‘तब्बल १३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ट्वेन्टी-२० जगज्जेतेपद… ’ हा उल्लेख भारतीय क्रिकेट संघाविषयी वारंवार केला जात आहे, कारण क्रिकेटच्या इवल्याशा विश्वात क्रिकेटच्या बाबतीत सर्वांत श्रीमंत आणि सर्वाधिक संसाधनसमृद्ध अशा या देशाला जागतिक विजेतेपद मिळवण्यासाठी इतकी प्रतीक्षा करावी लागणे अपेक्षित नव्हते. पण निव्वळ पैशाने मैदानावरील कामगिरी घडवून आणता येत नाही. भारतीय संघाच्या बाबतीत मुद्दा प्रत्येक स्पर्धेतील चांगल्या कामगिरीचा नव्हता; तर मोक्याच्या सामन्यांमध्ये गळपटण्याचा होता. गेल्या दोन एकदिवसीय विश्वचषक स्पर्धांमध्ये (२०१९, २०२४) साखळी स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करूनही अनुक्रमे उपान्त्य आणि अंतिम सामन्यांमध्ये भारतीय संघ निस्तेज ठरला होता. तीच गत ट्वेन्टी-२० प्रकाराची. या प्रकारात जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट स्पर्धा अर्थात आयपीएल भारतात खेळवली जाते. पण २००७मध्ये पहिल्या-वहिल्या ट्वेन्टी-२० जगज्जेतेपदानंतर भारताची झोळी रितीच राहिली होती. तरी आयपीएल मात्र जोरात, जोशात सुरू होती. या काळात कधी अंतिम सामन्यात, कधी उपान्त्य सामन्यात पराभूत होण्याची मालिका सुरूच राहिली. काही वर्षांपूर्वी कसोटी विश्वचषक स्पर्धा सुरू झाली. तीत तर दोन वेळा अंतिम फेरीपर्यंत धडकून चषकाने हुलकावणी दिली. या अशा अनेक हुकलेल्या विजयक्षणांमुळे हुरहूर, संशय, नैराश्य वर्षानुवर्षे साचून राहिले होते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने शनिवारी या साचलेल्या भावनांचा प्रथम निचरा केला आणि विश्वविजयाच्या अत्यंत सुखद, जल्लोषपूर्ण भावनांना लाखो भारतीय क्रिकेटप्रेमींच्या मनोविश्वात लोटले. भारतीय वेळेनुसार शनिवारी मध्यरात्री भारताच्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० जगज्जेतेपदावर शिक्कामोर्तब केले आणि उर्वरित रात्र भारतभर उत्साहात, उत्सवात जागवली गेली. विजयाची वस्तुनिष्ठ चिकित्सा करताना या नैराश्यकोंडव्याची आणि उत्साहसांडव्याची दखल घ्यावीच लागते.
हेही वाचा >>> व्यक्तिवेध : फ्रँक डकवर्थ
अंतिम सामन्यात विजय अत्यंत खडतर होता. त्यामुळेच त्याची खुमारी अधिक. एक तर समोर दक्षिण आफ्रिका होता, जो जगज्जेतेपदासाठी भारताइतकाच तृषार्त होता. भारताची अंतिम सामन्यापर्यंतची मजल झोकात होती. परंतु मोक्याच्या सामन्यात सुरुवातीपासूनच सारे काही बिघडू लागले. कर्णधार रोहित शर्मा चटकन बाद झाला, बाकीचेही बाद होत गेले. निश्चल उभा राहिला विराट कोहली- ज्याची त्या टप्प्यापर्यंत स्पर्धेतली कामगिरी अतिशय सुमार ठरली होती. भारताच्या दोन्ही फिरकी गोलंदाजांकडून अपेक्षा होती, पण तेच महागडे ठरले. शेवटच्या काही षटकांमध्ये तर विजयावर दक्षिण आफ्रिकेने शिक्कामोर्तब केलेच होते. अशा कसोटीच्या क्षणीच खेळ उंचावण्यासाठी असीम मनोधैर्य लागते, जे जसप्रीत बुमराने पुरवले. एखादी असामान्य क्षणैक कामगिरी लागते, जी सूर्यकुमार यादवने करून दाखवली. निग्रही एकाग्रता लागते, जी हार्दिक पंड्याने दाखवली. आणि या सगळ्यांस नियंत्रित करणारे, लक्ष्यापासून ढळू न देणारे अविचल नेतृत्व लागते, जे रोहित शर्माने दाखवले. राहुल द्रविड हे या सामन्याबरोबर प्रशिक्षकपदावरून निवृत्त झाले. त्यांच्या निष्ठेसाठी यापेक्षा अधिक चांगली निरोपभेट ठरली नसती. रोहित, विराट आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० प्रकारातून निवृत्त होत आहेत. भारतीय क्रिकेट पुन्हा एकदा संक्रमणावस्थेत आहे. सचिननंतर कोण याचे उत्तर महेंद्रसिंग धोनीने दिले. धोनीनंतर विराट होता, विराटनंतर रोहित होता. आता आणखी कुणी येईल. या स्पर्धेच्या संयोजनावर बरीच टीका झाली. सामने भारतीय संघाच्या सोयीने खेळवले गेले, असे अनेकांनी बोलून दाखवले. आयसीसी केवळ भारतीय पैशाबरहुकूम वागते नि वळते, ही टीका तर सातत्याने होत असते. या शेवटच्या मुद्द्याची दखल घेण्याची गरज आहे. परंतु भारतीय संघासाठी अनुकूल परिस्थिती ठरवली गेली वगैरे आरोप तद्दन फिजूल आहेत. या आरोपांना भारतीय संघाने मैदानावर खेळून खणखणीत उत्तर दिले, हे योग्यच. अंतिम सामन्याची खेळपट्टी म्हटल्यास भारतापेक्षा दक्षिण आफ्रिकेस अधिक अनुकूल होती. शिवाय माजी विजेते ऑस्ट्रेलिया व गतविजेते इंग्लंड यांना एकतर्फी हरवून नि पाकिस्तानला प्रतिकूल परिस्थितीतून अस्मान दाखवून, भारतीय संघाने गुणवैविध्य आणि स्थिरचित्त वृत्ती दाखवून दिली. तेरा वर्षांच्या दुष्काळानंतर मिळालेल्या जगज्जेतेपदाचे म्हणूनच कवित्व. कारण या खेळाडूंच्या क्षमतेविषयी आणि निष्ठेविषयी प्रश्न उपस्थित केले गेले. त्यांचे सुयोग्य, सर्वमान्य उत्तर त्यांनी विश्वचषक जिंकून दिले.