एल निनो हे हवामानातील विशिष्ट प्रकारच्या बदलाला देण्यात आलेले नाव आहे. त्याच्या शोधाच्या कहाणीची सुरुवात सोळाव्या शतकात दक्षिण अमेरिका खंडात झाली. या खंडाशोधाच्या कहाणीची सुरुवात सोळाव्या शतकात दक्षिण अमेरिका खंडात झाली. या खंडाच्या पश्चिम किनाऱ्यावर पेरू हा देश आहे. त्या भागात दीर्घकाळ स्पॅनिशांची सत्ता होती. तेथील अर्थव्यवस्थेत मासेमारीला महत्त्वाचे स्थान आहे. सोळाव्या शतकात पेरूवासीयांच्या हे लक्षात आले की, मधेच एखाद्या वर्षी तिथल्या समुद्रातले मासे व इतर सागरी जीव जणू एकदम नाहीसे होऊन जात. या संकटाचा लोकजीवनावर व अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होई. हा प्रकार ख्रिासमसच्या – डिसेंबर जानेवारीत- घडून येई. त्याला स्पॅनिशांनी बाळ येशूच्या संदर्भाने ‘एल निनो’ – ते बाळ – असे नाव ठेवले. अशा दुर्दैवी घटनाक्रमाला हे नाव दिले जाणे, हे तसे विचित्रच. तरी ते सर्वत्र रूढ झाले. एल निनोसंबंधी पहिली वैज्ञानिक नोंद १८९० मधील लिमा जिओग्राफिकल सोसायटी या संस्थेची आहे. १९२० मध्ये गिल्बर्ट वॉकर हे भारतातल्या वेधशाळांचे संचालक होते. त्यावेळी मान्सूनचा अभ्यास करताना त्यांनी असे नोंदवले की जेव्हा पॅसिफिक महासागरावर वायुभार अधिक असतो तेव्हा हिंदी महासागरात वायुभार कमी असतो. आणि दुसरे, जेव्हा यापैकी एके ठिकाणी अतिवृष्टी होते, तेव्हा दुसरीकडे अनावृष्टी होते. या प्रकाराला त्यांनी दाक्षिणात्य आंदोलन (Southern Oscillation) असे नाव दिले. कारण या घटना दक्षिण पॅसिफिकमध्ये घडत होत्या. त्यामुळे एल निनोचा उल्लेख एनसो (El Nino Southern Oscillation) असाही करतात. पुढे ७० च्या दशकात जेकब जेर्नेस ( Jacob Bjerknes) या नॉर्वेजियन शास्त्रज्ञाने वॉकर यांच्या नोंदीमागील घटनाक्रम शोधून काढला. त्यातून मग एल निनोची घटना का घडते हे समजू लागले.

पेरू हा देश विषुववृत्ताच्या जवळ दक्षिण गोलार्धात असून त्याच्या एका बाजूला समुद्र आणि दुसरीकडे अँडीज पर्वताच्या उंच रांगा आहेत. विषुववृत्तावर सूर्यकिरण वर्षभर लंबरूपाने पडतात. यामुळे समुद्राचे पाणीही उष्णतेने तापते. परंतु कर्कवृत्ताकडून विषुववृत्ताकडे ईशान्य व्यापारी वारे, तर मकरवृत्ताकडून विषुववृत्ताकडे आग्नेय व्यापारी वारे वाहतात. तसेच विषुववृत्तावर विषुववृत्तीय उष्ण सागरी प्रवाह पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असतो. हा सागरी प्रवाह आणि व्यापारी वारे या दोन्हींच्या परिणामी या भागातील समुद्राचे पाणी सतत पूर्वेकडून पश्चिमेकडे ढकलले जाते. ते उष्ण पाणी पॅसिफिक महासागर ओलांडून शेवटी आशियाचा पूर्व किनारा म्हणजे इंडोनेशिया परिसरात गोळा होते. इकडे पेरूच्या किनाऱ्याजवळ समुद्राचा वरचा जलथर पश्चिमेकडे ढकलला जाताच त्याची जागा घेण्यासाठी सागरतळाकडील पाणी पृष्ठभागाकडे येते. या प्रक्रियेला समुद्राचे ऊर्ध्वभरण (uphealing) म्हणतात. येथील समुद्रतळाकडचे पाणी अधिकच थंड असते. कारण पेरूच्या किनाऱ्याजवळून चिली प्रवाह हा शीत सागर प्रवाह वाहत असतो. तात्पर्य पेरूच्या किनाऱ्याजवळ पृष्ठभागावरील उष्ण पाणी पश्चिमेकडे जाणे व तळाकडून थंड पाणी पृष्ठभागावर येणे ही क्रिया अव्याहत चालू असते. समुद्रतळाकडून वर येणाऱ्या थंड पाण्यासोबत खनिजे व क्षारही येतात. यांच्यामुळे या पाण्यात पाणवनस्पती व माशांचे अन्न (प्लँक्टोन) याची भरपूर वाढ होते. त्यामुळे हा परिसर मासेमारांचे नंदनवन बनला. एकूण सारांश असा की, पेरूच्या किनाऱ्यावरील समुद्राचे पाणी व हवामान नेहमी थंड असून वायुभार अधिक असतो. अर्थातच त्यामुळे वारे पेरूकडे येण्याऐवजी येथून पश्चिमेकडे वाहत असतात. त्यामुळेच पेरू देश व अँडीज पर्वताचा पश्चिम उतार हा कमी पावसाचा व वाळवंटी बनला. या उलट इंडोनेशिया व त्याच्या आजूबाजूचा हिंदी महासागर परिसर उष्ण असून येथे अधिक पाऊस पडतो.

पण मध्येच काही कारणाने पेरूजवळील सागरजल पश्चिमेकडे वाहून नेणारे व्यापारी वारे मंदावतात व कधी कधी तर ते उलट दिशेने म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहू लागतात. यामुळे पेरूच्या किनाऱ्यावर उष्ण पाणी जमा होऊ लागते. हा उष्ण जलथर वाढल्याने तळाकडील थंड पाणी वर येऊ शकत नाही. या सर्वाचा परिणाम जलचर वनस्पती व प्राणी सृष्टीवर होऊन त्यांची वाढ थांबते. तसेच उष्ण पाण्यामुळे येथील वायुभार कमी होतो व पेरूच्या दिशेने अधिक बाष्पयुक्त वारे येऊ लागतात. त्यामुळे पेरू व आजूबाजूच्या देशात अतिवृष्टी व पुराचे थैमान चालते. या उलट याच काळात हिंदी महासागर व इंडोनेशिया परिसरात थंड पाणी जमा होऊ लागते. त्यामुळे येथे वायुभार वाढतो. अर्थातच इकडे येणारे बाष्पयुक्त वारे अडतात. उलट या भागातून वारे दुसरीकडे वाहू लागतात. याचा मोठा परिणाम मान्सून व नेहमीच्या हवामानावर होऊन अनावृष्टी व दुष्काळाचा फटका बसतो. तात्पर्य एल निनोमुळे एकाच वेळी पेरूमध्ये पूर व वादळे यांचे तर आशियामध्ये अनावृष्टी व दुष्काळाचे थैमान सुरू होते. सागरी जलाच्या तापमानात पडणारा फरक जेवढा जास्त तेवढी ही संकटे अधिक गंभीर होतात. तापमानातील हा फरक सुमारे २ ते १४ अंश से.पर्यंत असू शकतो. तसेच एल निनोचा प्रभाव दूरदूरपर्यंतही (उदाहरणार्थ आशियात भारत-चीन व उत्तर अमेरिका खंडात अमेरिका, मेक्सिको) पोहोचतो. हवामान बदलाच्या अशाच दुसऱ्या विरुद्ध प्रकाराचे नाव आहे. ‘ला नीना’. त्यात सागरजलाचे तापमान अधिक होण्याऐवजी नेहमीपेक्षा कमी होते. त्यामुळेही अतिशीत हवामान, हिमवृष्टी, वादळे इ. उत्पात होतात.

भारतीय उपखंडाजवळही एल निनोचा एक आविष्कार दिसतो. म्हणजे अरबी समुद्र व बंगालचा उपसागर यांच्या तापमानात फरक पडतो. याला हिंदी महासागरीय द्विध्रुवता ( IOD- Indian Ocean Dipole) म्हणतात. यामुळे आशियातील हवामान संतुलन बिघडून अतिवृष्टी, अवर्षण यांची तीव्रता वाढते. भूतकाळात युरोप व दक्षिण अमेरिकेतील अनेक ऐतिहासिक घटनांत एल निनोचाही वाटा होता, असे शास्त्रज्ञांनी शोधून काढले. एकोणिसाव्या शतकाअखेर जगातील अनेक दुष्काळात सुमारे ३ ते ६ कोटी लोक मृत्युमुखी पडले. त्यानंतर विसाव्या शतकातही किमान २६ वेळा विविध ठिकाणी एल निनोचा मोठा फटका बसल्याचे तज्ज्ञांना आढळले. १९८३ मध्ये प्रथमच एल निनोच्या कालावधीतच त्याची तीव्रता व दुष्परिणाम यांचा प्रत्यक्ष अभ्यास करण्यात आला.

पण एल निनो घडवणारे बदल नक्की कशामुळे होतात, ते अजूनही उलगडलेले नाही. सुमारे दोन ते सात वर्षात एल निनोची पुनरावृत्ती होते. त्यामुळे समुद्राच्या पाण्याच्या तापमानाची नोंद ठेवून आगामी एल निनोचा अंदाज बांधता येतो. पॅसिफिक महासागरात ७० ठिकाणी अशी नोंद केंद्रे उभारण्यात आली असून त्यातून रोजचे तापमान नोंदवून एल निनोची चाहूल घेतली जाते.

तात्पर्य, एल निनो हे बाळ उपद्व्यापी असले तरी आधी वाटले तेवढे अगम्य व अभाकितीय नाही. नैसर्गिक उत्पात व संकटे टाळता येत नाहीत. पण पूर्वसूचना मिळाल्यास त्यापासून होणारी हानी कमी करता येते. एके काळी केवळ ‘अस्मानी लहर’ मानल्या जाणाऱ्या मान्सूनलाही मानवाने आज भाकितांच्या टप्प्यात आणले आहे. तसेच एल निनोबाबतही होत आहे.