एका दंतकथेनुसार अल्बर्ट आईन्स्टाईन यांना एकाने विचारले ‘विश्वाचा आकार केवढा आहे?’ ‘ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा.’ आईन्स्टाईन उत्तरले. वरकरणी फक्त गमतीदार वाटणारे हे विधान सर्वार्थाने बरोबर असल्याचे आढळते. इथे डोके म्हणजे बुद्धी किंवा ज्ञान. जन्मलेल्या मुलाचे जग म्हणजे पाळणा व आई. मग मोठा होत त्याची समज वाढत जाते तसे घर, शाळा, गाव, देश असे त्याचे जग विस्तारत जाते. त्याचप्रमाणे आपले जग आणि विश्व याबद्दलची मानवाची कल्पनाही कालौघात त्याच्या ज्ञानासोबत विस्तारत गेली.

अतिप्राचीन काळी माणूस जिथे राहात होता तो परिसर म्हणजेच त्याचे जग होते. पुढे आफ्रिकेतून स्थलांतर करीत तो जगात इतरत्र पोहोचला. इ.स. पूर्व सहाव्या शतकातील बॅबिलोनच्या अनाक्झिमिनँडरने केलेला नकाशा हा उपलब्ध सर्वात प्राचीन नकाशा. त्यावरून भूमध्य व काळा समुद्र, भोवताली दक्षिण युरोप, नैऋत्य आशिया, इजिप्त आणि आफ्रिकेचा वायव्य किनारा (त्याला लिबिया म्हणत), एवढेच जग त्या काळी माहीत होते आणि पृथ्वी सपाट मानली जात होती. पुढे ग्रीस, पर्शिया, मेसोपोटेमिया, लिबिया, इजिप्त, भारत यांची माहिती परस्परांना मिळाली व व्यापार होऊ लागला. इ.स.पूर्व चौथ्या शतकात चीनच्या हूण लोकांनी आशिया व युरोपात धुमाकूळ घातला व राज्ये स्थापिली. त्यातून चीनचे अस्तित्व तत्कालीन जगाला समजले. इ.स. पूर्व चौथ्या शतकात अलेक्झांडरच्या स्वारीनंतर भारतासह आशियाच्या बऱ्याच भागांची माहिती परस्परांना झाली. ‘पेरिप्लस ऑफ एरिथ्रीयन सी’ या नोंदवहीवरून पहिल्या शतकात भारत, र्नैऋ त्य आशिया, ग्रीस, आफ्रिकेचा पूर्व किनारा, तांबडा समुद्र, इ. परिसर परस्परांना ज्ञात होता व त्यांच्यात व्यापार चालत होता. पुढे चौथ्या ते सातव्या शतकात फहियान, युआन श्वांग, इ. विद्वान चिनी प्रवासी भारत व आशियात इतरत्र फिरले आणि ज्ञात जगाचा विस्तार वाढला. पण चीन व आशिया याबद्दल बरीच माहिती इतरांना समजली ती १३ व्या शतकात इटलीच्या मार्कोपोलोमुळे. त्यांच्या प्रवास वर्णनांनी भारत व आशियाकडील सागरी मोहिमांबद्दल युरोपात मोठेच कुतूहल व आकर्षण निर्माण केले. पुढे १४८८ मध्ये पोर्तुगालचे बार्थालोमो डायस यांनी प्रथमच ‘केप ऑफ गुड होप’जवळून आफ्रिका खंडाला वळसा घातला. त्यामुळे आफ्रिका खंडाचा विस्तार किती व कसा आहे, हे लक्षात आले. परिणामी दहाच वर्षांनंतर पोर्तुगालचे वास्को द गामा हे समुद्रमार्गे आफ्रिकेला वळसा घालून १४९८ मध्ये भारतात पोहोचले. या घटनेने जगाचा इतिहास व भूगोल यात क्रांती घडवून आणली. इथून पुढे हिंदी महासागर, अरबी समुद्र आणि अटलांटिक महासागर यांच्यातील सागरी प्रवास व नवनवीन भूप्रदेशांच्या शोधाचा अध्याय सुरू झाला.

loksatta kutuhal interesting facts about the first dinosaur of india
कुतूहल : भारतातील पहिलावहिला डायनोसॉर
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Correlation between geological events and their time
कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन
wardha deoli Shantanu raut
जगातील बारात ‘हा’ एकमेव भारतीय, नोबेल विजेत्याच्या नावे असलेला फेलोशिप सन्मान पटकावला
International Space Center vidarbh Maharashtra
आज सायंकाळी अंतराळातील आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र डोळ्यांनी पाहता येणार….शुक्र, शनी, गुरुजवळ….
dinasorus highway
१६ कोटी वर्ष जुना ‘डायनासोर हायवे’ काय आहे? शास्त्रज्ञांना याचा शोध कसा लागला?
Loksatta kutuhal Founder of the Paleontological Institute
कुतूहल: पुराजीवविज्ञान संस्थेचे संस्थापक
Tirupati Stampede Latest Updates| Stampede at Tirupati bairagipatteda token counter
Tirupati Stampede : तिरुपतीच्या चेंगराचेंगरीत कायमची ताटातूट, व्हायरल व्हिडिओमुळे पतीला समजली पत्नीच्या मृत्यूची बातमी

१२ आक्टोबर १४९२ रोजी इटलीच्या ख्रिास्तोफर कोलंबस यांनी वेस्ट इंडिज बेटावर पाऊल ठेवले. भारत समजून त्यांनी चुकून लावलेला अमेरिका खंडाचा शोध ही भूगोलाच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या घटनेपैकी एक ठरली. त्याच सुमारास इटलीच्या अमेरिगो व्हेसपुसी यांनी तो भूप्रदेश दूरदूरपर्यंत धुंडाळला. यातून युरोपच्या चारपटीहून मोठ्या, अज्ञात अमेरिका खंडाची भर पडून ज्ञात जग एकदम विशाल झाले.

१५०० मध्ये पोर्तुगालचे पेड्रो कॅब्राल यांनी ब्राझीलचा शोध लावला आणि १५१३ मध्ये स्पेनच्या वास्को नूनेझ द बाल्बोआ यांनी अमेरिका खंडातून पॅसिफिक महासागराचे दर्शन घेतले. गोलाकार पृथ्वीच्या शोधात ही फार महत्त्वपूर्ण घटना होती. कारण त्यानंतरच १५१९ मध्ये पोर्तुगालचे फर्डीनांड मॅगेलान हे पहिल्या पृथ्वीप्रदक्षिणेवर निघाले. या मोहिमेत स्वत: मॅगेलान फिलिपाइन्स येथे मारले गेले तरी, त्यांच्या ताफ्यातील व्हिक्टोरिया हे जहाज १५२२ मध्ये पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण करून पोर्तुगालला परतले. या अभूतपूर्व मोहिमेत अनेक नवे भूप्रदेश, बेटे, समुद्र, सामुद्रधुन्या, आखात, भूशिरे, वारे, सागरप्रवाह यांचा शोध लागून भूगोलशोधास मोठी गती मिळाली. त्यामुळे पुढे केवळ १५० वर्षांत पृथ्वीवरील बहुतेक भूप्रदेश, समुद्र व बेटे शोधली गेली. १६०६ मध्ये ऑस्ट्रेलिया खंडाचा शोध लागला. हॉलंडच्या आबेल टास्मान यांनी १६४२-४३ मध्ये न्यूझीलंड व टास्मानियाचा शोध लावला. आता जगाच्या विस्तारात पुन्हा जवळपास युरोप खंडाएवढी भर पडली. १६०७ मध्ये इंग्लंडच्या हेन्री हडसन यांनी उत्तर ध्रुवीय परिसर धुंडाळला. पुढे कॅप्टन कुक यांनी ऑस्ट्रेलिया व आर्क्टिक महासागर परिसरात बराच प्रदेश, समुद्र शोधले. याच मोहिमेत १७७९ मध्ये त्यांचा हवाई बेटावर चकमकीत मृत्यू झाला. नवे खंड, भूप्रदेश शोधले गेले की त्यांचा अंतर्भागाचा शोध सुरू होई. त्यातूनच जगातील अनेक दुर्गम पर्वत, शिखरे, नद्या यांचा शोध लागला. मंगोपार्क, स्टँले, किशन सिंग व नैनसिंग रावत, इ. संशोधकांनी मिसिसिपी, अमेझॉन, कांगो, झांबेसी, ब्रह्मपुत्रा, इ. अनेक दुर्गम नद्यांचा शोध घेतला. तसेच पृथ्वीवरील महासागर आणि सागरतळ याचाही शोध सुरू झाला. सागरतळाची सरासरी खोली ३,६८२ मीटर असून त्यात काही जागी खोल गर्ता असल्याचे १९व्या शतकात लक्षात आले. फिलिपाइन्सजवळची मरियाना गर्ता ही सर्वात खोल गर्ता असून तिच्याही तळाला चॅलेंजर डीप (खोली ११,००९ मीटर ) नावाचा डोह असल्याचे १८७२ ते १८७६ मध्ये आढळले. पृथ्वीच्या अगदी उत्तरेकडे म्हणजे उत्तर ध्रुवाभोवती अतिशीत व हिमाच्छादित आर्क्टिक समुद्र आहे हे १९ व्या शतकात नॉर्वेच्या फ्रिज्योर्ड नान्सेन यांनी शोधले. पुढे १८२० मध्ये अंटार्क्टिका खंडाचा शोध लागला. १९०९ मध्ये रॉबर्ट पिअरी यांनी उत्तर ध्रुवावर, तर अमुंडसेन यांनी १९१२ मध्ये दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवले. १९५३ मध्ये न्यूझीलंडचे एडमंड हिलरी व भारताचे तेनसिंग नोर्के यांनी तिसरा ध्रुव मानल्या जाणाऱ्या एव्हरेस्ट शिखरावर विजय मिळवला. एकंदरीत आज जेवढी पृथ्वी आपल्याला माहीत आहे त्याच्या निम्मीही कोलंबसपूर्वी हजारो वर्षे मानवाला माहीत नव्हती. ५१० द. ल. चौ. कि. मी. क्षेत्रफळाच्या भूगोलपृष्ठावरील बव्हंश भूप्रदेश व महासागर म्हणजे हा पूर्ण भूगोलच गेल्या ५०० वर्षांत शोधला गेला आहे. अर्थात याचे श्रेय वैज्ञानिक व भौगोलिक शोध, तो लावणारे शास्त्रज्ञ व प्रसंगी प्राण पणाला लावून वसुंधरेचा शोध घेणारे असंख्य ज्ञात-अज्ञात शोधयात्री यांना जाते.

या शोधयात्रींच्या ध्यासामागे प्रेरणा कोणती होती? मोहिमेस राज्यकर्त्यांची मान्यता मिळवताना व्यापार, संपत्ती, धर्मप्रसार, नव्या भूप्रदेशाचे स्वामित्व अशी उद्दिष्टे सांगितली जात. पण त्या मोहिमेत शोधयात्रींनी एवढ्या अकल्पित संकटांना वर्षानुवर्षे तोंड देत की वरील उद्दिष्टे त्यापुढे क्षुद्र ठरावीत. अज्ञात समुद्री मार्ग व वादळे, भीषण वाळवंटे, भयंकर जंगले दुर्गम नद्या – यांचा शोध, उत्तुंग शिखरांवर विजय, जीवघेण्या थंडीत ध्रुवीय प्रवास, ज्वालामुखींचा अभ्यास, अशा कल्पनातीत ध्येयाचा ध्यास हा अलौकिक प्रेरणेतूनच निर्माण होतो. तात्पर्य, अदम्य धाडस, अज्ञाताचे आकर्षण, असामान्य असे काही करण्याची ऊर्मी, अशाच उच्चतर प्रेरणा भूगोलशोधात कार्यरत होत्या. जर्मनीचे आल्फ्रेड वेजेनर आर्क्टिक प्रदेशात हिमनिद्रा घेत आहेत. पोर्तुगालचे मॅगेलान फिलिपाइन्समध्ये तर इंग्लंडचे कॅप्टन कुक हवाई बेटावर मृत्युमुखी पडले. पॅसिफिक महासागर शोधणारे बाल्बोआ यांचा दक्षिण अमेरिकेत शिरच्छेद झाला. आणि स्पेनचा हा दर्यावर्दी पनामा देशाचा महानायक ठरला. ग्रेट आर्क प्रकल्पासाठी आयुष्य वेचत इंग्लंडचे जॉर्ज एव्हरेस्ट भारतात उत्तुंग कार्य करून गेले तर विलियम लॅम्ब्टन यांनी त्याच ध्यासात हिंगणघाटला प्राण सोडले. आपला मायदेश नसतानाही प्रॉबी कॉटली व आर्थर कॉटन यांनी गंगा व गोदावरी कालव्याचे स्वप्न पाहिले व वास्तवात आणले. एकूणच असे संशोधक हे भौतिक स्वार्थ आणि देश, धर्म, इ. अभिनिवेशाच्या पलीकडे गेले होते. ‘अवघा भूगोल हेच माझे जग’ असे मानण्याएवढे त्यांचे मन विशाल होते, म्हणूनच आपले जग पृथ्वीएवढे विशाल झाले. तात्पर्य ‘विश्वाचा आकार ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा’ हे तर आहेच पण तो ‘ज्याच्या त्याच्या मनाएवढा असतो’ असाही संदेश भूगोलाच्या इतिहासातून मिळतो.

Story img Loader