जगभर सध्या सशस्त्र संघर्षांचे जे टापू निर्माण झाले आहेत, त्यात युक्रेन-रशिया सीमेबरोबरच इस्रायल-गाझा टापूचाही उल्लेख करावा लागेल. परंतु युक्रेन-रशिया संघर्षांची व्याप्ती वाढण्याची इतक्यात तरी शक्यता नाही. इस्रायल-गाझा संघर्षांबाबत मात्र तसे म्हणता येत नाही. या संघर्षांमध्ये इस्रायलच्या बाजूने आणि हमास-पॅलेस्टाइनच्या बाजूने काही सत्ता खेचल्या जाण्याची शक्यता होतीच. अजून तरी आजूबाजूच्या देशांनी या संघर्षांत थेट उडी घेतलेली नाही. मात्र हमाससारख्याच काही संघटनांनी विशेषत: इस्रायलविरोधात छुपे वा प्रकट हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. इस्रायलच्या उत्तरेकडे असलेल्या लेबनॉनमध्ये स्थित हेझबोला संघटनेकडून हमासच्या समर्थनार्थ इस्रायलच्या विरोधात हल्ले केले जातील, असा अंदाज होता. पण हेझबोलाने अजून तरी फारशा कुरापती काढलेल्या नाहीत. मात्र एका वेगळयाच संघटनेकडून आणि पूर्णपणे वेगळया दिशेकडून हमासच्या समर्थनार्थ इस्रायलविरोधी हल्ले सुरू झाले आहेत. या हल्ल्यांचा रोख लाल समुद्रातील इस्रायली आणि इस्रायलमित्र देशांच्या व्यापारी जहाजांकडे आहे. छोटया तीव्रतेची क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या माध्यमातून सुरू झालेले हे हल्ले येमेनस्थित हुथी बंडखोरांकडून होत आहेत. ७ ऑक्टोबर रोजी हमासच्या हल्ल्यानंतर गाझा संघर्ष सुरू झाला. त्यानंतर लगेचच म्हणजे १९ ऑक्टोबर रोजी लाल समुद्रात संचार करणाऱ्या यूएसएस कार्नी या अमेरिकी विनाशिकेवर चार क्षेपणास्त्रे डागली गेली आणि १५ ड्रोन हल्ले झाले. हुथींकडून आलेल्या या क्षेपणास्त्रांचा अमेरिकी विनाशिकेने सहज लक्ष्यभेद केला. पण सागरी व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत मोक्याच्या असलेल्या या टापूमध्ये मालवाहू व्यापारी जहाजे आणि तेलवाहू जहाजांच्या सुरक्षेचा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> उलटा चष्मा : ऐक सूनबाई..

याचे कारण अमेरिका आणि तिच्या मित्रदेशांच्या नौदल नौका स्वत:चा बचाव करून घेण्यासाठी पुरेशा सक्षम आहेत. परंतु व्यापारी जहाजे आणि मालवाहू टँकरना अशा प्रकारे सुसज्ज सुरक्षा व्यवस्था बाळगता येईलच असे नाही. लाल समुद्रातील वाहतूक अतिशय महत्त्वाची आहे. कारण भूमध्य समुद्रातून सुएझ कालव्यामार्गे लाल समुद्र व एडनच्या आखातातून अरबी समुद्र ते हिंद महासागर असा हा विस्तीर्ण आणि व्यापारीदृष्टया मोक्याचा जलमार्ग आहे. हुथी बंडखोरांना इराणचे शस्त्रास्त्रे आणि संपत्तीच्या माध्यमातून भक्कम पाठबळ आहे. सौदी अरेबियाविरुद्ध येमेनमध्ये वरचष्मा गाजवण्यासाठी इराणने हुथींना सुसज्ज केले. यातून सौदी अरेबियाचा अप्रत्यक्ष पराभव झाला, तरी हुथी शिरजोर बनले. आता तर ते इराणलाही जुमानत नाहीत. पश्चिम आशिया अस्थिर आणि अस्वस्थ करण्यामागे इराणची वर्चस्वाकांक्षा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. इस्रायल आणि अमेरिका या कट्टर शत्रूंविरोधात थेट इस्रायली भूमीवर न लढता, वेगळयाच टापूमध्ये त्यांच्यावर कुरघोडी करण्याची ही खोड जागतिक व्यापार आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने मात्र तापदायी ठरू लागलेली आहे.

हेही वाचा >>> चिंतनधारा : मृत्यूचे दु:ख अज्ञानमूलक

या झळकक्षेत भारतही येऊ लागला आहे. कारण हुथींचे हल्ले अरबी समुद्रात म्हणजे भारताच्या वेशीवर येऊन ठेपले आहेत. इस्रायलमध्ये नोंदणी झालेल्या एमव्ही केम प्लुटो या रसायनवाहू जहाजावर गुजरातपासून २०० नॉटिकल मैलांवर (३७० किलोमीटर) हल्ला करण्यात आला. लाल समुद्रातून मोठया प्रमाणात तेलाची वाहतूकही होते. या तेलवाहू जहाज कंपन्यांनी आता वाहतुकीवर अतिरिक्त जोखीममूल्य आकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर दोन ते पाच टक्क्यांनी वधारले आहेत. भारताला सध्या रशियाकडून प्राधान्याने तेलपुरवठा होतो आणि रशिया-इराण संबंध सुरळीत असल्यामुळे या तेलवाहू जहाजांना अद्याप हुथींनी लक्ष्य केलेले नाही. मात्र धान्य, रसायने, खनिजे, खते घेऊन येणाऱ्या जहाजांवर अशी मेहेरनजर होईलच असे नाही. लाल समुद्रातील या अनपेक्षित हल्ल्यांचा ‘लाल बावटा’ जागतिक व्यापार पुन्हा एकदा संकोचण्यास कारणीभूत ठरू लागला आहे. भारतासारख्या प्रगतशील अर्थव्यवस्थेसाठी हे चांगले लक्षण नाही. लाल समुद्र टाळून दक्षिण आफ्रिकेच्या ‘केप ऑफ गुड होप’ भूशिराला वळसा घालून मालवाहतूक करणे अतिशय खर्चीक आहे. तेव्हा इस्रायल-हमास संघर्ष थांबणे किंवा अमेरिकेच्या पुढाकाराने तथाकथित ‘ऑपरेशन प्रॉस्परिटी गार्डियन’ ही सागरी संरक्षण योजना तातडीने कार्यान्वित होण्याची प्रतीक्षा करणे एवढेच आपल्या हातात राहते. येमेनच्या भूमीवर हुथी तळ उद्ध्वस्त करून ही समस्या मुळापासून उखडून काढणे अमेरिकेच्या दृष्टीने अतिशय जोखिमीचे ठरेल. शिवाय टापूमध्ये आणखी एका मुस्लीम देशाविरुद्ध लष्करी कारवाई करणे अमेरिकेला राजकीय दृष्टयाही सोयीचे नाही. येत्या काही दिवसांत त्यामुळेच हमासपेक्षा हुथींची समस्या अधिक तापदायी ठरणार आहे.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India ships attacks in the red sea crisis in the red sea india bound ships attacked in the red sea zws