इस्रायल-हमास संघर्षांमुळे एकूणच पश्चिम आशियातील परिस्थिती स्फोटक बनल्याच्या पार्श्वभूमीवर, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची इराणभेट महत्त्वाची ठरते. या भेटीची मीमांसा करण्याआधी काही घडामोडींची नोंद आवश्यक ठरते. जयशंकर तेहरानमध्ये होते त्या काळातच इराणने सीरिया, इराक आणि मुख्य म्हणजे पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतामध्ये थेट क्षेपणास्त्र हल्ले केले. सात ऑक्टोबर रोजी गाझा संघर्ष सुरू झाल्यानंतर इराणच्या भूमीवरून अशा प्रकारचे हल्ले प्रथमच झाले आहेत. या हल्ल्यांमागची कारणे बहुधा वेगवेगळी होती. इराकमधील एरबिल शहरात केलेल्या हल्ल्यांचे एक लक्ष्य इस्रायली गुप्तचर यंत्रणा मोसादचे मुख्यालय होते.
हेही वाचा >>> संविधानभान : गांधीवादी संविधान..
सीरियातील हल्ल्यांचे लक्ष्य आयसिसचे तळ होते. आयसिस किंवा इस्लामिक स्टेटने काही दिवसांपूर्वी इराणच्या केरमन शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली होती. पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतामध्ये ‘अल अदल’ या दहशतवादी संघटनेच्या तळावर इराणकडून क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले झाले. याची गंभीर दखल पाकिस्तानने घेतली आहे. या हल्ल्यांमुळे पश्चिम आशियातील परिस्थिती चिघळू शकते. कारण इराणने स्वत:हून हल्ले करून मोठीच जोखीम पत्करलेली दिसते. एरवी हुती, हमास, हेझबोला अशा संघटनांच्या माध्यमातून पश्चिम आशियात इस्रायलपासून सौदी अरेबियापर्यंत अनेक देशांच्या कुरापती काढण्यामागे इराणचा हात असल्याचे बोलले जातेच. आता थेट हल्ले केल्यामुळे अप्रत्यक्षपणा आणि अदृश्यतेचा फायदा इराणला मिळणार नाही. इस्रायल-हमास संघर्षांची व्याप्ती वाढेल असा अंदाज सुरुवातीला व्यक्त करण्यात आला होता. परंतु बहुतेक सर्व अरब देशांनी समंजस आणि नेमस्त भूमिका घेतल्यामुळे ही भीती बरीचशी फोल ठरली. परंतु इस्रायलच्या विरोधात आणि पॅलेस्टाइन-हमासच्या समर्थनार्थ येमेनस्थित हुथी बंडखोरांनी लाल समुद्रातील जहाजांना लक्ष्य केल्यामुळे मूळ संघर्षांची व्याप्ती भलतीकडेच सरकली. हुथी बंडखोरांना इराणकडून नैतिक, शस्त्रास्त्रे आणि बहुधा आर्थिक पाठबळ मिळते.
लाल समुद्रातील हुथी हल्ल्यांचे जगभर पडसाद उमटतात, याचे कारण भूमध्य समुद्रातून सुएझ कालव्यामार्गे लाल समुद्र व एडनच्या आखातातून अरबी समुद्र ते हिंद महासागर असा एक अत्यंत व्यग्र असा जलमार्ग आहे. या मार्गे व्यापारवस्तू, धान्य, इंधने, भाजीपाला अशा अनेक जीवनावश्यक वस्तूंची जलवाहतूक होत असते. परवा अमेरिका आणि ब्रिटनने संयुक्तपणे येमेनमधील काही हुथी तळांवर हल्ले केले. या हल्ल्यांनी ईप्सित परिणाम साधलेला दिसत नाही. कारण अगदी मंगळवारीच हुथींकडून अमेरिकी नौदल नौकांवर लाल समुद्रात प्रतिहल्ले झाले. गाझातून इस्रायल माघार घेत नाही तोवर हल्ले करत राहणार ही हुथींची भूमिका. ती इराणचीही भूमिका आहे. त्यामुळे संघर्षांची झळ भारतालाही बसू लागली आहे. जयशंकर यांच्या इराण दौऱ्याला यामुळे महत्त्व होते.
हेही वाचा >>> उलटा चष्मा : होऊ द्या १४० चे २८० कोटी!
हुथी हल्ले अगदी थेट अरबी समुद्रातही होऊ लागल्यामुळे याविषयी भारताने इराणकडे रास्त चिंता व्यक्त केली. चाबहार बंदराच्या कामात अधिक तत्परता हवी आणि गाझा प्रश्नी भारताने अधिक सक्रिय भूमिका घेताना इस्रायलशी बोलावे अशी इच्छा जयशंकर यांच्यापाशी इराणचे अध्यक्ष इब्राहीम रईसी यांनी व्यक्त केल्याच्या बातम्या प्रसृत झाल्या. याचा अर्थ भारत आणि इराण हे आजही एकमेकांना जुन्या मित्रांसारखे भेटत असले, तरी दोहोंच्या परस्परांकडून अपेक्षा भिन्न आहेत आणि कदाचित त्या पूर्ण होण्यासारख्याही नाहीत. कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाचा भारत पूर्वीही निषेध करत आला आणि भविष्यातही करणार हे जयशंकर यांनी समर्थपणे मांडले, ते बरे झाले. पण हमास आणि हुथी करतात तो सरकारबाह्य दहशतवाद ठरतो, तर इस्रायल आणि इराण आचरतात तो सरकारपुरस्कृत दहशतवाद ठरतो हे या दोन्ही देशांना आपण सांगू शकतो का? इराणने प्रथमच पाकिस्तानलाही लक्ष्य केले आहे. पाकिस्तान पुरस्कृत आणि पोषित दहशतवादाची झळ इतर कोणत्याही देशापेक्षा भारताला बसलेली आहे. तरीही इराणच्या या कृतीचे समर्थन करणे आपल्याला अडचणीचे ठरेल. कारण स्वत: अनेकदा दहशतवादी हल्ल्यांचा बळी ठरूनही, कुरापतखोरीची इराणची खोड शमलेली नाही. या देशाशी चाबहार बंदर आणि मर्यादित प्रमाणात इंधन आयात यापलीकडे संबंध ठेवणे आपल्याला दिवसेंदिवस जडच जाईल. ही कसरत आपण किती दिवस करणार, हा प्रश्न आहे.