सामान्य प्रशासन खात्याच्या शेरेविषयक परिपत्रकाची अंमलबजावणी सुरू झाल्यावर गुणवत्तापूर्ण तपासणीत बाद ठरलेल्या फायलींचा ढीग दालनात साचू लागल्याने अवघे मंत्रिमंडळ संतापले. हे सरकार लोकांचे, त्यांचीच कामे होत नसतील तर फायदा काय, अशा तक्रारी सर्वच मंत्री करू लागल्यावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने एक बैठक बोलावली. त्यात सहभागी झालेल्या मंत्री व अधिकाऱ्यांनी बराच खल करूनही फायलीवरच्या शेऱ्यावरून कामे मार्गी कशी लावायची यावर तोडगा निघेना! गुणवत्तेच्या नावावर फाइल परत येणे हा आमचा अपमान असा बहुतेक मंत्र्यांचा सूर, तर या परिपत्रकामुळे आम्ही असंतोषाचे धनी ठरू लागलो असे अधिकाऱ्यांचे म्हणणे. चर्चा करता करता एका वरिष्ठ अधिकाऱ्याने भीतभीतच अकबर व बिरबलाची कथा ऐकवली.
न्यायदान करताना सांकेतिक भाषेचा वापर कसा करावा असे त्या कथेचे सार. ती ऐकताच अख्खे मंत्रिमंडळ व अधिकारी ‘यूरेका, यूरेका’ असे एका स्वरात ओरडले. मग सर्वानुमते ठरले. फायलीवर शेरा मारताना मंत्र्यांनी सांकेतिक कृती करायची, तिथे हजर संबंधित खात्याच्या अधिकाऱ्याने त्याची नोंद घ्यायची व नंतर त्याप्रमाणे निर्णय घ्यायचा. यामुळे उत्साहित झालेल्या काही अधिकाऱ्यांनी तातडीने ‘सांकेतिक नियमावली’ तयार करायला घेतली. लगेच त्याच्या प्रती तयार करून सर्वाना देण्यात आल्या. ती नियमावली पुढीलप्रमाणे होती. ‘फायलीवर त्रोटक शेरा लिहिल्यावर ते काम करायचेच अशी मंत्र्यांची इच्छा असेल तर त्यांनी डावी भुवई उंचावून अधिकाऱ्याकडे बघायचे. उजवी भुवई उंचावली तर नंतर चर्चा करा असे मंत्र्यांना सुचवायचे असे अधिकाऱ्यांनी समजायचे. जे भुवई उंचावण्यात माहीर नाहीत अशांनी त्याच क्रमाने डावा किंवा उजवा हात डोक्यावरून फिरवायचा. कधी सवयीनुसार एखाद्या मंत्र्यांनी चुकून डाव्याऐवजी उजवा हात फिरवला व झालेली चूक त्यांच्या लक्षात आली नाही तर साहाय्यकाने त्यांच्या कानाला लागून चूक तात्काळ लक्षात आणून द्यावी. अधिकाऱ्यांनीसुद्धा ही घडामोड योग्य रीतीने टिपावी. ज्यांच्या डोक्यावर केस कमी आहेत अशांनी उजवा किंवा डावा हात गालावरून फिरवावा. काही मंत्री डावखुरेसुद्धा असू शकतात.
अशांनी डावा कशासाठी व उजवा कशासाठी हे ठरवून घ्यावे. त्यात बदल करण्याचा अधिकार त्यांना असेल. फक्त हा बदल अधिकाऱ्यांच्या लक्षात वेळीच आणून द्यावा. ज्यांना हे जमणारे नाही त्यांनी डाव्या किंवा उजव्या हाताची चुटकी वाजवली तरी चालेल. मात्र हे करताना अभ्यागतांना काही गैर वाटणार नाही याची काळजी घ्यावी. अनेक मंत्री हातात नॅपकिन ठेवतात. त्यांनी तो डाव्या अथवा उजव्या हाताने ओठावरून फिरवणेसुद्धा सांकेतिक म्हणून ओळखले जाईल. या सांकेतिक कृतीत करंगळी अथवा तर्जनीचा वापर करू नये. त्यातून गैरअर्थ ध्वनित होऊ शकतो.’ केवळ मंत्री व वरिष्ठ अधिकारी यांच्यापुरती मर्यादित असलेल्या या नियमावलीला नंतर १५ दिवसांत पाय फुटले. मग मंत्रालयात जाणाऱ्या प्रत्येकाच्या हाती ती दिसू लागली. अभ्यागत शेऱ्याऐवजी मंत्र्यांच्या हालचालीच न्याहाळू लागले. त्याची चर्चा होऊ लागली. त्रस्त झालेल्या मुख्यमंत्र्यांनी मग पुन्हा मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. त्यात काय निर्णय होतो ते तुम्हाला नंतर कळवूच.