अग्नी-५ या क्षेपणास्त्राची मूळ चाचणी डिसेंबर २०२२ मध्येच घेण्यात आली होती. परवा या क्षेपणास्त्राच्या ‘एमआयआरव्ही’ तंत्रज्ञान आधारित अवताराची चाचणी यशस्वी ठरली. भारतीय संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रासाठी हा दिवस विशेष कौतुकास्पद ठरतो आणि समस्त भारतीयांसाठी अभिमानास्पदही. याचे कारण ‘शांततामय सहजीवन’ या भारताच्या परराष्ट्र आणि सामरिक धारणेलाच तडे जातील अशा घटना गेल्या काही वर्षांत घडलेल्या आहेत. पुंड देशांकडून जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीला, जगातील सर्वाधिक लोकशाहीवादी खंडाला धोका निर्माण झाला आहे. शांततेत जगण्यासाठी युद्धसज्ज असावे लागते असे सामरिक अभ्यासक्रमात सातत्याने बजावले जाते. हे युद्धसज्ज असणे म्हणजे काय, ते अग्नी-५ एमआयआरव्ही क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीने दाखवून दिले. सामरिक अभ्यासक्रमाचे आणखी एक तत्त्व असते. अधिग्रहित शस्त्रसज्जतेचा फायदा म्हणजे बऱ्याचदा शस्त्रे वापरण्याची वेळच येत नाही. याउलट, दुर्लक्षातून उद्भवलेल्या कमकुवतपणाचा तोटा म्हणजे तुमचा शत्रू दु:साहसी बनू शकतो! त्यामुळेच ‘मिनिमम डिटरन्स’ अर्थात पुरेशी जरब य संकल्पनेला कोणत्याही देशाच्या सामरिक धोरणात विशेष महत्त्व प्राप्त होते. अण्वस्त्रसज्जता, क्षेपणास्त्रसिद्धता, अंतराळ युद्धसज्जता या माध्यमातून आपण शत्रूसाठी पुरेशी जरब निर्माण करत असतो. भारताचे परराष्ट्र धोरण नेहमीच शांतताकेंद्री राहिले, तरीही तीन युद्धे (१९६२, १९६५, १९७१) आणि दोन लढाया (१९४८, १९९९) आपल्यावर लादल्या गेल्याच. जगात इतर कोणत्याही भूभागापेक्षा भारत हा सर्वाधिक असुरक्षित म्हणवता येईल, अशा टापूमध्ये वसलेला आहे. वायव्य, उत्तरेकडे पाकिस्तान आणि उत्तर व ईशान्येकडे चीन या दोन अण्वस्त्रसज्ज देशांनी भारताच्या सीमा ग्राह्य मानलेल्या नाहीत. भारताच्या सार्वभौमत्वाला सतत आव्हान देणे हे या दोन्ही देशांचे प्रधान धोरण राहिलेले आहे. अशा परिस्थितीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित शस्त्रास्त्रांनी सज्ज राहणे ही आपली केवळ गरज नसून, तो अस्तित्वाचाही प्रश्न ठरतो.
हेही वाचा >>> चतु:सूत्र : संविधानातील ‘लापता लेडीज’
अग्नी-५ च्या चाचणीकडे या दृष्टिकोनातून पाहावे लागेल. त्यासाठी प्रथम संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) अभिनंदन करावे लागेल. ओडिशाच्या किनाऱ्याजवळ ए. पी. जे. अब्दुल कलाम बेटावरून ही यशस्वी चाचणी घेण्यात आली, हेदेखील योग्यच. भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम हे या देशाच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे प्रणेते. अग्नी, पृथ्वी, आकाश, नाग अशी विविध क्षेपणास्त्रे विकसित करण्याच्या गुंतागुंतीच्या आणि आव्हानात्मक मोहिमेत द्रष्टेपणा आणि नेतृत्व अशा दोन्ही आघाड्यांवर कलाम यांचे योगदान बहुमोल ठरते. देशांतर्गत शस्त्रास्त्रनिर्मितीबाबत डीआरडीओचे प्रगती पुस्तक फार आश्वासक आणि आशादायी नाही. अर्जुन रणगाडे, तेजस लढाऊ विमाने, ध्रुव हेलिकॉप्टर यांच्या निर्मितीसाठी लागलेल्या विलंबाचे खापर सर्वस्वी या संस्थेच्या माथी फोडणे कदाचित अन्याय्य ठरेल. परंतु या विलंबामुळे देशातील सैन्यदल उच्चपदस्थांचा देशी बनावटीच्या शस्त्रसामग्रीवरील विश्वास उडाला होता, हे अमान्य करता येत नाही. या निराशाजनक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाच्या यशाची झळाळी विलक्षण उठून दिसते. अग्नी-५ ला एमआयआरव्ही तंत्रज्ञानाचा साज चढवून डीआरडीओने क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा वापर तसा दुर्मीळ आणि उद्दिष्टही मर्यादित. एकल लक्ष्याचा विविध स्फोटकाग्रांनी विध्वंस करणे हे ते पारंपरिक उद्दिष्ट. परंतु एमआयआरव्ही तंत्रज्ञानामुळे एकाच वेळी अनेक लक्ष्यांचा वेध घेता येईल. त्यामुळे शत्रुदेशाकडे क्षेपणास्त्र बचाव प्रणाली असली, तरी ती कुचकामी ठरेल. हे तंत्रज्ञान अर्थातच अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन आणि फ्रान्स या देशांकडेही आहे. पाकिस्तान आणि इस्रायलने ते आत्मसात केल्याची चर्चा आहे. मोठे आणि प्रमुख देश शस्त्रसामग्रीच्या संख्यात्मक वाढीपेक्षा गुणात्मक वाढीवर लक्ष केंद्रित करू लागले आहेत. यातून उपग्रहविरोधी अस्त्रे, हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे, एमआयआरव्ही आधारित आंतरखंडीय क्षेपणास्त्रे विकसित होऊ लागली आहेत. या स्पर्धेत भारत विलंबाने उतरला असला, तरी मागे पडलेला नाही ही बाब सुखावणारी ठरते. लवकरच अशा प्रकारची आत्मनिर्भरता लढाऊ विमाने आणि युद्धनौकांच्या निर्मितीमध्येही दिसावी ही अपेक्षा. महासत्ता होण्याचा एक मार्ग स्वावलंबित्वाच्या माध्यमातून जातो. अग्नी-५ कार्यक्रमाची झेप ही या परिप्रेक्ष्यात आश्वासक आणि अभिमानास्पद ठरते.