‘आपण कुणाच्याच बाजूचे नाही, तरी आपण आहोत,’ या आकलनानंतरचा स्लोअर शहाणेच्या आयुष्यातील सर्वांत मोठा तिढा तेव्हा आला, जेव्हा स्लोअरने दोन हजारच्या दशकात नोकरी करायला सुरुवात केल्यानंतर टीमवर्क – संघभावना हा शब्द सातत्याने ऐकायला सुरुवात केली. त्याला त्याचा लाक्षणिक अर्थ माहीत नव्हता असे नाही. तो अधिक वेळा कडेला बसून एकट्यानेच सूर्यास्त दिशा पाहण्यासाठीच फुटबॉल मैदानावर जात असला, तरी काही वेळा मैदानात उतरून सगळ्यांबरोबर फुटबॉलही खेळत असे. सगळ्यांमधले, म्हणजे दोन्ही संघांतील २२ जणांतले दोघे-तिघेच उत्तम खेळणारे असायचे, तरी मैदानावरचा प्रत्येक जण, प्रत्येक वेळी फुटबॉल हा सांघिक खेळ आहे, याबाबत त्याची उजळणी करून घेत असायचे. परिणामी, स्लोअरच्या आयुष्यात ‘सांघिक’चे महत्त्व अधोरेखित झाले. ‘सांघिक’ खेळून झाल्यावर निवडकांचे स्वतंत्र स्वतंत्र चमू ‘स्वतंत्रपणे निवडक’ काही तरी करत असायचे, तरी स्लोअरची ‘सांघिक’वरील श्रद्धा ढळली नव्हती. त्याला वाटे, हे ‘स्वतंत्रपणे निवडक’ जे काही आहे, ते आपणही खेळ संपल्यावर किंवा कधी कधी त्याही आधी आपल्याऐवजी बदली खेळाडू खेळविण्यासाठी आपल्याला मैदानाबाहेर काढल्यावर, मैदानाच्या कडेला बसून चांदण्या मोजताना करतो आहेच की. नोकरीतल्या संघभावना – टीमवर्कबाबत मात्र त्याच्या मनात अशी भावना दाटून येणे दुरापास्त ठरले, कारण सतत सगळ्यांबरोबरच काही तरी करत राहायचे आहे, एकाच ध्येयाने पुढे जायचे आहे, एकच लक्ष्य गाठायचे आहे, वगैरे त्याच्या पचनी पडेनासे झाले. असे सगळ्यांनी एकच काही तरी करण्यापेक्षा सगळ्यांनी त्यांना-त्यांना जे जमते, ते करून हे जे काही लक्ष्य असते, ते का नाही साध्य करायचे, त्याने उलट त्यात किती छान वैविध्य येईल, असे मुद्दे त्याच्या डोक्यात यायचे, पण ‘एकच एक, अनेकांतही एक’ हीच चाल स्लोअरला त्याच्या नोकरीआधीच्या प्रशिक्षणादरम्यान पढवलेली असल्याने स्लोअर प्रश्न न विचारता नोकरी करत राहिला.
याच चालीवर असताना एकदा तो भूक लागलेली असताना कुठल्याशा खाणावळीत जेवायला गेला. जेवण झाल्यावर खाणावळचालकाने विचारले, ‘काय जेवण आवडले का?’ स्लोअरकडे याचे खरे तर काहीच उत्तर नव्हते. त्यामुळे तो साहजिकच म्हणाला, ‘आवडायचे काय त्यात? भूक लागली होती, जेवण केले.’ चालकाला हे उत्तर उद्धटपणाचे वाटून त्याने स्लोअरला बिलात अजिबात सवलत न देता, शिवाय दोन रुपये सुट्टे नसल्याने, तेही ‘पुढच्या वेळी देतो,’ असे सांगून त्याची बोळवण केली. स्लोअरला हे मात्र अजिबात ‘आवडले’ नाही. खाणावळचालकाला तसे स्पष्ट सांगून तो बाहेर पडला, तेव्हा खाणावळचालकानेही, स्लोअरचे उत्तर त्यालाही कसे ‘आवडले’ नाही, असे ऐकविल्याचे, बाहेर पडणाऱ्या आणि त्यामुळे खाणावळचालकाकडे पाठ असणाऱ्या, स्लोअरच्या कानावर स्पष्टपणे पडले. कानावर हे पडल्यावर मात्र स्लोअर विचारात पडला. त्याने तडक घरी येऊन त्याच्या रोजदिनीत काही नोंदी त्याच दिवशी करून टाकल्या. त्या नोंदींना एक कंगोरा होता, तो त्याच्या लहानपणी घडलेल्या एका प्रसंगाचा. स्लोअरला खाणावळीच्या प्रसंगाला सामोरे जावे लागले, तेव्हा त्याला या लहानपणीच्या, अगदी शाळेत असताना तो त्याच्या मित्राच्या घरी कसल्याशा निमित्ताने जेवायला गेला होता, तो प्रसंग आठवला नव्हता. पण त्याने रोजदिनीत नोंद करायला घेतल्यावर त्या प्रसंगाची छाप अप्रत्यक्षपणे त्याच्या वागण्यात कशी उमटली होती, हे त्याला उमगले होते. त्यामुळे आधी प्रसंगाविषयी, मग नोंदीविषयी.
तर प्रसंग असा होता, की स्लोअरने मित्राच्या घरी जेवायला जाण्याचे आमंत्रण – तो लहान असल्याने त्याच्याऐवजी त्याच्या आईने – स्वीकारले होते. जेवायला जाताना स्लोअरने कोणती पथ्ये पाळावीत, याचे नियमही आईनेच ठरवले होते. त्यातील पहिला नियम होता, तो म्हणजे जेवायला वाढल्यानंतर दोन घास खाल्ल्यावरच, ‘काकू, स्वयंपाक खूप छान झाला आहे. सगळे पदार्थ आवडले,’ असे ‘उत्स्फूर्त’पणे सांगणे. दुसरा नियम होता, ‘एखादा पदार्थ आवडला नाही, तरी ताटातील सर्व पदार्थ संपवणे.’ आणि, तिसरा नियम होता, निघताना पुन्हा, ‘जेवण छान होते, आवडले,’ असे सांगणे. स्लोअर हा मध्यमवर्गीय संस्कारात वाढलेला असल्याने, त्याने तिन्ही सूचना तंतोतंत पार पाडल्या होत्या. याने मित्राच्या आईच्या चेहऱ्यावर कसे अपार समाधान पसरले, असेही स्लोअरने घरी येऊन आईला सांगितले होते. या प्रसंगाच्या दुसऱ्या दिवशीपासून मात्र तो मित्र स्लोअरशी बोलेनासा झाला. कारण, आपल्या आईने मित्र कसा छान जेवतो, याचे कौतुक करताना आपल्यातील वैगुण्यावर ठेवलेले बोट त्या मित्राला ‘आवडलेले’ नव्हते. आणि, त्यामुळे तेव्हापासून मित्राला स्लोअर आणि स्वत:ची आई आवडेनाशी झाली होती. स्लोअरला हे कळल्यावर त्याने मित्राला, तो कसा त्याला खूप आवडतो, असे सांगण्याचा प्रयत्न करूनही त्या मित्राला स्लोअर पुढे कधीच ‘आवडला’ नाही, जरी ते भेटल्यावर एकमेकांना – मध्यमवर्गीय असल्याने – ओळख देत राहिले.
या प्रसंगानंतर स्लोअर शहाणे हे शिकला, की एखादी गोष्ट किंवा व्यक्ती आवडते वा आवडत नाही, किंवा ती ‘आवडतही नाही, पण आवडतच नाही, असेही नाही,’ असेही असू शकते. म्हणजे, प्रत्येक वेळी पहिले दोन पर्यायच हवेत, अशी काही गरज नाही. त्याला तर उलट वाटू लागले, की तिसऱ्या पर्यायाला आपण मुकलो, तर पर्यायांची लोकशाही संपून आवडीच्या निवडीची सक्ती होऊन बसेल, ज्यामुळे आपला मित्र तुटल्याचा अनुभव आपण घेतलाच आहे. म्हणूनच कुणी तरी किंवा काही तरी आवडण्यासारख्या भावनेला असे दोनच पर्यायांच्या टोकांना बांधून ठेवण्यात अर्थ नाही. खाणावळीच्या प्रसंगात स्लोअरच्या उत्तरामागे हाच तर्क होता, जो अप्रत्यक्षपणे आपल्यात त्या प्रसंगामुळे रुजला आहे, याची जाणीव त्याला त्या वेळी न झाल्याने, स्लोअरने नोंद केली, ‘कुणीतरी वा काहीतरी आवडावे, याचे काही निकष असतील आणि त्यांना काही सामाजिक संकेत असतील, तर ते मला इतके दिवस कळले कसे नाहीत? साध्या जेवण्याच्या क्रियेलाही आवड-नावड असू शकते का? म्हणजे, भूक लागली, की माणूस खातो, जेवतो. जे काही खाल्ले, ते भुकेपोटी खाल्ले असेल, तर त्यात आवडणे-नावडणे असा फरक करण्याची गरज असते किंवा कसे? एखादा पदार्थ आवडलाच, तर उत्स्फूर्तपणे येणारी दाद किंवा नाही आवडला, तर मुरडले जाणारे नाक, अशा प्रकारची उमटणारी पोचपावतीवजा भावना, हा नैमित्तिक व्यवहार असावा, की त्यांना त्या त्या वेळी उमटणारे उद्गार असे म्हणून कोणत्याही चौकटीत न बसवता ते संकेतमुक्त ठेवावेत? नैमित्तिक व्यवहार हा असा कर्तव्याचा भाग होत असल्याने, आवड-नावडीविषयी उत्तर द्यायची सक्ती ही ज्याला उत्तर द्यायचे, त्याला दुखावण्याची किंवा सुखावण्याची, म्हणजेच पर्यायाने संघर्षाची किंवा मैत्रीची नांदी ठरू शकते. अशा वेळी ‘आवडलेही नाही, पण आवडले नाही, असेही नाही,’ असा पर्याय असणे गैर का असावे? किंबहुना तशी मुभा का नसावी? माणसाच्या, व्यक्तीच्या आवडीनिवडी ही जर वैयक्तिक बाब असेल, तर तिचे सार्वत्रिकीकरण, तिला सामाजिक संकेतांच्या नियमबंधांत अडकवणे आणि महत्त्वाचे म्हणजे तिचा जाहीर उच्चार करून कुणाला तरी दुखावणे किंवा सुखावणे, याचे कर्तव्यात रूपांतर करणे मला तरी ‘आवडलेले’ नाही.’
सन २००० च्या सुरुवातीला नोकरीला लागलेल्या स्लोअर शहाणेने ही नोंद केली काय आणि २००० चे दशक अर्धे संपले होते, तोवर ‘फेसबुक’चा उदय झाला. कुणी म्हणाले, फेसबुकमुळे अभिव्यक्तीचे लोकशाहीकरण झाले. मग स्लोअरने त्याची ही नोंद फेसबुकवरही टाकली. त्यावर त्याला ‘लाइक’चे हजारेक उंचावलेले अंगठे आणि तितकेच इतर सकारात्मक-नकारात्मक चेहऱ्यांचे इमोजी प्रतिक्रिया म्हणून मिळाले. त्यावर त्याला इतकेच कळले, की ‘आवडलेही नाही, पण आवडले नाही असेही नाही,’ हा पर्याय आता संपला!