आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारताने रविवारी न्यूझीलंडला हरवून या स्पर्धेचे अजिंक्यपद विक्रमी तिसऱ्यांदा पटकावले. ५० षटकांच्या पुरुष विश्वचषक स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलियाचा दबदबा असला, तरी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेमध्ये भारताचे प्रगतिपुस्तक त्या देशापेक्षा सरस ठरते. २०१३ पासून सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघ धडकला. २०१३ मध्ये आपण अजिंक्य ठरलो, २०१७ मध्ये अंतिम लढतीत पाकिस्तानशी हरलो. यंदा न्यूझीलंडचे कडवे आव्हान मोडून काढत आपण बाजी मारली. अशा रीतीने २००२, २०१३ आणि २०२५ अशा तीन स्पर्धांमध्ये भारताने अजिंक्यपद मिळवले. ऑस्ट्रेलियाला आजवर ही स्पर्धा दोनदाच जिंकता आली. सहसा तो संघ मैदानावर सातत्यपूर्ण कामगिरीचे उच्च मानदंड निर्माण करतो असे मानले जाते. या पार्श्वभूमीवर भारताच्या कामगिरीला दाद द्यावी लागेल. कारण कमालीचे सातत्य आपणही दाखवत आहोतच. कसोटी अजिंक्यपद, एकदिवसीय विश्वचषक, टी-ट्वेण्टी विश्वचषक आणि आता चॅम्पियन्स करंडक अशा सलग चार आयसीसी स्पर्धांच्या अंतिम फेरीत धडक. दोहोंत अजिंक्यपद आणि दोहोंमध्ये उपविजेतेपद. विश्वचषकातील पराभव, मध्यंतरी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकांमध्ये दारुण पराभव, नवनियुक्त प्रशिक्षक गौतम गंभीरने केलेली वादग्रस्त विधाने, त्याच्या नियुक्तीस असलेली वादग्रस्त राजकीय किनार या सगळ्या पार्श्वभूमीवर कर्णधार रोहित शर्मा, तसेच विक्रमवीर फलंदाज विराट कोहली यांच्या वर्तमान आणि भविष्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात होते. पण क्रिकेटच्या बाबतीत एक वैश्विक चिरंतन सत्य म्हणजे, आपल्याविषयीच्या किन्तु-परंतुला मैदानावरील कामगिरीनेच चपखल उत्तर द्यायचे असते. गतवर्षी टी-ट्वेण्टी विश्वचषक आणि आता चॅम्पियन्स करंडक अशा दोन अजिंक्यपदांच्या माध्यमातून तसे उत्तर रोहित शर्माने दिले आहेच.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा