‘रेटिंग किंवा रँकिंगविषयी मी फार विचार करत नाही. पहिल्या पाचात वगैरे आहे, याचेही मला फार काही वाटत नाही…’ अर्जुन एरिगेसीचे हे शब्द बहुधा त्याच्या ‘जेन झी’ पिढीची मानसिकता दर्शवतात. तरीदेखील इतक्या किरकोळ शब्दांत त्याच्या अलीकडच्या कामगिरीचे मूल्यांकन करताच येणार नाही. कारण ती दुर्मीळ आहे नि ऐतिहासिकही. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटनेने (फिडे) डिसेंबर २०२४साठीची गुणांकन यादी जाहीर केली असून, त्यात २८०१ एलो गुणांसह अर्जुन जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आहे. २८०१ हा आकडा अत्यंत महत्त्वाचा. कारण पारंपरिक बुद्धिबळ प्रकारात आजही २८०० हे अत्युच्च हिमशिखर मानले जाते आणि अर्जुनच्या आधी १४ जणांनाच ते सर करता आले. आता अर्जुन १५वा. त्या १४ जणांमध्ये अर्थातच एक नाव होते विश्वनाथन आनंद याचे. त्याच्यानंतर २८०० गुणांवर पोहोचलेला अर्जुन केवळ दुसरा भारतीय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्याचा भारताचा सर्वाधिक वलयांकित बुद्धिबळपटू डी. गुकेश बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीमध्ये व्यग्र आहे. तर विश्वनाथन आनंदने भारतीय बुद्धिबळाला जागतिक पटावर खणखणीत ओळख प्राप्त करून दिली. जगातील सर्वांत युवा ग्रँडमास्टरांपैकी एक असलेला आर. प्रज्ञानंद हादेखील गेली काही वर्षे जगभर लक्ष वेधून घेत आहे, परंतु अशी कोणतीही पार्श्वभूमी किंवा वलय नसलेला अर्जुन शांतपणे तरीही सातत्याने खेळ उंचावत आहे. गेल्या वर्षभरात त्याच्या गुणांकनात ९० अंकांची भर पडली. अर्जुनला अजूनही बड्या स्पर्धांची निमंत्रणे फारशी येत नव्हती. त्यामुळे तो खुल्या स्पर्धेत खेळतो. या स्पर्धांमध्ये कमी गुणांकन असलेल्या बुद्धिबळपटूंशी अनेकदा गाठ पडते. त्यांच्याशी बरोबरी किंवा हार पत्करावी लागल्यास गुणांचे नुकसान होते. पण अर्जुनने हा जोखमीचा मार्गच पत्करला आणि थक्क करणारी झेप घेतली. त्याच्या या बेधडक शैलीमुळे मॅग्नस कार्लसनसारखा विख्यात बुद्धिबळपटू त्याचे वर्णन ‘मॅड मॅन’ या शब्दांत करतो. ‘अर्जुन केवळ जिंकण्यासाठीच खेळतो. प्रत्येक वेळी तुमचा पाडाव करण्यासाठी त्याचा तल्लख मेंदू काम करत असतो..’ हे कार्लसनचे शब्द अर्जुनसाठी पावतीच ठरतात.

हेही वाचा : संविधानभान : संविधानसभेत काश्मीरचा मुद्दा

निर्विकार चेहऱ्याने अर्जुन खेळत असतो, पण त्याच्या खेळी म्हणजे पटावरचे वादळच असते. यंदा हंगेरीत बुडापेस्ट येथे झालेल्या ऑलिम्पियाडमध्ये अर्जुनने सुवर्णपदक जिंकले आणि भारताच्या सांघिक सुवर्णपदकासाठी मोलाचे योगदान दिले. गुकेश, प्रज्ञानंद, अर्जुन या त्रिकुटामध्ये अर्जुन सर्वांत मोठा. पण इतर दोघांच्या मानाने उशिरा प्रसिद्धी मिळूनही आता अर्जुन जागतिक क्रमवारीत त्यांच्या पुढे सरकला आहे. भविष्यात तोही जगज्जेता होईल, याविषयी सध्या कुणाचेच दुमत नाही.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian chess grandmaster arjun erigaisi loksatta article css