अभिजीत ताम्हणे
साहित्य मानवी नैतिकतेला आवाहन करू शकतं, जगरहाटीत मागे पडलेल्या अप्रिय स्मृतींनाही जागवून वर्तमानाला प्रश्न विचारू शकतं..
चित्रदर्शी वर्णनं असूनही काळाला कवेत घेणारी ही छोटेखानी कादंबरी आहे. अनेक प्रसंग जरी सन १९१० ते १९१३ दरम्यान घडत असले, तरी १८१५ किंवा त्याही आधीपासून (१७९३) ते सन २०१० किंवा ‘आत्ता’पर्यंतचा काळ या कहाणीत येतो. अमेरिकेच्या किनाऱ्यालगत, अटलांटिक समुद्राच्या उत्तरेकडल्या एका बेटावर घडणारी ही गोष्ट कुणा एकाची नसून विस्थापनाची आणि त्यामागल्या प्रेरणांची आहे. इथल्या सर्व ४७ रहिवाशांचं विस्थापन १९१२ मध्ये तत्कालीन वर्णद्वेषी, जमिनी बळकावणाऱ्या अमेरिकनांनी घडवलं होतं आणि हे बेट ‘सुप्रजनना’च्या नावाखाली ताब्यात घेतल्याबद्दल पुढे २०१० मध्ये अमेरिकेतल्या मेन या राज्यानं माफीही मागितली होती, याचा उल्लेख कादंबरीच्या सुरुवातीलाच आहे. कादंबरीला या इतिहासाचा आधार असला तरी, बाकीची गोष्ट काल्पनिक आहे. त्यामुळे त्यात पात्रं आहेत आणि ती बहुतेक सारी बेटावरली आहेत. कादंबरीला नायक नसला तरी एथन हनी हा पोरसवदा चित्रकार, त्याची आजी एस्थर आणि बाप एहा, एथनच्या बहिणी शार्लट आणि टॅबोथा, एथनला अमेरिकेच्या ‘मुख्यभूमी’वरल्या ओहायो राज्यात, इनॉन परिसरात पाठवलं गेल्यानंतर त्याला भेटलेली मैत्रीण/ शय्यासोबतीण ब्रिजिट कार्नी.. शिवाय बेटावरला कसबी, पण विक्षिप्त झकारी प्रोव्हर्ब नावाचा म्हातारा आणि त्याच्या दोघी पुतण्या, आयरिस आणि व्हायोलेट मॅकडरमाँट, थिओफिलिस आणि कॅडेन्स लार्क आणि त्यांची अशक्त- वेंधळी मुलावळ.. त्या पिलावळीसारख्या लार्क मुलावळीतली त्यातल्या त्यात धड म्हणावी अशी मिली.. अशा अनेकांची व्यक्तिचित्रं आहेत. बेटावर येऊन-जाऊन शिक्षणप्रसार आणि धर्मप्रसार करणारा मॅथ्यू डायमंड आणि दूर इनॉन परगण्यात राहणारे थॉमस हेली, त्यांची नात फ्रीबी अशीही पात्रं आहेत. प्रामुख्यानं एस्थर, एहा आणि झकारी, एथन, ब्रिजिट ही पात्रं सकर्मक आहेत – स्वबुद्धीनं, निर्णयपूर्वक काहीएक कृती करणारी आहेत, त्यामुळे त्यांच्याच ‘कर्म’-कहाण्या ही कादंबरी सांगते. त्या बेटावरला मूळ पुरुष बेन्जामिन हनी आणि त्याची सहधर्मचारिणी पेशन्स हनी हे इथे सफरचंदाची बाग फुलवतात, म्हणून या काल्पनिक बेटाचं नाव ‘अॅपल आयलंड’.
या अॅपल-बेटाची गोष्ट सांगण्याच्या मिषानं लेखक पॉल हार्डिग यांनी, विस्थापनकारी प्रेरणांचा लेखाजोखा उपरोधिक शैलीत वाचकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. पण हा उपरोध हे काही हार्डिग यांच्या शैलीचं वैशिष्टय़ नाही. उलट, त्यांची भाषा काव्यमय म्हणावी अशी आहे. उदाहरणार्थ बेटावरच वाढलेली मिली ‘बेटाच्या कानात कुजबुजते’, इनॉन परिसरातल्या थॉमस हेलींच्या घरातली आश्रित-नोकर मुलगी ब्रिजिट या मोठय़ा घरात जिथं बसली आहे तिथल्या खिडक्यांच्या तावदानांवर पावसाचे थेंब पडतात आणि त्यांच्या पाणेरी रेघा होऊन ‘एकमेकांमध्ये वेणीसारख्या गुंफून’ सरकतात, पोटचं पोर समुद्रात बुडवायला निघालेली एस्थर विचार बदलून मागे फिरते तेव्हा तिच्या ‘ओल्या केसांचा आसूड तिच्या चेहऱ्यावर फटकारतो’.. वगैरे. ही काव्यमयता फक्त शब्दयोजनेपुरती नसून, काव्यात्मपणे काही तरी निराळंच सूचित करण्याचाही खटाटोप ही भाषा मांडते.. उदाहरणार्थ, ब्रिजिटला एथनबद्दल वासनायुक्त आकर्षण वाटलं आहे हे सांगण्याऐवजी लेखक ‘त्याच्यासारखंच धूम्रपान करण्याच्या ऊर्मीपर्यंत ती पोहोचली’ एवढंच सांगतो (जाणकारांना इथे अमृता प्रीतमही आठवतील, पण पॉल हार्डिग हे प्रीतम यांच्या ‘रसीदी टिकट’बद्दल अडाणीच असणार)! या भाषेतून आणि ‘कळकट’ कप, ‘खंबीर’ दरवाजा अशा विशेषणांनी लडबडलेल्या वर्णनांतून समोर येतात त्या पात्रांच्या कृती.. कधी दैनंदिन जगण्यातल्या, तर कधी आयुष्य बदलून जाईल इतक्या कळीच्या कृती.. किंवा, बेटावरल्या माणसांबद्दल बाहेरच्या माणसांना वाटणारा तिरस्कार दाखवणाऱ्या कृती. त्या कृतींना इतर पात्रांनी दिलेले प्रतिसाद, त्या प्रतिसादांमधून उलगडणारं पात्रांमधलं नातं. तटस्थ वर्णन करण्याच्या अनेक पद्धती लेखक हाताळतो. साक्षीभावानं या कृतींबद्दल सांगत राहातो, तसंच ‘पहिली सुप्रजनन परिषद लंडनमध्ये याच महिन्यात (जुलै १९१२) झाली, तिच्या उद्घाटनपर भाषणात मेजर लिओनार्ड डार्विन म्हणाले..’ असा वृत्तान्त , बेटावरल्या सर्वाचं विस्थापन करण्याचा ठराव किंवा ‘पहिल्या चित्रात दिसतो आहे तो.. ’ अशा प्रकारची म्युझियममध्ये असतात तसली लेबलं.. अशा अत्यंत त्रयस्थ, कागदी वाक्यरचनांचाही वापर कहाणी पुढे नेण्यासाठीच लेखक करतो.
एकेका पात्राच्या कहाणीनं वाचक अस्वस्थ होईलही.. उदाहरणार्थ एस्थरची कहाणी. एस्थरचे वडील हेच तिचा मुलगा एहा याचेही जन्मदाते आहेत.. मुलीवर त्यांनी वासनाप्रयोग केल्यामुळे तिला एहा झाला, त्याला बुडवण्याचा विचार बदलून तिनं स्वत:च्या बापालाच बेटावरल्या आडव्या सुळक्यावरून ‘अलगद ढकलून दिलं.. जरा जास्त जोर लावला असता तर कदाचित तीही भेलकांडून खाली पडली असती’! ही एस्थर उतारवयात त्याच आडव्या सुळक्याच्या सुरक्षित भागात खुर्चीवर बसून राहात असते. तिच्या बापाची आठवण तिला याही वयात छळत असते. तारुण्यसुलभ प्रेम आपल्या आयुष्यात कधी आलंच नाही, याची जाणीव तिला असते आणि हे प्रेम आपण झकारीवर केलंही असतं, हा साक्षात्कार तिला होईपर्यंत बराच उशीर झालेला असतो! झकारी एके काळचा रांगडा गडी. सुतारकाम, कोरीवकाम अशी हुनर त्याच्याकडे भरपूर, पण हा अतिविक्षिप्त. एका झाडाच्या ढोलीत राहातो, त्या ढोलीमध्येच वर-वर खोदत, ढोलीच्या आतल्या भागात बायबलच्या प्रसंगांची चित्रं जमतील तशी कोरत राहातो, त्यापायी तहानभूक विसरतो. हाच झकारी, विस्थापनाला ठाम नकार देतो. आलेल्या पथकासमोर स्वत:च्या विजारीचा पट्टा म्हणून बांधलेला दोर काढून या पथकाला भीती दाखवताना विजार सुटून नागडा होतो आणि त्याच अवस्थेत आरडाओरड करून, या पथकाला मागे फिरायला लावतो! एथन हनी हा वेळ आणि चितारायला काहीही साधन मिळालं की लगेच चित्रं काढणारा पोरगा, बेटावरल्या माणसांची हुबेहूब रेखाटनं करतो. तो रंगानं गोरा आहे.. बेटावरल्या त्याच्या पिढीतला एकमेव गोरा मुलगा एथनच. म्हणून तर मॅथ्यू डायमंड ठरवतात, हा मुख्य भूमीवरही जाऊ शकतो.. तिथं रीतसर चित्रकला शिकू शकतो.. फक्त थॉमस हेलींची मदत हवी. तीही मिळते आणि एथन कलाशाळेत जायचं म्हणून बेट सोडतो, कलाशाळा सुरू होण्यापूर्वीच्या दिवसांत हेलींकडेच राहू लागतो आणि तिथं गवत कापण्या-बांधण्यासाठी आलेल्या डच मजुरांच्या टोळीची चित्रं काढू लागतो (या मजूरटोळीत एक बारा वर्षांचा मुलगाही आहे, तो कानानं बहिरा- मुका नाही, गाणीसुद्धा गायचा; पण मोठय़ा आवाजात गाऊ लागला, की त्याचे वडील त्याच्या खांद्यावर थोपटून त्याला सावध करायचे.. हे वर्णन लेखक विनाकारण करतो) .. तर एथन, ‘मी पाहू का तुला चित्रं रंगवताना’ असं म्हणत त्याच्या शेजारी बसकण मारणाऱ्या ब्रिजिट कार्नीचंही चित्र काढतो! ही ब्रिजिट एथनच्याच खोलीत झोपण्याचा निर्णय घेते आणि त्याचं मूल हिच्या पोटात असणार असा संशय मालकाला- थॉमस हेलींना- ज्या पहाटे येतो त्याच सकाळी एथनला हाकलून दिलं जातं.. दुसऱ्याच दिवशी ब्रिजिटसुद्धा हेलींचं घर सोडते. कशीबशी अॅपल-बेटावर पोहोचते.. कारण, एथनच्या नकळत का होईना, त्यानं बेटावर काढलेली चित्रं तिनं पाहिलेली असतात आणि ‘बहिणी काळय़ा कशा?’ वगैरे प्रश्नही तिला पडलेले असतात. ऐन विस्थापनाच्या धामधुमीत ब्रिजिट बेटावर! एथन कुठेय विचारते, पण एथनला परतीची वाट माहीतच नसेल, हे तिला उमगलंच नाहीये.. तरीही हे घर तिला ठेवून घेतं. झकारीच्या साथीनं कधीकाळी एक मोठ्ठा वृक्ष तोडून, त्यापासून ओंडकेवजा फळय़ा बनवून जे घर एहानं स्वत:च्या आई- मुलांसाठी (एहाच्या पत्नीचा उल्लेख कादंबरीभर कुठेही नाही) बांधलं होतं, त्याच फळय़ा सुटय़ा करून आता तो तराफा तयार करतो आणि या तराफ्यावरून एहा, दोघी मुली, पोटुशी ब्रिजिट आणि खुर्चीवरली एस्थर यांचा प्रवास सुरू होतो. एकविसाव्या शतकात या बेटावरल्या अवशेषांचं संग्रहालय झालं आणि थॉमस हेलींची नात फ्रीबी यांनी उदारपणे दिलेल्या एथनच्या चित्रांमुळे या संग्रहालयाला शोभा आली, याचे उल्लेख आधीच लेखकानं केलेले आहेत. त्याहीआधी पहिल्याच प्रकरणात काव्यात्मपणे काही तरी निराळंच सूचित करण्याच्या शैलीनं, ‘एथननं पाण्यात असलेल्या बहिणींचं चित्र कागदावर चारकोलची काडी वापरून काढलं. ते रेखाटन पाहाताना त्याला वाटलं, अनंतकाळपर्यंत या कोळशानं बनलेल्या दोघी, कोळशानंच साकारलेल्या समुद्रात, कोळशानं रेखाटलेल्या सूर्याखाली राहातील आणि हाडामांसाची.. मनसुद्धा असलेली खरीखुरी माणसं, वरून त्यांना पाहातील’ असं लेखक लिहून गेला आहे. कादंबरीचा शेवट काय असेल, हे आता निराळं सांगायला हवं का?
ही गोष्ट विस्थापनाचीच आहे, नायक शोधणाऱ्यांसाठी एथन आहेच, पण खलनायक कोण, हे शोधण्यासाठी मात्र मिली लार्क आणि अन्य सर्व लार्क कुटुंबीयांना सुधारगृहात ठेवून सक्तीनं त्यांची नसबंदी कोणी केली, मुळात बेटाचं विस्थापन कोणी केलं याचा तपशीलही कादंबरीतच आहे, तो उपयुक्त ठरेल! लोकस्मृतीतून असे इतिहास सहज पुसले जातात कारण लोकस्मृतीला ते आठवायचेच नसतात; पण साहित्य- जे मानवी नैतिकतेला आवाहन करू शकतं- ते अशा नकोशा स्मृतीला जागवून तिची जागा परत मिळवून देऊ शकतं (हे असं काम मराठीतही झालंय, पण ज्या थोडय़ांनी केलं तेही पुढे लेखकराव होण्याच्या महत्त्वाकांक्षेपायी पानि-पतित झाल्याचीही उदाहरणं आहेत, असो). अॅपल आयलंडच्या बाहेरची जी काही (१९१२ च्या सुमाराची) अमेरिकन पात्रं या कादंबरीत आहेत, ती वैविध्याबद्दल पूर्णत: अनभिज्ञ. गोरेच खरे, असं मानणारी. हे आजच्या ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’वाल्यांचेच पूर्वज असावेत की काय, अशी शंका वाचकांमध्ये पेरण्यातही लेखक यशस्वी झाला आहे. पहिलं अख्खं प्रकरण जरी या बेटाचा इतिहास सांगणारं, तरी त्यातून जणू वंश- राष्ट्र अशा साऱ्या कल्पनांच्या पलीकडल्या मानवी जगाचं स्वप्न लेखकानं दाखवलं आहे. भेदभावकारक राजकारण- अर्थकारण आणि विस्थापन यांचा संबंध ‘कहाणी’सारख्या वेल्हाळपणे सांगणारी ही कादंबरी चित्रदर्शी आहे, म्हणून बुकरच्या स्पर्धेत इथवर तरली आहे.
काही दुवे..
या कादंबरीची लेखनप्रक्रिया आणि पॉल हार्डिगबद्दल अधिक माहिती करून देणारा लेख : https://www.nytimes.com/2023/01/22/ books/paul-harding-this-other-eden.html
लेखकाची मुलाखत :
पुढील आठवडय़ात : चेतना मारू यांच्या ‘वेस्टर्न लेन’बद्दल- अजिंक्य कुलकर्णी यांचा लेख.
‘धिस अदर ईडन’
लेखक : पॉल हार्डिग,
प्रकाशक : पेन्ग्विन रॅण्डम हाऊस,
पृष्ठे : २२२; किंमत : ७९९ रुपये
abhijit.tamhane@expressindia. com