एल. के. कुलकर्णी,भूगोलकोशाचे लेखक आणि ,भूगोलाचे निवृत्त शिक्षक

भौगोलिक स्थळांना व्यक्तीऐवजी स्थानिक नावे देण्यात यावीत असा जॉर्ज एव्हरेस्ट यांचा कटाक्ष होता. पण तो माऊंट एव्हरेस्टच्या बाबतीत पाळता आला नाही. त्यांचा विरोध असतानाही त्यांचेच नाव द्यावे लागले. असे का?

Sandy Irvine 100 years later
Sandy Irvine remains found:एव्हरेस्ट १९२४ सालीच सर झाला होता का? अर्विनचे सापडलेले अवशेष नेमकं काय सांगतात?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : हस्तक्षेपास एवढा विलंब का झाला?
wall-painted calendar in the Roman Republic
भूगोलाचा इतिहास : एका खेळियाने…
Nizam, Razakars, and Operation Polo
Operation Polo: भारतासाठी महत्त्वाचे ठरलेले ‘ऑपरेशन पोलो’ काय होते?
redevelopment plan of dharavi
धारावीविषयी नवा दृष्टिकोन हवा!
accountability of devendra fadnavis declined due to his divisive politics says supriya sule
फोडाफोडीच्या राजकारणामुळे फडणवीसांची विश्वसनीयता कमी; सुप्रिया सुळे

ज्युलिएट रोमिओला म्हणते ‘नावामध्ये एवढं विशेष आहे तरी काय ? समजा गुलाबाचं नाव दुसरंच काही असतं, तरी त्याचा सुगंध तर तेवढाच मधुर राहिला असता ना !’ शेक्सपिअरने ज्युलिएटच्या मुखी टाकलेलं हे वाक्य जगप्रसिद्ध झालं. तरी पण नावातच फार काही आहे, हेही खरेच. नाहीतर एव्हरेस्ट शिखराचा शोध लागल्यावर त्याचे नाव जाहीर होण्यास तब्बल १६ वर्षे कशाला लागली असती ?

हिमालयातले ‘ढीं‘-15’ हे शिखर सर्वोच्च असल्याचे राधानाथ सिकधर यांनी १८५२ मध्ये ट्रिग्नोमेट्रिक सव्‍‌र्हेचे प्रमुख कर्नल वॉ यांच्या निदर्शनाला आणले. हा एक क्रांतिकारक शोध ठरणार होता. म्हणूनच कर्नल वॉ यांनी स्वत:च सर्व नोंदी व गणिते तपासली. त्यात चार वर्षे गेली. या विलंबाचे अजून एक कारण होते. हे शिखर नेपाळ व तिबेट यांच्या सीमेवर आहे. परकीयांना तिबेट व नेपाळमध्ये प्रवेश नसल्याने त्या शिखराचे स्थानिक नाव समजत नव्हते. त्यासाठी १८५० ते १८५५ पर्यंत अथक प्रयत्न करण्यात येत होते. पण शिखराजवळ प्रवेश मिळवण्यात किंवा त्याचे स्थानिक नाव शोधण्यात यश येत नव्हते. अखेर त्याला नवे नाव देण्याचा निर्णय वॉ यांना घ्यावा लागला. त्यांनी १ मार्च १८५६ रोजी हा शोध प्रकट केला व त्या शिखरास जॉर्ज एव्हरेस्ट यांच्या कार्याच्या गौरवार्थ ‘माऊंट एव्हरेस्ट’ हे नाव सुचवले.

१४ वर्षांपूर्वी निवृत्त झालेले जॉर्ज एव्हरेस्ट तेव्हा इंग्लंडमध्ये राहत होते आणि त्यांनी ते स्वत: शिखर कधी पाहिलेही नव्हते. त्यांचा असा कटाक्ष असे की भौगोलिक स्थळांना व्यक्तीऐवजी स्थानिक नावे देण्यात यावीत. अर्थातच या शिखराला आपले नाव देण्यास ते अनुकूल नव्हते आणि तसे त्यांनी रॉयल सोसायटीला लेखी कळवले.

‘रॉयल जिओग्राफिकल सोसायटी’लाही हे नामकरण आवडले नाही. कारण कोणत्याही नैसर्गिक स्थानास व्यक्तीचे नाव न देता तेथील स्थानिक नाव देण्याचा रॉयल सोसायटीचाही आग्रह असे.

या प्रकरणात जॉर्ज एव्हरेस्ट यांच्या थोरवीबद्दल कुणाचा आक्षेप नव्हता. १८१८ मध्ये १८ वर्षांच्या या बुद्धिमान तरुणाचे झपाटलेपण पाहून लॅम्ब्टन यांनी त्याला आपला सहकारी म्हणून घेतले. बुद्धिमत्ता व गुण यामुळे लॅम्ब्टननंतर त्यांचा कार्यभार २३ वर्षीय एव्हरेस्टकडे आला.

लॅम्ब्टन यांनी सुरू केलेल्या त्रिकोणमितीय सव्‍‌र्हेचे रूपांतर एव्हरेस्ट यांनी भारतव्यापी व यशस्वी अशा ‘ग्रेट आर्क’ प्रकल्पात केले. मुळात लॅम्ब्टन यांचा ‘आर्क प्रकल्प’ कन्याकुमारी ते आग्ऱ्यापर्यंत होता. पण त्यालाच हिमालयापर्यंत नेऊन एव्हरेस्टनी तो सर्वार्थाने ‘ग्रेट आर्क’ बनवला. सुमारे अडीच हजार कि.मी. लांबीच्या भारतातील ‘मेरिडियन आर्क’ चे अचूक मापन ही अजूनपर्यंतही जगातली अद्वितीय गोष्ट आहे.  ‘एव्हरेस्ट यांचे हे विज्ञातातील सर्वात मोठे योगदान असून या बाबतीत ते अतुलनीय आहेत’, असे मोठमोठय़ा संशोधकांचे मत आहे. त्यांनी विकसित केलेले ‘एव्हरेस्ट स्फिरॉईड’ हे प्रतिमान (मॉडेल)  आजही भारतीय उपखंडातील अनेक देशांत वापरले जाते. सव्‍‌र्हेची थिओडोलाइट व इतर यंत्रे व तंत्रे यात मोठे व महत्त्वपूर्ण बदल करून त्यांनी ट्रिग्मोमेट्रिक सव्‍‌र्हेच्या कामात अधिक वेग, निर्दोषता व अचूकता आणली. भारतीय उपखंडात त्रिकोणमितीय सव्‍‌र्हे पूर्ण होऊन त्याआधारे नकाशे तयार होऊ लागले, याचे श्रेय एकमताने एव्हरेस्ट यांनाच दिले जाते. इंग्लंडच्या रेजिनाल्ड हेन्री फिलीमोर यांनी ‘भारतीय ग्रेट आर्क’ प्रकल्पाचा इतिहास पाच खंडांतून लिहिला आहे. त्यापैकी तिसरा पूर्ण खंड जॉर्ज एव्हरेस्ट यांच्या कार्यावर आहे.

व्यक्तिश: जॉर्ज एव्हरेस्ट हे त्यांच्या अनेक सहकाऱ्यांचे प्रेरणास्थान होते. ग्रेट आर्क व त्रिकोणमितीय सव्‍‌र्हे हे जीवितकार्य मानून त्यासाठी त्यांनी सर्वस्व पणाला लावले. अतिश्रम व प्रतिकूलतेमुळे ते अनेकदा आजारी पडले. एकदा एक वर्ष तर एकदा चार वर्षे त्यांना सक्तीच्या विश्रांतीवर पाठवण्यात आले होते. एकदा तर सर्वानी त्यांच्या जगण्याची आशाच सोडली होती. पण इच्छाशक्तीच्या आधारे एव्हरेस्टनी मृत्यूवर मात केली. ‘जिवंत राहायचे असेल तर जंगल व सव्‍‌र्हेपासून दूर राहा’ असे डॉक्टरांनी सांगितले होते. पण ते धुडकावून, थोडे बरे वाटताच ‘नाऊ ऑर नेव्हर’  असे म्हणत एव्हरेस्ट कामावर येत. १८४३ मध्ये निवृत्त होऊन एव्हरेस्ट  इंग्लंडला परत गेले. निवृत्तीनंतर इंग्लंडच्या राणीने देऊ केलेला ‘सर’ (नाइटहूड) किताबही त्यांनी आधी नाकारला होता.

रॉयल सोसायटीने ‘माऊंट एव्हरेस्ट’ या नावास मान्यता देण्यास बराच वेळ घेतला. इकडे मूळ स्थानिक नाव शोधण्याचे प्रयत्न चालूच होते. शेर्पा किंवा वाटाडय़ांना अशा शिखरांची नावे विचारली की ते ‘गौरीशंकर’ किंवा असेच काहीही नाव ठोकून देत. त्यामुळे बराच काळ या शिखराचे मूळ नाव गौरीशंकर असल्याचा गैरसमज होता.  प्रत्यक्षात ‘गौरीशंकर’ हे एव्हरेस्टपासून सुमारे ६० की. मी. अंतरावरील वेगळे शिखर आहे. उंचीच्या बाबतीत ते पहिल्या शंभरातही नाही.

अखेर १८६५ मध्ये रॉयल जिओग्राफिकल सोसायटीने ‘केवळ अपवाद म्हणून’ ‘माऊंट एव्हरेस्ट’ या नावाला मान्यता दिली. अल्पावधीत हे नाव जगप्रसिद्ध झाले आणि गिर्यारोहक, अभ्यासक, भूसंशोधकांचा ओघ त्या शिखराकडे सुरू झाला.

पुढे चालूनही ‘माऊंट एव्हरेस्ट’च्या नामांतराचे अनेक प्रयत्न झाले. सव्‍‌र्हेच्या डेहराडूनच्या मुख्य कार्यालायतील हेन्नेसी आणि कलकत्त्याच्या गणन विभागाचे प्रमुख राधानाथ सिकधर या दोघांच्याही नावे गणिताने हे शिखर सर्वोच्च असल्याचे शोधल्याच्या नोंदी आहेत. खरे तर दोन वर्षे या शिखराचे प्रत्यक्ष वेध घेण्याचे कष्टाचे व जोखमीचे काम कर्नल अँड्र वॉ यांच्या नेतृत्वाखाली जेम्स निकल्सन यांनी केले होते. सिकधर व हेन्नेसी हे दोघेही वेधांच्या आधारे गणिते ( गणन –  computation) करण्याचे काम करीत होते. मात्र या दोघांतील श्रेयाच्या वादासंबंधी अनेक दंतकथा प्रचलित झाल्या.

नेपाळ व तिबेट यांनी प्रवेश न दिल्यामुळे संशोधकांना या शिखराचे स्थानिक नाव समजले नव्हते. त्यामुळे त्याला ‘माऊंट एव्हरेस्ट’ हे नाव द्यावे लागले होते. पण त्याच नेपाळ आणि तिबेट यांनीही पुढे या शिखराच्या नामांतरासाठी प्रयत्न केले. १९६० मध्ये नेपाळने शिखराचे नाव ‘सगरमाथा’ तर तिबेटने ‘चोमोलुग्मा’ असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले. पण त्या किंवा इतर नावाबद्दल अजूनही एकवाक्यता नाही. आता तर ‘एव्हरेस्ट’ हे केवळ एका व्यक्तीचे किंवा शिखराचे नाव न राहता तो एक प्रतीकात्मक व रूपकात्मक शब्द बनला आहे.

स्थानिक नावांच्या आग्रहाबद्दल आपण जॉर्ज एव्हरेस्ट व रॉयल सोसायटीचे ऋणीच आहोत. नसता हिमालायतील असंख्य शिखरे, सरोवरे, पर्वत, नद्या यांना व्यक्तींची नावे मिळाली असती. तत्कालीन पद्धतीनुसार या शिखराला व्हिक्टोरिया, एडवर्ड असे  ‘शाही’ नाव मिळू शकले असते. पण त्याऐवजी वॉ यांनी एका संशोधकांचे नाव सुचवणे हेही धाडसाचे व कौतुकास्पद होते.

असे म्हणतात की ‘प्रसिद्धी व कीर्ती ही सावलीसारखी असते. जो तिच्यामागे धावतो त्याच्या ती पुढे धावते, पण जो  तिच्याकडे पाठ फिरवतो त्याच्यामागे – ती निमूटपणे चालत येते.’ १ डिसेंबर १८६६ रोजी इंग्लंडमध्ये एव्हरेस्ट यांचा मृत्यू झाला. पण काळाची लीला अशी की या शिखराला आपले नाव देण्याचे टाळूनही त्यांच्या हयातीतच त्यांचे नाव पृथ्वीवरील सर्वोच्च शिखराला मिळून ते अजरामर झाले.