कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण रोखण्यासाठीच्या ‘विशाखा गाइडलाइन्स’चे मूळ भंवरी देवीच्या बालविवाहविरोधी लढ्यात आहे…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भंवरी देवी ही राजस्थानमधल्या जयपूरपासून साधारण पन्नासेक किलोमीटर दूर असलेल्या भटेरी गावातली बाई. राजस्थान सरकारच्या महिला विकास कार्यक्रमात ती काम करू लागली. महिलांवर अन्याय होऊ नये, यासाठी तिचे प्रयत्न सुरू होते. राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणावर बालविवाह होत असत. १९९२ साली गावामध्ये नऊ महिन्यांच्या मुलीचे एक वर्षाच्या मुलासोबत लग्न होणार होते. हे लग्न भंवरी देवीने रोखले; मात्र दुसऱ्याच दिवशी हा विवाह पार पडला. हे पोलिसांपर्यंत पोहोचले पण त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. भंवरी देवी मागास समजल्या जाणाऱ्या ‘कुम्हार’ जातीची आणि ज्या कुटुंबात हे लग्न झाले ते ‘गुर्जर’ जातीचे होते. या कर्मठ कुटुंबीयांनी भंवरी देवीवर सूड उगवण्यासाठी ती आणि तिचा पती शेतात काम करत असताना हल्ला केला. भंवरी देवीच्या नवऱ्याला काठ्यांनी मारहाण केली. नवरा बेशुद्ध पडला आणि पाच पुरुषांनी भंवरी देवीवर बलात्कार केला. न्यायालयात खटला उभा राहिला. त्यात आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न झाला. या घटनेला विषारी पितृसत्ताकतेचा आयाम होता. क्रूर जातव्यवस्था स्पष्ट दिसत होती आणि बालविवाहासारखी भीषण प्रथाही याला कारणीभूत होती.

हेही वाचा >>> पहिली बाजू : संघ राष्ट्रउभारणी करतो, राजकारण नव्हे!

न्यायालयात बरीच मोठी उलथापालथ झाली. आरोपींना निर्दोष सोडण्याचा प्रकारही घडला मात्र त्यानंतर ‘विशाखा’ या बिगर शासकीय संस्थेने जनहित याचिका दाखल केली. १९९७ साली याचिकेच्या सुनावणी प्रसंगी सर्वोच्च न्यायालयाने लैंगिक शोषणाच्या विरोधात मार्गदर्शक सूचना मांडल्या. ‘विशाखा गाइडलाइन्स’ या नावाने या सूचना प्रसिद्ध आहेत. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक शोषणाच्या मूलभूत प्रश्नाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाच्या या सूचना ऐतिहासिक ठरल्या. भंवरी देवी खटल्यात अनुच्छेद १४, १५, १९ आणि २१ यांमध्ये अभिप्रेत असलेल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाले असल्याचे न्यायालयाने मांडले. जगण्याचा हक्क मान्य करणाऱ्या अनुच्छेद २१ नुसार, लैंगिक शोषणाच्या विरोधात प्रत्येक व्यक्तीला हक्क आहे, असे निकालपत्रात म्हटले गेले. विशाखा गाइडलाइन्सचा आधार घेत २०१३ साली कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक शोषणापासून संरक्षणासाठी कायदा केला गेला. या कायद्यामुळे लैंगिक शोषणाची व्याख्या निर्धारित झाली. एवढेच नव्हे तर कार्यालयीन ठिकाणी लैंगिक शोषणाच्या विरोधात तक्रार करणारी एक समिती गठित करण्याची तरतूद झाली. त्यानुसार आता सर्व कार्यालयीन ठिकाणी अशी लैंगिक शोषणाच्या विरोधात तक्रार करण्यासाठी अंतर्गत समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. लैंगिक शोषणावर प्रतिबंध आणणे आणि त्या संदर्भातील तक्रारींचे निवारण करणे हे काम या कायद्यामुळे अधिक प्रभावी होऊ लागले.

एका नृशंस घटनेपासून ते हा कायदा संमत होण्यापर्यंतचा प्रवास समजून घेताना भारतीय समाजाचे वास्तव आणि न्यायालयीन लढाई या साऱ्याचे भान येते. जात-वर्ग-लिंग या तिन्ही कोनांमधून चिरफाळलेल्या समाजाचे विदारक चित्र लक्षात येते. भंवरी देवीच्या आयुष्यातील खऱ्याखुऱ्या घटनेवर ‘बवंडर’ हा सिनेमा बेतलेला आहे. बवंडरचा अर्थ होतो वादळ. समाजातल्या कर्मठतेच्या विरोधात भंवरी देवीच्या निमित्ताने वादळच निर्माण झाले. यातून एका मूलभूत हक्काला सुवाच्य अक्षरांत मांडले गेले. एकेक मूलभूत हक्क प्राप्त होत असताना, त्यासाठी काय किंमत द्यावी लागली आहे, हे लक्षात घेतले तर त्याचे महत्त्व समजू शकते. आज भंवरी देवी सत्तरीत आहे. जिचा बालविवाह झाला ती मुलगी तिशीत आहे. या मुलीला भंवरी देवीविषयी राग आहे, द्वेष आहे. भंवरी देवीविषयी या मुलीच्या मनात प्रेम कधी निर्माण होईल? भंवरी देवीला आजही न्याय मिळालेला नाही. तो तिला कधी मिळेल? हे होईल तेव्हा संविधानाचा विजय होईल!

कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण रोखण्यासाठीच्या ‘विशाखा गाइडलाइन्स’चे मूळ भंवरी देवीच्या बालविवाहविरोधी लढ्यात आहे… poetshriranjan@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian constitution vishaka guidelines against sexual harassment at workplace zws
Show comments