डॉ. श्रीरंजन आवटे 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टागोरांनी पंचम जॉर्जकरिता गाणे लिहिले अशी ‘फेक न्यूज’ पसरवण्याचा प्रकार ब्रिटिश माध्यमांनी जाणीवपूर्वक केला असे दिसते…

‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत सर्वत्र म्हटले जाते, मात्र त्या अनुषंगाने भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. हे गीत रवींद्रनाथ टागोरांनी पंचम जॉर्ज यांना अभिवादन करण्यासाठी लिहिले, असा गैरसमज पसरवला जातो. वस्तुस्थिती काय आहे? काँग्रेसच्या १९११ च्या अधिवेशनात ‘जन गण मन’ हे टागोरांनी लिहिलेले गीत सादर झाले. याच दिवशी रामानुज चौधरी यांनी लिहिलेले एक गाणेही सादर केले गेले. चौधरींचे गाणे पंचम जॉर्जला धन्यवाद देण्यासाठी लिहिले होते. पंचम जॉर्जला धन्यवाद देण्याचे कारणही विशेष होते. ब्रिटिशांनी १९०५ साली बंगालची फाळणी केली. धार्मिक विखार निर्माण करण्याचा ब्रिटिशांचा प्रयत्न होता. स्वदेशी चळवळीने त्याला कडाडून विरोध केला आणि अखेरीस १९११ ला फाळणी रद्द करावी लागली. या निर्णयाबद्दल धन्यवाद देण्यासाठी चौधरी यांनी गाणे लिहिले होते. मात्र टागोरांनीच पंचम जॉर्जकरिता गाणे लिहिले असे ब्रिटिश माध्यमांनी जाणीवपूर्वक लिहिले. माध्यमांना हाताशी धरून ‘फेक न्यूज’ पसरवण्याचा प्रकार ब्रिटिशही करत होते, हे यातून लक्षात येते.

हेही वाचा >>> संविधानभान : ‘झंडा ऊंचा रहे हमारा’

टागोरांना याविषयी कालांतराने समजले तेव्हा अतिशय संतापून त्यांनी पत्रात लिहिले की ‘अधिनायक’ हा शब्द ‘मानवतेचा भाग्यविधाता’ (डिस्पेन्सर ऑफ ह्युमॅनिटी) या अर्थाने लिहिला असून कुणी पंचम किंवा सहावा जॉर्ज हा काही मानवतेचा दाता नाही. इतिहासकार सौतिक विश्वास यांनी १९३७ सालच्या टागोरांच्या या पत्राचा दाखला दिला आहे. या सर्व तपशिलांमधून हे स्पष्ट होते की, टागोरांनी हे गाणे भारताच्या सांस्कृतिक बहुलतेचे अभिवादन करण्यासाठी लिहिले होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे ‘राष्ट्रगीत’ म्हणून हे गीत स्वीकारले. महात्मा गांधी म्हणाले की, या गीताने भारताने राष्ट्रीय जीवनात विशेष स्थान मिळवले आहे.

हेही वाचा >>> व्यक्तिवेध : रिकेन यामामोटो

टागोरांनी हे ‘भारतो भाग्यो बिधाता’ या शीर्षकाचे बंगाली भाषेत गाणे लिहिले. या गाण्यातील पहिले कडवे आपण गातो. याचा अर्थ असा की, मानवतेच्या भाग्यविधात्या पंजाब, सिंध, गुजरात असा सर्व प्रदेश तुझ्या जयघोषाने जागृत होतो. विंध्य आणि हिमालयाच्या पर्वतरांगांत तुझे यशोगान ऐकू येते आणि संगीत निनादते गंगा यमुनेच्या प्रवाहात. मानवतेचे गाणे गाणारे ही गीत आहे. याचे ‘शुभ सुख चैन की बरखा बरसे’ असे उर्दूमध्ये भाषांतर केले कॅप्टन अबिद अली यांनी. नंतर इतर भाषांमध्येही हे गाणे पोहोचले. राष्ट्रगीताविषयी संविधानसभेत चर्चा आधी सुरू झाली, मात्र देशाने अधिकृतरीत्या २४ जानेवारी १९५० रोजी ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत आणि बंकिमचंद्र चटर्जी लिखित ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रगान म्हणून स्वीकारले. राजेंद्र प्रसादांनी हा ठराव मांडला आणि सदस्यांनी त्याला अनुमोदन दिले. गंमत म्हणजे टागोरांनी केवळ भारताचेच राष्ट्रगीत लिहिले नाही तर बांगलादेशचे राष्ट्रगीतही टागोरांनीच लिहिले आहे. योगायोग असा की, १९०५ ला बंगालची फाळणी झाली तेव्हा ‘आमार शोनार बांगला’ हे गाणे त्यांनी बंगाल अखंड राहावा म्हणून लिहिले. पुढे भारताची फाळणी झाली. पाकिस्तानची फाळणी झाली आणि बांगलादेशची निर्मिती झाली, पण टागोरांचे गाणे टिकून राहिले. अगदी श्रीलंकेचे राष्ट्रगीतही टागोरांच्या प्रभावातून जन्माला आले. एखाद्या राष्ट्रासाठीचे गीत गाताना दुसऱ्या राष्ट्राला शत्रू मानण्याची किंवा कमी लेखण्याची गरज नसते. टागोर मानवमुक्तीचे गाणे गात होते. त्यामुळेच भारत, बांगलादेश असो की श्रीलंका, मानवाच्या प्रगतीचे, प्रेमाचे आणि अभिमानाचे ते गीत सांगत होते. आज या मानवमुक्तीच्या गाण्याचा अर्थ कळाला तर राष्ट्र समजून घेता येते, माणूस आकळतो आणि साकल्याचा प्रदेश दिसू लागतो.

poetshriranjan@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian constitution british media spread fake news rabindranath tagore wrote national anthem jana gana mana for king george zws