डॉ. उज्ज्वला दळवी
विज्ञानवृत्तीमुळे, कारणं जाणून घेण्याच्या कुतूहलामुळे आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला ताजेपणाचा तडका मिळतो, तो कसा?
‘‘आपल्याला काचेतून पलीकडचं दिसतं; भिंतीतून का दिसत नाही?’’ कैवल्यच्या प्रश्नाला उत्तर म्हणून आईने त्याला एक धपाटा घातला, ‘‘नको तिथे डोकं घालतोस! अभ्यास झाला का? पारदर्शक, अपारदर्शक वस्तूंची नावं लिहून झाली?’’ हिरमुसलेल्या कैवल्यचं ‘खरं काय- का- कशावरून’ हे शोधणारं कुतूहल गुदमरलं. ‘दुकानातल्या वस्तू ग्राहकांना दिसाव्यात म्हणून काचेतून दिसतं आणि आपण नहाताना लोकांना दिसू नये म्हणून भिंतीतून दिसत नाही,’ असा बालसुलभ निष्कर्ष त्याने काढला.
तशा थातुरमातुर स्पष्टीकरणात समाधान मानायची त्याला हळूहळू सवयच लागली. त्या निष्कर्षांची, गैरसमजांची त्याच्या मनावर पुटं चढत गेली. मोठेपणी, घोकंपट्टी करून परीक्षा देत तो विज्ञानाचा प्राध्यापक झाला. मग त्या पुटांवर, ‘मी सांगतोय ना! तेच बरोबर आहे!’ असा अहंभावाचा लेप चढला. आपले समज हे गैरसमज असू शकतात; त्यांच्यातल्या चुका समजून घेतल्या; कबूल केल्या तर नवं, खरं शिकता येईल ही जाणीवच हरपली. जुन्या समजांना कवटाळून जगण्याला शिळेपणा, तोचतोचपणा आला.
हेही वाचा >>> समोरच्या बाकावरून : मोदींच्या या ‘जातीं’चं काय चाललंय?
लहानग्या कैवल्यच्या प्रत्येक प्रश्नाला त्याच्या आईने निदान उत्तर दिलं असतं तर त्याच्या मनातलं कुतूहल सतत जागं राहिलं असतं. मुलांच्या प्रश्नांची उत्तरं माहीत नसली तर शोधून द्यावी लागतात. कुतूहल आणि मेंदूचा शिकाऊपणा लहान वयात सर्वाधिक असतो. नव्या, भक्कम पुराव्याच्या आधाराने नवा दृष्टिकोन स्वीकारायचं बाळकडू लहानपणापासूनच पाजलं तर सत्यशोधक, वैज्ञानिक मनोवृत्ती तयार होते.
वैज्ञानिक मनोवृत्ती असणं म्हणजे डोक्यात ज्ञान ठासून भरणं किंवा संशोधन करणं नाही. ती विज्ञानापुरती मर्यादितही नसते. ‘‘फोडणीत जिरं का घमघमतं आणि जिरेपूड का करपते?’’ , ‘‘एक डाव तेल म्हणजे किती मिलिलिटर?’’ ही उत्तरं शोधायलाही वैज्ञानिक मनोवृत्ती, काही तरी नवं समजून घ्यायची जिज्ञासा लागते. ‘गोड खाल्ल्याने जंत होतात’ वगैरे काही पारंपरिक पूर्वग्रह मनात घट्ट बसलेले असतात. ते पुसून तिथे, ‘अस्वच्छपणे हाताळलेला कुठलाही खाऊ खाल्ल्याने जंत होऊ शकतात,’ अशी नवी-सत्य परिस्थिती स्थापायलाही विज्ञानवृत्ती लागते. तेवढयाने आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला ताजेपणाचा तडका मिळतो.
समाजमाध्यमांतल्या सनसनाटी संदेशांनी भारावून वाहवत न जाता, केवळ थोरामोठय़ांनी सांगितलं म्हणून विश्वास न ठेवता, सावध-साशंक राहाणं; पण प्रथमश्रवणी अशक्य वाटणाऱ्या विधानावरही ताशेरे न झोडता, प्रत्येक विधानासाठी पुरावे शोधणं; अतक्र्य वाटणाऱ्या नव्या विधानांची काटेकोरपणे परीक्षा घेणं; त्यांच्यासाठी भक्कम पुरावा मिळाला तर मात्र खुल्या मनाने, जुनं सोडून नवं स्वीकारणं हे वैज्ञानिक मनोवृत्तीचे भाग आहेत. त्याच्याही पुढे जाऊन कुतूहलाने सतत नवं ज्ञान शोधायची सवय; आपल्या जुन्या समजुती चुकीच्या होत्या हे प्रामाणिकपणे मान्य करून दुसऱ्याकडून नवं शिकायचा नम्रपणा; अद्याप माहीत नसलेल्याचाही पाठपुरावा करायची हिंमत, हेही त्याच विचारशैलीचे घटक आहेत.
तशी विज्ञानवृत्तीची वहिवाट उभ्या चढाची बिकट वाटच असते. विज्ञानात नवाकोरा शोध लागला, की संशोधक ताबडतोब त्याच्यातल्या उणिवा, चुका हुडकायला लागतात. शोधात चुका असल्याचा खात्रीलायक पुरावा मिळाला, की कालचा क्रांतिकारक सिद्धांत त्या कठोर निकषांच्या अग्नीत फिनिक्स पक्ष्यासारखी स्वत:ची आहुती देऊन नव्या संकल्पनांच्या पंखांना बळ देतो. डॉक्टरकीची, हजारो पानांची, बारीक छपाईची पाठयपुस्तकं दर तिसऱ्या वर्षी रद्दीत जातात.
‘पुराणमित्येव न साधु र्सव न चापि काव्यं नवमित्यवद्यम्। सन्त: परीक्ष्यान्यतरद्भजन्ते मूढ: परप्रत्ययनेयबुद्धि:॥’ असं कालिदास म्हणतो. पण मानवी मनाला स्थैर्य हवं असतं; परंपरा जपायच्या असतात. त्याला ‘क्षणे क्षणे नवतामुपैति’ असं विज्ञान रमणीय वाटत नाही. प्रस्थापितांना, राजकारण्यांना त्यांची मतं, भूमिका ऊठसूट बदलणं परवडत नाही. म्हणून त्यांना तर विज्ञानाचं वावडंच असतं. ‘पृथ्वी सूर्याभोवती फिरते,’ म्हणणाऱ्या गॅलिलिओला प्रस्थापितांनी जन्मठेपेची शिक्षा दिली.
तरीही सध्याचं जग विज्ञानाच्या पायावरच उभं आहे. आपल्या खेडेगावातसुद्धा विजेचे दिवे, विहिरीचे पंप, एसटीची बस अशा विज्ञानावर रोजचं जगणं अवलंबून असतं. विज्ञानाच्या प्रगतीच्या पाठीशी सरकारचा, पर्यायाने राजकारणाचा वरदहस्त लागतो. जेव्हा समाजाला, सरकारलाही तत्काळ फायदा होतो तेव्हा नव्या शोधांचा स्वीकार आणि प्रसार लवकर होतो. पोलिओच्या साथींनी गांजलेल्या समाजाने नव्या लशीचा शोध स्वीकारला. हरकाम्या मोबाइल हर कानाशी रुजू झाला. महायुद्धात अण्वस्त्रांची गरज होती म्हणून अणुशक्तीवर संशोधन झालं. मातब्बर कंपन्यांच्या नफ्यासाठी नवीन औषधपद्धती, शेतकी तंत्रं शोधली गेली.
सरकारच्या निर्णयांची दिशा राजकारणी धोरणांनुसार बदलू शकते. लोकशाही राज्यांत तिच्यावर जनतेचा वचक असतो. अणुशक्ती, कृत्रिम बुद्धिमत्ता, पर्यायी इंधनं वगैरेंसाठी होणाऱ्या संशोधनावर जनतेचं सजग नियंत्रण हवं. म्हणून जनतेला वैज्ञानिक मनोवृत्ती असणं अत्यावश्यक आहे. ‘वैज्ञानिक मनोवृत्तीची जोपासना करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे,’ असं भारताची घटना सांगते. गोरगरिबांपर्यंत विज्ञानवृत्ती पोहोचवण्यासाठी भारत सरकारने १९५२ पासून बरेच प्रयत्न केले. त्यासाठी ‘विज्ञान-प्रगती’, ‘विज्ञानवृत्ती’ वगैरे मासिकं काढली. पण त्यांचा परिणाम फार मर्यादित राहिला.
भारतीय जनता अजूनही समाजमाध्यमांवरच्या सनसनाटी बातांना भुलते; कॅन्सरवर उपाय म्हणून अंगारेधुपारे, जडीबुटी वापरते; कोविड-लस घ्यायला कचरते. अभिनेत्याची पद्मश्री गाजते; पण पद्मविभूषण ठरलेल्या विज्ञान संशोधकाला त्याच्या गल्लीतही कुणी ओळखत नाही. शांततेचा नोबेलविजेता सर्वश्रुत होतो पण भौतिकशास्त्राचा नोबेलविजेता मात्र गूगलवर शोधावा लागतो.
विज्ञानवृत्ती रुजवायची चळवळ घराघरांत घुसायला हवी असेल तर विज्ञानप्रसार जनतेच्या भाषेत, रंजक पद्धतीने व्हायला हवा. त्यासाठी ‘कौन बनेगा’मध्ये विज्ञानविषयक प्रश्न हवेत. टीव्हीवरच्या रोजच्या बातम्यांत, वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर एक-दोन तरी नव्या संशोधनांच्या नवलकथा असाव्यात. चॅट-जीपीटी, जनुकशास्त्र, पर्यायी इंधनं वगैरेंवर लोकप्रिय मासिकांचे विशेषांक, किमान पुरवण्या तरी याव्यात. टीव्हीवरच्या मालिकांतला थरार माजघरातल्या कारस्थानांऐवजी अंतराळातल्या आव्हानांतून यावा; खुन्याचा गळा त्याच्या केसाच्या डीएनएने कापावा; भयकथेला वाढत्या जागतिक तापमानाची धग पोहोचावी; खऱ्या विज्ञानाचा लोकरंजनासाठी चित्तथरारक वापर व्हावा.
आजारांविषयीचे अभ्यासवर्ग
त्याच्याही पुढे जाऊन प्रत्येक माणसाच्या मनात विज्ञानवृत्ती फुलवायला हवी. प्रत्येक निष्कर्ष काढताना ‘खरं काय? कशावरून?’ हे शोधलं तर विचारांचा पाया भक्कम होईल; पूर्वग्रह निस्तरून खरी माहिती स्वीकारता येईल. तशा पायामजबुतीची सवय स्वत:च लावून घ्यायची असते. त्यासाठी शिकवणी वर्ग नसतात. तरीही मदत देता येईल. रोटरी-लायन्स-क्लब, इतर स्वयंसेवी संस्था लोकांच्या आरोग्यासाठी मोठं काम करतात. त्या संस्थांच्या कार्यकर्त्यांनी विज्ञान चळवळीला हातभार लावावा.
‘भुकेल्याला मासा देऊ नका; त्याला मासेमारी शिकवा,’ अशी चिनी म्हण आहे. भुकेलेलाच ‘पोट’तिडिकीने मासेमारी शिकतो. लोकांच्या तात्कालिक निकडीपासूनच शिक्षणाला सुरुवात केली तर त्यांची जिज्ञासा सहज जागी होते. काही देशांत सरकारी रुग्णालयांमध्ये सर्वसामान्य रुग्णांसाठी त्यांच्याच आजारांविषयीचे अभ्यासवर्ग असतात. तसे आपल्याकडे सुरू करावेत. छळवादी आजारांशी सामना कसा करावा; रोजच्या ताणतणावांचे परिणाम कसे टाळावेत; म्हातारपणीही हातीपायी करतंसवरतं कसं राहावं याविषयीचं शिक्षण अधिकृत संस्थांनी वृत्तपत्रं, मासिकं, टीव्ही, समाजमाध्यमं या सगळय़ांतून द्यावं. त्यासाठी नटनटया, प्रसिद्ध वक्ते, पुढारी वगैरेंची मदत घेतली तर ती चळवळ गरीब, अशिक्षित, वंचितांपर्यंतही पोहोचेल. प्रत्येक भारतीयाचा, पूर्वग्रहांच्या, अज्ञानाच्या, भयाच्या धुक्यातून आरपार बघणारा विज्ञानदृष्टीचा तृतीय नेत्र उघडेल. नव्या सत्यशोधक नजरेमुळे आर्थिक व्यवहारांपासून वैज्ञानिक शेतीपर्यंतची त्याची समज वाढेल.
विज्ञानवृत्तीचा तृतीय नेत्र आदिमानवालाही होता. म्हणून तर विस्तवाचा-चाकाचा शोध लागला. प्रत्येक भारतीयाची मनोवृत्ती डोळस झाली तर भारतभूमी विज्ञानसजग-निरामया-स्वर्गभूमी होईल.
००००
आरोग्याची काळजी घ्यायला शरीराची माहिती असायला हवी. आतापर्यंत आजार हे पडद्यावर दिसणारं नाटक आणि त्यामागच्या शरीरातल्या घडामोडी या पडद्याआडच्या हालचाली होत्या. आता रसायनशास्त्रातल्या-प्रतिमातंत्रांतल्या प्रगतीमुळे त्या पडद्याआडच्या गोष्टी उघड होताहेत. आजार कशामुळे होतो, हे समजलं की तो टाळायचे नवे मार्ग सुचतात. त्यासाठी जीवनशैलीतल्या साध्यासोप्या सुधारणा गरजेच्या असतात.
ते साधे-सोपे उपाय वाचकांपर्यंत पोहोचवायचा, ते उपाय जीवनशैलीत रुळवायला वैज्ञानिक दृष्टिकोन द्यायचाही प्रयत्न या लेखमालेने केला. त्या लेखांतली माहितीही कालपरत्वे शिळी होणार. त्याचं भान बाळगून सुजाण वाचकांनी सतत नवलाईचा शोध घेतला तर ही मालिका सत्कारणी लागेल.
लेखिका वैद्यकीय व्यवसायातून निवृत्त आहेत.
ujjwalahd9@gmail.com