बॅडमिंटन या खेळामध्ये भारतात पूर्वीपासूनच आंतरराष्ट्रीय दर्जाची गुणवत्ता दिसून येत होती. गेली काही वर्षे तर जागतिक आणि ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदकेही मिळू लागली आहेत. बॅडमिंटनप्रमाणेच टेबल टेनिस हा खेळही भारतात सर्वदूर पसरला, पण इतक्या मोठ्या प्रमाणात भारतात पदकविजेते निर्माण होऊ शकले नाहीत. याची कारणे अनेक. एक तर पूर्व आणि आग्नेय आशियाई देशांप्रमाणेच काही युरोपीय देशही या खेळात प्रावीण्य दाखवत असतात. शिवाय सरकारी व खासगी पाठबळ जितक्या प्रमाणात बॅडमिंटनला मिळाले, तितके ते टेबल टेनिसला मिळू शकले नाही हे आपल्याकडील वास्तव. कमलेश मेहता, इंदू पुरी अशी मोजकीच नावे आढळत. या पार्श्वभूमीवर अचंत शरथ कमलच्या कर्तृत्वाची दखल घ्यावी लागेल.

भारताचा आजवरचा सर्वांत प्रसिद्ध टेबल टेनिसपटू ही त्याची आजची ओळख. तो याच महिन्यात या खेळातून निवृत्ती घेत आहे. चाळिशी ओलांडूनही हा भिडू ज्या उत्साहात आणि ऊर्जेने खेळत होता, ते पाहता त्याच्या निवृत्तीच्या घोषणेने चाहत्यांना धक्का बसला खास. तरीदेखील कुठे तरी, कधी तरी थांबावे लागतेच. त्याच्या खेळाची सार्वत्रिक दखल त्याने तिशी ओलांडल्यानंतरच घेतली जाऊ लागली हा आपला करंटेपणा.

२००३मध्ये शरथ राष्ट्रीय विजेता बनला. त्या वेळच्या शिरस्त्याप्रमाणे एखाद्या राष्ट्रीयीकृत बँकेत किंवा सार्वजनिक उपक्रमात उत्तम पगाराची स्थिर नोकरी स्वीकारून किंवा कॉर्पोरेट दुनियेचा या खेळातला दिखाऊ कंड जिरवण्यासाठी एखाद्या मोठ्या कंपनीत कोचिंग वगैरे रुळलेला करिअर मार्ग त्याला सहज स्वीकारता आला असता. शरथची भूक मोठी होती, दृष्टी दूरची होती. त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली क्षमता जोखायची होती. त्यामुळेच परदेशात प्रशिक्षण घेणारा, परदेशात क्लब स्तरावर खेळलेला, आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंकलेला पहिला टेबल टेनिसपटू ही त्याची ओळख भारताला झाली. ‘डेटा’ आणि ‘नंबर्स’च्याच भाषेत कारकीर्द आणि कर्तृत्वाचे मोजमाप केल्या जाण्याच्या आजच्या विश्वात शरथची कारकीर्द तोकडी ठरत नाही. राष्ट्रकुल स्पर्धेत १३ पदके (सात सुवर्णपदके), आशियाई स्पर्धेत दोन कांस्यपदके (ही कामगिरी राष्ट्रकुल स्पर्धेपेक्षा अधिक मोलाची), पाच ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभाग (शेवटचे पॅरिस ऑलिम्पिक वयाच्या ४२व्या वर्षी) हा त्याचा आंतरराष्ट्रीय पट. त्याची कारकीर्द फुलू लागली तेव्हा म्हणजे नवीन सहस्राकाच्या पहिल्या दशकात भारतामध्ये निव्वळ ऑलिम्पिक सहभागाचे कवित्व संपुष्टात येऊ लागले होते.

मोजकीच, पण पदके मिळू लागली होती. क्रिकेटचा पगडा तर होताच. या परिप्रेक्ष्यात शरथ कमलच्या टेबस टेनिसमधील वाटचालीकडे दुर्लक्ष होणे किंवा तिचे अवमूल्यन होणे काही प्रमाणात स्वाभाविक होते. पण या ‘दुर्लक्षा’कडे दुर्लक्ष करणेच हितकारक हे शरथने ओळखले. तो परदेशात खेळत होता, प्रशिक्षकांशी बोलत होता. या अनुभवाचा फायदा भारतीय खेळाडूंना व्हावा यासाठी झटत होता. स्वत:च्या तंदुरुस्तीकडे पूर्ण लक्ष होते. तिशी, चाळिशी ओलांडत असतानाही उंचपुरा, सरळसोट, डोक्याला ‘बँडाना’ बांधलेला शरथ देशभर सुपरिचित होता. आज त्याच्या पावलावर पाऊल टाकत अनेक मुले या खेळाकडे वळू लागली, चमकू लागली. मनिका बात्रा, श्रीजा अकुला, दिया चितळे, मुखर्जी भगिनी अशी काही उदाहरणे. प्रतिकूल परिस्थितीत खेळून चमकणे आणि वारसा प्रसवणे या दोन्ही आघाड्यांवर त्याची कारकीर्द खणखणीत ठरली आहे.

Story img Loader