अमृतांशु नेरुरकर (‘चिप’-उद्योगात कार्यरत असलेले तज्ज्ञ)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ही कंपनी सोडून स्वत:ची कंपनी स्थापायची, असं ठरवणाऱ्या नॉईस आणि मूर यांनी नव्या कंपनीचं नाव ‘एनएम कंपनी’ असं योजलं होतं…

साठच्या दशकात इलेक्ट्रॉनिक उपकरण क्षेत्रातील जपानी कंपन्यांचे प्राबल्य वाढत चाललं असलं तरीही त्या उपकरणांच्या परिचालनासाठी ज्या सेमीकंडक्टर चिपची गरज होती, त्यावर संपूर्णपणे अमेरिकी कंपन्यांचीच पकड होती. टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स (टीआय), रॉकवेल कॉर्पोरेशनसारख्या सुस्थापित कंपन्या अमेरिकी शासन व संरक्षण क्षेत्राची चिपची वाढती गरज पुरवण्यात आपली शक्ती खर्च करत होत्या; तर फेअरचाइल्ड सेमीकंडक्टरसारख्या नवउद्यमी कंपनीने (जी खरं तर स्थापनेच्या तीन-चार वर्षांतच मुख्य प्रवाहात प्रस्थापित झाली होती) सुरुवातीच्या नासा आणि एमआयटी लॅब्सच्या प्रकल्पानंतर आपलं लक्ष इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातल्या खासगी कंपन्यांवर केंद्रित केलं होतं.

त्यामुळे १९६९ साली ज्यावेळी नासानं मानवाला चंद्रावर उतरवण्याचं आपलं अपोलो-११ मिशन यशस्वीपणे पार केलं त्यावेळी जरी अंतराळयानातील संगणकासाठी फेअरचाइल्डची मायक्रोलॉजिक चिप वापरली असली तरीही तोपर्यंत फेअरचाइल्डनं शासकीय तसंच संरक्षण खात्याच्या कामावरलं आपलं अवलंबित्व बऱ्याच अंशी कमी केलं होतं. चिप आणि ट्रान्झिस्टरच्या संरचनेत कालौघात योग्य ते तांत्रिक बदल करत, विशेषत: फोटोलिथोग्राफी तंत्रज्ञानाचा खुबीनं वापर करून फेअरचाइल्डनं आपल्या चिपच्या किमती खासगी कंपन्यांना परवडतील अशा स्तरावर आणल्या होत्या. फेअरचाइल्डनं अल्पावधीतच घेतलेल्या या भरारीमागे बॉब नॉईस व गॉर्डन मूर या दोघांच्या द्रष्ट्या नेतृत्वाचा सिंहाचा वाटा होता.

हेही वाचा >>> समोरच्या बाकावरून: लोकशाहीचा उत्सव ‘साजरा’ व्हावा!

या दोघांपैकी बॉब नॉईस हा ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचं परिचालन सेमीकंडक्टर चिपनं कसं करता येईल या ध्यासानं झपाटला होता. त्याच्या या स्वप्नाचं सत्यात रूपांतर करण्यासाठी जरुरी असलेलं चिप तंत्रज्ञान व निर्मितीची तांत्रिक बाजू गॉर्डन मूर यानं भक्कमपणे सांभाळली होती. मूर तेव्हा फेअरचाइल्डच्या संशोधन आणि विकास (आर अँड डी) विभागाचं प्रमुखपद भूषवत होता. १९६५ साली सेमीकंडक्टर तंत्रज्ञानाच्या गेल्या आठ वर्षांतल्या प्रगतीचा आढावा घेत असताना मूरला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की, चिपमधल्या ट्रान्झिस्टर्सच्या संख्येत दरवर्षी दुपटीनं वाढ होत होती. भूमितीश्रेणीनं होणारी ही वाढ पुढील किमान एक दशक तरी चालू राहील असं भाकीत मूरने वर्तवलं.

मूरनं वर्तवलेल्या या भाकिताबरहुकूम चिप तंत्रज्ञानात प्रगती झाली का आणि त्याच्या या भाकिताचे (जे ‘मूर्स लॉ’ या नावानं लोकप्रिय आहे) डिजिटल क्षेत्रावर कोणते दूरगामी परिणाम झाले याचं विस्तृत विश्लेषण आपण पुढील लेखात करू; पण १९६५ साली- म्हणजे मूरचा हा नियम सर्वमान्य व्हायच्या पुष्कळ आधी- दस्तूरखुद्द मूरला आणि त्याचा सहकारी नॉईसला मात्र त्याचं महत्त्व संपूर्णपणे पटलं होतं. दुपटीनं वाढणाऱ्या ट्रान्झिस्टरच्या संख्येमुळे आणि त्याचवेळी कमी होत जाणाऱ्या चिपच्या आकारमान व किमतीमुळे वर्षागणिक चिप अधिकाधिक शक्तिशाली होत जाणार होती.

हेही वाचा >>> व्यक्तिवेध : रिकेन यामामोटो

इतकं प्रभावी तंत्रज्ञान मानवी जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करू शकेल याची जाणीव त्या दोघांनाही झाली. १९६५ साली लिहिलेल्या लेखात मूरनं त्या वेळेला जादुई आणि कल्पनातीत वाटतील अशा शक्यता वर्तवला होत्या. ‘चिपचा अंतर्भाव असलेला फोन’, ‘चिप नियंत्रित चारचाकी’, ‘माणसाच्या पंजात मावू शकेल एवढ्या आकाराचा संगणक’ – आजच्या वस्तूजालाच्या (आयओटी) युगात जिथं मानवी वापराचं प्रत्येक उपकरण डिजिटल होत आहे, त्यात या गोष्टी नित्याच्या व सामान्य वाटत असल्या तरी १९६५ साली असं भाकीत करण्यासाठी मूरची दृष्टी किती भविष्यवेधी असेल याचा अंदाज येऊ शकतो.

मानवी जीवनात मूलगामी बदल घडवू शकणाऱ्या तंत्रज्ञानाची गुरुकिल्ली हाती असूनदेखील नॉईस आणि मूर या दोघांनाही फेअरचाइल्डच्या व्यवस्थापनासंदर्भातल्या काही गोष्टी खटकत होत्या. फेअरचाइल्ड सेमीकंडक्टरच्या उभारणीसाठी न्यूयॉर्कस्थित जोखीम गुंतवणूकदार (व्हेन्चर कॅपिटलिस्ट) आणि उद्योजक शर्मन फेअरचाइल्ड यांनी निधी पुरवला होता. साहजिकच कंपनीसंदर्भातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्याचा सक्रिय सहभाग आणि बऱ्याच अंशी नियंत्रण असायचं. फेअरचाइल्डमध्ये चिप संरचना आणि निर्मितीचं सर्व कामकाज कॅलिफोर्नियामधून (वेस्ट कोस्ट) चालत असलं तरीही कंपनीचे धोरणात्मक निर्णय हे कॅलिफोर्नियापासून ५००० किलोमीटर दूर न्यूयॉर्कमधून (ईस्ट कोस्ट) घेतले जात. त्यामुळेच सर्वार्थानं लायक असूनही नॉईसला कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचं (सीईओ) पद कधीही देण्यात आलं नाही. कंपनीचा सीईओ न्यूयॉर्कमध्ये बसून सर्व निर्णय घ्यायचा आणि वर्षातून केवळ एखाद दोनदा कॅलिफोर्निया ऑफिसला भेट द्यायचा.

नॉईस आणि मूरला खटकणारी दुसरी गोष्ट म्हणजे फेअरचाइल्डच्या सेमीकंडक्टर विभागानं कमावलेल्या नफ्याचा अयोग्य पद्धतीनं होणारा विनियोग! १९६६ सालापर्यंत चिपनिर्मिती उद्योगातून मिळणाऱ्या महसुलाच्या बाबतीत फेअरचाइल्डचा टेक्सास इन्स्ट्रुमेंट्सच्या (टीआय) पाठोपाठ दुसरा क्रमांक होता. फेअरचाइल्डला चिपनिर्मिती उद्योगातून मिळणाऱ्या महसुलाचा वाटा हा त्याच्या एकूण महसुलाच्या तब्बल ७० टक्के इतका प्रचंड होता. तरीसुद्धा, सेमीकंडक्टर विभागानं कमावलेल्या नफ्याचा वापर हा फेअरचाइल्डकडून त्याच्या इतर उद्योगांत होत असलेला तोटा झाकण्यासाठी केला जात असे.

कंपनीला होत असलेल्या नफ्यात- जो नॉईस, मूर आणि त्यांच्यासारख्या इतर अनेक तंत्रज्ञ व अभियंत्यांच्या अहोरात्र मेहनतीमुळे होता होता- कर्मचाऱ्यांनाही वाटा मिळायला हवा व त्यासाठी सर्व पात्र कर्मचारी कंपनीचे भागधारक बनवून घ्यावेत अशी रास्त मागणी नॉईसकडून शर्मन फेअरचाइल्ड व तत्कालीन अध्यक्ष जॉन कार्टर यांच्याकडे होत होती. पण “कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना बाजारनियमांप्रमाणे योग्य ते वेतन देत असून, भागधारक बनवणे हे अमेरिकेच्या भांडवलशाही चौकटीत बसत नसल्यामुळे अशा समाजवादी शिफारशी कंपनी मान्य करू शकत नाही,” अशी अतार्किक कारणमीमांसा देऊन या दोघांनीही नॉईसच्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवली. एवढंच नव्हे तर कार्टरचा उत्तराधिकारी म्हणून पुन्हा एकदा नॉईसला डावलून न्यूयॉर्कस्थित रिचर्ड हॉजसन याची निवड केली.

अशा प्रकारच्या अवहेलनेनंतर नॉईससारखा हाडाचा तंत्रज्ञ गप्प बसून राहणं शक्यच नव्हतं. आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करायचा असेल तर स्वतःची कंपनी स्थापन करण्यावाचून आता दुसरा पर्याय नाही हे त्याच्या ध्यानात आलं. अखेरीस १९६८ साली त्यानं गॉर्डन मूरच्या सोबतीनं फेअरचाइल्डला रीतसर अलविदा करून एका नव्या सेमीकंडक्टर कंपनीची पायाभरणी केली. गेली जवळपास पाच दशकं सेमीकंडक्टर संशोधन, चिप संरचना आणि निर्मितीक्षेत्रात भरीव योगदान देऊन डिजिटल युगाचा पाया रचणारी ही कंपनी म्हणजे ‘इंटेल’!

आयबीएम पीसीच्या उदयानंतर जेव्हा डेस्कटॉप संगणकाचा प्रसार वेगानं झाला आणि नव्वदच्या दशकात जेव्हा मायक्रोसॉफ्ट विंडोज परिचालन प्रणाली असलेला संगणक घराघरांत दिसू लागला तेव्हा आयबीएम आणि मायक्रोसॉफ्टसोबत ‘इंटेल इनसाइड’ या दोन शब्दांमुळे (जे संगणकाच्या सीपीयूवर चिकटवलेल्या लेबलवर कोरलेले असत) इंटेल हे नाव सर्वतोमुखी झालं. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला ‘इंटरब्रँड’ या अग्रगण्य नाममुद्रा (ब्रँड) सल्लागार कंपनीच्या क्रमवारीनुसार इंटेलची नाममुद्रा ही जागतिक स्तरावरील सर्वात मौल्यवान नाममुद्रांमध्ये पहिल्या पाचांत होती.

इंटेल हे ‘इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक्स’ या दोन शब्दांचं लघुरूप आहे. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात राहून सेमीकंडक्टर चिप अर्थात इंटिग्रेटेड सर्किट (आयसी) निर्मितीचं काम करणाऱ्या कंपनीसाठी हे नाव चपखल आहे. खरं तर स्थापनेच्या वेळी नॉईस आणि मूर या दोघांनी आपल्या आडनावाच्या आद्याक्षरांवरून आपल्या कंपनीचे ‘एनएम कंपनी’ असं अत्यंत सामान्य नामकरण केले होते. पुढे ‘डीजिकॉम’, ‘ट्रॉनिकॉम’, ‘कॉम्पुटेक’ अशा अनेक लघुरूपीय नावांच्या यादीमधून अखेरीस इंटेल या नावावर शिक्कामोर्तब झालं, जे छप्पन्न वर्षांनंतर आजही टिकून राहिलं आहे.

इंटेल स्थापनेच्या काही आठवड्यांच्या आतच नॉईसनं फेअरचाइल्डमधले त्याचे दोन सहकारी तसेच निष्णात अभियंते, अँडी ग्रोव्ह आणि लेस्ली वडाज, यांना इंटेलमध्ये अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे कर्मचारी म्हणून समाविष्ट केलं. नॉईस आणि मूरच्या बरोबरीनं या दोघांनीही इंटेलच्या व त्याचबरोबर सेमीकंडक्टर तंत्रज्ञानाच्या प्रगतीत मोलाचं योगदान दिलं आहे (ज्याचं विश्लेषण पुढल्या भागांत विस्तारानं येईलच).

इंटेलच्या संस्थापकांचं उद्दिष्ट स्पष्ट होतं : सेमीकंडक्टर चिपची क्षमता वाढवत नेणं आणि त्याच वेळेला समांतरपणे चिपची किंमत खासगी वापरासाठी परवडेल अशा स्तरावर आणणं. चिपची क्षमता निरंतर वाढत राहण्यासाठी गॉर्डन मूरनं १९६५ साली केलेलं भाकीत सत्यात उतरवण्याची गरज होती. केवळ इंटेलच्याच नव्हे तर डिजिटल परिवर्तनाच्या भविष्यातील रूपरेखेला आकार देऊन डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या या अनुभवजन्य सिद्धान्ताचं विश्लेषण पुढल्या आठवड्यात करूया.

amrutaunshu@gmail.com