सिद्धार्थ खांडेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारतीय फुटबॉलच्या प्रगतीपथावर नेहमीच दोन खडतर आव्हाने उभी  असतात. यातले पहिले आव्हान भारतीय क्रिकेटवेडय़ांचे आणि दुसरे भारतातील परदेशी फुटबॉलवेडय़ांचे! पहिल्या प्रकारातील मंडळी फुटबॉलला गिनतच नाहीत. दुसऱ्या प्रकारातले भारतीय फुटबॉलला मानत नाहीत. कॅनडा, चीन, न्यूझीलंड, अझरबैजान, कझाकिस्तान, एस्टोनिया असे एकतर आकाराने मोठे किंवा छोटय़ा आकाराचे समृद्ध देश आणि भारत यांच्यात फुटबॉलच्या बाबतीत साम्य म्हणजे, संसाधनसमृद्ध असूनही यांना फुटबॉलमध्ये आतापर्यंत काही भरीव करून दाखवता आलेले नाही. कॅनडा अधूनमधून विश्वचषक स्पर्धेत खेळातो तरी. न्यूझीलंड, चीन एकेकदा या स्पर्धेत खेळलेले आहेत. १९५० आणि १९६०च्या दशकात भारतीय फुटबॉलची वर्गवारी पहिल्या विसांत तरी सहज करता येऊ शकेल. नंतरच्या काळात मात्र काही प्रमाणात हॉकी आणि बऱ्याच प्रमाणात क्रिकेटमुळे देशातील फुटबॉलचा विकास मोजक्या राज्यांपुरता मर्यादित राहिला. आज या सगळय़ाची उजळणी करण्याचे मुख्य कारण म्हणजे, बऱ्याच अवधीनंतर भारतीय फुटबॉल संघाला माध्यमांमध्ये झळकण्याची संधी मिळाली. दक्षिण आशियाई फुटबॉल स्पर्धेमध्ये (सॅफ) अंतिम सामन्यात कुवेतवर भारताने विजय मिळवला. या स्पर्धेआधी भारताने किरगिझिस्तान आणि म्यानमार यांचा समावेश असलेली ट्राय-नेशन्स स्पर्धा जिंकली. या वर्षांत ११ सामन्यांमध्ये भारत अपराजित राहिला. सॅफ स्पर्धेसाठी लेबनॉन आणि कुवेत हे निमंत्रित संघ होते. लेबनॉनविरुद्ध उपान्त्य फेरीत आणि कुवेतविरुद्ध अंतिम फेरीत पेनल्टी शूट-आउटवर भारताने विजय मिळवला. सॅफ स्पर्धेत लेबनॉन आणि ट्राय-नेशन्स स्पर्धेत किरगिझिस्तान हे दोन संघ फिफा क्रमवारीत भारताच्या वर होते. ट्राय-नेशन्स स्पर्धेपूर्वी भारताचे फिफा रँकिंग होते १०६. दोन स्पर्धा जिंकल्यामुळे भारत १००व्या क्रमांकावर आला असून, लेबनॉन मागे ढकलला गेला. १०० वा क्रमांक ही आपली सर्वोच्च कामगिरी नव्हे. यापूर्वी २०१८ मध्ये भारत ९७ व्या क्रमांकावर होता. फिफाच्या संकेतस्थळावर भारताने कधी काळी ९४ व्या क्रमांकावर मजल मारल्याची नोंद आहे. पण अधिक तपशील आढळत नाही. आशियामध्ये आपण १८ व्या क्रमांकावर आलो आहोत.

युरोपिय क्लब फुटबॉल आणि विश्वचषक-युरो अशा स्पर्धातील फुटबॉलपटू आणि संघांना सरावलेल्या इथल्या बहुतेक फुटबॉलप्रेमींना कदाचित या क्रमवारीचे अप्रूप वाटणारही नाही. त्यांच्यासाठी जरा मागे जावे लागेल. फार लांब नाही, पण २०१४ मध्ये आपली १७१ व्या क्रमांकावर घसरण झाली होती. मग २०१५ मध्ये १६६ (त्या वर्षांतही आपण एकदा १७३ पर्यंत घसरलो होतो), २०१६ मध्ये १३५, २०१८ मध्ये ९७ अशी मुसंडी भारतीय संघाने मारली. याची फारशी दखल घेतली गेली नाही. २०१९ ते २०२३ एप्रिलपर्यंतच्या काळात भारतीय संघ १०४ ते १०८ दरम्यान हेलकावत होता. आता पाठोपाठच्या विजयांमुळे भारत पुन्हा एकदा शंभरीच्या उंबरठय़ावर उभा आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात थायलंडमध्ये किंग्ज कप स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत यजमान थायलंडसह भारत, लेबनॉन आणि इराक हे संघ सहभागी होतील. थायलंड फिफा क्रमवारीत ११३ वा आहे, तर लेबनॉन १०२वा. पण इराक ७० व्या स्थानावर असून, आधीच्या दोन्ही स्पर्धापेक्षा ही स्पर्धा त्यामुळेच भारतासाठी कसोटीची ठरेल. या स्पर्धेत चांगली कामगिरी केल्यास भारताला नव्वदीच्या उंबरठय़ावर पोहोचता येऊ शकेल. अशा प्रकारे क्रमवारीत वर सरकण्याचा एक फायदा म्हणजे, विश्वचषक आणि आशिया चषक स्पर्धासाठीच्या पात्रता फेऱ्यांमध्ये अधिक संधी मिळते. अशा प्रकारे गुणांच्या पै-पै कमाईची आणि इंच-इंच वाटचालीची नितांत गरज आहे. जागतिक स्तरावर काही संधी मिळण्याची शक्यता ही केवळ क्रमवारी सुधारल्यामुळेच वधारू शकते. यासाठी अधिकाधिक स्पर्धामध्ये सहभाग आणि अशा स्पर्धामध्ये चांगली कामगिरी हे अत्यावश्यक ठरते. 

कारण फुटबॉलप्रेमींच्या या देशात फुटबॉल खेळणाऱ्यांची वानवा आहे. दर विश्वचषक स्पर्धेत छोटय़ा देशांच्या विराट कामगिरीने आपले डोळे दीपतात आणि कित्येक क्षेत्रांमध्ये प्रगती करत निघालेल्या या देशाला फुटबॉलचे वावडे कशासाठी, ही भावना छळ करून जाते. पण व्यावहारिक विचार केल्यानंतर भावना ओसरू लागतात. या देशात फुटबॉलची संस्कृती कधीही रुजू शकली नाही. ईशान्येकडील राज्ये, पश्चिम बंगाल, केरळ, गोवा असे काही अपवाद वगळता, हा खेळ संपूर्ण भारत व्यापू शकला नाही. कारणे अनेक होती. इतिहासात डोकावण्याचे आता काही प्रयोजन नाही. १९५० मध्ये विश्वचषकात खेळण्याची एकमेव संधी आपल्याला चालून आली. पण आपल्या फुटबॉलपटूंच्या दर्जाविषयी आपल्या संघटनेलाच खात्री नव्हती! नंतरच्या काळात म्हणजे १९५६ ऑलिम्पिक किंवा त्या काळातील आशियाई स्पर्धामध्ये भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली आणि संघटनेची भीती अनाठायी ठरवली. परंतु स्वतंत्र भारतात सुरुवातीस हॉकी आणि नंतर क्रिकेटच्या समोर फुटबॉलचा नकाशा आक्रसू लागला हे वास्तव आहे. फुटबॉलसाठी आवश्यक असलेले वेग आणि ताकदीचे मिश्रण आपल्याकडील फुटबॉलपटूंच्या शारीरिक ठेवणीमध्ये नसते, असा एक सिद्धान्त आहे. भारतीयांमधील प्रथिनांच्या मर्यादित प्रमाणाचाही उल्लेख ‘परफॉरमन्स आउटपुट’संदर्भात केला जातो. विश्वचषकाचे सामने पहिल्यांदा १९८६पासून भारतात दिसू लागले. नव्वदच्या दशकात उदारीकरणानंतर येथे स्पोर्ट्स चॅनल्स वाढू लागले आणि विशेषत: इंग्लिश प्रीमियर लीगचे सामने तरुणाईवर भुरळ पाडू लागले. हे एक प्रकारे फुटबॉलकडील अंशत: फेरस्थलांतर म्हणता येईल. पण या ‘फॅनबेस’ला व्यवस्थेची चौकट आणि पुरस्कर्त्यांचे बळ म्हणावे तितके सुरुवातीला तरी मिळू शकले नाही. संघटनात्मक राजकारणाने हॉकीचे मातेरे केले आणि फुटबॉलसारख्या खेळाला विस्तारूच दिले नाही. तीच ती मंडळी वर्षांनुवर्षे क्रीडा संघटना चालवत होती. क्रिकेटमध्ये किमान मंडळाधीश काही वर्षांनी तरी बदलले जायचे. शिवाय मध्यम आणि उच्च मध्यमवर्गीयांमध्ये मुलांना इतर खेळांकडे पाठवण्यासाठी आवश्यक संधी आणि निधी असे दोन्ही उपलब्ध होऊ लागले. त्यामुळे फुटबॉलकडे वळणाऱ्या तरुणाईचे प्रमाण आणखी आटू लागले.

हे सगळे काही वर्षांपूर्वी बदलू लागले आहे. कोणत्याही खेळाचे बस्तान बसण्यासाठी त्या खेळाविषयीच्या आसक्तीइतकीच खासगी गुंतवणूकही आवश्यक असते. भारतात नवीन सहस्रकाच्या सुरुवातीस आय-लीगचा प्रयोग झाला. ही भारतातली अर्धव्यावसायिक फुटबॉल साखळी होती. खासगी कंपन्या आणि सार्वजनिक उद्योगातील बडय़ा कंपन्या असे हे मिश्रण होते. परंतु सार्वजनिक म्हणजे सरकारी कंपन्या नियमांची चौकट सोडायला तयार नाहीत आणि नियमांचे जोखड आम्हाला कशाला, असा खासगी कंपन्यांचा सवाल. या भानगडीत आय-लीगची झळाळी ओसरू लागली. अशा परिस्थितीत गतदशकात एका बडय़ा उद्योग समूहाने प्रचंड निधी ओतून इंडियन सुपर लीग (आयएसएल) सुरू केली. सुरुवातीला युरोप-दक्षिण अमेरिकेतील पहिल्या फळीतले पण पेन्शनीत गेलेले फुटबॉलपटू आणि तिसऱ्या फळीतले युवा फुटबॉलपटू आणण्याचा प्रयोग झाला. त्याला माफक यश मिळाले. यावेळी आय-लीग आणि आयएसएल अशा दोन समांतर लीग देशात सुरू होत्या. परंतु भारतीय फुटबॉल संघटनेने गडगंज निधी ओतणाऱ्या आयएसएलला प्राधान्य दिले. यातून आयएसएल ही भारतातली सर्वोच्च लीग आणि आय-लीग ही दुय्यम ठरली. या दोन्ही लीगची दखल आता कुठे घेतली जाऊ लागली आहे. पण एक वेळ भारतीय फुटबॉलला गर्तेत ढकलू शकणाऱ्या या घडामोडींनी अखेर फायदाच झाला. कारण फुटबॉलच्या गुणवत्ता क्षेत्राची व्याप्ती वाढली. दोन डझन संघांसाठी आवश्यक खेळाडू आणि सपोर्ट टीम्स असा पसारा वाढू लागला.

भारतीय फुटबॉल या सर्व घडामोडींमधून सावरलेले दिसते. कर्णधार सुनील छेत्री हे नाव घराघरांत पोहोचले आहे. भारतीय फुटबॉल प्रशिक्षक इगोर स्टिमॅच यांची आक्रमकता आणि आत्मविश्वास भारतीय फुटबॉलला वेगळय़ा वळणावर घेऊन जात आहे. अजून भरपूर शिखरे सर करायची आहेत. आता कुठे बेस कॅम्पवर आपण आलो आहोत. पण निदान वाटचाल तर सुरू झाली आणि ती आश्वासक दिसते हीच समाधानाची बाब.