सुरेश सावंत
राज्यघटनेच्या अनुच्छेद १ मध्ये इंग्रजीत ‘इंडिया, दॅट इज भारत, शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स’ असे म्हटले आहे. इंडिया आणि भारत हा असा दोन्ही नावांचा गोंधळ करण्यापेक्षा केवळ भारत हेच नाव का नाही आपण स्वीकारले, हा प्रश्न जुना आहे. संविधान सभेत यावर वाद झडले आहेत.
गतवर्षी सप्टेंबर महिन्यात राष्ट्रपतींनी जी – २० परिषदेच्या स्नेहभोजनासाठी पाठवलेल्या एका निमंत्रणात ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ हा नेहमीचा प्रघात मोडून ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख केल्याने वादाला तोंड फुटले होते. त्याआधीच झालेल्या विरोधकांच्या आघाडीने आपले नाव ‘इंडिया’ असे जाहीर केल्याने सत्ताधारी भाजपने हे जाणीवपूर्वक केले, असा विरोधकांचा आरोप होता. त्याला प्रत्युत्तर देताना भाजपच्या काही नेत्यांनी म्हटले, ‘‘इंडिया हे परदेशी लोकांनी दिलेले नाव असून भारत हे या देशाच्या प्राचीन सांस्कृतिक परंपरेतले नाव आहे.’’ त्यावर विरोधकांचा प्रतिप्रश्न होता- ‘‘आतापर्यंत तुम्हीच ‘इंडिया शायनिंग’, ‘डिजिटल इंडिया’, ‘स्टार्टअप इंडिया’, ‘न्यू इंडिया’ असे शब्दप्रयोग जोरात प्रचारले आहेत, मग आताच ‘इंडिया’ शब्दाबद्दल तुम्हाला तिटकारा कसा वाटू लागला?’’
या वादाने सामान्य माणसांच्या मनात मात्र गोंधळ तयार झाला. देशाचे योग्य नाव काय? झ्र इंडिया की भारत, यावर वर्तमानपत्रे तसेच अन्य माध्यमांतून बरेच लिहिले गेले तरी अजूनही अनेकांच्या मनात याबद्दल प्रश्न आहेत. याचे सरळ उत्तर ‘दोन्ही’ असे आहे. ‘कोणी गोविंद घ्या-कोणी गोपाळ घ्या’ या धर्तीवर कोणी भारत म्हणा, कोणी इंडिया म्हणा. ही दोन्ही आपल्या देशाची घटनेत नोंदवलेली अधिकृत नावे आहेत.
हेही वाचा >>> अन्वयार्थ: घरचा आहेर…
आपल्या राज्यघटनेच्या अनुच्छेद १ मध्ये इंग्रजीत ‘इंडिया, दॅट इज भारत, शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स’ असे म्हटले आहे. घटनेच्या मराठी अनुवादात ‘इंडिया, अर्थात भारत, हा राज्यांचा संघ असेल’ तर हिंदी अनुवादात ‘भारत, अर्थात इंडिया, राज्यों का संघ होगा’ असे म्हटले आहे. इंग्रजी व मराठीत ‘इंडिया’ शब्द प्रथम; तर हिंदीत ‘भारत’ प्रथम आहे. भारतीय पासपोर्टवर ‘भारत गणराज्य’ आणि ‘रिपब्लिक ऑफ इंडिया’ असे अनुक्रमे देवनागरी व रोमन लिपीत लिहिले जाते. सर्वसाधारणपणे इंग्रजीत ‘इंडिया’ आणि अन्य भारतीय भाषांत ‘भारत’ असे लिहिण्याचा प्रघात आहे. पण इंडिया आणि भारत हा असा दोन्ही नावांचा गोंधळ करण्यापेक्षा केवळ भारत हेच नाव का नाही आपण स्वीकारले, हा प्रश्न जुना आहे. संविधान सभेत यावर वाद झडले. त्यानंतर ही दोन्ही नावे स्वीकृत झाली.
इंग्रजांच्या अमलाखाली आपला देश असताना देशांतर्गत तसेच एकूण जगाशी होणाऱ्या व्यवहारात ‘इंडिया’ हेच नाव प्रचलित होते. स्वातंत्र्याच्या चळवळीत इंडिया, हिंदुस्थान, भारत ही तीन नावे सार्वत्रिक होती. तथापि प्रशासकीय व आंतरराष्ट्रीय राजनैतिक संबंधांतल्या सोयीसाठी इंग्रजांनी प्रचलित केलेले इंडिया हेच नाव आपण प्रथम स्वीकारले. जवाहरलाल नेहरू यांनी ९ ऑगस्ट १९४६ रोजी संविधान सभेच्या अगदी प्रारंभी जो उद्दिष्टांचा ठराव मांडला त्यात देशासाठीचे संबोधन केवळ ‘इंडिया’ असे होते. १ ऑक्टोबर १९४७ ला संविधान सभेचे सल्लागार बी. एन. राव यांनी सादर केलेल्या संविधानाच्या प्राथमिक मसुद्यातही फक्त ‘इंडिया’ होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील मसुदा समितीने ४ नोव्हेंबर १९४८ ला संविधान सभेत सादर केलेल्या संविधानाच्या मसुद्यातही देशाचे नाव ‘इंडिया’ एवढेच होते. घटनेशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या अशा या तिन्ही दस्तावेजांत ‘भारत’ हे नाव आलेले नव्हते. डॉ. आंबेडकरांनी सादर केलेल्या मसुद्यात आपल्या देशाचे ‘मूळ नाव’ का नाही याबद्दल काही सदस्यांनी आक्षेप नोंदवले. या मुद्द्यावर चर्चा मात्र साडेदहा महिन्यांनी झाली. १७ सप्टेंबर १९४९ रोजी आपल्या मसुद्याच्या अनुच्छेद १ मध्ये दुरुस्ती करणारा प्रस्ताव डॉ. आंबेडकरांनी संविधान समितीत मांडला. ‘इंडिया शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट्स’ ऐवजी ‘इंडिया, दॅट इज, भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट्स’ असा हा दुरुस्ती प्रस्ताव होता. या दुरुस्तीत इंडियासह भारत शब्दाचा प्रथमच संविधानात समावेश झाला.
या दुरुस्तीवर १८ सप्टेंबर १९४९ रोजी चर्चा झाली. या चर्चेत आलेल्या सूचना ‘भारत’ हा शब्द प्रमुख करण्याबाबत होत्या. ‘इंडिया म्हणजेच भारत’ याऐवजी ‘भारत, जो इंडिया नावाने ओळखला जातो’ असा शब्दप्रयोग करण्याची सूचना एच. व्ही. कामत यांनी केली. त्यांची दुसरी पर्यायी सूचना होती – ‘हिंदी अथवा इंग्रजी भाषेत इंडिया’ असा शब्दप्रयोग करावा. सेठ गोविंद दास यांनी ‘भारत, जो बाहेरच्या देशांत इंडिया नावानेही ओळखला जातो’ असे लिहिण्याची सूचना केली. इंडिया हा शब्द आपल्या प्राचीन ग्रंथांत आढळत नाही. तो ग्रीकांच्या आगमनानंतर आला. त्यांनी आपल्या सिंधू नदीला इंड्स म्हटले व या इंड्सवरून इंडिया आला. वेद, उपनिषदे, पुराणे, ब्राह्मणे, महाभारत या प्राचीन वाङ्मयांत भारताचे उल्लेख आढळतात, ह्यु एन त्संग या चिनी प्रवाशाच्या प्रवासवर्णनातही भारताचा उल्लेख आढळतो, असा त्यांचा युक्तिवाद होता. स्वातंत्र्यलढ्यातील आपली घोषणा ‘भारतमाता की जय’ होती याचेही स्मरण दास यांनी सभागृहाला करून दिले. भारत शब्दाच्या समर्थनार्थ प्राचीन संदर्भ देण्यात, त्याच्या व्युत्पत्ती विशद करण्यात अनेक सदस्यांचा पुढाकार होता. कला वेंकट राव यांनी संस्कृत ‘सिंध’चे प्राकृतात स चा उच्चार ह होत असल्याने ‘हिंद’ झाल्याची नोंद दिली. (अभ्यासक मात्र इराणच्या पर्शियन भाषेत स चा उच्चार ह होत असल्याने त्यांनी सिंधचे हिंद केले व त्यावरूनच पुढे हिंदुस्थान हे आपल्या देशाचे नाव पडले, असे नमूद करतात.) भारत, हिंदुस्थान, हिंद, भारतभूमी, भारतवर्ष अशा अनेक नावांचे उल्लेख यावेळी संविधान सभेतील चर्चांत झालेले आढळतात. गोविंद वल्लभ पंत यांनी आपण आपल्या धार्मिक श्लोकांत जंबू द्वीप, भारत वर्ष, भारत खंड, आर्यावर्त आदी नावांनी देशाला संबोधत असतो याचे स्मरण दिले. दुष्यंत-शकुंतलेचा शूर पुत्र भरत आणि त्याच्या राज्याला भारत म्हटले गेल्याचा दाखलाही पंत देतात.
कमलापती त्रिपाठी कामत यांना पाठिंबा देताना म्हणतात झ्र ‘‘जर ‘दॅट इज’ शब्द आवश्यक असतील तर ‘भारत, दॅट इज, इंडिया’ असे नोंदवणे अधिक योग्य राहील.’’ ते पुढे म्हणतात – ‘‘एक हजार वर्षांच्या गुलामगिरीत आपल्या देशाने आपले सर्वस्व गमावले. आम्ही आमची संस्कृती गमावली, आम्ही आमचा इतिहास गमावला, आम्ही आमची प्रतिष्ठा गमावली, आम्ही आमची माणुसकी गमावली, आम्ही आमचा स्वाभिमान गमावला, आम्ही आमचा आत्मा गमावला… आज एक हजार वर्षे गुलामगिरीत राहिल्यानंतर, हा स्वतंत्र देश पुन्हा त्याचे नाव प्राप्त करेल… तो खरोखरच जगात त्याची प्रतिष्ठा परत मिळवेल.’’
ही हजारो वर्षांची गुलामी काही इंग्रजांची नाही. पण स्वातंत्र्य लढ्यात देशाचे स्वत्व जागवताना सांस्कृतिक राष्ट्रवादाखाली हे सगळे एका सुरात म्हटले जाई. त्याचाच हा संविधान सभेतील नमुना होता.
इथे आणखी एक लक्षात घ्यायला हवे. भारत हा शब्द प्राचीन आहेच. पण हिंदुस्थान किंवा इंडिया हे काही कमी प्राचीन नाहीत. इंडिया हे नाव काही इंग्रजांनी आल्यावर दिलेले नाही. संविधान सभेतील सदस्यांनीच नोंदवल्याप्रमाणे इंडिया नावाच्या उत्पत्तीचे नाते ग्रीकांशी आहे. ते भारतात आले तो काही आधुनिक काळ नव्हता. वेदांपेक्षा कमी प्राचीन असे म्हणू. इ. स. पूर्व चौथ्या शतकाच्या आसपास ग्रीक भारतात आले. हा मौर्यांचा काळ आहे. इंडो-ग्रीक संस्कृतीच्या देवाण-घेवाणीचा हा काळ आहे. ज्याला भारतीय संस्कृती असे आपण आज म्हणतो व जिची प्रचीती चित्र, शिल्प, तत्त्वज्ञान यांतून येते ते सगळे या संकराचे फलित आहे. ग्रीकांमार्फत या देशाचे इंडिया हे संबोधन युरोपात पसरले. पुढे आधुनिक काळात भारतात आलेल्या इंग्रजांनीही तेच नाव गृहीत धरले. अधिक प्रचलित केले.
डॉ. आंबेडकरांनी मांडलेल्या अनुच्छेद १ मधील दुरुस्तीवर आलेल्या सर्व सूचना व आक्षेप अखेर फेटाळण्यात आले आणि ती दुरुस्ती मंजूर करण्यात आली. ‘इंडिया अर्थात भारत’ या शब्दावलीतून ‘इंडिया’ व ‘भारत’ ही दोन्ही नावे अधिकृत झाली.
संविधानाच्या प्रसार-प्रचार चळवळीतील कार्यकर्ते
sawant.suresh@gmail.com