रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यापाठोपाठ आता इस्रायलचे अध्यक्ष बिन्यामिन नेतान्याहू यांच्याविरोधातही द हेग येथील आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय (आयसीसी) अटक वॉरंट जारी करण्याची शक्यता आहे. या न्यायालयास किती अधिकार आहेत, त्याकडून झालेली अटक वॉरंट किती गांभीर्याने घ्यावी वगैरे युक्तिवाद करणाऱ्यांसाठी एक उदाहरण देणे अस्थानी ठरणार नाही. गतवर्षी असे वॉरंट जारी झाल्यानंतरच पुतिन यांच्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यांमध्ये लक्षणीय घट झाली. भारतासारख्या मित्रदेशात झालेल्या टी-२० परिषदेसाठीही ते आले नाहीत. पुतिन यांच्या हातात बेडया घालण्याची पोलिसी किंवा लष्करी ताकद आयसीसीमध्ये नसेल, पण प्रगत व नीतिवादी जगतात कुठेही ज्याच्याविरोधात वॉरंट जारी झाले, अशा ‘वाँटेड’ व्यक्तीला प्रतिष्ठा मिळत नाही. पुतिन ‘तसे’ असणे हे अमेरिकेसारख्या देशांना योग्यच वाटेल. पण उद्या जर अशी नामुष्की नेतान्याहूंवर आली, तर अमेरिकेच्या राजदरबारात त्यांना पूर्वीसारखी प्रतिष्ठा मिळेल का, या प्रश्नाचे उत्तर सोपे नाही. अशा प्रकारचे वॉरंट जारी करण्याची प्रक्रिया आयसीसीकडून सुरू असल्याचे काही पाश्चिमात्य माध्यमांनी, तसेच ‘अल जझीरा’ या कतारी-अरब वृत्तवाहिनीने इस्रायली अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे. तशी कुणकुण लागल्यामुळे इस्रायली सरकार काहीसे चिंतित असल्याचेही या माध्यमांनी म्हटले आहे. इस्रायलची गाझा पट्टीत सुरू असलेली हमासविरोधी कारवाई आयसीसीच्या आरोपपत्रात अंतर्भूत नाही. पण कारवाईच्या निमित्ताने काही लाख गाझावासीयांची अन्नधान्य मदत इस्रायलने रोखून धरली आणि त्यातून शेकडो भूकबळी उद्भवले हा इस्रायलविरुद्धचा प्रमुख आरोप आहे. तसेच, इस्रायली शहरांवर गतवर्षी ७ ऑक्टोबरच्या नृशंस हल्ल्यानंतर अनेक इस्रायलींना पकडून ओलीस ठेवल्याबद्दल या संघटनेच्या म्होरक्यांविरोधातही वॉरंट जारी होण्याची दाट शक्यता आहे. गतवर्षी पुतिन यांच्याविरुद्ध वॉरंट जारी झाले, ते युक्रेनवर आक्रमण केले या कारणासाठी नव्हे. तर या युद्धामुळे युक्रेनमधील अनेक लहान मुले विस्थापित वा मृत झाली हे त्यामागचे कारण होते. तेव्हा इस्रायल सरकार आणि जगभरातील इस्रायलचे समर्थक ‘प्रतिसादात्मक कारवाई करूच नये का’ असा जो तक्रारसूर आयसीसीविरोधात आळवत आहेत, त्याला अर्थ नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा