सन १९४८ च्या डिसेंबरमध्ये कलकत्ता येथे आयोजित केलेल्या अधिवेशनात ‘रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टी’चे विसर्जन करण्यात आले, तरी नंतरच्या काळात रॉयवादी कार्यकर्ते व विचारवंत वर्षा-दोन वर्षांनी एकत्र येऊन ‘रॅडिकल ह्युमॅनिस्ट कन्व्हेंशन’ भरवत. असेच एक अधिवेशन ४ व ५ फेब्रुवारी, १९५१ मध्ये कलकत्त्यात संपन्न झाले. या अधिवेशनासाठी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी व प्रा. गोवर्धन पारिख यांनी मिळून वैचारिक मसुदा तयार केला होता. तो ७ जानेवारी १९५१ च्या ‘दि ह्युमॅनिस्ट’ इंग्रजी साप्ताहिकात प्रसिद्ध झाला होता.
या मसुद्यात लेखकद्वय म्हणतात की, ‘‘मानवी राजकारण हे राजकीय सत्तेसाठी नसून, राजकीय स्वातंत्र्यासाठी आहे. हे उदारमतवादी समाजार्थ निर्माण मुक्त समाजपीठ होय. केवळ संविधानाने मिळालेले राजकीय हक्क व स्वातंत्र्याने मुक्त समाज निर्माण करता येणार नाही. ते केवळ व्यक्तिस्वातंत्र्याद्वारे शक्य आहे. ते प्रजा नि सत्ताधीशांच्या वेगवेगळ्या स्थानांच्या विसर्जनातून आले पाहिजे. प्रजा व सत्ताधारी एक हवेत. गेल्या शंभर वर्षांतील समाजवादी सत्तेच्या प्रयोगातून हे साध्य होऊ शकले नाही. भारतात आज संविधानाधारित लोकशाही सत्ता अस्तित्वात आली आहे. केवळ विरोधी आवाजांचे अस्तित्व म्हणजे लोकशाही नाही. घटनाही संपन्नता, विकास व स्वातंत्र्याचे साधन असेल, तर त्याची प्रचीती राज्यकारभारातून आली पाहिजे. भारतीय लोकशाही लोकप्रतिनिधी म्हणून कार्य करते. प्रत्यक्ष जनता राजकारभारात सक्रिय नसते. पक्ष, गट कारभार पाहतात. भारतीय लोकशाही विधायक धर्मनिरपेक्षतेवर आधारलेली हवी. लोकशाहीत निवडणुका प्रबोधनाचे साधन न होता, राजकीय साध्य बनले आहे. लोकशिक्षणाधिकारी लोकशाही खरी. आम्ही त्या मताचे समर्थक आहोत. पर्याय हा लोकशाहीचा आत्मा आहे. आम्ही नव्या पर्यायांचे पूजक आहोत. नैतिक अधिष्ठान असलेली लोकशाही लोकशिक्षणातून घडणाऱ्या परिवर्तनातूनच शक्य आहे. आम्ही तसा प्रयत्न करू इच्छितो.’’
याच विषयासंदर्भाने तर्कतीर्थांनी ‘दि रॅडिकल ह्युमॅनिस्ट’ साप्ताहिकाच्या २५ फेब्रुवारी, १९५१ च्या अंकात ‘दि स्टेट अँड डिफ्युजन ऑफ पॉवर’ या शीर्षकाच्या लेखात आपले विचार व्यक्त केले आहेत. त्यात ते म्हणतात की, ‘‘राज्याचे कार्य समाजातील गोंधळ दूर करून सामंजस्याचे वातावरण निर्माण करणे हे असते. ते मानवी अंत: नि आत्मीय संबंधांवर अवलंबून असते. मानवी आदर्श, जीवन, स्वातंत्र्य, विकास, नैतिकता यांमुळेच शक्य असते. सामंजस्य व एकोपा, प्रतिबंध आणि संरक्षण, अशा उभय मार्गांनी ते निर्माण करणे शक्य असते.’’
‘‘वर्गरहित व वर्गसहित समाजात असणारी उतरंड परंपरेवर अवलंबून असते. अशा परंपरागत समाजात राज्याची भूमिका नाजूक असते. बदल तर घडवायचे; पण दुखवायचे नाही, असा पवित्रा सर्रास घेतला जातो. अशा भूमिकेतून मूलभूत परिवर्तन अशक्य असते. त्यासाठी नव्या स्वरूपाचे कार्य करणारे राज्य प्रजा अपेक्षिते; पण हे तत्त्व म्हणून आकर्षक असले, तरी कृतीत मर्यादा येतात. मार्क्सवादात राज्याची (State) व्याख्या निश्चित केली आहे. त्यात सत्तेस बदलाचे साधन मानले आहे. साधनात शक्ती असल्याशिवाय कार्य अशक्य ठरते. सत्ताशक्तीचे विसर्जन आणि राज्य अस्तित्व अशक्य कोटीतील गोष्ट होय. असे आजवर आपण मानत आलो आहोत. आदर्श, तत्त्व म्हणून ते ठीक असले, तरी अव्यवहारी आहे, असा आजवरचा समज आहे.’’
‘‘राजकीय शक्तीद्वारे सत्ताप्राप्ती आणि सत्तेद्वारे जनकल्याण, असा प्रघात आहे. राजकारण करायचे तर, सक्ती व शक्ती तत्त्वात बसत नाहीत. सुधारवादी प्रशासनात लोकसहभाग व लोकसहयोगाचे तत्त्व अभिप्रेत असते. समाजशक्ती हीच परिवर्तनाची शक्ती मानून कार्य करणारे राज्य नवमानवतावादी विचाराच्या आम्हा सर्वांना यावर उपाय वाटतो. चारित्र्य संवर्धनातून निर्माण होणाऱ्या शक्तीच्या समाजात राज्यकारभार करण्यासाठी सत्ता व शक्ती अनिवार्य वाटत नाही. ‘‘The integral character of Power can be perceive in diffusion also and that is why complete diffusion of power cannot mean chaos but we signify a perfect democratic order.’’ तर्कतीर्थांनी या लेखातून ‘राज्य’ संकल्पनेसंबंधी नवा विचार मांडला असून, तो तात्त्विक व तर्काधारित आहे.
– डॉ. सुनीलकुमार लवटे
drsklawate@gmail.com