पहिल्याच आंतरराष्ट्रीय दौऱ्यात, तेही ऑस्ट्रेलियाच्या, दोन अर्धशतके आणि एकदा सहा बळी… १९७१मधील संस्मरणीय इंग्लिश दिग्विजयात विजयी धावा फटकावण्याची मिळालेली ऐतिहासिक संधी… असे काही परमोच्च बिंदू असूनही सैयद आबिद अली यांची कसोटी कारकीर्द म्हणावी तशी फुलली नाही. १९६७ ते १९७४ अशा सातच वर्षांमध्ये त्यांना भारताकडून खेळण्याची संधी मिळाली. या काळात २९ सामन्यांमध्ये ४२.१२च्या सरासरीने ४७ बळी आणि २०.३६च्या सरासरीने सहा अर्धशतकांसह १०१८ धावा ही कामगिरी तशी माफकच. पण तंदुरुस्ती हा विषय ‘ऑप्शन’ला टाकण्याच्या काळात आबिद अलींनी देशातील सर्वांत चपळ क्रिकेटपटू असे नाव कमावले होते. त्यांनी एका सामन्यात आघाडीला जाऊन फलंदाजी आणि पहिली गोलंदाजीही केली. ते मध्यमगती गोलंदाज, पण त्यांच्या वेगात वैविध्य होते. खेळपट्टीचा वापर ते खुबीने करत, त्यांचे अनेक ‘आपटी’ चेंडूही उसळीऐवजी सरळ जाऊन फलंदाजांना चकवायचे. सलामीला येऊन त्यांनी काही खेळी साकारल्या, तरी ते खऱ्या अर्थाने मधल्या वा खालच्या फळीतील उपयुक्त फलंदाज म्हणूनच ओळखले जायचे. १९५०-६०-७०च्या दशकांत भारताला चंदू बोर्डे, विनू मांकड, पॉली उम्रीगर असे चांगले अष्टपैलू क्रिकेटपटू लाभले. आबिद अली त्या तोडीचे होते.

‘आबिद अली यांच्याकडे वेगवान धावपटूचे पाय, मॅरॅथॉन धावपटूची ऊर्जा आणि डेकॅथलॉनपटूची इच्छाशक्ती होती!’ असे वर्णन क्रिकेटला वाहिलेल्या एका संकेतस्थळाने केले, हे समर्पकच. ते अत्यंत चपळ क्षेत्ररक्षक होतेच, पण फलंदाजी करताना त्या काळाशी पूर्णपणे विसंगत असे त्यांचे वेगवान ‘रनिंग बिटविन दि विकेट्स’ म्हणजे दोन यष्टींदरम्यानचे धावणे होते. तेव्हाचे काही फलंदाज ज्याअवधीत एक धाव (रमत-गमत) पूर्ण करत, तेवढ्यात आबिद अली दोन धावा सहज काढू शकायचे.

कसोटी कारकीर्द अल्पकालीन ठरली, तरी स्थानिक क्रिकेट आबिद अलींनी गाजवले. ते हैदराबादकडून खेळत. हैदराबादने देशाला मुंबई, बडोद्याप्रमाणेच उत्तम क्रिकेटपटू दिले. टायगर पतौडी, अब्बास अली बेग, एम. एल. जयसिंहा, मोहम्मद अझरुद्दीन, व्हीव्हीएस लक्ष्मण इत्यादी. या यादीमध्ये एक झळाळते नाव आबिद अली यांचेही होते. त्यांचा खेळ पाहायला – फलंदाजी असो, गोलंदाजी असो वा निव्वळ क्षेत्ररक्षण – दूरदूरवरून क्रिकेटप्रेमी लालबहादूर शास्त्री स्टेडियमवर गर्दी करत. जयसिंहा, पतौडी, बेग यांच्यात एक नवाबी लहेजा होता. उलट आबिद अली सर्वसामान्यांना अधिक आपले वाटायचे, अशी आठवण हर्ष भोगलेंनी सांगितली आहे.

ते केवळ पाचच एकदिवसीय सामने खेळले. विसेक वर्षे नंतर क्रिकेटमध्ये आले असते तर उत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू ठरले असते, असे सांगणारे विश्लेषक आणि क्रिकेटप्रेमी असंख्य. मैदानावर चपळ, फलंदाजी आणि गोलंदाजीतली उपयुक्तता आणि संघासाठी वाट्टेल तो त्याग करण्याची तयारी, असा हा आदर्श खेळाडू. वेस्ट इंडिजविरुद्ध ऐतिहासिक मालिकाविजयाची वेळ आली, तेव्हा विजयी फटका मारण्याची संधी त्यांनी स्वत:ऐवजी पहिलीच कसोटी मालिका खेळत असलेल्या एका युवा फलंदाजाला दिली… त्या फलंदाजाचे नाव सुनील गावस्कर! असा जिंदादिल उमदेपणा ही आबिद अलींची चिरंतन ओळख. नुकतेच ते निवर्तले, तरी स्वत:पेक्षा खेळावर प्रेम करणारा नि संघाला प्राधान्य देणारा क्रिकेटपटू म्हणून ते अनेक वर्षे स्मरणात राहतील.

Story img Loader