एल के कुलकर्णी
मानवाचा सर्वात जुना लिखित इतिहास इजिप्तमधला, इ. स. पूर्व ३४००, म्हणजे सुमारे साडेपाच हजार वर्षांपूर्वीचा आहे. गुहेतील प्राचीन चित्रे, अश्मयुगीन हत्यारे, इ.च्या रूपात त्यापूर्वीच्याही काळातील धागेदोरे दिसतात. पण जेव्हा माणूस निर्माणही झाला नव्हता, त्या काळच्या इतिहासाचा आणि भूगोलाचाही वेध कसा घ्यावा हा मोठा प्रश्न होता. त्या प्रयत्नात संशोधक खडकांकडे वळले आणि कोट्यवधी वर्षांचा पृथ्वीचा इतिहास उलगडू लागला. मानवी इतिहासाची विभागणी अश्मयुग, ताम्रयुग, प्राचीन, मध्ययुगीन, इ. कालखंडांत करण्यात आलेली आहे. तशीच पृथ्वीच्या इतिहासाचीही विशिष्ट अशा कालखंडानुसार मांडणी करण्यात आली. त्याला भूशास्त्रीय कालश्रेणी (जिओलॉजिकल टाइमस्केल) असे म्हणतात.
डॅनिश संशोधक धर्मगुरू निल्स स्टीनसेन ऊर्फ निकोलस स्टेनो यांनी १८६९ मध्ये एक सिद्धांत मांडला. ‘खडकांचा कोणताही थर हा त्याच्या वरच्या थरापेक्षा जुना व त्याच्या खालच्या थरापेक्षा नवा असतो’. अतिशय साध्या शब्दातला हा बिनतोड सिद्धांत एका शास्त्राचा पायाच ठरला व त्यामुळे स्टेनो हे भूशास्त्रीय कालखंडांचे जनक ठरले. १७७२ मध्ये जे. बी. रोम डी. इलसेल यांनी हेच तत्त्व खडकांचे वय ठरवण्यासाठी लागू केले. पृथ्वीच्या इतिहास शोधाची पूर्ण इमारत याच पायावर उभी आहे. नंतर प्रत्यक्षात खडकांचा अभ्यास सुरू झाला, तेव्हा असे दिसले की खडकांचे थर हे पुस्तकाच्या पानांप्रमाणे केवळ आडवे, एकावर एक व समांतर रचलेले नसतात. तर ते झिजलेले, वाकलेले, मोडतोड झालेले व रूपांतर झालेले असतात. खडकांचे रूप व गुणधर्म यावर तेथील पर्यावरणाचाही परिणाम झालेला असतो. म्हणजे खडकांचे रूप पाहून प्राचीन काळी बदलत गेलेल्या वातावरणाचाही अंदाज बांधता येतो. तात्पर्य कोणत्याही खडकांच्या थरात पृथ्वीचा तेथील भूतकाळ प्रतिबिंबित झालेला असतो. म्हणजे खडकांचा एकेक थर हे पृथ्वीच्या भूतकाळाचे एकेक पान आहे. फक्त त्यावरील लिपी समजली की वसुंधरेच्या इतिहासाचा ग्रंथ वाचता येणे शक्य आहे. तो इतिहास ज्या कालबद्ध पायऱ्यांत सांगितला जातो, त्यालाच भूशास्त्रीय कालश्रेणी म्हणतात.
जर्मन भूशास्त्रज्ञ अब्राहम वेर्नर यांनी १७८७ मध्ये प्रथमच खडकांच्या थरांचे वर्गीकरण करून त्यांचे प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक व चतुर्थक (प्रायमरी, सेकंडरी, टर्टरी, क्वाटर्नरी) असे चार प्रकार पाडले. हे प्रकार जमिनीच्या तळाकडून वर म्हणजे भूतकाळाकडून वर्तमानाकडे अशा क्रमाने मानले आहेत. यापैकी खोलवरील प्राचीन अशा प्राथमिक व द्वितीयक कालखंडाचे पुढे अनेक उपविभाग शोधून काढण्यात आले. वेर्नर यांच्या मते हे सर्व थर प्राचीन काळातील एका प्रचंड महापुरात निर्माण झाले. हे मत नेपच्यूनी सिद्धांत म्हणून ओळखले जाते.
पुढे १८८५ मध्ये स्कॉटिश भूशास्त्रज्ञ व आधुनिक भूशास्त्राचे जनक, जेम्स हटन यांनी रॉयल सोसायटीपुढे तीन क्रांतिकारक निबंध वाचले. त्यातून या विषयाला मोठीच कलाटणी मिळाली. हटन यांच्या मते पृथ्वीचा अंतर्भाग उष्ण असून तोच नव्या खडकांच्या निर्मितीस कारणीभूत आहे. पाणी आणि वारा यांच्यामुळे जमिनीची झीज होते व तिचे थर सागरतळाशी साचतात. भूगर्भातील उष्णतेमुळे या थरांचे खडकात रूपांतर होते व उष्णतेमुळेच ते भूपृष्ठावर येतात. हे मत प्लुटोनिस्ट सिद्धांत म्हणून ओळखले जाते.
औद्याोगिक क्रांतीनंतर मोठ्या प्रमाणावर कोळशाच्या खाणी खोदल्या जाऊ लागल्या. या क्रियेत खोलवरील खडकात अनेक ज्ञात-अज्ञात जिवाश्म सापडू लागले. १८२० ते १८५० या काळात खडकांचे थर व जिवाश्म यांचा जो प्रचंड अभ्यास झाला, त्यातून धरतीच्या इतिहास शोधात क्रांतीच झाली. दोन खडकांच्या प्रकारात एकाच प्रकारचे जिवाश्म आढळत असतील तर ते एकाच काळात निर्माण झाले असणार हे उघड आहे. त्यावरून हे जिवाश्म म्हणजे पृथ्वीच्या इतिहासग्रंथाची लिपीच ठरत होते. जिवाश्मावरून खडक प्रकार ठरवण्याची पद्धत विलियम स्मिथ, जॉर्ज कुव्हीअर वगैरेंनी सुरू केली. मग जिवाश्मांवरून पृथ्वीच्या इतिहासाचे कालखंड ठरवण्यात आले व त्यांना नावे देण्यात येऊ लागली. उदा. ज्यूरासिक, कार्बोनिफेरस, इ.
खडक प्रकारांची नावे बहुधा ते खडक वा जिवाश्म प्रथम जिथे सापडले त्या स्थानावरून किंवा खडकांच्या स्वरूपावरून देण्यात आली. उदा. डायनोसारचे जिवाश्म प्रथमत: युरोपातील ज्यूरा आल्प्स या पर्वतात सापडले. त्यामुळे १४ ते २० कोटी वर्षांपूर्वीच्या या खडकांना व त्या कालखंडाला ‘ज्यूरासिक’ म्हणतात. तर ज्या खडकांवर तीन रेषा दिसत त्यांना ट्रायासिक आणि ज्यात कोळसा होता त्या थरांना कार्बोनिफेरस असे नाव देण्यात आले.
या अभ्यासातून मांडण्यात आलेल्या पृथ्वीच्या इतिहासाची म्हणजेच भूशास्त्रीय कालश्रेणीची रूपरेषा पुढीलप्रमाणे सांगता येईल. ४७० कोटी वर्षाच्या पृथ्वीच्या भूतकाळाची विभागणी पाच प्रमुख कालखंडांमध्ये करण्यात आली असून त्यांना ‘कल्प’ ( Era) म्हणतात. त्यांची नावे कालक्रमानुसार आर्किओझोईक, प्रोटेरोझोईक, मेसोझोईक, पेलिओझोईक व सिनोझोईक अशी आहेत. या कल्पांची विभागणी पुढे महायुग ( Periods) व युग (Epoch) या उपविभागात करण्यात आली आहे. महायुगांची नावे टर्शरी, ज्यूरासिक, ट्रायासिक, कार्बोनिफेरस, इ. आहेत, तर युगांची नावे होलोसीन, प्लिस्टोसीन, प्लिओसीन, इ. आहेत. आपण राहतो ते होलोसीन किंवा आधुनिक युग ११,००० वर्षांपूर्वी सुरू झाले. ते पाच लक्ष वर्षांपूर्वी सुरू झालेल्या क्वाटर्नरी महायुगाचा भाग असून ते महायुग ६५ लक्ष वर्षांपूर्वी सुरू झालेल्या सिनोझोईक कल्पात मोडते.
या कालश्रेणीतून मांडलेला पृथ्वीचा पूर्वेतिहास लक्षात येण्यासाठी एक प्रसिद्ध उदाहरण घेऊ. कल्पना करा की परवा मध्यरात्री १२ वाजता पृथ्वी निर्माण झाली व त्या घटनेस काल मध्यरात्री एक दिवस म्हणजे २४ तास पूर्ण झाले. अर्थात हे २४ तास म्हणजे ४७० कोटी वर्षे! या २४ तासांत तिच्या इतिहासातील मुख्य घटनांचा कालक्रम पुढीलप्रमाणे असेल.
७ नोव्हेंबर मध्यरात्री १२ वाजता जन्म. नंतर पहाटे दोन वाजेपर्यंत वातावरण, जलावरण, महासागर तयार झाले. तोपर्यंत पृथ्वीपासून चंद्र वेगळा झाला आणि उल्कावर्षाव व ज्वालामुखीचे उद्रेक थांबले. ८ नोव्हेंबरच्या पहाटे चारच्या आधी पहिला सजीव निर्माण झाला. पहाटे सहाच्या आधी प्रकाश संश्लेषक जीव अन्ननिर्मिती करू लागले. मात्र केंद्रक असणारे एकपेशीय सजीव निर्माण होईपर्यंत दुपारचा एक वाजला. त्यातून बहुपेशीय सजीव विकसित होण्यास सायंकाळचे पाच वाजले. सायंकाळी आठ वाजता जलचर प्राण्यांची निर्मिती झाली. तर रात्री साडेनऊच्या सुमारास वनस्पती जमिनीवर वाढू लागल्या आणि दहा वाजता भूचर जमिनीवर विहार करू लागले. रात्री १०.४० ते ११.४० या वेळेत पृथ्वीवर डायनोसार व मोठमोठे नेचे यांचे साम्राज्य होते. उरलेल्या २० मिनिटांत सस्तन प्राणी, पक्षी विकसित झाले. आणि मध्यरात्री १२ वाजायला काही क्षण बाकी असताना मानवाचा जन्म झाला.
म्हणजे पृथ्वी आणि जीवसृष्टीच्या आयुष्याच्या तुलनेत मानवाचे वय २४ तासास एक मिनिटही नाही! पण त्याच एक मिनिटात त्याने या पूर्ण इतिहासाला गवसणी घातली. पृथ्वीचा जन्म, विश्वाचा विस्तार, एवढेच नव्हे तर विश्वाच्या जन्मापर्यंतच्या रहस्याला स्पर्श केला.
काळपुरुषाच्या काठीचा आवाज येत नाही, असे म्हणतात. ते खरे असेल नसेल. पण त्याच्या पावलांचे ठसे मात्र खडकावरील पाऊलखुणांच्या रूपात नक्की शिल्लक उरतात. आणि त्याच भाषेत धरतीच्या इतिहासाचा ग्रंथ लिहिला जातो. मात्र ती साक्षरता ज्यांच्याकडे आहे, त्यांनाच तो वाचता येतो. आजच्या वेगवान जगात आई-वडिलांचाही इतिहास जाणण्यास अनेकांकडे वेळ नसतो. त्या पार्श्वभूमीवर भूमातेच्या इतिहास शोधासाठी वाहून घेतलेले संशोधक अधिकच महान वाटू लागतात.
(पृथ्वीचा इतिहास – २४ तास)