राज्यातील शहरांचा आकार वाढत असताना त्या तुलनेत नागरी सुविधा पुरविण्यात महानगरपालिका कमी पडत असल्याची सार्वत्रिक तक्रार केली जाते. राज्यात २०११च्या जनगणनेनुसार ४५ टक्के नागरीकरण झाले होते. त्यानंतरचा गगनचुंबी झपाटा लक्षात घेता गेल्या दशकभरात ६० टक्क्यांच्या आसपास भागाचे नागरीकरण झाल्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र त्या तुलनेत पायाभूत सुविधा पुरविण्यात स्थानिक स्वराज्य संस्था कमी पडताहेत. मुंबई, पुणे वा ठाण्यासारख्या मोठ्या महानगरपालिकांमध्ये रस्ते, पायाभूत सुविधांची कामे करण्यासाठी किमान निधी उपलब्ध असतो. छोट्या महानगरपालिकांची तर बोंबच असते. नगरपालिकांची अवस्था आणखी वाईट. शहरांचा कारभार बघण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती अशी त्रिस्तरीय रचना आहे. महानगरपालिका आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्या पाहिजेत, असा नेहमीचा सूर असतो. पण सध्या सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था परावलंबी झाल्या आहेत. वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यापासून जकात कर, स्थानिक स्वराज्य संस्था कर असा महानगरपालिकांचा हक्काचा आर्थिक स्राोत बंद झाला. जकातीमुळे पालिकांकडे रोख जमा होत असे. जकात वा अन्य कर बंद झाल्याबद्दल राज्य शासनाकडून मिळणाऱ्या नुकसानभरपाईवर महापालिका व नगरपालिकांचा कारभार सुरू आहे. मालमत्ता कर वसुलीवर सारी मदार; पण ती करणार किती? मुंबई, ठाणे, पुणे अशा मोठ्या शहरांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणांवर सुरू असलेल्या बांधकामांमुळे पालिकांच्या तिजोरीत भर पडत आहे. इमारतींच्या बांधकामाकरिता विकासकांना पालिकांना विकास नियोजन शुल्क (प्रीमियम) भरावे लागते. मुंबई महानगरपालिकेने चालू आर्थिक वर्षात ५८०० कोटींचे उद्दिष्ट ठेवले होते, पण डिसेंबरअखेर- म्हणजे एक तिमाही आधीच- त्यापेक्षा जास्त रक्कम जमा झाली. परिणामी, पुढील आर्थिक वर्षात १० हजार कोटींच्या आसपास निधी इमारतींच्या बांधकामांतून जमा होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिका ही देशातील श्रीमंत महानगरपालिका. पण इथेही राज्य शासनाकडून मिळणारी सुमारे १४ हजार कोटींची नुकसानभरपाईची रक्कम महत्त्वाची ठरते.

मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, नागपूर या मोठ्या महानगरपालिकांमध्येही पैसे उभे करायचे कुठून, असा प्रश्न भेडसावत आहे. दोनच दिवसांपूर्वी ठाणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करताना आयुक्त व प्रशासक सौरभ राव यांनी शासनाकडून ६०० कोटींचा निधी अपेक्षित धरला आहे. ठाण्याचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी असताना शासनाकडून ठाणे महानगरपालिकेला एक हजार कोटींचा निधी देण्यात आला होता. शासनाकडून मिळालेल्या निधीमुळे प्रशासन पैसे खर्च करीत गेले. पण त्याच वेळी मालमत्ता कर किंवा अन्य वसुलीकडे दुर्लक्ष झाले. या वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नाही. पुढील आर्थिक वर्षात शासनाकडून ६१२ कोटी रुपये मिळतील या आशेवर पालिका प्रशासन आहे. तेव्हा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते यामुळे पालिकेची चलती होती. आता शिंदे उपमुख्यमंत्री व नगरविकासमंत्री असले तरी निधी देताना त्यांच्यावरही बंधने येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार हे प्रामुख्याने नागपूर वा पुणे, पिंपरी-चिंचवड या आपल्या प्रभाव क्षेत्राला प्राधान्य देताना ठाण्याला पूर्वीसारखा भरभरून निधी मिळण्याबाबत साशंकताच. एकीकडे कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पुरेसा पैसा नसताना दुसरीकडे, ठाणे महानगरपालिकेच्या ३२ मजली मुख्यालयासाठी ७०० कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. ऐपत नसताना ३२ मजली मुख्यालयाचा घाट, हा निव्वळ नागरिकांकडून कररूपाने जमा होणाऱ्या निधीचा अपव्ययच मानावा लागेल. पुणे काय किंवा सोलापूर, सर्वच महानगरपालिकांचे राज्य शासनाकडे विविध मदतीचे पैसे थकले आहेत. पुणे महानगरपालिकेचे तीन हजार कोटींपेक्षा अधिक थकले आहेत.

मुळात राज्य शासनाचीच आर्थिक अवस्था फार काही चांगली नाही. शासनाला स्वत:चा गाडा हाकताना तारेवरची कसरत करावी लागते. अशा वेळी महानगरपालिकांना पैसे देणार कुठून हा प्रश्न आहेच. वाढते नागरीकरण लक्षात घेता छोट्या शहरांच्या मूलभूत गरजा तसेच नागरी सुविधा पुरविण्याकरिता राज्य शासनाकडे जमा होणाऱ्या महसुलातून ४० टक्क्यांच्या आसपास रक्कम नगरपालिकांना द्यावी, अशी शिफारस राज्य वित्त आयोगाने केली होती. परंतु प्रत्यक्षात २० ते २२ टक्केच रक्कम शासनाकडून हस्तांतरित होते, अशी वित्त आयोगाचीच आकडेवारी. यातील बहुतांशी रक्कम ही कर्मचाऱ्यांच्या वेतनावरच खर्च होते. मग शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी पैसे येणार कुठून? उत्पन्नाचे स्राोत आटलेले, राज्य शासनावर अवलंबून राहावे तर शासनाची आर्थिक परिस्थिती फार काही चांगली नसणे अशा दुष्टचक्रात राज्यातील महानगरपालिका अडकल्या आहेत, तोवर शहरांचे रडगाणे हे असेच सुरू राहणार.

Story img Loader