राजेश बोबडे
मनुष्याच्या आत्मस्थितीच्या सुधारणेचा मार्ग विशद करताना राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात, गुरूंच्या अनुभव सांगण्याच्या पद्धतीतही फरक असतो. पोथी वाचण्याची पद्धत ही वाचाळता समजावी. ते केवळ शब्दज्ञान आहे पण घेतलेला अनुभवसुद्धा दोन प्रकारांनी सांगता येतो. एक जण कलात्मक पद्धतीने सजवून सांगेल तर दुसरा हृदयाच्या तळमळीने ओबडधोबड भाषेत निवेदन करेल. पण परिणामाच्या दृष्टीने दुसरा श्रेष्ठ ठरतो. कलेचा संबंध हृदयापेक्षा बाह्य ठाकठिकीशी असतो. पण भावना हृदयातल्या तळमळीशिवाय साकारच होऊ शकत नाही. एका दृष्टांताने हे सहज समजेल. बहुरूपी आपल्या कलात्मकतेने व हावभावाने एखाद्या दु:खी जीवाचे सोंग आणतो पण तो बहुरूपी आहे हे माहीत असल्यामुळे म्हणजेच त्याचे रडणे खोटे आहे याची मनाला जाणीव असल्यामुळे पाहणाऱ्याच्या अंत:करणात दु:खाच्या भावना जागृत होत नाहीत.उलट एखादा दु:खी मनुष्य रडताना पाहिला की आपले अंत:करण द्रवते. कारण या दृश्यांत कृत्रिमता नसते. केवळ स्वाभाविकता असते. तसेच आपणा सर्वाचे आहे.
ज्याला अंत:करणापासून समाजाच्या प्रगतीची हाव असेल, आपल्याला गवसलेल्या लाभांचा उपयोग आपल्या भोवतीच्या समाजाला व्हावा अशी अंतप्रेरणा असेल, तो आपले अनुभव हृदयाच्या तळमळीने निवेदन करीत राहील आणि जनमनावर त्याचा चांगला परिणामही दिसून येईल. असा मनुष्य जंगलात असला, पहाडात असला किंवा गिरिकंदरात असला तरीही तो स्वत:भोवती लोकसमुदाय निर्माण करेल. अशा वृत्तीचा माणूस हाच खरा माणूस होय. त्याला जगातील दु:ख नजरेने बघवत नाही. म्हणून या दु:ख निवारणाचा मार्ग तो लोकांना अत्यंत तळमळीने सांगत राहतो.
दुसरा कलावंत वृत्तीचा माणूस आपले अनुभव कलेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करेल. पण त्या सांगण्यात शब्दावडंबरच अधिक प्रमाणात राहील. या सांगण्यात साहित्यिक मूल्ये जरूर राहतील. मोहकताही खूप असेल. पण त्यातून लोकांना खरे मार्गदर्शन होणार नाही. या कलावंताला लोकांच्या विकासापेक्षा आपल्या कलेचे अधिक महत्त्व असते. श्रीमंतांच्या तळमळीतून ज्याप्रमाणे भोवतीचा समाज श्रीमंत न होता दरिद्रीच राहतो त्याप्रमाणे अशा कलावंताच्या अनुभवाचेही होते. ते अनुभव ऐकायला-वाचायला गोड वाटले तरीसुद्धा परिणामाच्या दृष्टीने ते शून्य ठरतात. कारण त्यातील सारा आशय, अनुभवातील सर्व जिवंतपणा शब्दांच्या अवडंबराखाली लोपून जातो.
rajesh772@gmail.com