डॉ. श्रीरंजन आवटे
“बद्र, तुमच्याकडे कलात्मक दृष्टी आहे. कृपया लवकरात लवकर ध्वज आणि राजमुद्रा यांचे अंतिम रूप ठरवा.” पं. नेहरू बद्रूद्दीन फैज तय्यबजी यांना म्हणाले. स्वातंत्र्य मिळायला अवघे दोन महिने बाकी होते. बद्रूद्दीन तय्यबजी हे सनदी अधिकारी होते. नेहरूंना त्यांच्या व्यक्तिमत्त्वातला कलात्मक आयाम ठाऊक होता. तय्यबजींनी नेहरूंच्या विनंतीनुसार ध्वज समिती स्थापन केली आणि राजेंद्र प्रसाद त्या समितीचे अध्यक्ष झाले. या समितीने भारतातल्या विविध कला प्रशाळांना आणि महाविद्यालयांना राजमुद्रा आणि ध्वजाकरता रचना पाठवण्याची विनंती करणारी पत्रे पाठवली. मुदत संपत आली मात्र काही विशेष रचना या समितीला मिळाल्या नाहीत.
ब्रिटिशांची निशाणी असलेले चिन्ह संविधान सभेतील कोणालाच नको होते. अगदी शेवटच्या क्षणी बद्रूद्दीन तय्यबजी आणि त्यांच्या पत्नी सुरैय्या तय्यबजी यांनी अशोकचक्र हे राजमुद्रा म्हणून स्वीकारता येऊ शकते, असा प्रस्ताव मांडला. साऱ्यांनाच हा प्रस्ताव आवडला कारण भारताची ती बहुसांस्कृतिक ओळख होती. सुरैय्या तय्यबजी या उत्तम कलाकार होत्या. पिंगाली वैंकय्या यांनी तयार केलेल्या ध्वजरचनेचे संपादनही सुरैय्या यांनीच केले होते. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी नेहरूंच्या कारवर फडकणारा तिरंगा स्वतः सुरैय्या यांनीच तयार केलेला होता. राजमुद्रेचे हे चिन्ह आवडल्यानंतर सुरैय्या यांनी अतिशय नजाकतीने राजमुद्रेची रचना निर्धारित केली.
हेही वाचा >>> संविधानभान : शुभ सुख चैन की बरखा बरसे..
ही राजमुद्रा सम्राट अशोकाच्या सारनाथ येथील स्तंभावरून घेण्यात आली आहे. या राजमुद्रेवर चार सिंह आहेत. हे चार सिंह एकमेकांकडे पाठ करून चहू बाजूंना पहात आहेत. हे चार सिंह सत्ता, धैर्य, अभिमान आणि आत्मविश्वासाचे निदर्शक आहेत. त्याच्या खाली डावीकडे आहे धावणारा घोडा आणि उजवीकडे आहे बैल. यांच्या मधोमध आहे अशोकचक्र. हे प्राणी बुद्धाच्या ज्ञानप्राप्तीची अवस्था दाखवतात, असा बौद्ध धर्मातला अन्वयार्थ आहे. अशोकचक्र हे कायद्याच्या राज्यासाठीचे प्रतीक आहे. हा स्तंभ बांधला सम्राट अशोकाने इसवी सन पूर्व २५० मध्ये. कलिंगाच्या युद्धानंतर सम्राट अशोकाचे हृदयपरिवर्तन झाले. हिंसा हे उत्तर असू शकत नाही, हे त्याला पटले. अहिंसा आणि शांती हाच मानवासाठीचा योग्य मार्ग आहे, हे सर्वांनाच समजावे म्हणून त्याने हा स्तंभ बांधला. या अशोकचक्राच्या खाली देवनागरी भाषेत लिहिले आहे- सत्यमेव जयते ! हे ब्रीदवाक्य मुण्डकोपनिषदाच्या प्रेरणेतून घेतले आहे.
हेही वाचा >>> संविधानभान : ‘झंडा ऊंचा रहे हमारा’
गम्मत पहाः हा अशोकस्तंभ शोधला फ्रेडरिक ऑस्कर ऑर्टेल या ब्रिटिश माणसाने. त्यातून उलगडला बौद्ध धर्माचा प्रचार करणाऱ्या सम्राट अशोकाचा इतिहास. त्यावर लिहिले आहे मुण्डकोपनिषदातील वाक्यः सत्याचाच विजय होतो. ही स्वतंत्र भारताची राजमुद्रा असावी हे सांगतात तय्यबजी. हे भारताचे सौंदर्य आहे. सांस्कृतिक कोलाजातून या देशाचे, संविधानाचे चित्र तयार झाले आहे. म्हणूनच ही राजमुद्रा संविधानाच्या मुखपृष्ठावर आहे. संसदेच्या शीर्षभागी आहे. ही राजमुद्रा पारतंत्र्याकडून स्वातंत्र्याकडे जाण्याची निशाणी आहे. ती निशाणी आहे सार्वभौम गणराज्याची. वसाहतवादाच्या जोखडातून मुक्त होण्याचा जल्लोष ही राजमुद्रा सांगते. या मूळ राजमुद्रेवरचे सिंह आक्रमक नाहीत, ते शूर आहेत, नम्र आहेत आणि भारताच्या आत्मविश्वासपूर्ण वाटचालीचे द्योतक आहेत.
ज्या बद्रूद्दीन तय्यबजी यांनी राजमुद्रा ठरवली त्यांना पाकिस्तान सरकारने उच्च पदाची ऑफर दिली होती. अतिशय नम्रपणे ही ऑफर नाकारताना तय्यबजी म्हणाले होते की, मी निवडून आलो ते भारतात राहण्यासाठी. मुस्लीम लीगच्या धर्मांध फुटीरतावादी विचारांशी मी सहमत नाही म्हणूनच धर्मांध विचारांशी फारकत घेणाऱ्या आणि ‘आयडिया ऑफ इंडिया’ समजणाऱ्या तय्यबजींनी ठरवलेली राजमुद्रा २६ जानेवारी १९५० रोजी स्वीकारणे हा काव्यगत न्याय होता !
poetshriranjan@gmail.com