एल. के. कुलकर्णी, लेखक भूगोलकोशाचे लेखक आणि भूगोलाचे निवृत्त शिक्षक आहेत.
प्रदीर्घकाळ टिकलेल्या राजवटींनी जलव्यवस्थापन राजवाडय़ांपुरते सीमित ठेवले नाही. त्याचा लाभ सामान्य जनतेलाही दिला. जनतेच्या आर्थिक समृद्धीसाठीही प्रयत्न केला..
जगातील सर्वात जुने ‘जावा’ नावाचे धरण प्राचीन मेसोपोटेमियातले. इ. स. पूर्व ३०००, म्हणजे पाच हजार वर्षांपूर्वीच्या या धरणाचे अवशेष सध्याच्या जॉर्डनमध्ये आहेत. सध्या वापरात असलेले सर्वात जुने धरण प्राचीन इजिप्शियन साम्राज्यातील आहे. सीरियामधील ओरांटीस नदीवरील ‘होम्स’ धरण सुमारे साडेतीन हजार वर्षांपूर्वीच्या फॅरोहा सेटी या इजिप्शियन सम्राटाच्या काळातील आहे. त्यातून होम्स या शहराला पाणी पुरवले जाते. स्पेनमधील ‘प्रोसर्पिना’ हे वापरात असलेले दुसरे प्राचीन धरण. ग्वाडियाना नदीच्या पार्डीलास या उपनदीवरील हे धरण मेरिडा या गावाजवळ आहे. तेथील ‘कॉर्नल्वो धरण’ आजही वापरात असलेले तिसरे धरण. ग्वाडियानाच्या अल्बारेगास या उपनदीवर बांधण्यात आलेल्या या धरणातून मेरिडा शहराला पाणी पुरवले जाते. ही दोन्ही धरणे रोमन साम्राज्याच्या काळात पहिल्या व दुसऱ्या शतकात उभारण्यात आली.
अशी इतरही जागतिक उदाहरणे आहेत. उदाहरणार्थ रोमन साम्राज्यातील जलवाहिन्या- इ.स.पूर्व चौथ्या शतकापासून पुढे ५०० वर्षे या जलवाहिन्यांचे बांधकाम व वापर सुरू होता. त्या दूर डोंगरावरील जलस्रोतापासून शहरांना पाणीपुरवठा करत. दगडी बांधकाम व भव्य कमानी असणाऱ्या काही वाहिन्या ९० किलोमीटर लांब व अनेक मजली इमारतीएवढय़ा उंचीवर होत्या. त्यांचा वापर सार्वजनिक स्नानगृहे, कारंजी, उद्याने, खाणकाम, शेती अशा विविध ठिकाणी होत असे. त्यापैकी ‘व्हीर्गो’सारख्या काही जलवाहिन्या आज २३०० वर्षांनंतरही वापरात आहेत.
भारतातही प्राचीन काळापासून जलव्यवस्थापन केले जाई. पण त्या कौशल्याचा वापर मुख्यत: राजवाडे, महाल व किल्ले यांना पाणीपुरवठय़ासाठी होत असे. शेती व सार्वजनिक कामांसाठी जलव्यवस्थापनाचे काही मोजके पण महत्त्वाचे प्रयत्न आपल्याकडे झाले. ‘कल्लनाई धरण’ किंवा ‘ग्रँड अनिकट’ हे भारतातील सर्वात प्राचीन व आजही वापरात असलेले जगातले चौथे धरण मानले जाते. दक्षिण भारतातील कारिकेल या चोल राजाच्या काळी इ.स.पूर्व पहिल्या ते दुसऱ्या शतकात कावेरी नदीवर हे धरण उभारण्यात आले. ते तंजावरपासून ४५ कि.मी. अंतरावर आहे. या धरणाच्या जवळ काही मैलांवर कावेरी नदीला उत्तरेकडील कोल्लेडम व दक्षिणेकडील कावेरी या दोन शाखा फुटतात. या दोन्ही शाखांच्या मध्ये श्रीरंगम हे बेट आहे. कावेरी प्रवाहातून वर्षभर पाणी वहात असल्याने तिच्या दक्षिणेचा भाग सिंचनाखाली होता पण कोल्लेडम शाखा पावसाळा सोडून कोरडी असे. त्यामुळे कल्लनाई धरण बांधून कावेरीचे जास्तीचे पाणी कोल्लेडम शाखेत वळवून तो परिसर सिंचनाखाली आणण्यात आला. या धरणाची लांबी ३२९ मी., उंची ४.५ मी. व रुंदी २० मी. आहे. हे धरण चोल राजांचा लोकाभिमुख दृष्टिकोन तसेच तत्कालीन ज्ञान व कौशल्याचे प्रतीक होते. पण दुर्दैवाने तो वारसा पुढे क्षीण झाला. नंतरच्या दोन हजार वर्षांत त्या धरणाच्या डागडुजीकडे कुणीही लक्ष दिले नाही. एकोणिसाव्या शतकापर्यंत त्यात गाळ साचून धरणाची उपयुक्तता संपुष्टात येऊ लागली. १८०४ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात कॅप्टन काल्डवेल व सर आर्थर कॉटन या अभियंत्यांनी उपाययोजना करून त्या धरणास जीवदान दिले. सध्या या धरणाचा लाभ सुमारे १३ लाख एकर जमिनीस मिळतो. २३०० वर्षांची प्राचीन पार्श्वभूमी, दणकट दगडी बांधकाम, देखणे स्थापत्य आणि लक्षावधी लोकांना जीवनदायी असणारे हे धरण तमिळनाडूत पर्यटकांचे एक प्रमुख आकर्षण स्थळ आहे.
चोल राजवटीनंतर माळव्यातील परमार राजांनी सिंचनाकडे लक्ष दिले. अकराव्या शतकातील पराक्रमी, विद्वान भोज परमार राजाची तुलना विक्रमादित्याशी केली जाते. भोजपूर किंवा भोपाळ शहराची स्थापना, तसेच धरणे व तलावांची निर्मिती त्याने केली. त्याने बांधलेले भोजेश्वर मंदिर हे तलावाकाठी होते. त्याची निर्मिती तीन धरणे बांधून करण्यात आली होती. यापैकी एक धरण डोंगराच्या पायथ्याशी येणारे पाणी अडवण्यासाठी बेटवा नदीवर होते. दुसरे दोन डोंगरांच्या मध्ये मंडुआ गावाजवळ तर तिसरे धरण भोपाळजवळ होते.
अकराव्या शतकातील पांडय़ राजवटीतील हजार वर्षांपूर्वीचे सिंचन व जलव्यवस्थापन आजही अनुकरणीय आहे. वैगेई, ताम्रपर्णी व कावेरीच्या साहाय्याने पांडय़ांनी तमिळनाडूचा मोठा भाग सिंचनाखाली आणला व दुहेरी पिके घेऊन शेतीस आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा बनवले. त्यांनी या नद्यांच्या खोऱ्यात बंधारे व तळी यांचे जाळेच उभारले. नद्यांच्या वरच्या भागात बंधारे बांधून, वाहिन्यांद्वारे पुराचे जास्तीचे पाणी खालच्या खोऱ्यात खोदलेल्या प्रचंड हौद किंवा तलावात साठवले जाई. यातून त्यांनी पुरावर नियंत्रण, सिंचन व नौकानयन साध्य केले. शेतीला पाणी पाळीपद्धतीने दिले जाई. बंधारे व कालव्यांच्या उभारणीत लोकांचाही सहभाग असे. तळी व वाहिन्यांच्या आजूबाजूची जमीन खरेदी करून तिचे अंशत: उत्पन्न तळे व बंधाऱ्याची दुरुस्ती यासाठी दिले जाई. सिंचनासंबंधीचे वाद, शेतकऱ्यांची नुकसानभरपाई याबाबत राजे व त्यांची यंत्रणा अतिशय जागरूक असल्याचे लिखित नोंदीवरून दिसते.
यानंतर सिंचन पाणीपुरवठय़ाकडे लक्ष दिले ते दिल्लीच्या तोमर राजांनी. त्यापैकी अनंगपाल तोमर याने अकराव्या शतकात दिल्लीजवळ मेहरौली भागात लालकोट हा किल्ला व धरणे, तळी व विहिरींची निर्मिती केली. इ.स. १०६० मध्ये त्याने दक्षिण दिल्ली परिसरात निर्मिलेला ‘अनंगताल’ हा तलाव आता वारसास्थळ म्हणून घोषित करण्यात आला आहे. जवळच अरवली पर्वताच्या पायथ्याशी त्याने उभारलेल्या अनंगपूर धरणाचे अवशेष आजही दिसतात. त्याने बांधलेला सूरजकुंड हा प्रसिद्ध तलाव आणि अनेक विहिरी एक हजार वर्षांनंतरही अस्तित्वात आहेत.
चौदाव्या शतकात तुघलक काळात १३५५ मध्ये फेरोजशहा तुघलक याने यमुना नदीवर बंधारा बांधून कालव्याची निर्मिती केली. ब्रिटिश राजवटीत त्याची डागडुजी झाली. तो कालवा आजही वापरात आहे. यानंतर मात्र पाच-सहाशे वर्षे सिंचन पूर्णत: दुर्लक्षित राहिल्याचे दिसते. पुढे एकोणिसाव्या शतकापासून ब्रिटिश राजवटीत भारतात अनेक धरणांची निर्मिती व दुरुस्ती करण्यात आली.
वर उल्लेखलेल्या राजवटींचा प्रत्येकी एकूण कालावधी स्थूलमानाने पुढील प्रमाणे होता. फॅरोहा – ३१२० वर्षे , रोमन साम्राज्य – १४८० वर्षे, चोल – १५०० वर्षे, परमार – ५०० वर्षे, पांडय़ – १६०० वर्षे, तुघलक- ८४ वर्षे, तोमर – ४०० वर्षे.
जगात व भारतातही बहुतेक राजवटी सामान्यत: दोन-अडीचशे वर्षे किंवा त्याहूनही कमी काळ राज्य करून गेल्या. त्या तुलनेत (तुघलकांचा अपवाद ) वरील सर्व राजवटींत दीर्घायुष्य उठून दिसते. त्याचे एक विश्लेषण असेही करता येते की, या राजवटींनी जलव्यवस्थापनाचा उपयोग केवळ राजवाडे व महालांच्यापुरता न करता लोकांच्या आर्थिक समृद्धीसाठी केला. त्यामुळे त्या राजवटींना आर्थिक स्थैर्यासोबत लोकाश्रय मिळून त्या दीर्घायुषी ठरल्या. या राजवटींच्या दीर्घायुष्याचे हेही रहस्य असेल का ?
(तमिळनाडूतील कल्लनाई धरण – वय २२०० वर्षे)