टी-२० क्रिकेट प्रकारातील पहिले जगज्जेतेपद भारताने पटकावले. या प्रकारातील पहिली खरी व्यावसायिक स्पर्धा भारतातच खेळवली जाते आणि ती क्रिकेटमधीलच नव्हे, तर क्रीडा क्षेत्रातील एक श्रीमंत आणि यशस्वी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. या पार्श्वभूमीवर भारताच्या आशिया चषकातील कामगिरीकडे पाहावे लागेल. गतवर्षी संयुक्त अरब अमिरातींमध्येच झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताला साखळी टप्प्यातच गाशा गुंडाळावा लागला. यावेळी स्पर्धा तुलनेने कमी तीव्र असताना, आपण साखळी टप्पा पार केला इतकेच. पण दुसऱ्या टप्प्यात पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्याशी पराभूत झालो. दोन्ही देश सध्या प्रचंड समस्याग्रस्त आहेत, तरी मैदानावर जिवाची बाजी लावत आहेत. तेच अफगाणिस्तानच्या बाबतीत. या देशातील क्रिकेटपटू मायभूमीला पारखे झाले असून, रोजच्या सरावासाठीही परदेशात राहावे लागते. त्यांचीही कामगिरी चांगलीच म्हणायची. भारत या सगळय़ांच्या तुलनेत खूपच सधन-सुस्थिर असल्यामुळे मैदानावर निराळी हुन्नर दाखवण्याची गरजच बहुधा पडत नसावी! आशिया चषक स्पर्धेत आपण गतविजेते होतो. परंतु प्रत्येक सामन्यात अव्वल ११ खेळाडूंऐवजी उपलब्ध ११ खेळाडू घेऊनच उतरण्याची सवय आपल्याला जडलेली दिसते. या स्पर्धेला आपण फार महत्त्व दिलेले नाही आणि आपले लक्ष्य ऑक्टोबर महिन्यात येऊ घातलेला टी-२० विश्वचषक आहे, असे कर्णधार रोहित शर्माच्या मुलाखतींमधून अप्रत्यक्ष सूचित झालेले आहे.
हे म्हणजे आम्ही मुख्य परीक्षेतच धडाका दाखवू नि बाकीच्या परीक्षांना सरावपरीक्षा मानू, म्हणण्यासारखे. पण सरावपरीक्षेतीलच पेपर मुख्य परीक्षेतच असणार, त्याचे काय? गेल्या काही वर्षांमध्ये मुख्य स्पर्धामध्ये अपुरी तयारी किंवा प्रयोगशीलता या चक्रातून आपण बाहेर पडायलाच तयार नाही. या स्पर्धेचे उदाहरण घ्यायचे झाल्यास, फावल्या वेळात काहीजण क्रिकेट खेळताहेत, काही जायबंदी आहेत, काही स्पर्धेदरम्यान जायबंदी होताहेत हे वारंवार दिसून येते. सुपर फोर टप्प्यात दोन पराभव, शेवटच्या षटकांमध्ये दोन पराभव, दोन्ही सामन्यांमध्ये प्रतिस्पर्ध्यासाठी आव्हानात्मक ठरेल, असे लक्ष्य उभारण्यातील अपयश, सुटलेले झेल, हुकलेले फटके- रोहित शर्मा, के. एल. राहुल, विराट कोहली, दिनेश कार्तिक, रविचंद्रन अश्विन यांच्यापैकी कोण खेळणार, हे निश्चित नाही. तेज गोलंदाजांपैकी मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरा हे जायबंदी आहेत, की त्यांना विश्रांती देण्यात आली आहे याविषयी धोरण नाही. सूर्यकुमार यादव, दीपक चहर, श्रेयस अय्यर आणि अगदी ऋषभ पंत यांचे संघातील स्थान निश्चित नाही. आपला संघ हल्ली कोणत्या कारणांसाठी चर्चेत असतो, तर झेल सुटलेल्या अर्शदीपला कसे खलिस्तानवादी म्हणून संबोधले जाते किंवा भारतीय क्रिकेट मंडळाचे सचिव जय शहा यांनी झेंडा फडकवण्याचे का नाकारले वगैरे. आखातातील वाळवंटात गेल्या दोन वर्षांत तीन स्पर्धा झाल्या. त्यांतील दोन होत्या आंतरराष्ट्रीय सांघिक स्पर्धा. एक होती आंतरराष्ट्रीय फ्रँचायझी स्पर्धा म्हणजे आयपीएल. आपल्याकडील बहुतेक खेळाडू जीव तोडून किंवा देहभान हरपून वगैरे कोणत्या स्पर्धेत खेळले याचा शोध घेण्याचा प्रयत्न जिज्ञासूंनी करून पाहावाच. त्यातून केवळ खेळाडूंचेच नव्हे, तर भारतीय क्रिकेट व्यवस्थेचे प्राधान्यही कशाला होते हे पुरेसे स्पष्ट होईल. हे प्राधान्य नजीकच्या काळात तरी बदलण्याची चिन्हे नाहीत.