टचक्र सुरू होते. तात्पर्य भू-तापवृद्धी ही तात्त्विक गणितापेक्षा कित्येक पट व्यापक व वेगवान ठरू शकते. त्यामुळे आजकाल ग्लोबल वॉर्मिंगऐवजी ‘क्लायमेंट चेंज’ किंवा ‘हवामान बदल’ असा व्यापक शब्द रूढ होत आहे.

या संभाव्य अरिष्टाबद्दल शास्त्रज्ञ सावध करीत होतेच. १९८८ मध्ये वातावरणीय बदलासंबंधी एका आंतरराष्ट्रीय पॅनल- आयपीसीसी- ची स्थापना करण्यात आली. त्यावर विविध शाखांचे तज्ज्ञ असून ते जगातील सर्व सरकारांना योग्य त्या शिफारशी करतात. सुरुवातीला ग्लोबल वॉर्मिंगबद्दल संशोधकांतही पूर्ण सहमती नव्हती. ती पुढे होत गेली. २०१९ च्या एका अहवालानुसार तर ९९ टक्के तज्ज्ञ या बाबतीत सहमत आहेत. इतकेच नव्हे तर भू-तापवृद्धीच्या दुष्परिणामांपासून लोकांना वाचवण्यासाठी तातडीने कृती करण्याची गरज शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. याबाबतच्या अनेक तज्ज्ञ परिषदांतून देशांना व जागतिक नेत्यांना हरितगृह वायूंचे उत्सर्जन तातडीने कमी करण्याबाबत वारंवार आवाहनही करण्यात येते. तसे एकूणच जग या बाबतीत खडबडून जागे झाल्याचे दिसते. या संदर्भात वेळोवेळी सर्व स्तरांवर परिषदा, मेळावे, आंतरराष्ट्रीय शिखर परिषदा इ. चे आयोजन करण्यात येते. त्यातून आढावे घेऊन आवाहने वगैरे करण्यात येतात. पण दुर्दैवाने याबाबत जेवढा गाजावाजा केला जातो तेवढी प्रत्यक्ष कृती करण्यात आलेली नाही. हरितगृह वायूंचे उत्सर्जन व त्यावर नियंत्रण यात प्रचंड प्रमाणावर जागतिक अर्थकारण गुंतलेले आहे. त्यामुळे अशा परिषदांमध्येही आंतरराष्ट्रीय राजकारण व सत्ताकारण, प्रादेशिक गटबाजी, विकसित व अविकसित देशांची रस्सीखेच, औद्याोगिक महासत्तांचे हितसंबंध यांच्या छाया पडत आहेत. हे सर्व असूनही याच प्रकारच्या ओझोन छिद्र आपत्तीबाबत मानवाने यशस्वी व योग्य उपाययोजना केली आहे. ग्लोबल वॉर्मिंग हेही तसेच सर्व राजकीय व आर्थिक हितसंबंधांच्या पलीकडचे, गंभीर व तातडीचे संकट आहे. त्याबाबतही मानवजात ओझोन छिद्र समस्येबाबत दर्शवले तसेच शहाणपण दर्शवेल अशी आशा करू या.