एचपी’नं वास्तव जोखलं, मान्य केलं आणि जपानी कंपन्यांना कंत्राट दिलं! पण तसं न करणाऱ्या ‘जीसीए’चं काय झालं?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ह्यूलेट पॅकार्ड (एचपी) ही अमेरिकी कंपनी १९७०-८०च्या दशकात संगणकीय हार्डवेअर क्षेत्रातली एक दादा कंपनी होती. आजही अत्यंत उच्च दर्जाच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी (संगणक – डेस्कटॉप, लॅपटॉप किंवा सर्व्हर आणि इतर साहाय्यक उपकरणं – उदा. प्रिंटर, स्कॅनर इत्यादी) ती ओळखली जाते. इंटेल, फेअरचाईल्ड, नॅशनल सेमीकंडक्टर्स अशा चिपउत्पादक कंपन्यांप्रमाणेच ‘एचपी’देखील सिलिकॉन व्हॅलीस्थित असल्याकारणानं सर्व अमेरिकी सेमीकंडक्टर कंपन्यांसाठी ती एक महत्त्वाचा ग्राहक होती. अशा ‘एचपी’नं १९८० साली जेव्हा तिच्या उपकरणांसाठी लागणाऱ्या मेमरी चिप अमेरिकी कंपन्यांना डावलून प्रथमच तोशिबा, एनईसी यांसारख्या जपानी कंपन्यांकडून खरेदी करण्याचा इरादा जाहीर केला, तेव्हा आत्ममग्न अवस्थेत जाऊन काहीसं सुस्तावलेलं अमेरिकी चिपविश्व भानावर आलं.

गेल्या एक दशकभरातल्या आपल्या अमेरिकी पुरवठादारांऐवजी जपानी मेमरी चिपनिर्मात्या कंपन्यांना ‘एचपी’नं चुचकारण्याचं कारण काय होतं? एक गोष्ट इथं लक्षात घ्यायला हवी. कोणत्याही क्षेत्रातल्या अमेरिकी कंपन्या या पक्क्या व्यावसायिक असतात. देशप्रेम, राष्ट्रवाद अशा ऐकायला छान वाटणाऱ्या संकल्पना त्या कंपनी चालवताना मध्ये आणत नाहीत. त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे रोकडा व्यवहारवाद असतो. म्हणूनच चिपनिर्मात्या कंपन्यांनी ‘ऑफशोअरिंग’ संकल्पनेची अंमलबजावणी करताना केवळ वृद्धिंगत होऊ शकणाऱ्या कार्यक्षमतेचं आणि नफ्याचं गणित डोक्यात ठेवलं होतं. अशा निर्णयामुळे अमेरिकी लोकांच्या नोकऱ्यांवर गदा येईल का वगैरे विचार या निर्णयाआड आले नाहीत. आजही अमेरिकेचे चीनशी राजनैतिक संबंध कसेही असोत; अमेरिकी कंपन्यांसाठी चीन हा त्यांच्या उत्पादनांच्या पुरवठा साखळीतला एक अत्यंत महत्त्वाचा भागीदार आहे.

हेही वाचा >>> संविधानभान – पारदर्शकता : लोकशाहीचा प्राण

‘एचपी’नं जपानी मेमरी चिपनिर्मात्या कंपन्यांकडून खरेदी करण्याच्या निर्णयाची कारणमीमांसा करताना आपल्या प्रसिद्धिपत्रकात स्पष्ट म्हटलं होतं की जपानी मेमरी चिप अमेरिकी चिपपेक्षा अधिक किफायतशीर आहेत हे त्या निर्णयामागचं मुख्य कारण नाही; तर अमेरिकी चिपच्या तुलनेत जपानी मेमरी चिपची श्रेष्ठ कार्यक्षमता हे एकमेव कारण त्यांच्या या निर्णयामागे आहे. ‘एचपी’नं त्या प्रसिद्धिपत्रकात काही आकडेवारी प्रकाशित केली होती जी अमेरिकी चिप कंपन्यांच्या स्वत:च्या तांत्रिक क्षमतांबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी पुरेशी होती.

त्यासाठी आधी ‘एचपी’च्या खासगी प्रयोगशाळेत जपानी तसेच अमेरिकी चिपवर त्यांची कार्यक्षमता तपासण्यासाठी काही चाचण्या केल्या गेल्या. या चाचण्यांत प्रत्येक कंपनीच्या चिपला अविरतपणे एक हजार तास कामाला जुंपवलं. चाचण्यांअंती ‘एचपी’ला आढळलं की, जपानी कंपन्यांच्या दहा हजार चिपमागे केवळ दोन चिपच्या कार्यात खंड पडतो. याउलट, अमेरिकी चिप कंपन्यांसाठी हाच दर प्रत्येकी दहा हजार चिपमागे किमान नऊ तर कमाल २६ असा होता. थोडक्यात कार्यक्षमतेच्या बाबतीत जपानी कंपन्या अमेरिकी चिप कंपन्यांच्या तुलनेत किमान पाच तर कमाल १३ पटींनी पुढे होत्या. ‘एचपी’चा हा अहवाल जपानी कंपन्यांनी अगदी थोड्या अवधीत चिपनिर्मिती क्षेत्रात केलेली अविश्वसनीय प्रगतीची गाथा सांगत होताच; पण त्याहीपेक्षा तो अमेरिकी चिप उद्याोगाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा ठरला होता.

केवळ एखाद्या तंत्रज्ञानाची निर्मिती केली म्हणून त्यातील आपली आघाडीची स्थिती गृहीत धरता येऊ शकत नाही. अमेरिकी चिप उद्याोगावर केवळ दोन दशकात हे विधान प्रत्यक्षात अनुभवण्याची वेळ आली होती. बरं जपानी विस्तारवाद हा केवळ इलेक्ट्रॉनिक उपकरणं, चिप उत्पादन एवढ्यापुरताच सीमित नव्हता. चिपनिर्मितीसाठी अत्यावश्यक अशा प्रक्रियांच्या अंमलबजावणीसाठी लागणाऱ्या उपकरणांच्या निर्मितीतही जपाननं चांगलीच आघाडी घेतली होती. उदाहरणच द्यायचं तर चिपनिर्मितीत मोलाची भूमिका निभावणाऱ्या ‘फोटोलिथोग्राफी’ प्रक्रियेच्या उपकरणाचं देता येईल.

जीसीएआणि निकॉन!

जे लॅथ्रॉप यांनी १९५०च्या दशकाच्या उत्तरार्धात फोटोलिथोग्राफी तंत्रज्ञानाचा शोध लावल्यानंतर जवळपास सर्वच चिप उत्पादक कंपन्यांनी या तंत्रज्ञानाच्या वापराला आत्मसात करून चिपच्या घाऊक उत्पादनासाठी आपापल्या परीनं त्यात योग्य ते बदल घडवून आणले होते. सत्तरच्या दशकाच्या अंतापर्यंत मात्र, फोटोलिथोग्राफी प्रक्रियेला चिप उत्पादक कंपनीची गरज तसंच चिपच्या संरचनेप्रमाणे सिलिकॉनच्या पट्टीवर कोरण्यासाठी एका स्वतंत्र उपकरणाची निर्मिती करण्यात काही अमेरिकी कंपन्यांना यश आलं होतं. त्यात आघाडीवर होती मिल्ट ग्रीनबर्ग या अमेरिकी हवाईदलात योगदान देणाऱ्या भू-भौतिकशास्त्रज्ञानं स्थापन केलेली ‘जीसीए’ नावाची कंपनी!

‘जीसीए’ काही पहिल्यापासून फोटोलिथोग्राफीचं उपकरण बनवण्याच्या उद्याोगात नव्हती. ग्रीनबर्गनं अमेरिकी संरक्षण खात्यातील आपल्या ओळखींचा वापर करून हवाई दलासाठी टेहळणीयंत्रं निर्माण करण्याची कंत्राटं पदरात पाडून घेतली होती. दूरचा अदमास घेऊ शकतील अशा दुर्बिणी किंवा कॅमेरे गॅसच्या फुग्यांवर बसवून अवकाशातून देखरेख ठेवण्याचे काम ही टेहळणीयंत्रं करत असत. आजच्या काळात वापरल्या जाणाऱ्या ड्रोन तंत्रज्ञानाशी समतुल्य असं हे पन्नास वर्षांपूर्वीचं तंत्रज्ञान. सत्तरच्या दशकात जेव्हा सेमीकंडक्टर चिप तंत्रज्ञानाचा झपाट्यानं प्रसार झाला तेव्हा आपलं प्रकाशशास्त्रातलं (ऑप्टिक्स) कौशल्य आणि अनुभवाचा उपयोग करून फोटोलिथोग्राफीसाठी लागणारी उपकरणं तयार करण्याच्या उद्याोगात शिरण्याचा प्रयत्न ‘जीसीए’नं सुरू केला.

त्या प्रयत्नात ‘जीसीए’नं लवकरच यशही मिळवलं. किंबहुना त्या काळात ही उपकरणं बनवणाऱ्या पार्क एल्मर सारख्या उत्पादकांपेक्षा ‘जीसीए’ दोन पावलं पुढेच होती. कारण ‘जीसीए’च्या उपकरणांत फोटोलिथोग्राफी प्रक्रियेला तार्किकदृष्ट्या छोट्या छोट्या टप्प्यांत तोडून प्रत्येक टप्प्यावर काही जुजबी बदल करणं शक्य होतं. चिप उत्पादक कंपन्यांसाठी ही फारच मोठी सोय होती; कारण यामुळे त्यांना पूर्ण फोटोलिथोग्राफी प्रक्रियेच्या अंमलबजावणीच्या वेळी काही जरुरी बदल करणं शक्य होणार होतं. साहजिकच १९८० पर्यंत जीसीए फोटोलिथोग्राफी उपकरणं बनवणारी जगातील क्रमांक एकची कंपनी बनली.

ऐंशीच्या दशकात मात्र अमेरिकी चिपनिर्मिती कंपन्यांप्रमाणेच ‘जीसीए’ला देखील जपानी कंपन्यांच्या तीव्र स्पर्धेचे चटके बसायला सुरुवात झाली. निकॉन ही कॅमेरा आणि तत्सम उपकरणं बनवणारी जपानी कंपनी आधीच ‘जीसीए’ची फोटोलिथोग्राफी प्रक्रियेत लागणाऱ्या भिंगांची मुख्य पुरवठादार कंपनी होती. १९८० सालापर्यंत निकॉननंही फोटोलिथोग्राफी उपकरणं बनवायला सुरुवात केली. निकॉन ही आता आपली केवळ पुरवठादार कंपनी राहिली नसून ती आता आपली स्पर्धकही बनली आहे हे ‘जीसीए’च्या लक्षात येताच तिनं निकॉनकडून भिंगं घेण्याचं कंत्राट तडकाफडकी रद्द केलं. या निर्णयाचा निकॉनवर काही परिणाम होण्याऐवजी तोटा ‘जीसीए’लाच झाला. निकॉनच्या भिंगांची प्रकाशाचं परावर्तन करण्याची अचूकता वादातीत होती, या गोष्टीचं फोटोलिथोग्राफी प्रक्रियेच्या उच्च कार्यक्षमतेसाठी प्रचंड महत्त्व होतं.

‘जीसीए’च्या नव्या पुरवठादारांच्या भिंगांची अचूकता निकॉनच्या तुलनेत कमी होती, याचा परिणाम फोटोलिथोग्राफी उपकरणाच्या फलनिष्पत्तीवर होत होता. ज्या वेगानं ‘जीसीए’च्या विश्वासार्हतेत घट होत होती त्याच वेगानं निकॉनच्या उपकरणांची विक्री आणि विश्वासार्हता वाढत होती. जपानी मेमरी चिप उत्पादक कंपन्या ज्या एकेकाळी ‘जीसीए’च्या प्रमुख ग्राहक होत्या त्याच १९८४-८५ पर्यंत त्यांना लागणारी फोटोलिथोग्राफी उपकरणं शतप्रतिशत निकॉनकडून खरेदी करू लागल्या.

जवळपास एक दशकभर क्रमांक एकची कंपनी म्हणून मिरवल्यामुळे पूर्ण कंपनीच्या वर्तणुकीत आलेला एक प्रकारचा उद्दामपणा, अत्यंत खराब ग्राहकसेवा, तोटा वाढत चालला असूनही कंपनीच्या परिचालनासाठी होणारी पैशांची अमाप उधळपट्टी आणि कंपनी नेतृत्वाला अशा बिकट प्रसंगातून बाहेर पडण्यास आलेलं ढळढळीत अपयश या सर्वांमुळे ‘जीसीए’ एवढ्या खोल गर्तेत अडकली की ज्यातून बाहेर पडणं तिच्यासाठी अशक्यप्राय होऊन बसलं. १९८५ नंतर ‘जीसीए’ फोटोलिथोग्राफीच्या उद्याोगातून जवळपास बाहेर फेकली गेली.

चिपनिर्मिती क्षेत्रात चहूबाजूंनी अमेरिकेची पीछेहाट होत असताना अमेरिकी चिप उत्पादक कंपन्या स्वस्थ बसणं शक्य नव्हतं. तोपर्यंत सर्व अमेरिकी चिपनिर्मात्या कंपन्यांनी आपल्या चिप ग्राहकोपयोगी उपकरणांसाठी बनवताना अमेरिकी शासन तसेच लष्करी आस्थापना यांना पहिल्यापासून चार हात लांब ठेवलं होतं. चिप तंत्रज्ञानासंदर्भातल्या आपल्या संशोधनात अमेरिकी शासनाचा एका मर्यादेबाहेर हस्तक्षेप नसावा, हा यामागचा प्रमुख उद्देश होता.

आता मात्र जपानी कंपन्यांनी सर्व बाजूंनी कोंडी केल्यानंतर अमेरिकी कंपन्यांना आपल्या सरकारच्या मदतीची गरज भासू लागली. शासन दरबारी आपले म्हणणे मांडण्यासाठी व जमेल तितकी सरकारी मदत आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी त्यांनी ‘सेमीकंडक्टर इंडस्ट्रीज असोसिएशन’ ही संस्था स्थापन केली. आपल्या मागण्या सरकारच्या गळी उतरवण्यात या कंपन्या यशस्वी झाल्या का? जपानी कंपन्यांच्या वाढत्या वर्चस्वाला अमेरिकी कंपन्यांनी कसा शह दिला? या प्रश्नांची उत्तरं पुढील सोमवारी जाणून घेऊया.

चिप’-उद्योगात कार्यरत असलेले तज्ज्ञ.

amrutaunshu@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hp buy memory chip from japanese companies zws