डॉ. उज्ज्वला दळवी

पचनास मदत करणारं, जठरातलं हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड अन्ननलिकेत पोहोचलं तर तिथल्या पेशींना इजा होऊ शकते. ही प्रक्रिया टाळणंच उत्तम..

Natural Ways To Dissolve Gall bladder Stones
पित्ताशयातील खडे शस्त्रक्रियेशिवाय नैसर्गिकरित्या काढता येतात का? वाचा डॉक्टरांचे मत
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Papaya Leaf Water Benefits in Marathi
Papaya Leaf Water Benefits : आठवड्यातून तीनदा प्या पपईच्या पानांचे एक कप पाणी; जाणून घ्या मधुमेहापासून त्वचा-केसांच्या आरोग्यापर्यंतचे असंख्य फायदे
Loksatta Chatura What is the importance of this fast in terms of health
स्त्री आरोग्य: उपवास करताय? करा, पण आरोग्य सांभाळून…
Loksatta Chatura Article on health of working women
तू तुझं आरोग्य सांभाळून राहा…
It revealed that doctor injured womans blood vessel and bile duct during surgery for gallstones
शस्त्रक्रियेत निष्काळजीपणा, भरपाई नाकारुन डॉक्टरची महिलेला धमकी
Coriander Juice benefits
Coriander Juice: रिकाम्या पोटी कोथिंबिरीचा रस प्यायल्यानं शरीरावर काय परिणाम होतो? वाचून व्हाल अवाक…
5 superfoods that can help prevent clogged arteries
रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होऊ नये म्हणून खा हे पाच सुपरफूड! तज्ज्ञांचा सल्ला

‘‘डॉक्टर, जेवल्यावर छातीत दुखतं, जळजळतं,’’ अख्खा पंजा पसरून छातीसमोर फिरवत मुकुंदराव बोलत राहिले, ‘‘पुढे वाकून बुटाची लेस बांधताना घशात आंबट पाणी येतं. गिळताना घास अडकतो. रात्री झोपेत खोकला येतो, श्वासाला त्रास होतो. माझा आवाज घोगरा झाला आहे. घशाचा कॅन्सर झालाय का मला?’’

सेवानिवृत्त झाल्यापासून मुकुंदरावांनी आरामखुर्चीत बसून टीव्ही बघायचा सपाटा लावला. सुगरण राधाकाकूंनी नवेनवे पदार्थ रांधून पतिराजांना खाऊ घातले. काकांचं वजन वाढत गेलं. शिवाय मित्रांबरोबर रात्री मद्यपानाची बैठक, तिथे सोडा घेणं, चखणा म्हणून भजी- फरसाण- फिशफ्राय चापणं, घरी येऊन दातही न घासता तडक झोपणं हेही चालू झालं. जळजळ झाली तर गारेग्गार मिल्कशेक घेतला. पण थोडय़ाच वेळात जळजळ पुन्हा झाली. अलीकडे त्रासदायक खोकलाही सुरू झाला.  

हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड आपल्या सर्वाच्याच पोटात, जठरात  तयार होतं. अन्न पचवायला त्याची मदत होते. त्या अ‍ॅसिडने जठराच्या पेशीदेखील पचू शकतात. तसं होऊ नये म्हणून जठराच्या अस्तरावर श्लेष्मल (काहीसा चिकट) पदार्थाचे जाड थर असतात. लहान आतडय़ात अ‍ॅसिडमारक अल्कलीचं प्रमाण भरपूर! तिथं जठरातलं अ‍ॅसिड काम करू शकत नाही.

पण वर अन्ननलिकेत मात्र अल्कलीही नसतात आणि श्लेष्मल थरही जेमतेम असतो. जठरातलं अ‍ॅसिड अन्ननलिकेत पोहोचलं तर तिथल्या पेशींना इजा होते. म्हणून जिथे अन्ननलिका संपून जठर सुरू होतं तिथले स्नायू जठराचं तोंड आवळून बंद ठेवतात. लठ्ठपणा, गरोदरपणा, अती खाणं वगैरेंमुळे पोटातला दाब वाढला की त्या स्नायूंवर मात करून आम्ल अन्ननलिकेत घुसतं. इजा करतं. जळजळ होते. त्या त्रासामुळे अन्ननलिकेचे स्नायू पिळवटतात. छातीत कळ येते.

संत्री-लिंबं, फसफसणारी पेयं, टोमॅटो केचप, व्हिनेगर वगैरेंनी अन्ननलिकेतलं अ‍ॅसिड वाढतं. आयर्नच्या गोळय़ा, हाडांचा ठिसूळपणा घटवणारी औषधं, ब्रुफेनसारखी संधिवातावरची औषधं, औदासीन्यावरचे, निद्रानाशावरचे, रक्तदाबावरचे काही उपचार, काही अँटिबायोटिक्ससुद्धा अन्ननलिकेला अ‍ॅसिडने होणारी इजा वाढवतात.

असडीक धान्यं, केळी-सफरचंदासारखी फळं, पालेभाज्यांसारख्या तंतूमय भाज्या अ‍ॅसिड वर येऊ देत नाहीत. उतारवय, धूम्रपान, मद्य, कॉफी, सोडा, तळकट खाणं, चीझ, चॉकलेट, पिझ्झा, साखरेचे पदार्थ आणि स्निग्ध पदार्थ यांनी त्या स्नायूंची पकड सैल होते. जठर-अन्ननलिका-घसा ही एक सलग लांब मानेची बाटली तयार होते. बाटली उभी ठेवली तर तिच्यातील रस खालीच रहातो. पण ती लवंडली तर रस बाटलीच्या मानेतून तिच्या तोंडापर्यंत जातो, बाहेर सांडतो.

मुकुंदरावांच्या मद्यपानाने, तळलेल्या चखण्याने अ‍ॅसिडचं उधाण येई. गार दुधाने तात्पुरतं बरं वाटे. पण नंतर उधाण वाढून पुन्हा जळजळ होई. पोटाला तडस लागेपर्यंत जेवल्याबरोबर आडवं झालं की गच्च भरलेली जठर-बाटली लवंडून तिच्यातलं अ‍ॅसिड अन्ननलिकेला जाळत घशात-तोंडात-फुप्फुसांतही पोहोचे. जळजळ, खोकला, दमा हैराण करत.

त्या उलटय़ा वाहणाऱ्या गंगेमुळे त्यांना सायनसायटिसचाही त्रास झाला. तसंच त्या अ‍ॅसिडमध्ये दातांचं एनॅमेल विरघळलं. दात पोखरले. एकदा ते अ‍ॅसिड घशातून कानात चढलं. मोठीच इजा झाली. शस्त्रक्रिया करावी लागली.

डॉक्टरांनी मुकुंदरावांच्या अन्ननलिकेतल्या अ‍ॅसिडचं प्रमाण तपासलं. ते फार वाढलं होतं. दुर्बिणीतून केलेल्या तपासात अन्ननलिकेला जखमा झाल्याचं दिसलं. काही लोकांत पुन्हापुन्हा तशा जखमा झाल्यामुळे कॅन्सरही होऊ शकतो. नशिबाने मुकुंदरावांत तशा कॅन्सरची सुरुवात झाली नव्हती.

डॉक्टरांनी त्यांना जीवनशैली बदलायचा सल्ला दिला. मद्यपान, धूम्रपान, तळकट खाणं सगळं पूर्ण बंद करून वजन कमी करायला सांगितलं. जेवल्यावर तीन तास आडवं झोपायचं नाही, थोडातरी वेळ शतपावली घालायची अशाही अटी घातल्या. सोबत अ‍ॅसिडचा स्राव घटवणारं रॅनिटिडीन जेवणापूर्वी घ्यायला  दिलं. गरजेला घ्यायला अँटासिड्स (अ‍ॅसिडमारक औषधं) दिली. तेवढय़ाने पूर्ण आराम मिळेना. म्हणून त्यांना ओमेप्रॅझॉल नावाचं औषध  दिलं. ते जेवणाच्या आधी अर्धा तास घेतलं की जठरातल्या पेशींमधले अ‍ॅसिडचे नळ पूर्णपणे  बंदच होतात. मग त्या पेशी जेवणामुळे उद्दीपित झाल्या तरी अ‍ॅसिड तयार करू शकत नाहीत. त्या औषधानं  मुकुंदरावांना बरं वाटलं.. मग बाकीची पथ्यं पाळायचीच कशाला?

एरवी जठरातल्या अ‍ॅसिडमुळे तिथले रस निर्जंतुक असतात. अ‍ॅसिडचा बंदोबस्त  केल्यावर तिथे भलभलत्या जंतूंना मोकळं रान मिळतं. बेदम जेवून झोपल्यावर जेव्हा जठराची बाटली घशापर्यंत उपडी होते तेव्हा ते खतरनाक जंतू घशात आणि तिथून फुप्फुसांत पोहोचतात. नेहमीच्या अँटिबायोटिक्सना दाद न देणारा, जीवघेणा न्युमोनिया होऊ शकतो. म्हणून ओमेप्रॅझॉल-रॅनिटिडीन वगैरे औषधं दोन-तीन महिनेच घेणं बरं. 

कुठलीही औषध-गोळी बनवताना तिच्यात काही निर्गुण-निरौषध पदार्थ घालावे लागतात. रॅनिटिडीनमधल्या तसल्या एका पदार्थामुळे कॅन्सरची शक्यता वाढते, असं आढळल्यामुळे आता फॅमोटिडीन हा रॅनिटिडीनचा चुलतभाऊ वापरतात.

डॉक्टरांनी हे समजावून सांगितलं.  झोपताना घ्यायच्या अँटासिड्सना आल्जिनेट्सची जोड दिली. आल्जिनेट्स ही पाणवनस्पतींतून मिळणारी रसायनं. त्यांची अन्ननलिकेवर आणि जठरातल्या अ‍ॅसिडच्या वरच्या भागावर दाट-घट्ट साय धरते. सोबतची अँटासिड्स तिथली अ‍ॅसिडिटी घटवतात. अन्ननलिकेवरचा भडिमार घटतो.

तरी  मुकुंदरावांनी आपली राजसी जीवनशैली सुरूच ठेवली. शहाण्या राधाकाकूंनी सुताराकडून पलंगाचीच उशाकडची बाजू सहा इंचांनी उंच करून घेतली. झोपल्यावर जठर-बाटली उभी नाही पण निदान तिरपी तरी रहायला लागली.

एकदा मुकुंदराव मध्यरात्री उठले. घट्ट वळलेली मूठ छातीसमोर धरून, ‘दुखतंय!’ म्हणून गप्प बसून राहिले. काकूंनी त्यांना अँटासिडची अख्खी बाटली प्यायला लावली. काहीही फायदा झाला नाही. चाणाक्ष काकूंनी तत्काळ रुग्णवाहिका बोलावून रुग्णालय गाठलं. मुकुंदरावांना हृदयविकाराचा झटका आला होता. वेळेत पोहोचल्यामुळे तातडीच्या इलाजांनी मोठं नुकसान टाळता आलं.

 प्रद्युम्नलाही अ‍ॅसिडिटीचा त्रास होता. तो तिशीतच मोठय़ा पदावर पोहोचला. तिथल्या अनेक जबाबदाऱ्यांचे ताणतणाव, सततची भ्रमंती, वेळीअवेळी अत्यंत महत्त्वाच्या निर्णायक मीटिंग्ज, सरकारदरबारी लागेबांधे प्रस्थापित करायला भरभक्कम एक्झिक्युटिव्ह जेवणं, रात्रीची जागरणं, व्यायामाचा अभाव या सगळय़ांच्या परिणामांनी अ‍ॅसिडिटी वाढली. सगळं सुधारणं शक्य नव्हतं. पण पार्टीतही स्वत:पुरतं माफक बिनतेलाचं निवडक जेवण, नियमित व्यायाम असा वसा घेऊन त्याने तो पाळला. वजन कमी केलं, चॉकलेट, तळकट, अती गोड टाळलं आणि अ‍ॅसिडीटीला दूर ठेवलं.

आयुषबाळाला जन्मापासूनच प्रत्येकवेळी दूध प्याल्यावर मोठी उलटी होई. त्याची किरकिर सतत सुरू असे. पहिल्या चार महिन्यांत त्याचं वजन वाढलंच नाही. त्याला अ‍ॅसिडिटीचा त्रास होता. डॉक्टरांनी त्याला तासातासाला थोडंथोडं दूध भरवायला सांगितलं. त्याने हळूहळू तो सुधारला. पहिल्या वाढदिवसानंतर तो इतर मुलांसारखाच व्यवस्थित खायला-प्यायला लागला. ३५ टक्के तान्हुल्यांना तसा त्रास होतो. बहुतेकांमध्ये तो आपोआपच नाहीसा होतो.

सदूभाऊंना आणि भुजंगरावांनाही घास गिळताना अडकल्यासारखं वाटे. दोघंही अ‍ॅसिडिटीची औषधं घेत राहिले. त्रास असह्य झाला तेव्हा दोघांनीही दुर्बिणीतून अन्ननलिका-जठर-तपास करून घेतला. सदूभाऊंना अ‍ॅसिडिटीमुळेच अन्ननलिकेत जखमा झाल्या होत्या. त्यांच्या आवळलेल्या व्रणांमुळे अन्ननलिका चिंबली होती. चिंबलेल्या भागाच्या वर अन्न अडकून राहिल्यामुळे अन्ननलिकेला मोठा पातळ फुगा आला होता. ते सारं शस्त्रक्रियेने दुरुस्त करावं लागलं.

भुजंगरावांच्या अन्ननलिकेत कॅन्सर सापडला. तो काढून टाकायला मोठी शस्त्रक्रिया करावी लागली. डोकेदुखी-सांधेदुखीला, हातापायाच्या मुंग्यांना, गांधी-दादडांना अ‍ॅसिडिटी जबाबदार नसते. स्वादुिपड (पॅन्क्रियाज), यकृत, पित्ताशय वगैरे अनेक अवयवांच्या दुखण्यांवरही अ‍ॅसिडिटीच्या निदानाचा शिक्का घरच्या घरीच मारला जातो. त्यामुळे खरं निदान व्हायला, योग्य उपचार व्हायला उगाचच उशीर होतो. म्हणून कुठलीही स्वघोषित ‘अ‍ॅसिडिटी’ फार काळ त्रास देत राहिली तर डॉक्टरांकडून तपास करवून नेमकं निदान जाणून घ्यावं.

हृदयविकाराच्या झटक्यानंतर शहाणे झालेले  मुकुंदराव आता प्रद्युम्नसारखेच नेटका, माफक आहार घेतात. मद्याला स्पर्श करत नाहीत. जेवणानंतर तीन तास आडवे होत नाहीत. नियमित शतपावली, योग्य व्यायामही करतात. जीवनाला योग्य वळण लावल्यावर त्यांच्या अ‍ॅसिडची उलटी गंगाही आता गुणात सरळ वाहते.

लेखिका वैद्यकीय व्यवसायातून निवृत्त आहेत.

ujjwalahd9@gmail.com