एल के कुलकर्णी
१००-१२५ वर्षांपूर्वी हवामानाचे भाकीत ही हास्यास्पद कल्पना मानली जात असे. पण आज एखाद्या रेल्वेप्रमाणे संभाव्य चक्रीवादळाचे वेळापत्रक सांगितले जाते. उद्या भूकंप भाकिताबाबतही असे घडणे अशक्य नाही.
विभंग किंवा भूकवचातील भेगेजवळ जमा होणाऱ्या दाबाकडे लक्ष ठेवले, तर भूकंपाचे भाकीत करणे शक्य होईल, असे मत १९१० मध्ये हॅरी रीड या शास्त्रज्ञाने व्यक्त केले होते. पण शेकडो किलोमीटर लांबीच्या विभंगांवर लक्ष ठेवण्याची यंत्रे व तंत्रे त्या वेळी उपलब्धच नव्हती. पुढे भूकंप मापक व इतर यंत्राचा शोध लागला आणि भूकंप भाकीत शास्त्रही विकसित होत गेले.
पूर्वानुमान (Forecast), भाकीत (Predection) आणि अंदाज या भिन्न गोष्टी आहेत. भूकंपाचे स्थळ, काळ व प्रमाण याबद्दलचा अल्पकालिक अभ्यासपूर्ण तर्क म्हणजे ‘पूर्वानुमान’ तर ‘भाकीत’ हे दीर्घ कालावधीसाठीचे (काही महिने वा वर्ष) पूर्वानुमान असते. भूकंपापूर्वी काही तास, मिनिटे आधी विशिष्ट क्षेत्रापुरता दिलेला अंदाज म्हणजे ‘पूर्वसूचना’ होय. याशिवाय ‘भूकंपइशारा यंत्रणा’ (Earthquake Warning) वेगळी. ती भूकंप झाल्यानंतर काही सेकंदात त्यासंबंधी सावध करते.
प्रचंड दाबाखाली असलेल्या खडकात होणारे बदल (त्यांना डायलेटन्सी म्हणतात) १९६० नंतर ओळखता येऊ लागले होते. १९४९ मध्ये रशियाच्या सर्बिया भागात झालेल्या भूकंपानंतरच्या प्रदीर्घ अभ्यासाचे निष्कर्ष १९७१ च्या आंतरराष्ट्रीय भूकंप परिषदेत मांडले गेले. त्यानुसार भूकंपीय क्रियांकडे (म्हणजे कंपने) लक्ष ठेवले, तर भूकंपाचे भाकीत शक्य होईल. त्यानुसार कोलंबिया विद्यापीठातील लिन साईक्स या शास्त्रज्ञाने यश अग्रवाल या त्यांच्या विद्यार्थ्याला भूकंप लहरींकडे लक्ष ठेवण्यास सांगितले. आणि त्याने त्या आधारे १९७३ मध्ये एके दिवशी भूकंपाचे अचूक भाकीत वर्तवले. त्याच वर्षी कॅलटेकमधील तीन तज्ज्ञांनीही भूकंपाचे अचूक भाकीत केले. १७ सप्टेंबर १९७४ रोजी माल्कम जॉन्सन यांनी कॅलिफोर्नियातील होलिस्टर येथे दुसऱ्याच दिवशी होऊ शकणाऱ्या पाच रिश्टरच्या भूकंपाची शक्यता एका परिषदेत जाहीर केली. दुसऱ्या दिवशीच होलिस्टर येथे भूकंप झाला आणि तो ५.२ स्केलचा होता.
भूकंप भाकिताचे संशोधन दोन मुख्य दिशांनी केले जाते. १. निश्चित व विश्वसनीय भूकंपसूचक चिन्हांचे निदान. त्यातून भूकंपाचे पूर्वानुमान मिळू शकते. २. मोठ्या भूकंपापूर्वी येणाऱ्या भूकंपीय लहरींचा अभ्यास करून भूकंपाच्या संभाव्यतेसंबंधी काही सूत्र सापडते का याचा शोध. असा शोध हा दीर्घकालीन भाकितासाठी महत्त्वाचा आहे.
भूकंपसूचक चिन्हे म्हणजे प्राणी व वनस्पतींचे वर्तन, भूजल पातळी, भूरचना, वातावरण, आकाशाचा रंग इ. मध्ये झालेले बदल. अनेक प्राणी जमिनीतील कंपने, तापमान, विद्याुत चुंबकीय लहरी व इतर बदलाबाबत अतिसंवेदनशील असतात. उदा. पक्षी, वटवाघळे, सील आणि इतर अनेक प्राणी. भूकंप होण्यापूर्वी खडकांच्या विद्याुत चुंबकीय गुणधर्मात, तसेच भूजलाच्या रासायनिक गुणधर्मात होणारे बदल प्राण्यांना तात्काळ कळतात. या संदर्भात मोठा अभ्यास चीन व जपानमध्ये झाला आहे. उदा. जुलै १९६९ मध्ये चीनमधील ‘बाहाई भूकंपा’पूर्वी प्राणिसंग्रहालयातील हंस जमिनीवर आले आणि पाण्यापासून दूर थांबले, हिमालयन पांडा पंजाने डोके झाकून विलाप करू लागले आणि कासवे अस्वस्थ झाली होती. १९८४ चा जपानमधील ‘ओटाकी भूकंप’, २००९ चा इटलीमधील ‘ला अॅक्विला भूकंप’, २०१० चा न्यूझीलंडमधील ‘कॅटर्बरी भूकंप’ इ. चा वेळच्या भूकंपसूचक चिन्हांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. अमेरिकेतील भूकंपप्रवण अशा सॅन अँड्रीयस विभंग परिसरात ७० प्राणिजातींवर तर जगात अनेक प्राणिसंग्रहालयात व इतर ठिकाणी ८७ प्राण्यांच्या प्रकारावर या संदर्भात सतत लक्ष ठेवले जाते.
भूकंप होण्यापूर्वी खडकातून ‘रॅडॉन’ हा किरणोत्सर्गी वायू अधिक प्रमाणात मुक्त होतो व भूजलात विरघळतो. त्यामुळे विहिरीतील पाण्यात रॅडॉनचे प्रमाण वाढले तर ते आगामी भूकंपाची चिन्ह मानले जाते. यासाठी जगात अनेक ठिकाणी निरीक्षण केंद्रे उभारण्यात आली आहेत. चीनमध्ये या कामात शेकडो भूकंप अभ्यास केंद्रातून हजारो नागरिक व विद्यार्थ्यांची मदत घेतली जाते. याशिवाय भूकंपापूर्वी आकाशाचा रंगबदल इ. बाबतही संशोधन चालू आहे. भूकवचाखाली घडणाऱ्या घडामोडीतून निर्माण होत असलेल्या सूक्ष्म कंपलहरी यंत्रावर अखंड नोंदवल्या जातात. त्यांचा भूकंपपूर्व क्रम शोधता आल्यास भूकंप पूर्वानुमानात क्रांती होऊ शकते. एकूण अशा भूकंप सूचक चिन्हांतून काही मिनिटांची पूर्वसूचना मिळाली तरी लाखो लोकांचे प्राण वाचू शकतात.
या शोधाची दुसरी दिशा म्हणजे एखाद्या भूप्रदेशात होऊन गेलेल्या भूकंपांची वारंवारिता (Frequency) व तीव्रता (Intencity) यांचा इतिहास व आकडेवारी यांचे विश्लेषण. त्यातून विशिष्ट जागी भूकंप होण्यात काही क्रमबद्धता व आवर्ती क्रम आढळतो का, याचा शोध घेतला जातो. त्या आधारे येत्या काळात कोणत्या भागात भूकंप होण्याची शक्यता अधिक आहे हे ठरवता येते. अशी भाकिते स्थूल व दूरच्या काळातील संभाव्यता सांगणारी असली तरी विश्वसनीय असतात. पृथ्वीवरील ‘भूकंपप्रवण क्षेत्रे’ ही अशा भाकितांची प्रयोगभूमी आहे. मोठ्या भूकंपाच्या आधी व नंतर त्याच परिसरात काही कमी क्षमतेचे धक्के जाणवतात. अशा धक्क्यांना अनुक्रमे पूर्वधक्के (foreshocks) व उत्तरधक्के (ftershocks) म्हणतात. त्यांच्या अभ्यासातून त्यांचा विशिष्ट आवर्ती क्रम (पॅटर्न) समजतो. त्या आधारे मोठ्या भूकंपानंतर येणाऱ्या उत्तरधक्क्यांचे भाकीत सांगितले जाते. अशाच पण थोड्या वेगळ्या अभ्यासातून ‘भूकंप पोकळी’ (Seismic gap) नावाचा सिद्धांत पुढे आला व त्यातून काही यशस्वी भाकितेही सांगितली गेली आहेत. पूर्वी होऊन गेलेल्या भूकंपाच्या भेगात खोदकाम करून तेथील खडकांच्या अभ्यासातून भूकंपाची संभाव्यता शोधली जाते. प्रयोगशाळेत खडकांवर प्रचंड दाब वा ताण निर्माण करून त्यांच्यात कोणते बदल होतात याचाही अभ्यास केला जातो आहे.
पण अनेक भाकितांबाबत आलेले अपयश हे भूकंप भाकीत संशोधनाला मोठा हादरा देणारे ठरले. उदा. १९७५ मध्ये चीनच्या हाईचेंग भूकंपाचे यशस्वी पूर्वानुमान करण्यात आल्याचा दावा प्रसिद्ध आहे. परंतु पुढे असे आढळून आले की त्यासंबंधी अधिकृत पूर्वानुमान सांगण्यात आले नव्हते. त्याच्या दुसऱ्याच वर्षी १९७६ मध्ये चीनमध्येच झालेल्या तांगझांग भूकंपात लाखो लोक मृत्युमुखी पडले. तरीही जपानने १९७८ मध्ये भूकंप पूर्वसूचनेसंबंधी कायदाच केला व ‘भूकंप भाकीत समिती’ स्थापन केली. पण त्यांचाही भूकंपाच्या पूर्वानुमानाचा पहिलाच प्रयत्न अयशस्वी ठरला. १९८३ मध्ये आलेल्या पूर्वधक्क्यानंतर त्याच्या पाठोपाठ मोठ्या भूकंपाचा इशारा देण्यात आला होता. पण प्रत्यक्षात जपानी समुद्रात ७.७ रिश्टर स्केलचा भूकंप झाला तो तब्बल १२ दिवसांनी. जपानच्या सांख्यिकी विभागाच्या मते, त्या इशाऱ्यानुसार ते १२ दिवस आणीबाणी लागू करण्यात आली असती, तर ७०० बिलियन येन एवढे प्रचंड नुकसान झाले असते. म्हणजे त्याच्यापेक्षा भूकंपच स्वस्तात पडला असता. तात्पर्य, भाकीत जाहीर होताच आणीबाणीची स्थिती, गोंधळ, स्थलांतर, इ.ची योग्य हाताळणी आवश्यक असते. नसता मोठी हानी होते व भाकीत अयशस्वी ठरल्यास ते वादग्रस्त व टीकेचा विषय ठरते. साहजिकच गेल्या काही दशकात भूकंपाचे भाकीत क्वचितच जाहीर करण्यात येते.
एकूणच भूकंपाचे भाकीत अशक्य आहे, असे आजही काही तज्ज्ञांना वाटते. केवळ १००-१२५ वर्षांपूर्वी हवामानाचे भाकीत ही हास्यास्पद कल्पना मानली जात असे. पण आज एखाद्या रेल्वेप्रमाणे संभाव्य चक्रीवादळाचे वेळापत्रक सांगितले जाते. उद्या भूकंप भाकिताबाबतही असे घडणे अशक्य नाही. एऑन भूमीला माता मानलेले आहे. भूकंप लहरींचा अभ्यास म्हणजे एका अर्थाने तिच्या हृदयस्पंदनाचाच वेध नाही का? म्हणूनच भूमातेचे हृदगत आणि तिच्या अंतरंगातील घालमेल जाणून घेण्याच्या या कार्यात नव्या भारतीय पिढीनेही सामील व्हायला हवे.