डॉ. श्रीरंजन आवटे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संविधान निर्मिती पूर्ण होत आली तेव्हा छपाई मोठ्या प्रमाणात होत होती, मात्र पं. नेहरू यांना संविधान हस्तलिखित स्वरूपात हवे होते. त्यांची सौंदर्यदृष्टी अनोखी होती. हाताने लिहिलेल्या मजकुरात त्यांना एक ऊब जाणवत असे, त्यामुळे सुलेखन (कॅलिग्राफी) करणाऱ्या व्यक्तीच्या ते शोधात होते. नेहरूंना प्रेम बिहारी नारायण रायजादा या सुलेखनकाराची माहिती देण्यात आली. त्यानुसार प्रेम बिहारी नारायण रायजादा यांना संविधान लिहिण्याचे काम देण्यात आले.

प्रेम बिहारींचे आजोबा हे सुलेखनात निष्णात होते. त्यांच्याकडूनच ही कला प्रेम बिहारी शिकले होते. दिल्लीतल्या सेंट स्टीफन्स महाविद्यालयात पदवी पूर्ण करून रायजादा सुलेखन करू लागले होते. त्यांनी सहा महिने प्रचंड कष्ट घेऊन हाताने संविधान लिहिले. ३०३ क्रमांकाची निब वापरून हे लेखन केले. सुमारे ४०० हून अधिक निब्सचा उपयोग करून रायजादा यांनी ही कलाकुसर केली. त्यांचे हे काम अतिशय नाजूक आणि कलात्मक असल्याने ज्या कागदावर लिहायचे त्या कागदाची प्रतही दर्जेदार असणे आवश्यक होते. त्यामुळे पुण्यातील ‘हॅन्डमेड पेपर इन्स्टिट्यूट’ या संस्थेकडून कागद मागवण्यात आला. या संस्थेचे विशेष असे की ही संस्था स्वातंत्र्य चळवळीत आणि विशेषतः स्वदेशी चळवळीत सक्रिय होती. महात्मा गांधींशी तर या संस्थेचे अतिशय निकटचे संबंध होते. त्यामुळे या संस्थेकडून ९०- १०० जीएसएम प्रकारचा कागद मागवण्यात आला आणि त्या कागदाचा वापर करून रायजादा यांनी इटालियन शैलीत सुलेखन केले. स्वातंत्र्य आंदोलनाशी नाळ जोडलेल्या संस्थेचा कागद असणे हेदेखील किती प्रतीकात्मक!

हेही वाचा >>> अन्वयार्थ : ब्राझीलचा ‘उठावखोर’ गोत्यात!

संविधानाचे हस्तलिखित ही अगदी नजाकतीने केलेली कलाकुसर होती. ब्योहर राममनोहर सिन्हा यांनी या हस्तलिखिताची सुंदर सजावट केली होती तर नंदलाल बोस यांनी काढलेली सुरेख चित्रं संविधानात होती आणि संविधानाच्या मुखपृष्ठाला सोनेरी वर्ख होता. आजही ही हस्तलिखिताची प्रत संसदेच्या ग्रंथालयात हेलियम भरलेल्या चौकटीत जतन केलेली आहे.

नेहरूंनी संविधान सुलेखनाचे काम रायजादा यांना सोपवतानाच या कामाचे आपण किती पैसे घ्याल, अशी विचारणा केली होती. त्यावर प्रेम बिहारी यांनी दिलेले उत्तर थक्क करणारे होते. ते म्हणाले की या सुलेखन कामाबद्दल मी एकही दमडी घेणार नाही फक्त माझी एक अट आहे की मी माझे नाव प्रत्येक पानावर लिहीन. प्रेम बिहारी रायजादा यांना संविधान लिहीत असल्याचं ऐतिहासिक मोल माहीत होतं. त्यामुळेच त्यांनी अशी अट घातली. नेहरूंनी ती आनंदाने मान्य केली. संविधानाच्या प्रत्येक पानाच्या तळाशी लिहिलं आहे- प्रेम! त्यामुळे संविधानाच्या पानापानावर शब्दशः प्रेम आहे!

हेही वाचा >>> संविधानभान : आम्ही भारताचे लोक!

रवीश कुमार यांच्या ‘इश्क में शहर होना’ या पुस्तकात अनेक लप्रेक आहेत. लप्रेक म्हणजे लघु प्रेम कथा. यातील एका लप्रेकच्या बाजूला बाबासाहेबांच्या हातात संविधान आहे, असे चित्र आहे. त्याकडे हात करून कथेतला प्रियकर प्रेयसीला म्हणतो, ‘देखना यहीं किताब हमे हमेशा के लिए मिला देगी.’ ही जादू या पुस्तकात आहे. संविधान हा प्रेमाची बाराखडी कायद्याच्या भाषेत सांगणारा ग्रंथ आहे. साने गुरुजींची जगाला प्रेम अर्पण करण्यासाठीची प्रार्थनाच तर संविधानात आहे. प्रियकर प्रेयसीपासून ते समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत सर्वांना संविधानामध्ये आशा दिसते, कारण ये मोहब्बत की दास्तां है!

poetshriranjan@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian calligrapher prem behari narain raizada who has written constitution of india zws zws
Show comments